करिअरिस्ट मी : यशस्वी दुवा Print

प्रियांका मोकाशी , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

संस्थेसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या स्वप्ना पाटील-नाईक म्हणजे ऊर्जेचा अखंड स्रोत. स्वप्ना यांनी डिझाइन इंजिनीअर अशा पुरुषी वर्चस्व असलेल्या वाटेवरून करियरचा प्रवास सुरू केला. अनेक नामांकित उद्योगांसाठी रिव्हर्स ऑसमॉसिस प्लांट डिझाइन केले. सध्या ‘ईमा’च्या उपसंचालक   पदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वप्नांच्या ‘विद्युत’ करिअरचा हा चढता आलेख.
वेगळ्या वाटेवरचं करियर निवडण्याचा निर्णय धाडसी असतोच. पण निर्णय जर अचूक असला तर त्यातून मिळणारं समाधान किती अमूल्य असतं, याचं उदाहरण म्हणजे स्वप्ना पाटील-नाईक. स्वप्नाकडे सध्या ‘ईमा’ ( कएएटअ ) अर्थात ‘इंडियन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’, या संस्थेच्या उपसंचालकपदाचा कार्यभार आहे.
ही जबाबदारी निभावताना स्वप्नाची हुशारी पणाला लागतेच, पण तिची कार्यपद्धतीही विकसित होत जातेय. आलेल्या संधीचं सोनं करीत पुढे जाण्याचा तिचा ध्यास म्हणूनच वेगळा ठरतो, चारचौघांमध्ये उठून दिसतो.
मुंबईतील ‘शारदाश्रम’शाळेत मध्ये असताना एका शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून वैज्ञानिक प्रकल्पाच्या कामात सहभागी होण्याची संधी स्वप्नाला मिळाली व त्यातूनच इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगची आवड निर्माण झाली. खरं तरं हे पुरुषी वर्चस्व असणारं क्षेत्र! तरीही याच क्षेत्रात करियर करायचा तिचा निर्णय पक्का झाला. बारावीनंतर माटुंग्याच्या नामांकित व्हीजेटीआय अभियांत्रिकी महाविद्यालयात तिनं इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगला प्रवेश घेतला.
शेवटच्या वर्षांला असताना कॅम्पसमधूनच तिची आयन एक्स्चेंज (इं.) लिमिटेड या कंपनीत डिझाइन इंजिनीयर म्हणून निवड झाली. तिथूनच तिच्या कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. इथे मद्रास रिफायनरीसाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांटकरिता स्वतंत्रपणे इलेक्ट्रिकल डिझाइन करण्याची संधी मिळाली. यानंतर पुंज लॉईड, गुजरात अल्कली, मारुती उद्योग यांसारख्या बडय़ा उद्योगांसाठी रिव्हर्स ऑसमॉसिस प्लांट डिझाइन केलं. त्या काळी सहसा मुलींना साइटवर पाठवत नसत. पण स्वप्नानं स्वत:हून साइटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी तिला चंदपूरला एम.एस.ई.बी.च्या प्रोजेक्टवर पाठवण्यात आलं. तिच्या मते साइटला प्रत्यक्ष भेट दिल्यामुळे पुढचं डिझाइन करताना फायदा होतो. आणि त्याचा फायदा तिनं घेतला.
  १९९३ साली मरिन इंजिनीयर असलेल्या अमोल नाईकशी ती विवाहबद्ध झाली. या क्षेत्रात जबाबदाऱ्या खूप असतात व डेड लाइनशी सतत स्पर्धा करावी लागते. अशा वेळी कौटुंबिक बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून बाळ तीन-चार वर्षांचं होईपर्यंत पूर्णवेळ नोकरी करायची नाही, असं तिनं आधीच ठरवून टाकलं. पण नोकरी सोडून करमेना. मग तिनं घरीच इंजिनीयिरगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. बरोबरीनं व्ही. पी. एम. पॉलिटेक्निकमध्ये ती हंगामी प्राध्यापक म्हणून रुजू झाली. दुसऱ्या बाजूला याच क्षेत्रातील कन्सल्टन्सी सुरू करण्याचा संकल्पही तिनं पूर्ण केला.
