आनंदाचं खाणं : घडलंय - बिघडलंय!! Print

altवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , २ जून २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘सब चलता है’ म्हणून शरीर देत असलेल्या सिग्नल्सकडे आपण दुर्लक्ष करतो. मला राग येतो, मी मुडी आहे, म्हणून चालणार नाही. तुमचा आहार पडताळून पाहा. आहारातल्या फरकाने तुमच्या विचारात किती फरक पडतो ते पाहा. आजच्या तरुण पिढीने आपल्या आरोग्याक डे कसं पाहिलं पाहिजे त्या विषय़ी... ‘‘ए, मूडमध्ये नाहीस का आज?’’ किंवा ‘‘आज काय तुझा मूड बरोबर दिसत नाही’’ वगैरे रिमार्क्‍स आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. एक गोष्ट मला प्रकर्षांने जाणवली की आपण जेव्हा मोठे होतो (म्हणजे काही वयानंतर) मूड कसा आहे याचा विचार करायला कदाचित वेळ पण सापडत नाही. पण कॉलेजमध्ये असणारा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप या बाबतीत एकदम हुशार असतो. आपल्या ग्रुपमधला कोणी मित्र किंवा मैत्रीण दु:खी आहे अथवा चिडलेला आहे- हे चटकन लक्षात येतं आणि मग बिघडलेल्या मूडमागचं कारण शोधून ‘तो’ मूड बदलवायला वेळ लागत नाही. अर्थात, मित्र किंवा मैत्रिणीने मूड बदलवण्यासाठी केलेला प्रयत्न आपणही व्यर्थ जाऊ देत नाही. घरी काय? उगीचच का चिडचीड होतेय किंवा असा गप्प-गप्प का जेव्हा आई-बाबा विचारतात त्यांना काही थारा दिला जात नाही. (अपवाद आहेत) मग बिचारे आपले आपणच मीमांसा करत बसतात- काय बरं बिघडलंय?
विषय जास्त गहन न करता मित्र-मैत्रिणींनो, मन/ मनातील भावना/ कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलेला आपला प्रतिसाद आणि आपला आहार यांचा परस्परांशी काय संबंध आहे त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.
तुम्ही आपल्या शरीरात कार्यरत असलेल्या संदेश-वाहकांविषयी विज्ञानामध्ये ऐकलं असेलच. तर हे संदेश-वाहक (न्युरो ट्रान्समीटर) आपल्या शरीरात तयार होतात. आपण जे अन्न खातो त्यामधून म्हणजेच आपल्याला मिळणाऱ्या अन्न द्रव्यांमधून! शरीरामध्ये चांगले संदेश-वाहक बनवण्यासाठी काही आवश्यक ‘कच्चा माल’ पुरवावा लागतो.( उदा. प्रथिने टायरोसीन नावाचे) योग्य स्वरूपातील कबरेदके, फोलिक अ‍ॅसिड, कोलीन, सेलेनिअमसारखी अन्नद्रव्यं! म्हणजे ज्यावेळी उगाचच चिडचीड होते आहे किंवा अभ्यासात एकाग्रता होत नाही  किंवा अचानक कोणत्याच विषयामध्ये रस राहात नाही (नैराश्याची भावना) या सर्व क्रियांचा संदर्भ जसा आपण आपल्या आजुबाजूला घडलेल्या परिस्थितीशी लावतो तसाच तो आपल्या आहाराशीसुद्धा निगडित आहे ही गोष्ट लक्षात घ्या.
गेल्या आठवडय़ात माझ्याकडे एक कॉलेजला जाणारी मुलगी आली होती आपल्या आईबरोबर. तिची मुख्य तक्रार होती, वजन पटकन वाढतं. बोलता-बोलता आई म्हणाली की, ‘‘काही सांगितलं की रागपण पटकन येतो. काही बोलायचीच सोय नाही.’’ नेहमीप्रमाणे मी माझ्या प्रश्नाद्वारे तिचा आहार जाणून घेतला. त्याचबरोबर तिची झोपण्या-उठण्याची वेळ, तिची पचनाची स्थिती वगैरे आणि वजन वाढण्याच्या कारणाबरोबरच तिच्या ‘चिडण्याचं’ पण मूळ सापडलं आणि आहारामध्ये/जीवनशैलीमध्ये केलेल्या योग्य फरकाने एक महिन्यातच तिचं वजन हळूहळू कमी व्हायला लागलं आणि ‘चिडचिडेपणा’ खूप कमी झाला- इति आई. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ही काही जादू नाही. आहारामध्ये सातत्य ठेवणे जरुरी आहे. अभ्यासाचा/ परीक्षेचा ताण हा नेहमी असणारच, पण आहाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण शरीराला खूप ‘चालवून’ घेतो. म्हणजे भूक लागली तर न खाणं, भूक नसताना खाणं, चुकीचे पदार्थ खाणं, चुकीच्या वेळी/ पद्धतीने खाणं वगैरे वगैरे कारणं आपली प्रवृत्ती- ‘‘सब चलता है’’! म्हणूनच शरीर देत असलेल्या सिग्नल्सकडे आपण दुर्लक्ष करतो- ‘‘ठीक आहे मला राग येतो, मी मूडी आहे’’ म्हटलं की झालं? आजच आपला आहार पडताळून पाहा आणि आहारातल्या केलेल्या फरकाने तुमच्या विचारांमध्ये किती फरक पडतो ते बघा. सातत्य मात्र हवे.
मूड चांगला राहण्यासाठी आहारमंत्र :
- साखर, उत्तेजक पेय जसे कॉफी, चहा, अल्कोहोलयुक्त पेय इत्यादींचे अतिसेवन कधीही वाईट.
- रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दिवसातून तीन मुख्य खाणी (नाश्ता आणि दोन वेळचं जेवण) आणि तीन मधल्या वेळची खाणी घेणं योग्य.
- जीवनसत्व क, झिंक, फोलिक अ‍ॅसिडयुक्त पदार्थाचे सेवन करणे जेणेकरून ‘सेरोटोनीन’ संदेश- वाहक योग्य प्रमाणात बनून मूड छान राहू शकतो. उदा. आवळा, संत्र, मोसंबी, पालक, शेंगदाणे, पेरू, सूर्यफूल- भोपळ्याच्या बिया, सोयाबीन, अळशी, अक्रोड वगैरे.
- वजन कमी करण्याच्या नादामध्ये आहार एकदम कमी करणे अजिबात योग्य नाही. कारण कॅलरीज कमी केल्याने, वाढीसाठी शरीराला योग्य पोषणसुद्धा मिळत नाही. म्हणूनच आम्ही सांगतो की जर वजन कमी करायचं असेल तर महिन्याला दोन किलोपेक्षा जास्त करू नये आणि तेसुद्धा संतुलित आहार घेऊनच करावे.
- जर तुमचे मूड जास्तच बदलत असतील, तर तुम्ही एक युक्ती करू शकता. एका वहीमध्ये रोजची नोंद करून ठेवायची- काय खाल्लं, किती वाजता खाल्लं, कोणत्या गोष्टीमुळे आणि कोणत्या वेळी निगेटिव्ह मूड होता- रोजची नोंदवही ठेवली तर आहारामधील कमतरता आपल्यालाच ओळखता येईल आणि उत्तर सापडेल.
- कोणत्याही ‘स्ट्रेस फुल’ परिस्थितीमध्ये आपले ‘क्रेव्हिंग’ (खाण्याची तीव्र इच्छा ) कसे असतात याकडे लक्ष दिल्याने तणावपूर्ण परिस्थितीमध्ये (मुख्यत: परीक्षेच्या काळात) जर काही चुकीच्या खाण्याच्या सवयी असतील तर त्या बदललेल्याच बऱ्या. कारण त्यामुळे ‘स्ट्रेस’वरती उपाय होण्यापेक्षा आरोग्याला अपायच जास्त होतो. उदा. सतत काहीतरी खायला लागणे किंवा काहीही खायची इच्छा न होणे- दोन्हीही घातकच.
- काहीही खाण्याच्या आधी एक सेकंद विचार करा- आपण जे खातोय त्याने आपला मूड चांगला होईल की अजून बिघडेल. उदा. चहा/कॉफी प्यायल्याने आपल्याला तरतरीत वाटेल हा समज चुकीचा आहे, कारण चहा-कॉफीने शरीरातील पाण्याचे प्रमाण अजून कमी होते.
मूड ‘सांभाळणारे’ पदार्थ-
सोयाबीन, केळं, दही, तीळ, भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, चवळी, अळशी बिया, पॉलिश न केलेली धान्यं, डार्क चॉकलेट, बदाम, अक्रोड वगैरे + संतुलित आहार.
मूड ‘बिघडवणारे’ पदार्थ-
मैदायुक्त पदार्थ जसे ब्रेड, बिस्कीट, नूडल्स वगैरे, अतिसाखरेचे पदार्थ (गोड), प्रीझरवेटीव्ह घातलेले पदार्थ, अजिनोमोटो, कडक चहा/कॉफी, परत परत तापवलेल्या तेलातील तळकट पदार्थ, शिळे अन्नपदार्थ वगैरे.
आज आपण एक ‘हटके’ इडलीचा प्रकार शिकू या. हा पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये किंवा तुम्ही ‘लंच बॉक्स’मध्येसुद्धा घेऊन जाऊ शकता.
नाचणी इडली :
साहित्य : नाचणी पीठ- १-१/४ कप, उडीद डाळ- १/२ कप, वाफवलेले चवळीचे दाणे- २-३ टेबल स्पून, आलं-मिरची पेस्ट- चवीप्रमाणे, मीठ- चवीप्रमाणे.
कृती : उडीद डाळ २-३ तासांसाठी भिजवा. नाचणी पीठ १५ मिनिटांसाठी भिजवा. डाळ मिक्सरमधून वाटून घ्या. त्यामध्ये भिजवलेले नाचणी पीठ घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. नीट ढवळून ७-८ तासांसाठी उबदार जागेत झाकून ठेवून द्या. इडली पात्रामध्ये घालायच्या आधी त्यात  किसलेले गाजर, वाफवलेले चवळीचे दाणे आणि आलं-मिरची पेस्ट घाला. कूट चटणीबरोबर डब्यात द्या.
कूट चटणी :
तीळ, अळशी बिया, भोपळा बिया, लाल सुकी मिरची, जीरं, मीठ.
सर्व बिया सम प्रमाणात घेऊन थोडंसं भाजून घ्या. सर्व जिन्नस एकत्र करून चटणी तयार करा.
मित्र-मैत्रिणींनो, मी जे काही आत्ता सांगणार आहे तो ‘उपदेश’ न समजता एक ‘कानमंत्र’ समजा, जो तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यात नक्की कामाला येईल.
‘मेहनत जरूर करायची- शारीरिक आणि मानसिकसुद्धा! पण आपल्या जीवनशैलीचं संतुलन न बिघडू देता. आपली अपेक्षा असते न की आपण मनाने- शरीराने नेहमी तंदुरुस्त राहिले पाहिजे- मग त्यासाठी शरीर आणि मनाची काळजी घ्यायला शिका- योग्य आहार- विहारातून आणि असं आरोग्यवान आयुष्य घडवताना आपले मूड न बिघडवलेलंच चांगलं, नाही का?
कोणीतरी म्हटलं आहेच :
''Put  life into years and not years into life''!