चालू वर्षांत १० हजार कोटींच्या ‘गृहवित्त’ व्यवसायाचे सेंट्रल बँकेचे लक्ष्य Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
मुंबई मुख्यालय असलेल्या राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विद्यमान २०१२-१३ आर्थिक वर्षांत रु. १०,००० कोटींच्या गृहवित्त व्यवसायाचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करण्यासाठी आखण्यात आलेल्या धडाकेबाज उपक्रमांद्वारे हे लक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या पुढाकाराने अलीकडेच ‘स्वप्न संकुल २०१२’ या गृहप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या प्रदर्शनादरम्यान बँकेने ५२५ गृहकर्ज प्रकरणात एकूण १७४.२४ कोटी रुपयांच्या कर्जाना ताबडतोबीने मंजुरी दिली आहे. प्रदर्शनाला मिळालेल्या उत्साही प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर, मार्च २०१३ पर्यंत या धर्तीची प्रदर्शने देशभरात १०० शहरांमध्ये आयोजित करण्याचा मानस सेंट्रल बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मोहन टांकसाळे यांनी व्यक्त केला. ३० सप्टेंबर २०१२ पर्यंत सेंट्रल बँकेच्या एकूण कर्जवितरणात गृहकर्जाचा वाटा रु. ६८०० कोटींचा असून, उर्वरित सहा महिन्यात आणखी ४००० कोटींचे वितरण करून वर्षअखेर रु. १०,००० कोटींच्या गृहकर्ज वितरणाचे लक्ष्य गाठता येईल, असा विश्वास टांकसाळे यांनी व्यक्त केला.