आनंदाचं खाणं : ‘सुंदर मी होणार’ Print

वैदेही अमोघ नवाथे ,शनिवार ३० जून २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आहार आणि सौंदर्य दोन्ही परस्परांशी अतिशय संबंधित आहेत. ‘तूप खाल्ल्याने रूप येतं’ नुसतं म्हणण्यासाठी, पण शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक सौंदर्यासाठीचं आहारशास्त्र खूप गहन पण वापरासाठी तितकंच उपयोगी आहे. म्हणूनच ‘आंतरिक आरोग्य’ योग्य आहारानं कसं सुधारता येईल याविषयीचा आजचा लेख..
‘ता रुण्यपीटिका’ म्हणजेच चेहऱ्यावरील मुरूम - हा अतिशय नाजूक विषय. मुलगा असो वा मुलगी - वयाच्या १४-१५ वर्षांमध्येच चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमाबाबतीत खूप जागरूक असतात. जरा कुठे चेहऱ्यावर मुरूम दिसले की घरगुती उपाय - आईने सांगितलेले किंवा मित्र-मैत्रिणींकडून ऐकलेले- सुरू होतात. जाहिरातींचा पगडा असतोच. मग कोणतं क्रीम, कोणत्या कंपनीचं, किती रुपयांचं असं सगळं गणित समजावून घेऊन मग ते ‘ट्राय’ करायचं. आपल्या शारीरिक सौंदर्यावर सर्वच तरुण पिढी कमी-जास्त प्रमाणात लक्ष ठेवून असते. चला तर मित्र-मैत्रिणींनो, आज आपण थोडीशी ‘सौंदर्य-चर्चा’ करू या. बघा तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं सापडतात का?
सौंदर्य म्हटलं की ते दोन्ही प्रकारचं असतं- शारीरिक आणि मानसिक. शारीरिक म्हणजे आपला चेहरा आणि शरीरयष्टी. मानसिक म्हणजे मनाचं सौंदर्य. तुम्ही ऐकलं असेलच की चेहरा हा मनाचा आरसा असतो. म्हणूनच बाहेरील सौंदर्याबरोबरच मनाचं सौंदर्य जपणं खूप जरुरीचं आहे.
शारीरिक सौंदर्य विवंचना : सावळा रंग (?), चेहऱ्यावरील मुरुमे, चेहऱ्यावर अधिक प्रमाणात लव (मुलींमध्ये), निस्तेज त्वचा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, अकाली होणारे पांढरे केस, विरळ केस, केसामध्ये होणारा कोंडा, लवकर तुटणारी नखे, कमी उंची, अधिक शारीरिक वजन, वगैरे वगैरे.
मानसिक सौंदर्य-विवंचना : अस्थिर मन, तणाव, चिडचिडेपणा, निराशावाद, कमीपणाची भावना, चिंता, चढाओढीची वृत्ती वगैरे वगैरे.
आहार आणि सौंदर्य दोन्ही परस्परांशी अतिशय संबंधित आहेत. ‘तूप खाल्ल्याने रूप येतं’ नुसतं म्हणण्यासाठी, पण शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक सौंदर्यासाठी आहारशास्त्र खूप गहन पण तितकंच उपयोगी आहे. आज मी ‘आंतरिक आरोग्य’ योग्य आहाराने कसं सुधारता येईल याविषयी सांगणार आहे. बाहेरून त्वचेचा/ केसांना कोणते लेप लावायचे, जेणेकरून सौंदर्य निखरेल - हा सौंदर्यतज्ज्ञांचा विषय, आहारतज्ज्ञांचा नाही. म्हणून त्याविषयी न बोललेलेच बरे!
आहार, मन आणि सौंदर्य : माणसाचे शरीर ही एक रसायनशाळाच आहे. मानसिक ताणामुळे रसायनांचं संतुलन बिघडतं. आधुनिक काळामध्ये बऱ्याच रोगांचं मूळ या असंतुलनामध्ये आहे. मन आणि विचार यांनी राग, द्वेष, भय, मत्सर उत्पन्न होतात. एक गम्मत बघा- रागामुळे माणूस लाल होतो. शरीरामध्ये काय बदल घडतात- तर ग्रंथीमधून नवीन रस रक्तामध्ये पाझरतो. तो कंप पावतो. हृदयाचे ठोके वाढतात. पचनाची क्रिया बिघडते. झोपेवर परिणाम होतो. अशा वेळी योग्य-अयोग्याचा विचार न होता चुकीचा आहार घेतला जातो. आरोग्याचं संतुलन बिघडतं. मनाला विश्रांती न मिळाल्याने झोपेतही मनाचे कार्य चालू राहते. म्हणून झोपून उठल्यावरही थकवा जाणवतो. मित्रमैत्रिणींनो, आज दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, अ‍ॅनिमिया, मधुमेह, लठ्ठपण वगैरे सर्व रोगांचं मूळ या असंतुलनामध्ये आहे. आपले वैचारिक प्रक्षोभ/ भावनावेग यांचा रक्तप्रवाह, ग्रंथी, मज्जासंस्थावर परिणाम होतो आणि मी वर म्हटल्याप्रमाणे अनारोग्य मानसिक आणि शारीरिक सौंदर्य कसं देईल? तुम्ही योगासन करणाऱ्या साधकांची त्वचा बघितली असेल न? फेशिअल न करतासुद्धा त्वचेला कशी एक प्रकारची तकाकी असते!
