आनंदाचं खाणं : स्वातंत्र्य- आरोग्याचे Print

वैदेही नवाथे , आहारतज्ज्ञ - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आज आपण ‘शरीर-स्वातंत्र्य’ याविषयी जाणून घेऊया. आतापर्यंत मी लहान मुलांपासून तरुण पिढीपर्यंतच्या वाचकांसाठी विविध आहारयुक्त्या/ तक्त्यांविषयी लिहिलं आहे. आजपासून मी लिहिणार आहे आहाराविषयी- साधारण ३० ते ५० वयोगटातील वाचकांसाठी! आयुष्याच्या या टप्प्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला आघाडी मिळवायची असते. कारण आई-वडिलांवर अवलंबून नराहता आता प्रत्येक स्तरावर मग ते घर असो की कार्यालय, आपण सर्व दृष्टय़ा स्वतंत्र होण्याचा विचार करतो.
आज-कालच्या जीवनशैलीप्रमाणे आपण राहतो. म्हणजेच कधीही झोपायचं, कधीही उठायचं/ कधी अपुरी झोप तर कधी अति झोप/दिवसातून एक जेवण (कमीत कमी) बाहेरच होतं/ आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा घरच्या ‘किचन’ला सुट्टी!/ चायनीज- पंजाबी- चाटयुक्त अति तेलकट- तुपकट पदार्थ वरचे वर चवीने खाणे/ प्रोसेस्ड पदार्थाचा मारा/ शिळे पदार्थ/ फ्रीझरमध्ये ठेवलेले पदार्थ गरम करून खाणे/ मानसिक-शारीरिक तणाव आहेच/ एवढं सगळं करून ‘वेळ’ नाही म्हणून नाते-संबंधात पण तणाव आणि वर ‘स्पेशालिस्ट’कडे मारलेल्या चकरा/ औषधांचा मारा/ ‘हेल्थ-चेक-अप’ रुटीन आहेच. अरे काय चाललंय काय? आणि परिणाम काय तर आपल्या अवयवांना जखडून टाकणं.
अवयव जखडण्याने शरीरात वा शरीरावर होणारे दुष्परिणाम -
यकृत/लिवर - चरबीयुक्त यकृत
मेंदू/ब्रेन- अल्झायमर/विस्मरण
हृदय/हार्ट - ब्लॉक्स
आतडी/कोलोन - बद्धकोष्टता
त्वचा/स्कीन- विटामिन डीची कमतरता- अंग/हाडदुखी
नर्व ब्लॉक- पाय दुखणे (Claudication)
आरोग्य हे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे असायला नको. दिसायला सुबक, डौलदार, पण मुळात पोकळ. एक वाऱ्याची झुळूक आली की कोलमडून पडणारे. मी माझ्या सेमिनार्समध्ये नेहमी एक उदाहरण देते. आज ते तुमच्याबरोबर शेअर करते. बिल्डिंग उभारायची म्हटल्यावर सिमेंट, वाळू, विटा लागतातच, पण त्याच बरोबर लोखंडी सळ्यासुद्धा लागतात. यापैकी एक जरी गोष्ट नसेल तर पक्की इमारत कशी उभी राहणार? डिझेलच्या गाडीत डिझेल आणि पेट्रोलच्या गाडीत पेट्रोलच लागते, अदलाबदली करून चालत नाही. तसेच डिझेल/पेट्रोलचे प्रमाणही आपल्या मर्जीपेक्षा इंजिनच्या गरजेप्रमाणे लागते. गाडी चालवताना गाडी रिझव्‍‌र्हला आल्याशिवाय आपण पेट्रोल भरत नाही. तसंच आपल्या शरीराचा जरा विचार करा. शरीरसुद्धा एक मशीन आहे आणि अन्न म्हणजे इंधन. अन्न योग्य प्रकारचं आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केलं तर आपलं ‘मशीन’ न बिघडता चालू राहतं.
मूल एका आईला जन्म देतं. या तान्ह्य़ा बाळाकडून काय शिकण्यासारखं आहे? भूक असेल तेवढाच आहार घ्यावा. मग आई किती का प्रयत्नांची पराकाष्ठा करेना, तोंड गच्च बंद म्हणजे बंद. माझा मुलगा ऋषिकेश लहान असताना मला आठवतंय की अगदी एकच घास पानात उरला असेल तरी सगळ्या विनवण्या व्यर्थ! नाही म्हणजे नाही खाणार! आई म्हणून वाईट वाटतं, पण म्हणूनच बाळाची पचनसंस्था नियंत्रणात राहू शकते. मोठं झाल्यावर काय? जो पदार्थ चमचमीत दिसतो/वाटतो/लागतो तो खावा. मग भूक किती आहे/गरज आहे का/पोषणमूल्य काय मिळतात, याचा विचार करायला मेंदू कुठे रिकामा असतो? त्याच बरोबर आजकालच्या रॅट रेसमध्ये मुख्यत: ३ प्रकार प्रकर्षांने जाणवतात.
१. खाण्याच्या नियमित वेळा नाहीत.
२. जे मिळेल ते आणि ज्यावेळी मिळेल ते खावे. (फास्ट फूड)
३. भूक असताना वेळ नाही आणि भूक लागल्यावर पोषणयुक्त जेवण नाही.
थोडक्यात काय तर शरीरातील असंख्य पेशी ज्या सतत कार्यरत असतात त्यांना योग्य पोषण मिळणे जरुरी असते. जेणे करून शरीरात योग्य ऊर्जा उत्पन्न होऊ शकते आणि आपण तंदुरुस्त राहू शकतो. पण हेच काम जर झाले नाही तर शरीरात अनावश्यक चरबी साठू लागते, रक्तातील साखरेची पातळी सतत बदलत राहते, शरीरात विषद्रव्ये निर्माण होतात आणि या सर्वाचा दुष्परिणाम म्हणून वरकरणी छोटे वाटणारे आजार (बद्धकोष्ठता/ अपचन) भविष्यामध्ये मोठय़ा आजारांना निमंत्रण देतात.
म्हणूनच वाचक हो, आपण सतत आपल्या शरीरातील अवयवांना ज्या पद्धतीने परावलंबी करतो त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज जशी लोकसंख्या वाढते आहे, तंत्रज्ञान वाढते आहे, माणूस मंगळावर पोहोचला आहे, तसाच बऱ्याच शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रस्त आहे. शरीर आपल्याला सूचना करतं, पण जोपर्यंत रक्तातील वाढलेलं साखरेचं किंवा कोलेस्टेरोल ‘प्रमाणपत्र’ हातात येत नाही तोपर्यंत आपण ‘वेळ नाही’ या नावाखाली बिनधास्त असतो. आपलं आरोग्य हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. 'Disease reversal'  पेक्षा 'Disease prevention' कधीही चांगलं नाही का?

