कार्पेट विस्तारण्याच्या तयारीत ‘इंटरफेस’ Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

कंपन्या तसेच हॉटेल, बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या गालिच्यांच्या निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या ‘इंटरफेस’ या बहुराष्ट्रीय कंपनीने आता भारतीय बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निश्चय केला आहे. उंची गालिच्याचा भारतातील वाढता वापर लक्षात घेऊन कंपनी पर्यावरणप्रेमी तसेच पुर्नवापराच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याच्याही तयारीत आहे. जागतिक पातळीवर आघाडीच्या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये समावेश होत असलेल्या इंटरफेस कंपनीचे सध्या भारतात दक्षिणेत मुख्यालय असून केवळ कार्यालये, दालने यांच्यामार्फतच येथील व्यवसाय क्षेत्रावर कंपनीचे नियंत्रण आहे. मात्र एकूणच भारतीय अर्थव्यवस्था तसेच हे क्षेत्र अधिक वेगाने विकसित झाल्यास नजीकच्या भविष्यात भारतातून गालिचे निर्मिती करण्यात येईल, असे संकेत कंपनीने दिले आहेत.
कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनिअल हेन्ड्रिक्स व भारतीय व्यवसाय विभागाचे (विक्री) वरिष्ठ उपाध्यक्ष रॉब बूगार्ड यांनी गुरुवारी मुंबईत निवडक पत्रकारांशी संवाद साधताना कंपनीच्या एकूण महसुली उत्पन्नात भारतासारख्या देशातून मोलाची भर पडत असल्याचे नमूद केले. ४० कर्मचारी संख्या असलेल्या या कंपनीचा वार्षिक व्यवसाय २ कोटी डॉलरचा असल्याची माहिती कंपनीचे भारतातील व्यवस्थापक राज मेनन यांनी दिली. कंपनीच्या उत्पादनांना माहिती तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्र, आदरातिथ्य व्यवसाय येथून मोठी मागणी असल्याचेही ते म्हणाले. जागतिक स्तरावर आपल्या उत्पादनांसाठी अमेरिका, युरोप ही वेगाने वाढणारी बाजारपेठ असल्याचे रॉब यांनी सांगितले. तर गेल्या वर्षांत ४ कोटी डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या इंटरफेसने यंदाच्या वर्षांत ३ कोटी डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरविले असल्याचे डॅनिअल म्हणाले. कंपनी पुर्नरचित माध्यमातून ८० टक्के तर जैव तंत्रज्ञानाच्या आधारे २० टक्के गालिचे उत्पादन घेण्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. कंपनीसाठी कच्चा माल म्हणून लागणारे मुख्य स्त्रोत भारतातून उपलब्ध केले जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कंपनीने भारतातील आपल्या व्यवसायास २००१ मध्ये सुरुवात केली होती. या कालावधीत कंपनीने ४०० ग्राहक कंपन्यांना ४८ लाख चौरस फूटांहून अधिक आकाराचे गालिचे पुरविले आहेत. यामध्ये गालिच्यांचे डिझाईन तयार करण्यापासून ते थेट गालिचे बसवून देण्यापर्यंतच्या पूरक व्यवसायाचा समावेश आहे. जगभरातील ११० देशांमध्ये कंपनीची उत्पादने विकली जात असून सहा निर्मिती प्रकल्प आहेत. भारतासाठी कंपनी तिच्या थायलंड प्रकल्पातून उत्पादन आयात करते.