मुलगा गौरांग नर्सरीत जाऊ लागल्यावर स्वप्नाने ‘ईमा’मध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. ईमा म्हणजे इंडस्ट्रीमध्ये वापरली जाणारी केबल्स, कॅपेसिटर्स, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, इन्सुलेटर्स अशी विविध उत्पादनं तयार करणाऱ्या उत्पादकांची राष्ट्रीय स्तरावरील संघटना आहे. त्यांचे सार्वजनिक तसेच खासगी उद्योग क्षेत्रातले मिळून साडेसातशेच्या वर सदस्य आहेत. ‘ईमा’ म्हणजे विद्युत महामंडळ, ऊर्जा व उद्योग मंत्रालय आणि उत्पादक यांना सांधणारा दुवा आहे. मुख्यत: इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीला प्रोत्साहन देण्याचं काम ‘ईमा’ करते. त्यामुळे उत्पादकांच्या समस्या, त्यांची गाऱ्हाणी संबंधित मंत्रालयापर्यंत पोहचवणं, विविध सरकारी योजनांचा लाभ उत्पादकांना मिळेल यासाठी पाठपुरावा करणं, इलेक्ट्रिकल उत्पादनांचा निर्देशांक प्रसिद्ध करणं, तांत्रिक व व्यवस्थापकीय कार्यशाळांचं आयोजन करण्याची कामं ‘ईमा’तर्फे केली जातात.
 स्वप्नानं २००८ साली लघू व मध्यम उद्योजकांना विशेष प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली. स्पर्धा वाढावी व त्यातूनच उत्तमोत्तमाचा ध्यास उद्योजकांनी घ्यावा, या हेतूनं स्वप्नानं या उद्योजकांसाठी ‘क्वालिटी अवॉर्ड्स’ देण्यासाठी पुढाकार घेतला. उत्पादन, उत्पादन प्रक्रियेतील वेगवेगळे टप्पे, त्यातील नावीन्य, ग्राहकांशी त्यांचा संबंध, कामगारांचं आवश्यक ते प्रशिक्षण, कारखान्यातील सुरक्षा व स्वच्छता इत्यादी निकषांवर हे गुणवत्ता पुरस्कार दिले जातात. या योजनेला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतोच आहे.
   स्वप्नाचा अखंड उत्साह, नवीन जबाबदारी घेण्याची व त्यासाठी झोकून द्यायची तयारी यामुळे ‘ईमा’च्या दैनंदिन कार्यपद्धतीत तिनं सुसूत्रता आणली आहे. तिच्या नावीन्यपूर्ण कामाची चुणूक पहिल्यांदा डिसपॅच विभागानं अनुभवली. संस्थेच्या कामाचा आवाका मोठा असल्याने दररोज विविध प्रकारची सुमारे तीन हजार पत्रकं पोस्टानं पाठवावी लागतात. डिसपॅच विभागावर कामाचा प्रचंड ताण पडत असे. हा ताण कमी करण्याची जबाबदारी त्या वेळी कार्यकारी अधिकारी असणाऱ्या स्वप्नानं आपणहून घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं संबंधित माहितीचा तिनं डेटाबेस तयार करून घेतला. ही सर्व पत्रके ई-मेलनं पाठवण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी झालाच, शिवाय पोस्टेजच्या खर्चातही बचत झाली. याच पद्धतीने तिनं ‘ईमा’च्या सदस्यांची डिरेक्टरी नव्या स्वरूपात सादर केली. यात संस्थेच्या सर्व सदस्यांची तपशीलवार माहिती असते. स्वप्नानं डिरेक्टरी तयार करण्यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय डिरेक्टरीजचा अभ्यास केला. डिरेक्टरीच्या मांडणीमध्ये बदल करीत प्रत्येक सदस्याच्या लोगोचा त्यात समावेश केला. त्यामुळे ही डिरेक्टरी युझर-फ्रेंडली झाली. तिच्या अशा पुढाकारामुळे ‘ईमा’मध्ये नवीन संकल्पना राबविणं व त्याची यशस्वी अंमलबजावणी करणे याची जबाबदारी थेट स्वप्नाच्या खांद्यावर देण्यात आली. यासाठी वरिष्ठांकडून तिला नेहमीच प्रोत्साहन मिळते व कर्मचाऱ्यांकडून सहकार्यही. ‘ईमा’ची वेबसाइट, माहिती पुस्तिका यावरही तिनं आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
