ऊर्जा, नगरविकास व पायाभूत सुविधांवर येत्या आठवडय़ात तीन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
देशाच्या डळमळीत बनलेल्या आर्थिक विकासाच्या पाश्र्वभूमीवर अत्यंत जिव्हाळ्याच्या बनलेल्या ऊर्जा क्षेत्र, नगर विकास तसेच पायाभूत सोयीसुविधा या विषयांवरील तीन दिवसांच्या चर्चासत्राचे आयोजन येत्या आठवडय़ात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्राचे सामाजिक दायित्व विषयाला वाहिलेल्या ‘एशियन बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्क्लेव्ह (एबीआरसी-२०१२’चेही याच दरम्यान आयोजन होत आहे. या सर्व कार्यक्रमांचे संयुक्तपणे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री पथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२ रोजी होत आहे. यापैकी ‘पॉवर इंडिया’ आणि ‘कन्स्ट्रू इंडिया’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे यंदाचे हे १४ वे वर्ष असून, इंडिया-टेक फाऊंडेशनकडून त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘इंडिया-टेक एक्सलन्स अ‍ॅवार्ड २०१२’ या पुरस्कारांचेही वितरण केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने ऊर्जा व नगरविकासाच्या क्षेत्रात सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्याची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.