करिअरिस्ट मी : कायद्याचे राज्य Print

altवैजयंती कुलकर्णी-आपटे , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आय.ए.एस. अधिकारी आभा सिंग. सुमारे १३ हजार टपाल कार्यालयाच्या प्रमुख. पोस्ट ऑफिसमधल्या वीजटंचाईवर सौर ऊर्जेचा उपाय शोधणाऱ्या, उत्तर प्रदेशमधल्या बुरख्यातल्या स्त्रियांना पोस्ट-वुमन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या, पतीच्या संघर्षमय करिअरमध्ये पाठीशी उभ्या राहणाऱ्या, भ्रष्टाचाराविरोधात उभ्या राहणाऱ्या, कायद्याचे राज्य मानणाऱ्या या वेगळ्या सनदी अधिकाऱ्याविषयी... आदर्श घोटाळा, टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा यांसारख्या अनेक घोटाळ्यांमध्ये आणि भ्रष्टाचारांच्या अनेक प्रकरणांमध्ये आज अनेक सनदी अधिकारी तुरुंगाची हवा खात असतानाच आपली तत्त्वे सांभाळत, प्रामाणिकपणा जपत, सच्चेपणाने सरकारी नोकरी करणारे आय.ए.एस. अधिकारी विरळाच. अशा काही मोजक्या तत्त्वनिष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये वरचा क्रमांक लागतो तो आभा सिंग यांचा.
मूळच्या उत्तर प्रदेशातल्या लखनौच्या असलेल्या आभा या सध्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या टपाल खात्याच्या संचालक आहेत.
नेहमी हसतमुख चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, तल्लख बुद्धी आणि उत्कृष्ट वक्तृत्व या गुणांच्या जोरावर आभा यांचा प्रगतीचा आलेख उंचावतच राहिला.
उत्तरेची लाडकी लेक, महाराष्ट्राची स्नुषा बनून आली, तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की याच महाराष्ट्रात तिचे भवितव्य घडणार आहे. योगेंद्र प्रताप सिंग या लखनौच्याच पण महाराष्ट्रातल्या वर्धा इथे पोस्टिंग असणाऱ्या आय.पी.एस. अधिकाऱ्याशी आभा यांचा विवाह झाला. गंमत म्हणजे विवाहानंतर आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी आय.ए.एस.चे शिक्षण पूर्ण केले. तेव्हाची आठवण सांगताना आभा म्हणाल्या की, जेव्हा माझे आय.ए.एस.चे प्रशिक्षण चालू होते तेव्हा माझी आई माझ्या चार महिन्यांच्या मुलाला कॉलेजबाहेर लॉनवर खेळवत बसायची. मुळातच त्यांच्या घराण्यात उच्च शिक्षणाची आवड जोपासली गेली. आभा यांचे वडील रणबहादूर सिंग हेही पोलीस अधिकारीच होते. निवृत्त होताना ते उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. इतकेच नव्हे तर त्यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदकही मिळाले होते. त्यांची आई तारा याही अलाहाबाद विद्यापीठातून १९६१ साली इतिहास विषयात एम.ए. झालेल्या होत्या. त्यांचा मोठा भाऊ आयकर आयुक्त आहे, तर धाकटा भाऊ पोलीस खात्यातच आर्थिक गुन्हे विभागात अधिकारी आहे. त्यांची धाकटी बहीणही आय.ए.एस. झालेली आहे. आभा म्हणाल्या, ‘‘आमच्या पूर्ण कुटुंबातच शिक्षणाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपली तत्त्वे सांभाळणे, संस्कार करणे आणि आपली संस्कृती जोपासणे यावर माझ्या आई-वडिलांनी नेहमीच भर दिला.
