आनंदाचं खाणं :विकतचं दुखणं! Print

वैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ )
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मॉलमध्ये खरेदी करणं किंवा नुसतं फिरायला जाणं हासुद्धा अनेकांच्या आवडीचा भाग असतो, पण अनेकदा ‘टाइमपास’ म्हणून तिथले अनेक पदार्थ खाल्ले, विकत घेतले जातात आणि हे ‘विकत’चं अनारोग्य आपण घरी घेऊन येतो.
माझ्या गेल्या लेखाबद्दल (११ ऑगस्ट, ‘रात्रीचा दिवस’) अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण त्यातील एक प्रतिक्रिया मात्र खूप मनाला चटका लावणारी होती. ‘हीच लाइफ आहे. काय करणार?’ असं त्यांनी म्हटलं आहे. आपण चुकीच्या जीवनशैलीच्या आहारी गेलो आहोत ही चूक नाही, पण लक्षात आल्यावर त्यामध्ये सुधार न करणं ही चूक होऊ शकते. व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात  संतुलन आपण आत्ता साधू शकलो तर पुढच्या आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी आपण टाळू शकतो.
आज थोडसं आपण ‘मॉल संस्कृती’विषयी गप्पा मारू या. शनिवार-रविवारी कोणत्याही मॉलमध्ये गेल्यावर एक जत्रेचं स्वरूप दिसतं. तिथे आलेल्या लोकांपैकी किती तरी जणं ‘काय खरेदी करायचं’ ते ठरवून येतात आणि कितीजणं ‘सहज फेरफटका’ मारायला येतात आणि ‘काहीतरी खरेदी करून जातात हा एक विषय ठरू शकेल. मी काही मॉल संस्कृतीच्या विरुद्ध नाही, पण शेवटी मी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीनेच विचार करणार ना! ‘मॉलमधील खाद्य-खरेदी आणि आरोग्य’ चला याविषयी थोडं बोलूया, कारण जशी फॅमिली डॉक्टरची संकल्पना मागे पडून, स्पेशालिस्टची गरज आपल्याला लागते आहे तसाच आपला किराणेवाला पण कुठेतरी हरवून गेला तर?
खरेदी ‘मेनिया’
१) नवीन नवीन कोणते ‘प्रॉडक्ट्स’ बाजारात आले आहेत त्यांची प्रचंड उत्सुकता आपल्या प्रत्येकाला असतेच. टी.व्ही.वर जाहिरातीमध्ये बघितलेली प्रॉडक्ट लिस्ट आणि मित्र-परिवाराकडून मिळालेल्या टिप्स (स्वानुभावासहित) डोक्यात असतातच. त्यातच नवीन-चकचकीत वेष्टन असलेल्या गोष्टी अधिक आकर्षित करतात आणि ‘ट्राय’ करायला काय हरकत आहे म्हणून ट्रॉलीमध्ये सामावून जातात.
२) आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? भरपूर फिरल्यावर पिण्यासाठी लगेच पाणी सापडत नाही, पण ‘बेकरी/ फूड स्टॉल’ असतोच असतो जिथे बिलिंग करून तुम्ही लगेच खाऊ शकता. ४००-५०० कॅलरीज होतातच लगेच जमा शरीरात!
३) बिलिंग काऊंटरच्या बाजूला विविध कॅडबरीस/ चुइंगगम/ चिप्स असतातच- लाइनीत उभं राहून कंटाळा आला की, ‘सहज’ म्हणून घेण्यासाठी!
४) घरी नक्की काय हवंय याची लिस्ट नसल्यामुळे ‘उदार’ मनाने जे ‘चकचकीत’ दिसतंय ते घ्यायचं, पण बिल झाल्यावर मात्र ‘अरे, एवढं काय घेतलं आपण?’ हा प्रश्न येतोच. कारण कशावर काय फ्री आहे आणि किती टक्के सूट आहे हे बघण्याच्या नादामध्ये काही गरज नसलेल्या गोष्टीसुद्धा येऊन जातात.
आरोग्यासाठी शॉपिंग लिस्ट
१) अतिरिक्त चरबी आणि रक्तशर्करा नियंत्रणात आणण्यासाठी :
असे पदार्थ, ज्यामध्ये विरघळणारा चोथा आणि ‘प्लांट स्टेरॉल’चं प्रमाण जास्त असेल आणि कोलेस्टेरॉल/ साखर/ मैदाविरहित असतील या गोष्टी समाविष्ट कराव्यात.
उदा. विविध फळं (रस नाही), भाज्या, दही, तेलबिया वगैरे.
