साडेसात वर्षांच्या ‘छोटा हाथी’चे १० लाख सोबती Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

‘छोटा हाथी’ म्हणून तमाम वाहतुकदारांचा साथी बनलेल्या टाटा एसने गेल्या साडेसात वर्षांत १० लाख वाहनविक्रीचा अनोखा टप्पा पार केला आहे.मे २००५ मध्ये टाटा मोटर्सने टाटा एस हे छोटेखानी वाणिज्य वापरासाठीचे चारचाकी वाहन भारतीय बाजारपेठेत आणले होते. एक टन वजन वहन क्षमतेच्या वाहन विक्री क्षेत्रात त्याने कडवी स्पर्धा निर्माण केली. यानंतर दोन वर्षांनी कंपनीने याच ब्रॅण्डखाली चार चाकी प्रवासी वाहनही सादर केले. या दोन्हीची संख्या ऑक्टोबर २०१२ अखेर १०,५९,१३५ झाली आहे. यामध्ये देशात विकले गेलेल्या एसची संख्या ९,९७,१३३ आहे. विविध २४ देशात हे वाहन निर्यात होते. १० विविध प्रकारात हे वाहन उपलब्ध आहे. कंपनीचा आता या क्षेत्रात ८० टक्क्यांपर्यंतचा बाजारहिस्सा आहे.
एक लाख माल वाहतूक वाहनाचा विक्रमही एसने २०१० मध्ये नोंदविला होता. तर अवघ्या दोन वर्षांत ५ लाख वाहन विक्री पार केली गेली. कंपनीच्या पंतनगर (उत्तराखंड) येथील या वाहनाची निर्मिती क्षमता आता वार्षिक ५ लाख आहे.    
टाटा मोटर्स उंचावला
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील १०.५ टक्के वाढीचे आकडे बुधवारी जाहीर झाल्यानंतर टाटा मोटर्सच्या समभागाचे मूल्य आज दिवसअखेर ५.५२ टक्क्यांपर्यंत उंचावले. यामुळे कंपनीचे बाजारमूल्यही एकदम ४ हजार कोटी रुपयांनी वाढले. कंपनीचे बाजारमूल्य आता ७६,९२३ कोटी रुपये झाले आहे. ‘सेन्सेक्स’च्या दफ्तरी कंपनी समभाग २८४.१० रुपयांवर गेला होता. येथे तो ६ टक्क्यांपर्यंत उंचावला होता. तर ‘निफ्टी’वर त्याला ६ टक्के अधिक २८४.५० रुपयांचा भाव मिळाला. कंपनीच्या महसुलात ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा राखणाऱ्या जग्वार आणि लॅन्ड रोव्हरमुळे टाटा मोटर्सने ऑक्टोबरमध्येही जागतिक पातळीवर विक्रीतील वाढ नोंदविली होती. कंपनीचा हा मूळचा ब्रिटनचा ब्रॅण्ड चीनमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.