आनंदाचं खाणं : आजारपण महागच Print

वैदेही अमोघ नवाथे , आहारतज्ज्ञ ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आजारपण नेहमीच खर्चात टाकणारं असतं. त्यामुळे ते टाळलेलंच बरं. आजारपणापेक्षा स्वस्त पडतं ते आरोग्यदायी जगणं. मात्र त्यासाठी एकच करावं लागेल की आपल्या पाच आरोग्यशत्रूंना टाळायला हवं. कोणते हे आरोग्यशत्रू?
लहान असताना आमची एक मोठ्ठी ‘टोळी’ होती. मी, मिनू, स्वाती, स्मिता, योगेश (टोपण नावं न लिहिलेलीच बरी) आणि अजून खूप जण! संध्याकाळी ५ ते ७ च्या मध्ये खेळण्याव्यतिरिक्त (हुंदडण्याव्यतिरिक्त) अजून काही काम नसायचं. लगोरी/ डब्बा-ऐसपैस/ कोणी टिचकी मारून जावे/ टिक्कर आणि असे बरेच काही खेळ! त्या वेळी प्रत्यक्ष खेळण्याचा वेळ थोडा आणि कट्टीबट्टीचा वेळ जास्त असायचा. अचानक लहानपणीचा खेळ आठवण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी मी नवीन नवीन रुग्ण बघते त्यावेळी बऱ्याच वेळा मनात विचार येतो- अरे याला/ हिला हा आजार का झाला? मग इतक्या लहान वयामध्ये पित्ताशयाचा खडा असू दे/ वाढलेला रक्तदाब किंवा पूर्ण शाकाहारी निरोगी व्यक्तीला अचानक कर्करोग झालेला असू दे. लहान वयात इतके गंभीर आजार होणं वाईटच.
कोणत्याही आजाराचं मूळ कारण शोधायचा प्रयत्न केला तर दर वेळी उत्तर सापडतंच असं नाही. म्हणून एक आहारतज्ज्ञ या नात्याने आहाराशी निगडित कुठेही माझा रुग्ण चुकत असेल- मग तो निरोगी असो वा आजारी- त्याला योग्य मार्गदर्शन करणे हे माझं कर्तव्य आहे हे मी समजते. म्हणूनच फक्त ‘आरोग्य तपासणी’चा रुग्ण जर तंबाखू खात असेल तर त्याला तंबाखूपासून परावृत्त करणे जरुरी असते- तो अगदी आत्ता निरोगी असेल तरीही! म्हणूनच तुम्हाला काही आजार असो वा नसो मी तुमच्याशी संवाद साधते आहे तो तुम्ही कायम निरोगी राहावेत म्हणून. त्यासाठी आहारातील काही आरोग्यशत्रूंची मी आज नव्याने ओळख करून देणार आहे.
आहारातील पंच आरोग्य शत्रू : (अतिप्रमाणात घेतले तर)
१) साखर- ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ ही म्हण प्रत्यक्षात वापरून चालणार नाही. आपल्याकडे जी साखर मिळते ती ऊसापासून किंवा बिटपासून बनविलेली असते. ऊसापासून साखर बनविताना प्रथम रस काढून तो जास्त तापमानावर उकळला जातो; जेणेकरून ब्राऊन रंगाची साखर वेगळी होते आणि मळी वेगळी होते. जास्त तापमानामध्ये ऊसामधील enzymes वा वितंचक नष्ट पावतात. मग सल्फर डाय ऑक्साइड हे रसायन वापरून ती पांढरीशुभ्र बनविली जाते. पुढे अधिक प्रक्रिया करून त्याचं शुद्धीकरण केलं जातं. जेणेकरून आपल्याला हव्या त्या स्वरूपात साखर आपल्यापर्यंत पोहोचते. १ चमचा (५ ग्रॅम) साखर आपल्याला साधारण २० कॅलरीज देते. माणशी आपण साधारण २५-५० ग्रॅम साखर रोज खातो. (कोणत्याही स्वरूपात जाम, जेली, ब्रेड, बिस्किट्स चॉकलेट्स वगैरे) हीच साखर विविध प्रकारे आरोग्याला हानिकारक ठरू शकते. उदा. लठ्ठपणा, मधुमेह, कमी होणारी रोगप्रतिकारशक्ती, हृदयरोग, विस्मृती, मुलांमधील अतिक्रियाशीलता वगैरे वगैरे. बाजारात मिळणारी कृत्रिम साखरसुद्धा आहारामध्ये घेण्याचा आम्ही सल्ला देत नाही. म्हणून साखरेचा वापर जरा सांभाळूनच केलेला बरा. पोटातल्या जंतूंना का खाद्य पुरवायचं? गोडच हवंय ना मग अंजीर, खजूर, जर्दाळू, फळं आहेत की साखरेला पर्याय म्हणून, पण तेही प्रमाणामध्ये.