२) ऑक्सिडेशन होऊ न देणारे पदार्थ :
ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मोठे विकार जसे हृदयरोग/ कर्करोग आपण टाळू शकतो. उदा. लाल, जांभळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगांच्या भाज्या आणि फळे.
३) चोथायुक्त पदार्थ- पचन संस्था सुधारण्यासाठी उदा. बिन्स, पालेभाज्या, विविध बेरीज (स्ट्रॉबेरी वगैरे), सुका मेवा (काळ्या मनुका, अंजीर, जर्दाळू वगैरे), विविध कडधान्ये, ओट्स वगैरे.
४) अतिरिक्त मीठ (सोडियम) असलेले पदार्थ अतिरक्तदाबाला आमंत्रण देतात. उदा. कोणतेही ‘प्रोसेस्ड फूड’ पाकीट उघडा आणि खा- सारखे पदार्थ जरूर टाळा.
५) एनर्जी वाढवणारे पदार्थ-उदा. रताळं, टोमॅटो, सुका मेवा, अख्खी धान्यं, नट्स (शेंगदाणे/ काजू वगैरे), सोय दूध/ गायीचे दूध वगैरे.
एक खूप सोप्पी पद्धत आहे. मॉलच्या भूलभुलैयामध्ये न हरवण्याची! जुनीच पण नव्याने सुरू करण्यासाठी एक लिस्ट बनवायची ज्यामध्ये खालील गटातील अन्नपदार्थ समाविष्ट आहेत आणि त्याप्रमाणे खरेदी करायची. नवीन नवीन आकर्षित वेष्टनामध्ये असलेले पदार्थ बघायला चांगले, पण जर लिस्टमध्ये नसतील तर न घेतलेलेच बरे. नवीन गोष्ट/ पदार्थ घ्यायचा झाला तर लेबल वाचणे कधीही चांगले. जेणेकरून अति साखर/ चरबीयुक्त पदार्थ आणि चोथा/ सत्त्वविरहित पदार्थ घेतले जाणार नाहीत.
* धान्ये- हातसडीचा तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, कुळीथ, राजगिरा वगैरे
* डाळी आणि कडधान्ये
* सिझनल भाज्या आणि फळे (इम्पोर्टेड प्रकार गरज असले तरच घ्यावे)
* दूध- गायीचे/ सोयाबीनचे
* तेल/ तूप/ गूळ
* मसाले- आरोग्यदायी (जसे शाहजिरे, दालचिनी, ओवा, धने वगैरे)
* तेलबिया- शेंगदाणे, तीळ-काळे/ पांढरे, अळशी, अळीव, खोबरे वगैरे.
परवाच एका अमेरिकन स्थित आहारतज्ज्ञाशी माझ्या मधुमेहाच्या रिसर्चबाबतीत बोलणं झालं आणि त्यांच्याकडून एक विलक्षण पण गंमत वाटणारी गोष्ट कळली. परदेशामध्ये चुकीच्या आहार पद्धतीमुळे (रेडिमेड फूड्स) स्थूलता/ मधुमेह/ हृदयविकार/ अतिरक्तदाबसारखे विकार खूप जोमाने वाढत आहेत. म्हणून मॉलमध्ये फिरताना आहारतज्ज्ञ लोकांना ‘गाईड’ करतात- काय विकत घ्यायचे, लेबलमध्ये काय वाचायचं, काय विकत घ्यायचे नाही वगैरे. म्हणजे अन्न कसं शिजवायचं किंवा काय आणि किती खायचं याच्या आधी काय ‘विकत’ घ्यायचं हे अधिक महत्त्वाचं आहे.
जसं जहाज बुडायला एक छोटंसं भोक पुरेसं असतं तसंच घेतलेल्या छोटय़ा-छोटय़ा स्टेप्स जर अनारोग्याला कारणीभूत ठरत असतील, तर आत्ताच विचार केलेला बरा. पुढे जे होईल ते होईल हा विचार असेल तर मग बँकेमध्ये पैसे का ठेवायचे? आहेत ते संपवून का नाही टाकायचे? भविष्याचा विचार मनात येतोच ना? ‘विकतचं दुखणं घेण्यापेक्षा चला तर विकतंच आरोग्यच घेऊ या आपल्या सुनियोजित खाद्यखरेदीतून!’
सात बियांचं पाचक
शाहजिरा, ओवा, धना डाळ, काळे तीळ, पांढरे तीळ, अळशी, अळीव आपल्या आवडीप्रमाणे प्रमाणे. सैंधव- चवीप्रमाणे
कृती- सर्व पदार्थ खरपूस भाजून घ्यावेत. चवीप्रमाणे मीठ घालून आपल्या जवळ नेहमी ठेवावेत. जेवल्यानंतर १-१ चमचा चावून खावेत.