रक्त ‘जाड’ करणारे पदार्थ    रक्त ‘पातळ’ करणारे पदार्थ
मांसाहार    आलं, लसूण, कांदा (योग्य प्रमाणात)
चीज, बटर    लाल द्राक्ष (सालीसकट)
अति तेलकट आणि तुपकट पदार्थ    पातीचा चहा
दुधाची साय, खवा    विविध रंगांच्या भाज्या, विटामिन ‘सी’युक्त फळे
शर्करायुक्त पदार्थ    
    लवंग, जिरं, दालचिनी, हळद इ. मसाले

चला आज आपण आपल्या शरीरारोग्यासाठी एक ब्रीदवाक्य करूया आणि येणाऱ्या वर्षांसाठी त्याचं पालन करूया.
‘‘माझ्या आरोग्याची जबाबदारी ही फक्त माझी आहे. जे जे पदार्थ तामसी/राजसी प्रकारामध्ये मोडतात त्यांचे सेवन न करता मी सात्विक, घरी केलेले आणि देवाला अर्पण केलेलेच अन्न सेवन करीन. जेणे करून माझं मन आणि शरीर शांत आणि आरोग्यपूर्ण ठेवीन.’’
‘‘भुकेपेक्षा कमी खाणं ही प्रकृती,
भूक नसताना खाणं ही विकृती,
भुकेल्याला आपला घास देणे ही संस्कृती!’’
मूग कढी :
साहित्य- १ चमचा तेल, अर्धा चमचा जिरा, पाव चमचा मोहोरी, २ हिरव्या मिरच्या,
१ छोटा आल्याचा तुकडा, १ तमाल पत्र, १-२ लवंग, १ छोटा तुकडा दालचिनी,
हिंग-हळद- फोडणीसाठी, ताक- १ ग्लास, बेसन- १ चमचा, मोड आलेले मूग-
दोन चमचे
मीठ- चवीनुसार.
कृती : मोड आलेली उसळ वाफवून घ्यावी. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात बेसन लावलेले ताक घालावे. उकळ आली की उसळ घालावी. एक वाफ आणावी.