मस्त पावसाळी वातावरण असताना एक कप वाफाळलेली कॉफी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर प्यायला छान वाटते न? पण जर हे सुख कॉफीमध्ये आहे तर दुसरा/ तिसरा/ चौथा कप प्यायल्यावर आनंद द्विगुणित झाला पाहिजे. पण तसं होतं का? नाही, कारण आनंद हा त्या कॉफीमध्ये नाही तर आपल्या मनाच्या स्थितीमध्ये आहे. जीवन ही कला, शास्त्र आणि विवेक यांचा संगम आहे. म्हणजेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य योग्य आहारातून सांभाळण्याची कला आपल्याला एकदा अवगत झाली की मग आपल्याबरोबरच आपलं जीवनसुद्धा सुंदर होईल!!
आहार आणि सौंदर्य
तेजस्वी त्वचेसाठी
त्वचा शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. निरोगी त्वचेसाठी खालील बाबी विचारात घ्या.
- भरपूर पाणी प्या. सतत एक पाण्याची बाटली जवळ ठेवली पाहिजे, जेणेकरून पाणी प्यायला ‘वेळच झाला नाही’ किंवा ‘विसरूनच गेलो’ असा प्रकार होणार नाही.
- अति साखरयुक्त पदार्थ जसे मिठाई, चॉकलेट, कोल्ड्रिंक्स, केक्स वगैरे प्रमाणाबाहेर किंवा रोजच्या आहारामध्ये खाऊ नयेत.
- तरुण मुलामुलींमध्ये ‘फास्ट फूड’ची फारच आवड असते, पण मैदायुक्त किंवा चोथाविरहित पदार्थाच्या अतिसेवनाने बद्धकोष्ठता होते आणि पचनावरती परिणाम होतो, जो आपल्या चेहऱ्यावर मुरूम आणण्यासाठी पुरेसा ओह!
- त्वचेच्या बाहेरील आवरणासाठी झिंक, व्हिटॅमिन ‘अ’ आणि ‘क’ तितकेच आवश्यक आहे. ही जीवनमूल्यं मिळविण्यासाठी आहारामध्ये विविध रंगांच्या भाज्या, फळे भरपूर प्रमाणात घेणे. आमच्या भाषेत सांगायचं तर - दिवसातून ५ म्हणजेच २ प्रकारची फळं आणि ३ प्रकारच्या भाज्या पूर्ण दिवसाच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे.
alt
- जर्दाळू, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे, पालक इ. झिंकयुक्त पदार्थ रोजच्या आहारामध्ये जरूर असू द्या.
- पटकन तुटणारी नखं किंवा चमचाच्या आकाराची नखं लोहाची कमतरता दर्शवितात. म्हणून बाजरी, गूळ, कुळीथ, अळीव, मनुका, अंजीर, मोड आलेली कडधान्ये इ. पदार्थ नेहमी खावेत आणि त्यातील लोह शरीराला मिळण्यासाठी जीवनसत्त्व ‘क’ युक्त पदार्थाचा समावेश करावा. उदा. उसळ + लिंबू, संत्र्याचा रस + अळीव, बाजरी थालीपीठ + आवळा लोणचं वगैरे. इथेसुद्धा निरोगी नखांसाठी खूप उपयोगी असतं.
- त्वचेवरील मुरुमांसाठी तेलकट पदार्थ आहारामध्ये नसावेत, पण योग्य प्रमाणात तेलबिया/ नट्स वापरले जावेत, जेणेकरून त्वचेतील/ केसांमधील आद्र्रता टिकून राहू शकते. उदा. अक्रोड, बदाम, विविध तेलबिया जसे शेंगदाणे, तीळ, अळशी, भोपळा, सूर्यफुलाच्या बिया वगैरे.
सलाड म्हटलं की नाकं मुरडली जातात, पण भाज्या तर भरपूर खाल्ल्या पाहिजेत. म्हणून मी विविध गटांमधील पदार्थ जे आहारामध्ये असणे गरजेचे आहेत त्यांचा तक्ता देते. मिक्स-मॅचच्या जमान्यामध्ये बघा, मित्र-मैत्रिणींनो सलाडसुद्धा भाज्या/ फळ मिक्स-मॅच करून तुम्ही किती मजेने खाऊ शकता.
चला तर मित्रमैत्रिणींनो सुंदर होण्यासाठी प्रयत्न सुरू करा- मनाने आणि शरीरानेसुद्धा.