श.. शेअर बाजाराचा : तुम्हीच ठरवा किंमत काय ती.. Print

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काही काही शब्द बोजड वाटतात. पण त्यातील अर्थ कितीतरी सोपा असतो. ‘बुक बििल्डग’ हा असाच एक शब्द जो आयपीओ प्रक्रियेत वापरला जातो. गुगल वेबसाइटवर  शोधले तर याचा अर्थ सांगणारी तसेच त्याची व्याख्या सांगणारी काही शेकडो पाने वाचायला मिळतील. व्यवहारात त्याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी कंपनी आयपीओ माध्यमातून जनतेला शेअर्स देऊ करीत असते त्या शेअरची किंमत तुम्हीच ठरवा असे गुंतवणूकदाराना सांगते!! अर्थात ‘तुम्हीच काय ती किंमत ठरवा’ इतके अमर्याद स्वातंत्र्य कंपनी देत नसते. काही मर्यादा घालून देते. त्या मर्यादेत राहून योग्य वाटेल ती किंमत लावून अर्ज करा असा त्याचा अर्थ असतो. ही मर्यादा असते त्यालाच म्हणतात ‘प्राइस बँड!’  उदाहरणार्थ रिलायन्स पॉवर लिमिटेड. जेव्हा आयपीओ आला होता तेव्हा त्याचा प्राइस बँड होता ४०५ ते ४५० रुपये. याचा अर्थ या दोन आकडय़ामधील कुठलाही दर लावून गुंतवणूकदार अर्ज करू शकतो. कुणाला ४०५ हा दर योग्य वाटेल तर कुणाला ४३५, तर कुणाला ४४२ वगरे. मात्र ज्या ज्या गुंतवणूकदाराना शेअर्स मिळणार आहेत (allotment) ते मात्र एका समान भावाने मिळणार. त्या समान भावाला म्हणतात ‘कट ऑफ प्राइस.’
हा विषय अगदी सोप्या शब्दात मांडतो. समजा रिलायन्स पॉवर कंपनी   आयपीओ प्रक्रियेद्वारे गुंतवणूकदारांना एकूण २५,००० शेअर्स देणार होती. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ज्याला ज्याला जो भाव (दर) योग्य वाटला त्यानुसार त्यांनी अर्ज केले व अर्जासोबत तेवढय़ा रकमेचा चेक जोडला. अशा प्रकारे एकूण १४३००० शेअर्ससाठी अर्ज आले. कंपनी शेअर्स देणार आहे २५,००० पण त्याहून जास्त शेअर्ससाठी अर्ज आले अशी स्थिती झाली की म्हणतात ‘इश्यू ओव्हर सब्स्क्राइब झाला’ असे म्हटले जाते. म्हणजेच सर्वाना शेअर्स मिळणार नाहीत. काही लोकांनाच मिळणार. ते भाग्यवान कोण हे ठरविण्यासाठी एक सूत्र निश्चित केले जाते त्याला ‘बेसिस ऑफ अलॉटमेंट’ असे म्हटले जाते.
आता कट ऑफ प्राइस कशी ठरते ते पाहू. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आलेले सर्व अर्ज  त्यात लिहिलेल्या शेअरच्या किंमतीनुसार चढत्या क्रमाने वर्गवारी करून घेतात. जास्तीत जास्त म्हणजे ४५० ची कमाल बोली लावून फक्त ४,००० शेअर्ससाठी अर्ज आले आहेत. म्हणजे भरणा पुरा झाला नाही. अशा वेळी कंपनी एक पाऊल मागे जाते. म्हणजे ४,००० अधिक ५,००० म्हणजे ९,०००. अजूनही भरणा पुरा होत नाही. आणखी एक पाऊल मागे! अधिक १०,००० अधिक ८,००० झाले २७,०००. म्हणजे भरणा पूर्ण झाला. ज्या रकान्यात भरणा पूर्ण झाला तिथे जो काही भाव गुंतवणूकदारांनी लिहिला असेल म्हणजे ४३५,  तीच कट ऑफ प्राइस समजली जाते. म्हणजे ४५० ची बोली लावून ज्यानी अर्ज केले असतील व त्यापकी ज्यांना शेअर्स मिळाले असतील (allotment) त्याना प्रति शेअर १५ रुपये परत मिळतील. ४०५ ची बोली लावून ज्यानी अर्ज केले होते त्यांचे अर्ज बाद झाले, त्यांनी भरलेले सर्व पसे परत मिळणार. मात्र पहिल्या रकान्यात दाखविल्यानुसार ८५,००० शेअर्ससाठी ‘कट ऑफ’ असे लिहून ज्यांनी अर्ज केले होते त्यांचे अर्ज विचारात घेतले जातील इतरांबरोबर. त्याचा फायदा असा की ४०५ ची बोली लावून ज्यांनी अर्ज केले त्यांचे अर्ज पहिल्या फेरीत फेटाळले गेले पण ‘कट ऑफ’ लिहून ज्यानी अर्ज केले त्यापकी काही जणांना शेअर्स मिळण्याची शक्यता आहे. समजा २०० शेअर्ससाठी ज्याने अर्ज केला असेल त्याला ५ शेअर्स तरी मिळतील. हे उदाहरण म्हणून सांगितले. ‘कट ऑफ’ असे लिहून अर्ज करू शकतात ते फक्त छोटे गुंतवणूकदार म्हणजे दोन लाख रुपयांहून कमी रकमेच्या शेअर्ससाठी अर्ज करतात ते. इतकी ही प्रणाली समजायला सोपी आहे. साठय़े महाविद्यालयाची विद्याíथनी गौरी माळी हिने  माझ्या एका कार्यक्रमात ही बाब नीट समजली नसल्यामुळे सर्वाच्या माहितीसाठी परत एकदा या विषयावर लिहावे अशी विनंती केली होती. हे सर्व विषय एकदा ऐकून कळावेत किंवा लक्षात रहाणे ही अपेक्षाच नाही. कारण अनेकजण आयुष्यभर  ज्ञानेश्वरी वाचतात तेव्हा कुठे रिटायर होताना थोडा थोडा अर्थ कळू लागतो ना!!