करिअरिस्ट मी : केल्याने होत आहे रे Print

मनीषा सोमण ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ती एक सर्वसामान्य गृहिणी, पण आयुष्याने असं काही दान पदरात टाकलं की तिला कमवण्यासाठी बाहेर पडावं लागलं. अंगभूत मेहनत, बुद्धीच्या जोरावर ती बनली राज्यातली पाटबंधारे खात्याची कंत्राटावर काम घेणारी, शंभर कोटींच्या वर बिझनेस नेणारी पहिली आणि एकमेव महिला कॉन्ट्रक्टर. त्या विद्या लोलगेंविषयी..
मध्यमवर्गीय घरात सुरक्षित वातावरणात लहानाची मोठी झालेली संगीता एम. कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर जनरीतीनुसार वयाच्या २१व्या वर्षी लग्न होऊन मुंबईतून सोलापूरला गेली आणि विद्या लोलगे होऊन चारचौघींसारखा संसार करू लागली.. त्या वेळी हेच सोलापूर आपलं वेगळंच भविष्य घडविणार आहे हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं, पण ते घडलं. आयुष्याने एक असं सफाईदार वळण घेतलं की ती बनली संपूर्ण महाराष्ट्रात पाटबंधारे खात्याची कंत्राटावर  काम घेणारी पहिली आणि एकमेव महिला कॉन्ट्रक्टर.  
alt‘‘माझ्या माहेरची मध्यमवर्गीय परिस्थिती होती तशीच सासरचीही होती. सासरे रेल्वेत डॉक्टर होते, तर पती, मिलिंदचा केटरिंगचा डिप्लोमा झालेला होता. ते एका रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून काम करत. आयुष्याकडून ना माझ्या फार काही अपेक्षा होत्या ना काही वेगळी स्वप्न होती.’’ पण ते नियतीला मान्य नव्हतं. नियतीने विद्याला स्वप्न बघण्याचीही संधी न देता थेट दाहक वास्तवात नेऊन उभं केलं. ‘‘काही कारणांनी माझ्या पतीची नोकरी गेली आणि मग आमच्यापुढे अनंत प्रश्न उभे राहू लागले. त्या वेळी मला हातपाय हलवणं भागच होतं. माझं जरी एम.कॉम.पर्यंत उत्तम मार्क मिळवून शिक्षण झालं असलं तरी मला सोलापूरसारख्या ठिकाणी नोकरी काय मिळणार? हे सगळं कमी काय म्हणून त्याच वेळी मी गरोदरही होते. मात्र आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं ही जिद्द माझ्यात होती. मग त्या वेळी मला जे झेपेल, जे जमेल ती कामं मी करू लागले. अगदी श्रावणात मेंदीचे कोन करून दुकानादुकानांत नेऊन विकणं किंवा घरात राख्या तयार करून विकणं यासारखे उद्योगही मी केले आहेत.’’ ती सांगते. तेव्हाच बहुधा कुठेतरी जे काही पाच-पन्नास रुपये मिळतील ते स्वकष्टाचे आणि स्वत:च्या उद्योगातून कमावण्याचं बीज तिच्यात रोवलं गेलं असावं. त्याला योग्य खतपाणी मिळताच ते बघता-बघता फोफावलं.