 स्वप्ना सांगते, ‘नाही’ हा शब्द मी माझ्यापुरता वगळून टाकला आहे. ‘ईमा’मध्ये प्रथम तिला ‘इन्स्ट्रमेंट ट्रान्सफॉर्मर’ या विभागाची जबाबदारी मिळाली. कार्यभार स्वीकारल्यानंतर तिनं या विभागासाठी ‘टेक्निकल कॉन्फरन्स’चं आयोजन केलं. याआधी कधीही अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन या विभागासाठी झालं नव्हतं. यामुळे विभागातल्या कर्मचाऱ्यांना नवा जोश संचारला व आयोजनातील कौशल्यामुळे परिषदेला प्रतिसादही चांगला मिळाला. नऊ देशांतल्या अडीचशे तज्ज्ञांनी यात भाग घेतला होता. सुरुवातीला परिषदेच्या आयोजनाला विरोध करणाऱ्या वरिष्ठांनाही अखेर तिचं तोंडभरून कौतुक केलं. त्यानंतर स्वप्नानं विविध विभागांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या. त्यामध्ये २००६ व २०१० सालच्या टेक-आयटी, केबल वायर २००८ यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
जर्मनी, व्हिएतनाम, मलेशिया, कोरिया या देशांतील विविध प्रदर्शनांमध्ये भारतीय उद्योजकांना घेऊन सहभागी होण्याची संधी तिला मिळाली. भारतासारख्या विकसनशील देशातील उद्योजकांकडून युरोपातील उद्योजकांनी उत्पादनं आयात करावीत यासाठी २००२ साली नेदरलँड येथे ‘सेंटर फॉर प्रमोशन ऑफ इम्पोर्ट्स फ्रॉम डेव्हलिपग कंट्रीज’तर्फे पंधरा दिवसांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये युरोपियन मार्केटचा अभ्यास, तेथील व्यापाऱ्यांची मानसिकता जाणून घेण्याची संधी तिला मिळाली. त्यानंतर भारतातील इलेक्ट्रॉॅनिक सुटे भाग तयार करणाऱ्या २७ उद्योजकांना एकत्रित आणून अशा प्रकारच्या निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्यात स्वप्ना यशस्वीही झाली.
इलेक्रामा हे जगातील सर्वात मोठे टी अ‍ॅण्ड डी (T&D) (transmission & distribution) करता लागणाऱ्या उत्पादन व सेवा यांचे प्रदर्शन असून १९९० सालापासून दर दोन वर्षांनी ‘ईमा’तर्फे ते भारतात आयोजित केलं जातं. २००२ सालापासून स्वप्नानं इलेक्रामाच्या आयोजनात सहभाग घ्यायला सुरुवात केली व २०१० पर्यंत विविध जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडल्या. जानेवारी २०१२ मध्ये झालेल्या प्रदर्शनामध्ये जगभरातून बाराशेहून अधिक उद्योजक सहभागी झाले होते व सत्तर हजार चौरस मीटर जागेवर स्टॉल्स उभारण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला एक लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पाहण्याची संधी अभ्यासकांना मिळते. तसंच या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी उद्योजकांना मिळते. इलेक्रामामध्ये इंजिनीयरिंगच्या  विद्यार्थ्यांचे प्रकल्पही ‘ईमा’तर्फे सादर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची व आपला प्रकल्प उत्पादकांपर्यंत पोहचवण्याची संधी मिळते.
