वाढीव टॅक्सी भाडय़ाला उमदा पर्याय ‘शेअर्डकॅब’ स्वस्त वातानुकूलित सेवेचा Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहरासह उपनगरातील स्वतंत्र तसेच भागीदारीतील टॅक्सी व रिक्षा प्रवासी भाडे वाढलेले असतानाच काही नियमित मार्गावर यापेक्षाही माफक किंमतीत आणि तेही वातानुकूलित वाहनाने प्रवास करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या वाढीव भाडय़ाच्या तुलनेत २० ते ४० टक्क्यांपर्यंत स्वस्तात हा पर्याय उपलब्ध झाला आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमधील कार्याचा अनुभव असलेल्या प्रकाश सिकारिया व  एन. व्ही. सुब्रमण्यन या द्वयींनी  ‘शेअरकॅबडॉटकॉम’ ही कंपनी स्थापन केली असून शहरातील वाहतूक कोंडीसह प्रवाशांना सोसावे लागणाऱ्या अतिरिक्त भाडय़ातून सुटका होण्यासाठी काही नियमित मार्गावर भागीदारीतील टॅक्सी सेवा सुरू केली आहे.
प्रती किलोमीटर ७.५० रुपये या सेवेसाठी आकारण्यात येत असून विशेषत: ‘कॉर्पोरेट’ स्तरावर ही सेवा खूपच लोकप्रिय ठरत आहे. सध्या वाढलेल्या रिक्षा तसेच टॅक्सीच्या दरांच्या तुलनेत ती स्वस्त आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा लाभ २०० वाहनांद्वारे आतापर्यंत ५ हजारांनी घेतला आहे. कंपनी ही सेवा सध्या टीसीएस, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, स्टॅण्डर्ड चार्टर्ड, जेपी मॉर्गन चेस आदी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना पुरविते. दक्षिण मुंबईत नरिमन पॉईंट, मध्य शहरात परळ आणि उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुल येथे ही सेवा प्राथमिक तत्त्वावर सुरू आहे. भागीदारी प्रवासात तीन ते चार प्रवाशांना एका वाहनाद्वारे सेवा पुरविली जाते. नजीकच्या दिवसात वाहनसंख्या वाढविण्याबरोबरच अधिक मार्गावरही ही सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती कंपनीचे सहसंस्थापक प्रकाश सिकारिया यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
बहुमूल्य इंधन बचतीबरोबरच एका फेरीमुळे ३ टन कार्बन डायऑक्साईडचे प्रदूषणही याद्वारे रोखले जाईल, शिवाय वाहतूक कोंडी, अपुरी वाहनतळ व्यवस्था, बस-रेल्वेतील गर्दी तसेच वाढलेल्या प्रवासी भाडय़ावर हा उमदा पर्याय ठरेल, असा दावा शेअरकॅबडॉटकॉमचे अन्य संस्थापक एन. व्ही. सुब्रमण्यन यांनी केला.    
शेअरिंग कसे?
या सेवेसाठी www.sharedcab.com या संकतेस्थळावर नोंदणी करून किंवा ७६६६०३००७७ या क्रमांकावर फोन करून आपला मोबाईल क्रमांक आणि प्रवासाचा तपशील कंपनीबरोबर ‘शेअर’ करावा लागेल. जेणेकरून नियमित एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्यांचे गट बनवून त्यांना या सेवेचा लाभ दिला जाईल.