रबरच्या स्वस्ताईचा फायदा; गोविंद रबरच्या तिमाही नफ्यात सहापटीने वाढ Print

मुंबई : अत्यावश्यक कच्चा माल रबरच्या किमतीत झालेली घसरण आणि उत्कृष्ट उत्पादन मिश्रण या परिणामी दुचाकी व तीन चाकी टायर्स व टय़ूब्सच्या निर्मितीतील अग्रेसर कंपनी गोविंद रबर लिमिटेडने उत्साहवर्धक तिमाही वित्तीय निकाल दर्शविले आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर २०१२ या आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीअखेर ७.१३ कोटी रुपयांचा करोत्तर नफा कमावला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीतील १.०१ कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल ६०६ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीची विक्रीही गेल्या वर्षीच्या ७८२३ कोटींवरून यंदाच्या तिमाहीत १०७.७५ कोटींवर गेली आहे. कंपनीचा सहामाही नफाही मागील वर्षांतील १.५५ कोटींच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल-सप्टेंबर सहामाहीत १०.०६ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीच्या देशभरात चार उत्पादन सुविधा असून, दहेज-गुजरात येथे नवीन प्रकल्पाकरिता मार्च २०१३ पासून सुरुवात होईल. चांगल्या वित्तीय कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर कंपनीची प्रति समभाग मिळकत ०.४६ रुपयावरून ३.२७ रुपये झाली आहे.