आभा यांनी लखनौच्या इसाबेला महाविद्यालयातून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आग्य््रााच्या सेंट जॉन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात एम. ए. केले. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.फिल केले, तेव्हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता भारतातली बाल कामगारांची समस्या. त्यानंतर मुंबईत आल्यावर पहिल्याने मुंबई विद्यापीठातून एलएल.बी. आणि नंतर आय.ए.एस. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा जेव्हा वाय. पी. सिंग यांच्याशी विवाह झाला तेव्हा त्या दोघांनी एकमेकांना पाहिलेही नव्हते. ‘‘वाय.पी.शी लग्न झाले तेव्हा ते वध्र्याला पोलीस अधीक्षक या पदावर होते. विवाहानंतर काही दिवस गेल्यावरच मी आय.ए.एस. करण्याचा निर्णय घेतला. कारण पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींचा क्लब आणि किटी पार्टी यामध्ये मला रस नव्हता. ’’अर्थात, यापुढील शिक्षणासाठी सासरच्या लोकांनीही तेवढेच प्रोत्साहन दिले.
१९९१ मध्ये आय.ए.एस. झाल्यानंतर आभा यांची पहिली नेमणूक झाली ती कस्टम खात्यामध्ये. तिथे ३ वष्रे काम केल्यानंतर त्यांची टपाल आणि तार खात्यात नेमणूक झाली आणि तिथूनच त्यांच्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सध्या त्या महाराष्ट्र आणि गोव्यातल्या १२,८८० पोस्ट ऑफिसेसच्या प्रमुख आहेत. त्यामध्ये २७,६३४ कर्मचारी आणि १९,८८६ संलग्न कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आभा यांचे वडील आजारी पडले म्हणून त्यांनी लखनौला बदली करून घेतली आणि तिथे उत्तर प्रदेश टपाल खात्याच्या संचालक म्हणून काम सुरू केले. मुळात धडपडा स्वभाव, सतत काहीतरी नवीन करण्याची वृत्ती आणि कामावर प्रेम. यामुळे लखनौला गेल्यावरही आभा स्वस्थ बसल्या नाहीत. वीजटंचाईमुळे पोस्ट ऑफिसांमध्ये कामे खोळंबून राहायची. आभा सिंग यांनी यावर सोलर पॉवर (सौर ऊर्जा)चा पर्याय दिला. उत्तर प्रदेशातल्या गौरीगंज टपाल कार्यालयात पहिल्यांदा सौर ऊर्जेचा वापर करून कॉम्प्युटर, प्रिंटर, सव्‍‌र्हर आणि सी.एफ.एल. दिवे- विजेशिवाय पाच तास चालतील अशी व्यवस्था केली. या टपाल कार्यालयाच्या उद्घाटनाला राहुल गांधीही आले होते. त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या अनेक टपाल कार्यालयांत हा प्रयोग राबवण्यात आला. उत्तर प्रदेशातल्या ग्रामीण भागातल्या महिलांची मानसिक तयारी करून त्यांना पोस्ट वुमन म्हणून नोकरी दिली आणि अशा प्रकारे उत्तर प्रदेशात ज्या स्त्रिया बुरखा घेऊन वावरत होत्या त्या पोस्ट वूमन म्हणून काम करून अर्थार्जन करू लागल्या.
