आनंदाचं खाणं : आला पावसाळा, प्रकृती जपा Print

वैदेही अमोघ नवाथे , शनिवार , १४  जुलै २०१२
आहारतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाळा म्हटलं की आरोग्याची जरा जास्तच काळजी घ्यायला सांगितलं जातं. या काळात पचनशक्ती मंदावत असल्याने काय खावं आणि काय नाही हे सांगणारा लेख-
पावसाळा म्हटला की, डोळ्यांसमोर आणि आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी तरळून जातात. उदा. हवेतील गारवा, हिरवीगार झाडं, मस्त पाऊस पण त्याच बरोबर रस्त्यातील ट्राफिक जाम, खड्डय़ामधला प्रवास, भर वारा-पावसात छत्री- रेनकोट सांभाळीत न भिजण्यासाठी भिजत केलेली कसरत, कॉलेजला बुट्टी, समुद्राकाठी- नदीकाठी पावसात भिजत मारलेला फेरफटका, कट्टय़ावर बसून प्यायलेला वाफाळता कटिंग आणि गाडीवरची किंवा आईने स्पेशल बनवलेली भजी!!
‘आय हेट रेन्स’ असं म्हणणारा अरसिक विरळाच. पावसाळ्यातील सहलीचे- खाण्याचे जसे वेगवेगळे प्लान्स बनविले जातात तसंच या वर्षी पण बनवायचे. पण थोडंसं तब्येतीला सांभाळून. नाही नाही, मी काही उघडय़ावरचे पदार्थ खाऊ नका किंवा तेलकट खाऊ नका, असे सल्ले देणार नाही. कारण माझे सुज्ञ मित्र-मैत्रिणी ते जाणतातच. पण थोडंसं आरोग्याच्या दृष्टीने आहाराचे आपण मिळून काही प्लान्स बनवूया आणि मग बघा हा पावसाळासुद्धा आपल्या आयुष्यात किती बहार आणेल ते!
‘आषाढस्य प्रथमे दिवसे’ म्हणत नवीन ऋतूला-पावसाळ्याला सुरुवात होते. तुम्हाला एक सांगू- अगदी माझ्या लहानपणापासून  कालिदासाच्या या पंक्ती म्हणत माझे आई-पप्पा जणू काही ऐलान करायचे की चला आता मजाच मजा- उत्साहाचे, सणासुदीचे दिवस सुरू! वर्षऋतू म्हणजेच श्रावण आणि भाद्रपद महिने. आषाढ महिन्यापासून सणांना सुरुवात होते- वटपौर्णिमा, जगन्नाथ रथयात्रा, जन्माष्टमी ते थेट गणेश चतुर्थीपर्यंत. उन्हाळ्यात होणारी अंगाची लाही तर कमी होते, पण हवेत होणारे बदलपण बऱ्याच आजारांना निमंत्रण देणारे ठरतात. मग हे आजार तुम्हाला टाळायचे असतील आणि पावसाळ्याची मजा लुटायची असेल तर बघूया आहारात आणि आपल्या राहणीमानात काय बदल करायचे ते. सर्वप्रथम बदल का करायचे ते बघू या -
- पावसाळ्यात आपली पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. म्हणून अशा अन्नाचं सेवन करायचं जे पचायला सोपं जाईल.
- रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी होते आणि वारंवार सर्दी-खोकला/ क्वचित जुलाब, ताप येऊ शकतो. हवेतील बदल म्हणून आपण पावसाळ्याला दोष देतो, पण खरं कारण आपली मंदावलेली रोगप्रतिकारशक्ती आहे.
- ओलसर हवामानामुळे बॅक्टेरिया जरा जास्त प्रमाणात वाढतात आणि आपल्या जराशा हलगर्जीमुळे आजारांना निमंत्रण दिले जाते.
