सीएनजीही महागला! Print

किलोमागे ८५ पैशांची दरवाढ
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
महानगर गॅस लिमिटेडतर्फे मुंबई तसेच ठाणे आदी भागात वाहनांना होणारा सीएनजी पुरवठा आता महागला आहे. कंपनीने बुधवार मध्यरात्रीपासूनच किलोमागे ८५ पैशांची दरवाढ केली आहे. याचा फटका मुंबईसह ठाणे, मीरा रोड-भाईंदर, नवी मुंबई-खारघर परिसरातील अडीच लाखांहून अधिक वाहनधारकांना बसणार आहे.
मुंबई शहरातील दर आता किलोमागे ३३.९५ पैसे, ठाण्यातील ३४.१२ रुपये झाले आहेत. हे दर अबकारी कर तसेच अधिभार जमेस धरून आहेत. एकूण उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे इंधनदरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीने प्रति किलो ८५ पैशांची केलेल्या दरवाढीचे प्रमाण २.५७  टक्के आहे. तर वाढीव सीएनजी दराचा प्रती किलोमीटरमागे ०.०२ ते ०.०९ पैसै परिणाम होणार आहे. कंपनीने यापूर्वी १८ फेब्रुवारी २०१२ रोजी इंधनदरात वाढ केली होती. तर ठाण्यात चालू महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढ लागू केली होती. कंपनीचे सीएनजी केंद्र यापूर्वी भिवंडी परिसरात नव्हते. येथे ही सुविधा महिन्याभरापूर्वीच सुरू झाली आहे. महानगर गॅस कंपनीची मुंबई, ठाणे, मीरा - भाईंदर, नवी मुंबई - खारघर व भिवंडी परिसरात १५२ सीएनजी केंद्रे असून सीएनजीवर चालणारी २.६० लाखांहून अधिक वाहने या भागात आहेत.    
विभाग    वाढीव दर    पूर्वीचे दर (रुपये प्रती किलो)
मुंबई    ३३.९५    ३३.१०
ठाणे    ३४.१२    ३३.२७
मीरा रोड-भाईंदर    ३४.३७    ३३.३३
नवी मुंबई-खारघर    ३४.२९    ३३.४१
भिवंडी      ---    ३४.९७