आनंदाचं खाणं : बिरबलाची ‘खिचडी’ Print

वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये,’ असं म्हणतात, पण प्रत्यक्षात आपण काय करतो? दुपारचं-रात्रीचं जेवण, सकाळ-संध्याकाळचा नाश्ता कसा असावा? याचं मार्गदर्शन..
खू प वर्षांनी  मला माझ्या कॉलेजच्या मिसची आठवण झाली. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण आम्हाला त्या ‘रिसोर्स मॅनेजमेंट’ हा विषय शिकवायच्या. अतिशय सुंदर इंग्लिश भाषा आणि विषय सोप्पा करण्याची पद्धत म्हणून त्या लक्षात राहिल्याच, पण उंच, सडसडीत बांधा, गोऱ्यापान आणि खूपच चटपटीत. वयाच्या ५५ व्या वर्षी- म्हणूनसुद्धा लक्षात राहिल्या. त्यांची आठवण काढायचं एक कारण म्हणजे पूर्ण इंग्लिश लेक्चरमध्ये त्या नेहमी एक हिंदी शब्द वापरायच्या- ‘चलता है..’ म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी १०० टक्के मेहनत घ्यायची आणि काही कारणाने ते काम पूर्ण झालं नाही/ काही अडथळे आले तर ‘चलता है..’ म्हणून सोडून द्यायचं. फार कमी लोक जिद्दीने काम पूर्णत्वाला नेतात. म्हणून ‘चलता है अ‍ॅटिटय़ूड’ आपल्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतो हे ती मिस खूप जीव तोडून सांगायची. अशी प्रवृत्ती आपलं काय नुकसान करते? आज दमायला झालं म्हणून व्यायाम नको, उशीर झाला म्हणून डबा न्यायच्या ऐवजी कॅन्टीनमध्ये खाल्लं तर चालेल. आजचा दिवस (?) डाएटचा विचार नको- जंक फूड खाऊया वगैरे वगैरे आणि मग हळूहळू ही सवय जडली की, मग ‘सब कुछ चलता है’ म्हणत अनारोग्याची एक एक पायरी चढायची. अर्थात याला अपवाद भरपूर आहेत. आजच्या धावपळीतसुद्धा आवर्जून व्यायाम करणारे, संतुलित आहार घेणारी बरेच मित्र-मंडळी आहेत.
तर आज आपण बोलणार आहोत काही ‘डाएट संकल्पनांविषयी’ ज्या हळूहळू अशा प्रकारे रूढ होत चालल्या आहेत की, नक्की चूक काय आणि बरोबर काय तेच कळत नाही आणि मग हे पण चालेल आणि ते पण चालेल म्हणून आपल्या सोयीप्रमाणे आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची आहार-योजना केली तर बिरबलाची (आरोग्याची) खिचडी शिजणार कधी?
काही प्रचलित डाएट (?) संकल्पना :
१. नाश्ता : भरपूर खावा/ खाऊ नये/ भूक नाही/ सवय नाही/ सगळी कामं आटोपल्यावर खावा (आंघोळ/पूजा वगैरे)/ रात्रीचं उरलेलं अन्न (भात/चपाती) चालते/ ब्राऊन ब्रेड टोस्ट/ ओट्स/ बिस्किट्स- चांगले ऑपशन्स.
खरं काय?
आपल्या शरीराच्या घडय़ाळाप्रमाणे आपण रात्री झोपायला पाहिजे, कारण त्या वेळी आपल्या शरीरातील विविध अवयव जसे किडनी/ लिव्हर वगैरे ‘शरीर-स्वच्छतेचं’ काम करीत असतात आणि यामध्ये आपल्या शरीराची एनर्जी वापरली जाते. म्हणून सकाळी उठल्यावर मलविसर्जन क्रिया सर्वप्रथम व्हायला हवी आणि उठल्यानंतर साधारण दोन तासांच्या आत नाश्ता करायला हवा. या ‘घडय़ाळाला’ उलट चावी दिली गेली तर ‘बिघाडच’ अपेक्षित आहे. नाश्त्याचं प्रमाण आणि प्रकार प्रत्येकाच्या भुकेप्रमाणे आणि सवयीप्रमाणे ठरेल, पण नाश्ताच न करणं हे उचित नाही.
२. दुपारचं जेवण स्किप केलं तर हलकं वाटतं/ वजन कमी होतं/ ज्यूस-सँडविचसारखं काही तरी खाल्लं तरी पुष्कळ होतं/ जेवायला वेळ नसतो/ फिरतीचा जॉब आहे किंवा ट्रेनने प्रवास करायचा तर घरून डबा नेणं कठीण आहे.
खरं काय?
