‘हेगर’कडून दुपटीने महसूलवाढीचे बटन Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
विजेची बटने तसेच होम ऑटोमेशन उपकरणातील फ्रान्सच्या हेगर इलेक्ट्रो एसएएसची भारतातील उपकंपनी ‘हेगर इलेक्ट्रो प्रा. लि.’ने नव्याने गुंतवणूक करून आपला बाजारहिस्सा व अस्तित्व विस्तारण्यासाठी भारताची निवड केली आहे. महाराष्ट्रात पुण्यानजीक उत्पादन सुविधेत विस्तारासह २०१५ पर्यंत भारतातून एकूण महसुलात दुपटीने वाढ साधण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
मार्च २०११ अखरे जागतिक स्तरावर १.५५ अब्ज युरोची उलाढाल असलेल्या हेगरच्या महसुलात सध्याच्या घडीला भारतातील योगदान ३ ते ४ टक्के इतकेच आहे. परंतु हेगरच्या विकासासाठी भारतातून वाढते योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ‘प्रोजेक्ट २०१५’ या आपल्या धोरणात्मक आराखडय़ाची घोषणा करताना हेगर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बनोट लॅक्यूर यांनी सांगितले. एमसीडी आणि आरसीडीचे उत्पादन घेणाऱ्या पुण्याच्या प्रकल्पात २०१५ पर्यंत सुमारे १० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक, अनेकविध नवीन उत्पादने आणि त्यांचे वितरण जाळे मजबूत करून महसुलातही दुपटीने वाढ साधली जाईल, असे लॅक्यूर यांनी स्पष्ट केले.
व्हिडीओ डोअर फोन व्यवसायात निपुणता असलेल्या जर्मनीस्थित इलकॉम ही कंपनी हेगरने नुकतीच संपादित केली आहे. येत्या काळात भारतातही अशा प्रकारच्या कंपनीच्या अधिग्रहणाच्या संधींचा कायम शोध घेतला जाईल आणि त्यायोगेही व्यवसाय वाढ व बाजारपेठेतील उपस्थिती वाढविली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला हेगरची उत्पादने देशभरात २४ शहरात १७० व्यवसाय भागीदारांच्या माध्यमातून वितरीत केली जात आहेत.