 ‘‘सुरुवातीला मी कुठेतरी नोकरी शोधण्याची धडपड करू लागले. पण त्या काळी म्हणजे १९९२ साली सोलापूरसारख्या शहरात नोकरी करून महिन्याला किती पगार मिळणार तर जेमतेम ४००/५०० रु.! यात तरी घरखर्च कसा चालणार. तरी मी ‘राजश्री सिमेंट’मध्ये काम करू लागले. ज्यांच्याकडे ही एजन्सी होती त्यांनी मला त्यांच्यासाठी सब एजन्ट म्हणून काम करण्याची ऑफर दिली. त्या एजन्टने मला ५० पोती उधार दिली. माझ्याकडे सायकल होती. सायकलवरून मी आजूबाजूला जिथे बांधकाम सुरू असे तिथे जात असे. त्यांना माझ्याकडून सिमेंट घ्या, मी तुम्हांला पोत्यामागे आठ आणे सवलत देईन सांगून मार्केटिंग करू लागले. त्या वेळी आमच्या बंगल्याच्या एका खोलीतच मी सिमेंटची पोती ठेवत होते. पुढे वर्षभरातच मला ए.सी.सी. सिमेंटची एजन्सी मिळाली. तेव्हा मात्र सासऱ्यांनी मला एक दुकानाचा गाळा घेऊन दिला. माझ्या घरच्या मंडळींकडून मी घेतलेली ही एकमेव आíथक मदत होती! सिमेंटचा व्यवसाय चांगला सुरू झाला. मी लुना घेतली आणि एम.आय.डी.सी. एरियात मार्केटिंगसाठी फिरू लागले. तेव्हा मला सिमेंटच्या मोठय़ा ऑर्डर मिळू लागल्या. हळूहळू माझ्याकडे सिमेंट घ्यायला खूप कॉन्ट्रक्टरही येऊ लागले. त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात येऊ लागलं की ही सगळी मंडळी काही फारशी शिकलेली नाहीत. तरीही ते इतक्या उत्तम परिस्थितीत राहतायत. काम करतायत. मग ते जे काम करतात ते मला का नाही जमणार, या प्रश्नाच्या उत्तराने माझ्या करिअरला वेग आला.’’
काही तरी करण्याची जिद्द आणि कुठलाही बागुलबुवा, संकोच न बाळगता संवाद साधण्याची हातोटी यामुळेच विद्याने तिच्याकडे सिमेंट घ्यायला येणारी मंडळी काय काम करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या काही जणांनी मला उडवाउडवीची उत्तर दिली, तर काही जणांनी मला त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे ते अगदी खुलासेवार सांगितलं. त्यातून मला समजलं की हे लोक पी.डब्ल्यू.डी.ची सिव्हिल किंवा इरिगेशनची काम करणारे कॉन्ट्रक्टर आहेत. तेव्हा माझ्याही मनात आपणही असं काहीतरी काम करून बघायला काय हरकत आहे, हा विचार येऊ लागला. तशी मी याविषयी आणखी माहिती मिळवली. यातूनच मी थेट पी.डब्ल्यू.डी. ऑफिसपर्यंत पोहोचले. बरी-वाईट मंडळी तर सगळीकडे असतात. मलाही सगळ्या प्रकारचे लोक भेटले. सुरुवातीला जेव्हा मी काम करण्याची तयारी दाखवली तेव्हा ‘ही काय काम करणार?’ हाच सूर होता. पण मला काम मिळालं. जेव्हा पहिलं २५ हजार रुपयांचं काम मिळालं. त्या वेळी त्यातले जेमतेम काही हजार रुपये मला मिळाले असतील. पण तेही काम मी इमानदारीने केलं. याचा फायदा म्हणजे मला पी.डब्ल्यू.डी.