आभा यांना त्यांच्या टपाल खात्यातल्या कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. उत्तर प्रदेशच्या टपाल खात्याचा महसूल ४९ कोटींवरून ५९ कोटींपर्यंत वाढविल्याबद्दल चीफ altपोस्टमास्तर जनरल यांचे पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राच्या चीफ पोस्टमास्तर जनरल यांच्याकडून ‘बेस्ट वर्कर्स अ‍ॅवॉर्ड’ त्यांना मिळाले. पण आभा यांच्या करिअरमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘लीड इंडिया’. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत आभा या एकमेव महिला होत्या, ज्या शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचल्या. या स्पर्धेच्या तिसऱ्या क्रमांकाबद्दल त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्स या संस्थेत लीडरशिप कोर्स करण्याची संधी मिळाली. २०१० मध्ये त्यांना कर्मवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक संस्थांमध्ये त्या नेहमी व्याख्याने देतात. गेल्या वर्षीच त्यांना लंडन विद्यापीठात स्कूल ऑफ ओरिएन्टल आफ्रिकन स्टडीज इथे- ऑनर किलिंग्ज, खाप पंचायत आणि भारतीय घटनेच्या ४९८ अ कलमाविषयी व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
आभा यांच्या करिअरचा आलेख एकीकडे उंचावत असताना दुसरीकडे पती वाय.पी. सिंग आणि मुले आदित्य आणि ईशा यांच्याकडेही तितकेच लक्ष देण्याचा प्रयत्न त्या करतात. आभा म्हणाल्या- करिअर, घर आणि संसार या दोन्हीचा समतोल राखणे आवश्यक आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केले आणि जी तत्त्वे अंगी बाणवली तेच संस्कार मी माझ्या मुलांमध्ये रुजवू इच्छिते. आभा यांचा मुलगा आदित्य हा हैदराबाद इथल्या नॅशनल लॉ कॉलेजमध्ये वकिलीचा अभ्यास करतो आहे, तर मुलगी ईशा ही कॅथड्रलमध्ये शिकते आहे. वडील, आजोबा, मामा, मामी सगळेच घरात पोलीस अधिकारी असल्याने तिलाही लहानपणापासून खाकी वर्दीचे आकर्षण आहे आणि तिलाही पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
आभा आणि वाय.पी. सिंग यांच्या संसारात अनेक वादळे आणि ती येतच राहणार. आभा यांना तर आता अशा वादळांची सवयच झाली आहे. वाय. पी. सिंग यांचा पोलीस खात्यातल्या आणि सरकारमधल्या भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा सर्वश्रुतच आहे. सरकारबरोबर  मतभेद होऊन वाय. पी. सिंग यांनी आय. पी. एस.चा राजीनामा दिला. त्यांच्या या लढय़ाचे पडसाद घरातही उमटले. सतत टेन्शन, वैफल्य, नैराश्य अशा अवस्थेतून पूर्ण कुटुंब जात होते. आर्थिक चणचण निर्माण झाली. कारण वाय. पी. सिंग यांचा पगार सरकारने रोखला होता. इतकेच काय पण त्यांचा प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन काहीही मिळाले नाही. पण या सगळ्या वादळात आभा खंबीर राहिल्या. त्यांच्या एकटीच्या पगारावर घर, मुलांची शिक्षणं- सगळे केले. या दिवसांबद्दल बोलताना आभा म्हणाल्या की, आमची सीसीआय क्लबची मेंबरशिप फक्त २५० रु. होती. पण तेवढेही पैसे माझ्याकडे नव्हते. जर पती कमावत नसेल आणि पत्नीच्या पैशावर घर चालत असले तर कधी कधी या नात्यातही तणाव निर्माण होतो. पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर पडलो आहोत.
वाय. पी. सिंग आता एक उत्तम वकील म्हणून काम करत आहेत. त्यांची वकिली चांगली चालली आहे. गंमत म्हणजे त्यांनी पोलिसांची खाकी वर्दी उतरवून काळा कोट अंगावर चढविला आणि ते फायद्याचे ठरते. आज आदर्श घोटाळा, लव्हासा घोटाळा, हिरानंदानी पार्क केस अशा केसेस लढवून भ्रष्टाचाराच्या विरुद्धचा लढा चालूच आहे. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य पार पडतच आहेत. आभा म्हणाल्या की, ‘‘हा आमचा संघर्ष चालूच आहे आणि तो व्यर्थ जाणार नाही. याची मला खात्री आहे.’’
इतर आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. अधिकाऱ्यांची लाईफस्टाईल बघितली की तुम्हाला वैषम्य वाटत नाही का? यावर आभा म्हणाल्या की नाही वाटत. याचे कारण भौतिक सुख किंवा मटेरिअल टर्ममध्ये भले आम्हाला काही मिळाले नसेल, पण आज स्वाभिमान तर आमचा आहे. कुणाहीसमोर गुडघे टेकले नाहीत आणि अभिमानाने मान ताठ ठेवून आम्ही जगतो. ड्रॉइंग रूम पॉलिटिक्समध्ये आम्हाला रस नाही. विशेष म्हणजे मुंबईत इतक्या वर्षांत आमचे स्वत:चे घरही नाही. इतक्या सनदी अधिकाऱ्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सोसायटय़ा होतात, पण तिथे फ्लॅट घेताना अर्धे पैसे ब्लॅकमध्ये मागतात आणि आमच्याकडे ब्लॅकचे पैसे नाहीत. त्यामुळे आमचे घर इतकी वर्षे मुंबईत राहूनही होऊ शकले नाही. पण त्याबद्दल मला खंत नाही.