जीवनशैलीमध्ये हा बदल करावा
* अतिप्रमाणात झोप टाळावी. तुमच्या वयाच्या मुलांसाठी सात तास झोप पुरेशी आहे. दिवसा झोपणं जरूर टाळावं. रात्री उशिरापर्यंत जागून, सकाळी उशिरा उठण्यापेक्षा लक्षात ठेवा - ‘लवकर निजे, लवकर उठे त्याला विद्यासंपत्ती लाभे’ ही ओळ फक्त वाचण्यासाठी नाही. त्यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की, लवकर उठल्याने आपले गुड हार्मोन्स शरीरामध्ये कार्यरत होत असतात. त्यावेळी व्यायाम केला आणि योग्य नाश्ता केला तर शरीरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते ती पूर्ण दिवस एनर्जेटिक राहण्यासाठी कारणीभूत ठरते.
* भुकेपेक्षा थोडं कमी आणि पचायला सोप्पं असं खाणं खावं. कारण आपली पतनशक्ती मंदावलेली असते. म्हणूनच पुढे काही पर्यायी पदार्थ सुचविले आहेत जे पचायला सोपे आणि आरोग्य राखण्यासाठी पुरेपूर आहेत उदा. - साधा चहा/ कॉफी- हर्बल चहा किंवा धान्याची हर्बल कॉपी; सलाड - वाफवलेले मक्याचे दाणे; तळलेले पदार्थ - परतून केलेले चटपटीत पदार्थ.
* दमट हवामानामध्ये तहान जास्त लागत नाही म्हणून पाणी कमी प्यायलं जातं आणि जरुरीपेक्षा कमी पाणी प्यायल्याने पचनशक्तीवर अजून दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून थोडं थोडं करून दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी जरूर प्यावं. पाण्यासारखेच प्रवाही पदार्थ जसे भाज्यांचे सुप्स, डाळीचे पाणी, मूग, सूप, कुळीथ सूप वगैरे घेतल्यानेसुद्धा फायदा होतो.
४. दिवसभरातून कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करणं गरजेचं आहे.
५. पाणी उकळूनच प्यावे.
काही गरम गरम चटपटीत पावसाळी खाद्य प्रकार
हर्बल चहा
मेथी दाणे - १ छोटा चमचा
धने - १ छोटा चमचा
दालचिनी - १ छोटा तुकडा
बडीशेप - १/४ चमचा
सुंठ पावडर - १ चिमटी
लवंग - १
वेलची - १ किंवा २ पाकळ्या
तुळस/पुदीना/गवती चहा पाने - ५-६
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून पाच मिनिटे उकळा आणि गरम गरम चहाचा आस्वाद घ्या- रोगप्रतिकारशक्ती वाढवून!

पावसाळा स्पेशल सीख कबाब
बेसन - १/२ वाटी
तांदळाचं पीठ - १/४ वाटी
मक्याचं किसलेलं कणीस - १/४ वाटी
कोथिंबीर - बारीक चिरलेली
मीठ-मिरची-आलं वाटण - १ चमचा
लिंबू रस - १ चमचा
जीरं-धने पावडर -१ चमचा
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून थोडं थोडं पाणी घालत मुटकुळे वळतील असं पीठ भिजवा. १० मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर तीळ-कढीपत्त्याची फोडणी करून परतून घ्या किंवा चिमटय़ामध्ये एक-एक कबाब पकडून शेगडीवर भाजून घ्या. गरम गरम कबाब पचायला सोपे आणि खायलासुद्धा मज्जा.
कुळीथ सूप
कुळथाचं पीठ - २-३ चमचे
तूप - १/२ चमचा
जीरं - १/२ चमचा
हिरवी मिरची-आलं पेस्ट - १/२ चमचा
पातळ ताक - १ ग्लास
मीठ - चवीनुसार
कृती : तुपावर जिरं आणि पेस्ट परतून घ्यावी. कुळीथ पीठ लावलेलं ताक घालून उकळी आणावी. मीठ घालून गरम-गरम प्यावं.
मित्र-मैत्रिणींनो, आपल्या ग्रुपबरोबर पावसाळ्याची मजा लुटायला तुम्हाला आवडेल की पांघरूण घेऊन गादीवर झोपून औषधं खायला आवडतील? चला तर मग थोडं आहार-नियमांचं पालन करू या आणि हा पावसाळा आरोग्यदृष्टय़ा ‘एन्जॉय’ करू या!!