‘विप्रो’कडून बिगर-आयटी व्यवसायाला स्वतंत्र छत्र Print

पीटीआय, बंगळुरु
देशातील तिसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘विप्रो’ने आपला बिगर माहिती तंत्रज्ञान व्यवसाय एकत्र करण्याचे निश्चित केले आहे. यानुसार समूहातील विद्युत तसेच फर्निचर कंपनी, पायाभूत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय निराकरण उत्पादनांचा व्यवसाय ‘विप्रो एन्टरप्राईजेस’ या नव्या छत्रांतर्गत येईल.
भारताच्या १०० अब्ज डॉलरच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विप्रो समूहाचा मोठा व्यवसाय आहे. समूहाला मिळणाऱ्या एकूण महसुलात माहिती तंत्रज्ञान कंपनीचा हिस्सा ९० टक्क्यांहून अधिक आहे. या समूहाचा विप्रो कन्झ्युमर केअर अ‍ॅण्ड लाईटिंग (फर्निचर व्यवसायासह), विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग (पवन व जल व्यवसाय) व मेडिकल डायग्नोस्टिक प्रॉडक्ट्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस व्यवसाय आहे. या व्यवसाय पुर्नरचनेची माहिती कंपनीने गुरुवारी मुंबई शेअर बाजारालाही दिली. यातून कंपनीचे समभाग मूल्य ७ टक्क्यांपर्यंत उंचावले. दिवसअखेर ३ टक्के वाढीसह ते ३६१.४० रुपयांवर स्थिरावले. कंपनीचे बाजारमूल्य गुरुवारी एकाच दिवसात २,६०५ कोटी रुपयांनी वधारले.