वाय. पी. सिंग यांच्या ‘कार्नेज ऑफ एन्जल्स’ या कादंबरीवर आधारित ‘क्या यही सच है’ या चित्रपटाची निर्मितीही आभा यांनी केली होती. इतकेच नाही तर त्याच्या दिग्दर्शनातही त्यांचा सहभाग होता. पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारी जगत यांच्या लागेबांध्यावर आधारित हा चित्रपट होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका चालला नाही. याबद्दल बोलताना आभा म्हणाल्या की, एक तर या चित्रपटात मोठे तारे-तारका नव्हत्या. कारण तेवढे बजेटच नव्हते. दुसरे म्हणजे लोकांना चित्रपटात धगधगते वास्तव बघायला आवडत नाही, तर मनोरंजन आवडते. त्यामुळेच हा चित्रपट फक्त फेस्टिीवलमध्ये गेला आणि त्याला पुरस्कारही मिळाला.
आभा सिंग यांची पहिली नेमणूक ही बॉम्बे कस्टम हाऊस इथे होती. भारतात होणाऱ्या आयात आणि निर्यातीवर कस्टम डय़ुटी ठरवणे आणि ती वसूल करणे असे काम होते. याबाबत बोलताना आभा म्हणाल्या की, तेव्हा कस्टम डय़ुटीचे दर खूप होते. संगणकाचा वापर नव्हता. त्यामुळे आयात-निर्यातदारांचा कस्टम डय़ुटी चकवण्याकडेच कल असायचा. व्यवस्थित कर आकारणीवरून सरकारी महसूल वाढवण्याचा माझा प्रयत्न असायचा. पण तिथे इतके गैरप्रकार चालायचे की मला काम करणे अशक्य झाले. म्हणून मी पुन्हा सिव्हिल सव्‍‌र्हिसची परीक्षा दिली आणि टपाल खात्यात रुजू झाले.
महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये टपाल खात्यात २०११-१२ सालात ४३० कोटी ९४ लाखांचा महसूल बचतीच्या माध्यमातून जमा झाला. एकूण ४ लाख ६८ हजार ग्रामीण विमा पॉलिसीज विकल्या गेल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९ लाख ५७ हजार खाती उघडली गेली आणि ४ कोटी ९५ लाख रुपयांची रक्कम वाटली गेली.
हल्ली एटीएम मनी ट्रान्स्फर या गोष्टी शहरांमध्ये एका बटणाच्या क्लिकने होत असल्या तरी ग्रामीण भागात अजूनही मनीऑर्डरनेच पैसे पाठवले जातात. आभा म्हणाल्या की, खासगी कुरिअर सेवेप्रमाणे टपाल खात्याची स्पीड पोस्ट सेवाही तितकीच कार्यक्षम आहे आणि आता संगणकाद्वारे स्पीड पोस्ट सेवा ट्रॅकही करता येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टपाल कार्यालयांची कार्यक्षमता वाढवण्याचा त्या सतत प्रयत्न करत असतात. सध्या अनेक सनदी अधिकारी कुठल्या ना कुठल्या प्रकरणात तुरुंगात अडकले आहेत. याबाबत विचारले असता आभा म्हणाल्या की, दोषींना जर शिक्षा झाली, तर कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे याची जरब सनदी अधिकाऱ्यांना बसते आणि कुठलेही गैरप्रकार-भ्रष्टाचार करणार नाहीत.
माझ्या २० वर्षांच्या सरकारी सेवेत मला स्वत:कडून समोर येऊन लाच देण्याची हिंमत अजूनपर्यंत कुणालाही झाली नाही. कारण मी प्रामाणिक आहे आणि असले प्रकार माझ्याकडे चालत नाहीत. हे सगळ्यांना माहिती आहे.