करिअरिस्ट मी : खडतर क्षेत्रातलं समाधान Print

स्वप्ना जरग ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जकात नाक्यावर एखादी महिला ट्रकवाल्यांकडून किंवा इतर मालवाहतूकदारांकडून जकात वसूल करीत आहे हे चित्र तर जवळजवळ अशक्यच. या सर्व जकात नाक्यांची सूत्रे जवळून सांभाळणारी महिलाही क्वचितच आढळेल. या प्रकारची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या आयएएस अधिकारी व्ही.राधा या एकमेव! आपल्या सेवेदरम्यान बालकामगार उपक्रम, अमृतधारा, सावित्रीसारख्या योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या व्ही. राधा यांच्या करिअरबद्दल..
सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या एका विशेष मोहिमेसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक या नात्याने व्ही. राधा बीडमधील गेवराई नावाच्या एका गावात गेल्या होत्या. महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या ४० लोकांची एक टीमच बीड जिल्ह्य़ातील शैक्षणिक सर्वेक्षणासाठी होती. बीड हा त्या दृष्टीने आव्हानात्मक जिल्हा समजला जातो. १२-१२ तास विद्युत पुरवठा नसलेल्या गेवराईमधील लोकांचे जीवनमान जवळून पाहिल्यानंतर, देवाने आपल्याला खूप काही दिले आहे याचीच सर्वप्रथम आपल्याला जाणीव झाली, ही व्ही.राधा यांची पहिली प्रतिक्रिया होती.
याविषयी त्यांनी सांगितले की, ‘‘मन हेलावून टाकणारी दृश्ये तिथे पाहायला मिळाली. पालकांना शिक्षणाविषयी जागृत करून तुमच्या पाल्यांना शाळेत पाठवा, असे आवाहन करणे हे पहिल्यांदाच इथे जड वाटले. परंतु तिथे राबविल्या जाणाऱ्या अभियानामध्ये ६ ते १२ वयोगटातील १०० मुली सहभागी होत्या, हे ऐकून खूपच समाधान वाटले. सर्वेक्षणादरम्यान एक मुलगी मला येऊन भेटली आणि म्हणाली, इथे तर आठवीपर्यंतच शाळा आहे. मग आम्ही आठवीनंतर काय करू? तिचे हे एक वाक्य मला माझ्या या कार्यासाठी खूप मोठी प्रेरणा देऊन गेले.’’
१९९४ ला यू.पी.एस.सी.तून आय.ए.एस.साठी नियुक्त झाल्यानंतर व्ही.राधा यांची पहिली नेमणूक सोलापूरमध्ये साहाय्यक जिल्हाधिकारी पदावर झाली. सोलापुरातील बीडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी 'बाल कामगार उपक्रम' राबविला. त्यानंतर नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक येथे उप-विभागीय प्रतिबंधक फौजदारी न्यायाधीश म्हणून कामकाज पाहण्यासाठी नेमणूक झाली. तिथेही पेंच राष्ट्रीय उद्यानामध्ये राहणाऱ्या लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात वाटाघाटी केल्या. या वाटाघाटींमध्ये झालेला निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला.
‘ऑक्ट्रॉय' किंवा ‘जकात' या शब्दांशी महिलांचे काही नाते असणे तसे अनपेक्षितच आहे. जकात नाक्यावर एखादी महिला ट्रकवाल्यांकडून किंवा इतर मालवाहतूकदारांकडून जकात वसूल करीत आहे हे चित्र तर जवळजवळ अशक्यच. या सर्व जकात नाक्यांची सूत्रे जवळून सांभाळणारी महिलाही क्वचितच आढळेल. या प्रकारची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या व्ही.राधा या एकमेव!
खरं तर रेल, रोड, एअर या तीनही विभागांचा मिळून बनलेला रेव्हेन्यू हा मोठा विभाग त्यांच्या देखरेखीखाली कार्यरत होता. एकाच वेळी सगळीकडून येणाऱ्या मालाचे संबंधित चेक-पोस्टवर ट्रक ठेवणे हे किचकट आणि जिकिरीचे काम करताना व्ही. राधा या कामाबद्दल अतिशय समाधानी आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये गोळा होणाऱ्या सात हजार कोटी या उच्चांकी महसुलामध्ये ४३०० कोटी ऑक्ट्रॉयमार्फत तर २३०० कोटी प्रॉपर्टी टॅक्स या माध्यमातून जमा होतो. हा सर्व कारभार व्ही. राधा यांनी या विभागात असताना एकहाती मॉनिटर केला. अर्थात त्यांच्या मते यातील प्रत्येक गोष्ट ही टीमवरच आधारित आणि टीमवरच अवलंबून असते. ज्या प्रकारचे 'रेव्हेन्यू इंटेलिजन्स कलेक्शन मॅकॅनिझम' या विभागात आवश्यक असते, तितक्याच ताकदीचे लोक आपल्याबरोबर या कामासाठी असणे अत्यावश्यक असते, असे त्या म्हणतात.