दुपारी साधारण १२-१ च्या सुमारास आपला जठराग्नी उद्दीप्त होतो आणि त्या वेळी संतुलित/पूरक आहार ‘आहुती’ म्हणून घेणं गरजेचं असतं. हवन करते वेळी गुरुजी तूप का वापरायला सांगतात? मीठ/ साखर/ गूळ का नाही? तुम्ही म्हणाल, काय वेड लागलंय का? तुपाशिवाय अग्नी कसा तेवत राहील? मग ज्या वेळी ‘पूरक आहाराची’ गरज आपल्या जठराग्नीला असते त्या वेळी निकृष्ट अन्न (सँडविच/ पाव-भाजी/ चायनीज पदार्थ) खायला काय वेड लागलंय?
३. संध्याकाळचं खाणं म्हणजे काही तरी सटरफटर खायचं. चिवडा/ फरसाण/ बिस्किट्स अगदीच झालं तर नूडल्स/ वडा-पाव/ शेवपुरी/ सँडविच वगैरे वगैरे, कारण खूप भूक लागलेली असते आणि रात्रीचं जेवण उशिरा- रात्री १० नंतर असतं. मग तोपर्यंत उपाशी कसं राहणार?
खरं काय?
संध्याकाळी खूप भूक लागते जर नाश्ता किंवा दुपारचं जेवण व्यवस्थित नसेल झालं तर! आणि ही वेळ धोक्याची ठरू शकते, कारण दिवस संपत आलेला असतो. चुकीचे पदार्थ जे नक्कीच रोज रोज खाल्ल्याने आरोग्याला अपायकारक ठरू शकतात. मग काय करायचं? एक छोटा ‘खाऊचा डबा’ आपल्याजवळ नेहमी असावा, ज्यामध्ये चिक्की, घरचा चिवडा, खाकरा, लाह्य़ा वगैरे पदार्थ ठेवू शकतो, जे दोन जेवणांमधील वेळ भरून काढतील आणि रात्रीचं जेवण प्रमाणात होईल.
४. रात्रीचं जेवण म्हणजे एक पर्वणीच असते. कामं आटोपलेली असतात, आपण आपल्या कुटुंबाबरोबर असतो आणि हे एकच जेवण घरी आरामात खाऊ शकतो म्हणून ‘व्यवस्थितच’ खायचं!
खरं काय?
रात्रीचा आहार नेहमी हलका हवा, कारण आपण ज्या वेळी झोपतो त्या वेळी वर सांगितल्याप्रमाणे पेशी नव्याने (१ी्न४५्रल्लं३्रल्ल) बनत असतात आणि शरीराची सर्व ताकद पचनासाठी लागली तर सकाळी उठल्यावर ‘फ्रेश’ वाटणारच नाही आणि हो, ज्या वेळी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकर जेवलं तर चांगलं. रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये २-३ तासांचं अंतर हवं.
आपले पंच आहारशत्रू : (अति प्रमाणात घेतले तर)
१. साखर
२. मीठ
३. मैदा
४. तेल/ तूप/ बटर/ चीज
५. प्रक्रिया केलेले पदार्थ
यांच्याविषयी आपण पुढील लेखामध्ये बोलूच, पण एक मात्र नक्की की, या पदार्थापासून जरा जपूनच राहिलेले बरे!
आजकाल ‘लाइफ स्टाइल’ हा शब्द म्हणजे एक ‘फॅशन आयकॉन’ बनला आहे. मधुमेह/ लठ्ठपणा/ अतिरिक्त दाब/ हाय कोलेस्टेरोल वगैरे आजार हे आपल्या शरीराचा/ आयुष्याचा एक भाग बनले आहेत. बाकी काहीही असो, आपली सहनशक्ती मात्र जबरदस्त वाढली आहे. त्यामुळे ‘या’ आजारांना आता आपण आजार मानतच नाही. भरीस भर म्हणून कॅन्सर/ टी.बी./ प्रेग्नन्सीमधील मधुमेह/ सी.ओ.पी.डी./ पित्ताशयामधील स्टोन/ डिप्रेशनसारखे आजार आता डोकं वर काढू लागले आहेत. एवढी पण सहनशक्ती काय कामाची? कुठे काय चुकत आहे? जरा आपलीच पडताळणी करून पाहा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, ‘जगण्यासाठी खावे- खाण्यासाठी जगू नये!!’
आरोग्य खिचडी
दलिया- १ कप
सालाची मुगडाळ- २ चमचे
चणाडाळ- २ चमचे
राजमा/ मूग/ चवळी/ कुळीथ- भिजवलेले- २ चमचे
ओट्स- १ चमचा
चिरलेल्या भाज्या- १/४ कप (दुधी/ भोपळा/ पालक/ गाजर/ फ्लॉवर/बीन्स वगैरे)
गरम मसाला/ सांबार मसाला- १ चमचा,धने-जिरे पूड २ चमचे
कोथिंबीर- कढीपत्ता- आलं- मिरची पेस्ट- १ चमचा
तूप आणि फोडणीचे साहित्य- गरजेनुसार
सर्व जिन्नस एकत्र करून तिप्पट पाण्यामध्ये शिजवा. (कुकरच्या ३ शिट्टय़ा) वरून तुपाची फोडणी द्या.
(ही खिचडी नक्कीच लवकर शिजते आणि आरोग्यदायी देखील आहे.)