२) मीठ- एक चिमूटभर मीठ म्हणजे १ ग्रॅम मीठ. आपल्या शरीराला गरज असते ती फक्त साधारण ६ ग्रॅम मिठाची. प्रत्यक्षात आपण खातो १५ ग्रॅम मीठ! रोज शरीराला किती ताण पडतो? मिठाशिवाय अन्नाला चव नाही हे बरोबर आहे, पण अतिरिक्त मीठ खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते हे पण तितकंच खरं. सर्व प्रक्रिया केलेल्या पदार्थाबरोबरच पापड, लोणचं, चटण्या वगैरे रोजच्या आहारामध्ये वापरात येणारे पदार्थसुद्धा ‘खारट’ प्रकारामध्ये मोडतात. काही आजारांमध्ये जसे अतिरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे आजार वगैरे- मिठाचे प्रमाण कमी सांगितले जाते. प्रक्रिया केलेल्या मिठापेक्षा खनिज किंवा सैंधव मीठ कधीही चांगले, पण कोणतंही मीठ असलं तरी ते इतक्या प्रमाणात वापरा की, घरी बनवलेले अन्न थोडंसं अळणी लागलं तरी चालेल.
३) मैदा- बद्धकोष्ठता हे सर्व आजारांचं मूळ आहे. म्हणूनच अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी इतर काही बाबींबरोबरच जेवणामध्ये योग्य प्रमाणात तंतू (फायबर) असणं गरजेचं आहे. मैदा निकृष्ट समजला जातो कारण गव्हाचं शुद्धीकरण झाल्यावर (फायबर, जीवनसत्त्व काढून टाकल्यावर) मैदा तयार होतो आणि हा मैदा पचनाच्या क्रियेमध्ये अडथळे निर्माण करतो. ब्रेड, बिस्किट्स किंवा बेकरीचे कोणतेही पदार्थ, तसेच नुडल्स प्रक्रिया केलेले पदार्थ बऱ्यापैकी मैदा आपल्या आहारात आणतात. म्हणून लेबलवर जर ‘रिफाइंड गव्हाचे पीठ’ असं लिहिलं असेल तर तो पदार्थ आहारामध्ये नसलेला बरा.
४) तेल/ तूप/ बटर/ चीज
आपल्या शरीराला बऱ्याच पदार्थामधून चरबी मिळत असते. उदा. दूध, दुधाचे पदार्थ, तेलबिया जसे तीळ, अळशी, शेंगदाणे, अक्रोड, बदाम, खोबरं वगैरे वगैरे. धान्य-कडधान्यांमध्येसुद्धा काही प्रमाणात चरबी असते. म्हणूनच तेल-तूप-बटर वापरताना हात थोडा आखडताच घ्यावा जेणेकरून शरीरामध्ये चरबीचे प्रमाण जास्त होणार नाही आणि कोलेस्टेरोलची पातळी योग्य राहील. फुप्फुसाची सूज यासारखे आजारही आटोक्यात राहतील.
५) प्रक्रिया केलेले पदार्थ
नुडल्स, ब्रेड, बिस्किट्स, फरसाण, चिप्स हे पदार्थ दुर्दैवाने आपल्या आहाराचे अविभाज्य घटक बनले आहेत, पण वाईट सवयी तर मोडाव्याच लागतात. आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे. नाश्ता आणि मधल्या वेळचे खाणे विचारपूर्वक ठरविले तर चणे-फुटाणे, लाह्य़ा, चिवडा, खाकरा, अंजीर-बदाम वगैरे पदार्थ आहाराचे अविभाज्य घटक बनायला वेळ लागणार नाही.
बऱ्याच वेळा काही समीकरणं जुळलेली असतात. उदा. कर्जतचा बटाटेवडा, पुणेरी मिसळ, कोल्हापुरी रस्सा, मुंबईचा भाजी-पाव वगैरे वगैरे. तसंच डाएटीशिअन म्हणजे पोटाला उपवास’! खरं ना? पण तसं नाहीये. निदान आता तरी तुम्हाला ते पटलं असेल. आपल्या जिभेला चांगले (चमचमीत) लागणारे पदार्थ पोटाला नेहमी चांगले असतातच असं नाही. आपली पंचेंद्रियं काम करीत असतात. तसंच आपलं शरीरसुद्धा एका विशिष्ट पद्धतीमध्ये काम करीत असतं. त्याचा समतोल चुकीच्या पदार्थामुळे ढासळला तर दोष कुणाला द्यायचा? वर दिलेल्या आहार सूचना काही आजारांप्रमाणे बदलू शकतात. म्हणून आपल्या आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. ‘आजारपण हे निरोगी जीवनापेक्षा नक्कीच महाग असतं.’
शेंगोटय़ा :
बाजरीचे पीठ- १/२ कप
कुळीथ पीठ- १/२ कप
कोथिंबीर- जिरं-आलं-मिरची भरड- १ चमचा
तीळ- १ चमचा
कोणतीही किसलेली भाजी- २ चमचे (गाजर/ बीट/ दुधी/ भोपळा)
मीठ आणि तेल- नावापुरतं
पाणी- कणिक मळण्यासाठी
खोबरं/ कोथिंबीर/ लिंबू चवीप्रमाणे
वरील सर्व जिन्नस एकत्र करून कोमट पाण्याने कणिक भिजवावी. नीट मळून घ्यावी. छोटा कणकेचा गोळा घेऊन हाताने शेवयांचा आकार द्यावा. अतिबारीक किंवा अतिजाड नको. १०-१५ मिनिटे वाफवून मग खोबरं-कोथिंबीर-लिंबू घालून गरम गरम खाव्यात.
कमी तेलामध्ये वरून फोडणी दिली तरी चालेल.
जर वेळ नसेल किंवा आकार जमत नसेल तर छोटे-छोटे बारीक गोळे/मुटकुळे केले तरी चालतील.