वित्तीय तूट ५.३% राखणारच! Print

अर्थमंत्र्यांचा ठाम विश्वास
पीटीआय, नवी दिल्ली
खर्चावर मर्यादा राखून आणि अधिकाधिक महसुली उत्पन्न मिळवून चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ५.३ टक्के राखली जाईल, असा ठाम विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केला. वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचे आव्हान असले तरी ते नक्कीच गाठण्यासारखे आहे, असाही त्यांनी दावा केला. वित्तीय सुधारणा सुचविण्यासाठी स्थापित डॉ. विजय केळकर समितीच्या ६.१ टक्के अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी केले जाईल, असाही अर्थमंत्र्यांनी दावा केला.  म्हणाले.
आर्थिक सुधारणा सुचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे आणि १३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिलेल्या डॉ. विजय केळकर यांनीही योग्य उपाययोजना न केल्यास चालू आर्थिक वर्षांत वित्तीय तूट ६.१ टक्क्यांवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. याअनुसरूनच केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दोनच दिवसांपूर्वी आर्थिक सक्षमीकरणाचा पंचवार्षिक आराखडा जाहीर केला होता.
यंदाच्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षांतील वित्तीय तुटीचे प्रमाण ५.१ टक्के अंदाजित केले गेले आहे. तर गेल्या आर्थिक वर्षांत हे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्याच ५.८ टक्के होते. सरकारने यंदा राखलेले ५.३ टक्के वित्तीय तूट राखण्याचे उद्दीष्ट हे आव्हानात्मक निश्चित आहे; मात्र ते गाठण्यासारखे आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. ते करण्यासाठी अधिकाधिक महसूल गोळा करणे आणि खर्चावर नियंत्रण राखणे यासारख्या उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले. देश सध्या सामना करत असलेल्या आर्थिक आणि वित्तीय संकटांची योग्यरितीने हाताळणी करण्यासाठी प्रसंगी राजकीय पक्षांचेही सहकार्यही हवे, अशी आवश्यकताही त्यांनी मांडली.
देशातील कर्जस्थिती सध्या सहन करण्यासारखी आणि मर्यादेत आहे. थेट विदेशी गुंतवणूक आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून देशात निधीचा ओघ मोठय़ा प्रमाणात वाढून चालू खात्यातील तूटही ७०.३ अब्ज डॉलपर्यंत खाली आणली जाईल, असेही ते म्हणाले. थेट विदेशी गुंतवणूक हा काही पर्याय नाही; मात्र चालू खात्यातील तूट करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, असेही त्यांनी सांगितले.