सेन्सेक्स-रुपयाही तेजाळला Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांच्या पुननिर्वडीचे देशातील भांडवली बाजार आणि स्थानिक चलनानेही स्वागत केले आहे. जवळपास शतकी वधारणेसह ‘सेन्सेक्स’ १८,९०० च्या पुढे गेला आहे. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाही ५४ च्या वर गेला आहे.
मुंंबई शेअर बाजाराने गेल्या पाच सत्रातील निर्देशांकातील वाढ बुधवारी सहाव्या दिवशीही कायम राखली. गेल्या सहा दिवसात सेन्सेक्सने ३८६ अंशांची भर घातली आहे. दिवसभरात सेन्सेक्स कालच्या तुलनेत १५६ अंशांनी वधारत १८,९७३.४३ पर्यंत झेपावला होता. दिवसअखेर मुंबई निर्देशांक १८,९०२.४१ वर बंद झाला असला तरी ५ ऑक्टोबर रोजीच्या १८.९३८.४६ या नजीकच्या उच्चांकापर्यंत तो आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५,७०० च्या पुढे असून आजच्या ३५.७० अंश वाढीमुळे तो ५,७६०.१० पर्यंत उंचावला. शेअर बाजार आता महिन्याच्या उच्चांकी टप्प्यांवर आहेत.
भारतीय चलन गेल्या आठवडय़ापासून सतत खाली येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया या दरम्यान ५५ पर्यंत खाली उतरला होता. मंगळवारी रात्री उशिरा ओबामा यांची अध्यक्षपदी निवड जाहीर झाली आणि रुपया सकाळच्या सत्रापासून डॉलरला वरचढ ठरत गेला. रुपया कालच्या ५४.४३ पासून दिवसअखेर केवळ २३ पैशांनी उंचावलाच नाही तर त्याने गेल्या दोन आठवडय़ातील सर्वात मोठी पैशातील वाढही नोंदविली.