फेडरेशन ऑफ एशियन इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन म्हणजे चीन, जपान, कोरिया, तवान, भारत व ऑस्ट्रेलिया या सर्व देशांतील इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचं फेडरेशन. या फेडरेशनच्या शांघाय येथे २००८ साली झालेल्या अधिवेशनात ‘ईमा’तर्फे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी स्वप्नाला मिळाली आणि तिच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. त्या वेळी भाषणाची सुरुवात तिनं चिनी भाषेत केली. त्याचं खूप कौतुक झालं. स्वप्ना म्हणते, ‘‘ज्या देशात आपण जातो तिथल्या भाषेत बोललो.. अगदी मोडक्यातोडक्या का होईना तिथल्या लोकांना फार अप्रूप वाटतं. त्याने आपलेपणाचा बंध सहज जुळतो.’’ संवादाची आवड असल्यामुळे स्वप्नानं अनेक देशांच्या प्रवासात अनेक मित्र जोडले आहेत. जर्मनीतील हॅनोव्हर येथे एका प्रदर्शनाच्या निमित्तानं गेली असताना एका कुटुंबात राहायची संधी तिला मिळाली. कडाक्याच्या थंडीमुळे ती आजारी पडली, त्या वेळी त्या जर्मन बाईनं प्रेमानं तिला आल्याचा रस दिला. आपल्या आई किंवा आजीकडून लहानपणी असं घरगुती औषध घेतल्याची तिला आठवण झाली. त्यानंतर  तीन-चार वेळा हॅनोव्हर येथे गेल्यावर ती त्याच कुटुंबात राहिली.
स्वप्ना सांगते, ‘‘असोसिएशनमध्ये काम केल्यामुळे या क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची मला माहिती मिळाली. विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.’’ तिच्या संवाद साधण्याच्या अंगभूत कौशल्यामुळे अधिकाधिक कंपन्यांपर्यंत ‘ईमा’विषयाची माहिती पोहचण्यास व ‘ईमा’ची सदस्यसंख्या वाढण्यास खूपच मदत होते आहे.
पती अमोल नाईक मरिन इंजिनीयर असल्याने अनेकदा घराबाहेर असतात. त्यामुळे घराची व मुलाची जबाबदारी आपसूक तिच्यावरच येते. मुलाला शक्यतो घरातलं खाणं देण्याकडे तिचा कल असल्यामुळे तिचं वेळेचं नियोजनही काटेकोर असतं. याबाबत स्वप्ना आपल्या आईला आदर्श मानते. करियरच्या प्रत्येक टप्प्यावर सासर व माहेर दोन्हीकडून तिला खंबीर पाठिंबा मिळाला. कधी अचानक टूरवर जायची वेळ आली तर गौरांगची शाळेसकट संपूर्ण जबाबदारी तिच्या आईनं घेतली याचा ती आवर्जून उल्लेख करते. शाळेत असताना नाटकात काम केल्यामुळे आलेला सभाधीटपणा तिला या व्यवसायातही उपयोगी पडला. शाळेपासून योगासनांची लागलेली सवय या धकाधकीच्या आयुष्यातही फिट राहण्यासाठी तिला उपयोगी पडते.
 डिझाइन इंजिनीयर ते ‘ईमा’ची उपसंचालक या प्रवासात स्वप्ना अनेक गोष्टी शिकत गेली, त्यातून घडत गेली. अनेकदा मार्ग सुकर नव्हता, पण आयुष्यात आलेल्या संधी ओळखून त्यातून स्वत:बरोबरच इतरांसाठी विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर तिचा भर होता. तिची स्वत:ची अशी कामाची एक परिभाषा तयार झाली. म्हणूनच कदाचित तांत्रिक काहीसे किचकट असे हे क्षेत्र असूनही स्वप्ना यात लीलया संचार करू शकली.