च्या कामकाजाचा तिथल्या लोकांचा अनुभव मिळाला. यातूनच मला इरिगेशनची कामे काय असतात आणि कशी होतात, हेही समजलं. आणि इथेच माझ्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं. मीही ठरवलं की आपण ही इरिगेशनचं काम घ्यायचं. पण मी काही रजिस्टर कॉन्ट्रक्टर नव्हते. तेव्हा मला दुसऱ्याच्या रजिस्ट्रेशनवर काम घ्यावं लागणार होतं. शिवाय मी एक स्त्री आहे म्हटल्यावर सरकारी अधिकारी माझ्याकडे थेट व्यवहाराची भाषा करू शकत नव्हते. मग मी सरळ खुल्या स्पध्रेत उतरले. मिलिंदची मदत मागितली. नुकसान सोसून कमी किमतीत टेंडर भरलं आणि मला ते मिळालं. ते पहिलं काम होतं पंढरपूरच्या कॅनॉल लायिनगचं. त्या वेळी आम्ही ठरवलं की मी ऑफिस सांभाळायचं आणि पती प्रत्यक्ष साइटवर जातील. पण प्रत्यक्षात मलाच साइटवर जाऊन काम करावं लागलं. ४५ लाख रुपयांचं काम होतं ते. पण तेव्हा माझ्याकडे पाच टक्केअनामत रक्कम भरण्यासाठीही पसे नव्हते किंवा काम सुरू करण्यासाठी भांडवलही नव्हतं. उधारीवर माल घेऊन, दागिने वगरे गहाण ठेवून आम्ही भांडवल उभं केलं आणि कामाची सुरुवात झाली. माझे पती मिलिंद सोलापूर- पंढरपूर ये-जा करू लागले. दुर्दैवाने त्यांना अपघात झाला. त्यांचं ऑपरेशन करून पायात रॉड घालावा लागला. त्या वेळी काम शेवटच्या टप्प्यात आलं होतं. ते अर्धवट तर सोडता येत नव्हतं. घरातली जबाबदारी, नवरा हॉस्पिटलमध्ये हे सगळं सांभाळून मी रोज ५० किलोमीटर कायनॅटिकवरून ये-जा करून काम पूर्ण केलं!
या पहिल्या कामात तुला कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं? आणि मुख्य म्हणजे यातून काय शिकलीस असं विचारलं असता विद्या सांगते, ‘‘मोठी अडचण होती ती पसा उभा करण्याची. लेबरला कसं सांभाळायचं. वेळेला त्यांच्या कलाने कसं घ्यायचं आणि वेळेला त्यांच्यावर अंकुश ठेवून कसं काम करून घ्यायचं ते मला पहिल्याच कामाने शिकवलं. मुख्य म्हणजे पहिल्या कामात मिळालेल्या यश आणि फायद्यामुळे मला पुढे काम घेण्याची जिद्द वाढली.’’  
यातूनच जन्माला आलं विद्याचं ‘जिद्द कन्स्ट्रक्शन’ आणि ती महाराष्ट्रातली पहिली यशस्वी महिला इरिगेशन कॉन्ट्रक्टर ठरली. स्वत:च्या हिमतीवर तिने नाशिकजवळचं धरसवाडी धरण, ओझरखेड येथील कॅनॉल, शिरूर तालुक्यातलं धरण, राजगुरूनगर येथे शेतकऱ्यांसाठी चर खणून देण्याचं काम यासारखी अनेक कामं यशस्वीपणे केली. या तिने केलेल्या अनेक प्रोजेक्टपकी तिच्यासाठी सगळ्यात अभिमानास्पद प्रोजेक्ट होतं नारायण गावाजवळील िडबे धरणाच्यापुढे आदिवासी भागात असलेल्या कोकणेवाडी बुडीत बंधाऱ्याचं काम.
‘‘तिथल्या आठ बंधाऱ्यांच्या कामापकी एका बंधाऱ्याचं काम मला मिळालं होतं. ते काम इतक्या आतल्या भागामध्ये होतं की तिथे वाघसुद्धा फेरफटका मारायला येत असे. अशा ठिकाणी मी पुण्याहून पहाटे निघून रात्री उशिरापर्यंत काम करून वेळेत ते काम पूर्ण केलं, तेही उत्तम दर्जाचं, शिवाय एक कोटी ३० लाखांचं काम एक कोटी १० लाखांत केलं.  आज इतर बंधाऱ्यांना कुठे ना कुठे गळती आहे. पण आम्ही बांधलेल्या बंधाऱ्याला कुठेही गळती नसल्याने ऐन उन्हाळ्यातदेखील त्यात पाणी असतं.’’
