दसरा पावला Print

नव्या वाहनांमुळे ऑक्टोबरमध्ये विक्री वाढली
पीटीआय, नवी दिल्ली

एकूणच नकारात्मक अर्थस्थितीमुळे विक्रीला घरघर लागलेल्या भारतीय वाहन उद्योगाला यंदाचा दसरा चांगलाच पावला आहे. ऐन खरेदीच्या या हंगामात नवनवीन उत्पादने सादर करणाऱ्या कंपन्यांची वाहन विक्री या कालावधीत तुलनेने वाढली आहे. महिन्याभर चाललेल्या कामगार आंदोलनाचा सामना करावे लागलेल्या मारुती सुझुकीने पुन्हा एकदा महिन्यातील एक लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठला आहे. तर महिंद्रने आजवरच्या इतिहासातील दुसरी मोठी मासिक वाहन विक्री नोंदविली आहे. दसऱ्याचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काही कंपन्यांनी नवीन वाहने  बाजारपेठेत उतरविली. या महिन्यातील पहिला पंधरवडा तर पितृपक्षाचाच होता आणि वाहनखरेदीसाठी असलेला दसऱ्याचा मुहूर्त १० दिवसांवर येऊन ठेपला असताना एकाच आठवडय़ात अर्धा डझन नवीन वाहने सादर करण्यात आली होती. यामध्ये मारुतीची अल्टो ८०० ते महिंद्राकडून रेक्स्टॉन आदींचा समावेश होता. या नव्या वाहनांनी कंपन्यांच्या ऑक्टोबरमधील विक्रीत लक्षणीय वाटा उचलला.  
‘सियाम’ या वाहन निर्मात्या कंपन्यांच्या संघटनेने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत, नव्या वाहनांचा विक्रीची नोंद नसली तरी चालू वर्षांत गेल्या काही महिन्यांमध्ये या क्षेत्राची सुमार कामगिरी पाहता यंदाच्या लक्षणीय वाहन विक्रीत याच वाहनांची मोलाची कामगिरी राहिली असल्याचे स्पष्ट होते. पदार्पणापूर्वी नवीन अल्टो ८०० ची २० हजाराने नोंदणी झालेल्या मारुतीचे हे वाहन ऑक्टोबरमधील अवघ्या काही दिवसातच ३० हजारांच्या वर गेल्याचे सांगण्यात येते. तर सॅन्गयॉन्गचे दोन भारदस्त एसयूव्ही प्रकारातील वाहने याच दरम्यान सादर करणाऱ्या महिंद्रने महिन्याला ५०० वाहन विक्रीची अपेक्षा        केली होती. नवीन वाहने आणल्याने ‘रेनो’ने ऑक्टोबर २०१२ मध्ये वाहन विक्रीत तब्बल ४० पट वाढ नोंदविली आहे.         
महिंद्रूची कामगिरी उंचावली; मारुतीला पुन्हा बहर
नव्या अल्टो ८०० सह एकूणच छोटय़ा आकारातील प्रवासी वाहनांनी मारुतीला पुन्हा एकदा विक्रीतील घसरणीच्या स्थितीतून बाहेर काढले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात नोंदविलेल्या ८५.४६ टक्के वाहन विक्रीतील वाढीतून एक लाख वाहन विक्रीचा टप्पा पार केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीची मासिक विक्री एक लाख वाहनांच्या आतच होती. अवजड, वाणिज्य वाहनांसह प्रवासी वाहन क्षेत्रात टाटा समूहाला कट्टर स्पर्धा देणाऱ्या महिंद्र अ‍ॅण्ड मिहद्रची वाहन विक्रीतील आगेकूच कायम आहे. केवळ प्रवासी क्षेत्रातीलच मारुतीची वाहनविक्री ९३.७५ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये ऑक्टोबरमध्येच बाजारात आणलेल्या अल्टो ८००ला मिळालेला प्रतिसादही नोंदला गेला आहे. तर स्विफ्ट, रिट्झ, इस्टिलोच्या कॉम्पॅक प्रकारातील वाहनांची विक्री दुप्पट झाली आहे. कंपनीच्या एसएक्स४ चीही दुप्पट, डिझायरची तिप्पट तर आलिशान सेदान श्रेणीतील किझाशीने तब्बल ११ पट विक्री वाढ नोंदविली आहे. एकूणच कंपनीचा मानेसर प्रकल्प पूर्वपदावर आल्याचा चांगलाच फायदा मारुती सुझुकीला झाला आहे.  ‘महिंद्र’ने ऑक्टोबरमध्ये २९ टक्क्यांच्या वाढीसह ५३,५०० पर्यंतची वाहन विक्री गाठली आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक विक्री नोंदविली होती. तो विक्रम या महिन्यातही कायम राखला आहे.     

नवे वाहन         कंपनी    विक्री वाढ
अल्टो ८००    मारुती सुझुकी    ८५.४६%
रेक्स्टॉन    महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र    २८.७४%
मान्झा, स्टॉर्म    टाटा मोटर्स    ६.७४%
ब्राओ    होन्डा    ४६%