आज ती अनेक यशस्वी पाटबंधारे ठेकेदारांपकी एक आहे. तिच्या कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आज तिच्याकडे सगळी आधुनिक मशिनरी आहे, कामाला इंजिनीयर आहेत. तरीही ती म्हणते, ‘‘आजही प्रत्येक काम मी जातीने उभं राहून करून घेते.’’
आपण स्वत: व्यवसायात यशस्वी होऊनच फक्त ती थांबली नाही, तर सोलापूरमधल्या तब्बल ५०-६० विधवा, परित्यक्त्या स्त्रियांना तिने तिच्याकडची छोटी-मोठी कन्स्ट्रक्शनची कामं देऊन आपल्या पायावर उभं केलं आहे. तिची सोलापूरमध्ये स्वत:ची पतपेढी आहे. त्या पतपेढीमधून ती गरजू स्त्रियांना भांडवलासाठी कर्जाऊ रक्कम तर देतेच, शिवाय काम पूर्ण करण्यासाठी त्यांना जी मदत लागेल तीही करते. ‘‘सोलापूर हा आमचा सेटलमेंट एरिया आहे. सर्वसामान्य लोकांना सेटलमेंट हा शब्ददेखील माहिती नाही. सेटलमेंटमध्ये चोरांना हद्दपार केल्यावर ते जिथे राहातात तो भाग. स्वातंत्र्यानंतर जेव्हा पंडित नेहरूंनी सोलापूरला भेट दिली तेव्हा त्यांनी तारेच्या कुंपणाआड बंदिस्त केलेले लोक बघितले आणि त्यांना मुक्त केलं. तरी ते त्यांच्या व्यवसायातून पूर्ण मुक्त झाले नाहीत. इथले पुरुष प्रचंड दारू पितात आणि बायका काम करतात. त्यांचं काम म्हणजे चोरी करणं! त्या टोळक्या-टोळक्यानी शहरात जाऊन मिळेल तिथे हात साफ करतात, आठ-पंधरा दिवसांची बेगमी झाली की परत येतात. या स्त्रियांना जाणवायला लागलं की जे चाललंय ते योग्य नाही. त्या माझ्याकडे काम मागायला येऊ लागल्या. त्या वेळी मी त्यांना या कामाची दिशा दाखवली आणि आज याही बायका वर्षांकाठी लाखा-लाख रुपयांची कामं करतात. आता तर त्यांना कायमचं-हक्काचं छप्पर मिळवून देण्यासाठी आम्ही एक जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर २००/३०० स्क्वे. फुटांची छोटी-छोटी घर बांधायचं ठरवलं आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’
घर-व्यवसाय आणि सामाजिक बांधीलकी या तीनही आघाडय़ांवर विद्या आज यशस्वी आहे, ती म्हणते ‘‘हे यश माझं एकटीचं नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाचं आहे. त्या सगळ्यांनी मला वेळोवेळी साथ दिली. मुलं लहान असताना जेव्हा मला दिवस-दिवस साइटवर जावं लागत असे तेव्हा माझ्या सासुबाईंनी माझ्या मुलांची जबाबदारी घेतली. मिलिंदचा मला कायम पाठिंबा होता. आता ते लॅण्ड डेव्हलपमेंटची काम करतात, तर मुलगी वेदा ग्राफिक डिझायिनग शिकते आहे आणि मुलगा अक्षद भोसला मिलिटरी स्कूलमधे सहावीत शिकतो आहे.’’
काम असो, घर असो किंवा सामाजिक जबाबदारी, त्या तीनही आघाडय़ांवर यशस्वी असणाऱ्या विद्याची कामात प्रगती होईलच याची खात्री आहे, मात्र याचबरोबर तिला समाजासाठीही आणखी ठोस काही करायचं आहे. त्या दृष्टीने आज तिने पावले उचलायला सुरुवातही केली आहे..