जकात हा असा कर आहे, ज्याला कोणत्याच गोष्टीची मर्यादा नाही. अगदी वेळेचीसुद्धा नाही. रात्रंदिवस अखंडपणे जकात गोळा करणे चालूच असते. प्रत्येक मिनिटाला महानगरपालिका हद्दीत एक एक ट्रक येत असतो. त्यामुळे अजिबात निष्काळजी राहून चालत नाही. या विभागाला आव्हानात्मक म्हणण्याचे कारण म्हणजे ट्रकचालक व इतर मालवाहतूकदारांचे संप. संप हाताळणे ही तितकीशी सामान्य गोष्ट नसते. पण आपण योग्य मार्गाने काम करत राहिलो तर मात्र सगळे आपल्याला सहकार्य करतात. संशयास्पद वाटणाऱ्या ट्रक्सची छाननी करून रात्रीच्या वेळी त्यांना परत पाठवणे हे जोखमीचे काम असते. अशा वेळी अतिशय काळजीपूर्वक व सामंजस्याने सर्व गोष्टी हाताळाव्या लागतात.
रेव्हेन्यूसारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात नियुक्त झाल्याचे सार्थक अशा काही घटनांमुळे नक्कीच झाले आहे असे त्यांना वाटते. यावर त्यांनी एक गोष्ट विशेषत्वाने नमूद केली, ती म्हणजे रेव्हेन्यू, आय.टी.सारख्या विभागांमध्ये पुरुषांना जास्त पात्र समजून त्यांनाच प्राधान्य दिले जाते. म्हणजे थोडक्यात, स्त्री-पुरुष असे वर्गीकरण केले जाते. या विभागात काम करणाऱ्या कित्येक महिला कर्मचारी, तरुण मुलीसुद्धा रात्री उशिरापर्यंत त्यांच्याबरोबर रस्त्यावरही कामासाठी थांबलेल्या असतात, कारण त्या म्हणतात त्याप्रमाणे त्यांना त्या करत असलेल्या कामातून नक्कीच आनंद मिळतो. त्या कामाबद्दल त्यांना आदर असतो. शेवटी ज्या समाजासाठी आपण काम करतो त्या समाजाबद्दल आपलेपणाची भावना असेल व योग्य प्रकारे काम करण्यापलीकडे दुसरा कोणताही हेतू नसेल तर ते काम अगदी यशस्वीरीत्या पार पडते व तिथे कोणतीही समस्या उपस्थित होत नाही.
व्ही. राधा यांच्याकडे असणारा प्रामाणिकपणा आणि सचोटी ही दोन अस्त्रेच कोणत्याही कार्यासाठी उपयुक्त आणि पुरेशीसुद्धा ठरतात. आजवर ज्या ज्या ठिकाणी त्यांना एखादे काम त्यांच्या अपेक्षेप्रमाणे व्हावे अशी इच्छा झाली तेथे ते ते काम त्यांनी त्याप्रमाणे करवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, आणि अजूनही करतात.
 ‘‘शिक्षणाची मूळ प्रेरणा मला पुण्यामध्ये मिळाली.’’ व्ही.राधा सांगतात. ‘‘ श्री. रत्नाकर गायकवाडसरांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुण्यातील 'यशदा' या प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पुरवण्याची संकल्पना राबवली. सफाई कर्मचारी, शिपाई ते सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी उचलली. हा प्रशिक्षण कार्यक्रम इतका उपयुक्त ठरला आणि यशस्वीदेखील झाला की नंतर या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी हा देशातील सर्वात उत्तम आणि स्टँडर्ड प्रोग्राम म्हणून ओळखला जाऊ लागला."
औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी असताना त्यांनी ‘अमृतधारा’ हा एक वेगळ्या धर्तीवरील कार्यक्रम राबविला. औरंगाबादमध्ये पाण्याची इतकी प्रचंड कमतरता होती की पाणी हे अमृतासारखे क्वचितच उपलब्ध होते. जिल्ह्य़ात पाऊस नव्हता. त्यामुळे पेट्रोल मिळेल पण पाणी नाही अशी परिस्थिती होती. शेजारील जिल्ह्य़ातून पाणी मागवावे लागत असे, पण नंतर तेथील आमदारांनीही पाणी देण्यास नकार दिला. मराठवाडय़ातच इतकी वाईट परिस्थिती उद्भवली होती की हतबलता आली होती. मग यासाठी लोकांचीच मदत घेण्याचा विचार केला. सर्वानी मिळून काम करायचे म्हणजे श्रमदान ही कल्पना सुचली. पण सुरवातीला या कल्पनेबाबत लोकांनी राधाजींना जवळजवळ वेडय़ात काढले. पण त्यांनी गावकऱ्यांसाठी स्वतच्या हाताने एक पत्र लिहिले आणि सरपंचांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले. सरपंचांनी एखादा विद्यार्थी शिक्षकांचे पत्र वाचतो तसे त्यांचे पत्र लोकांना वाचून दाखवले. आश्चर्य वाटेल, पण अक्षरश हजारोंच्या संख्येने लोक श्रमदान करण्यासाठी हजर झाले. या वेळेस इतक्या संख्येने उपस्थित लोक पाहून त्यांचेही डोळे तेव्हा पाणावले होते. कारण लोकांबद्दल त्यांना वाटणारा विश्वास खरा ठरला. यावरून अधिकारी लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचले तर समन्वयाने अनेक गोष्टी साध्य करता येतात याची त्यांना प्रचीती आली.
अशाच प्रकारचा भावुक करणारा आणखी एक अनुभव नमूद करताना त्या म्हणाल्या, ‘‘औरंगाबादमध्येच सरोला या गावात जवळपास ३०२ वर्षांपासून पाण्याचा एक तलाव होता, जो पाणीटंचाईमुळे कोरडा पडत असे. त्या तलावात पाणी आणण्यासाठी जवळजवळ एक वर्षभर आम्ही प्रयत्न केले आणि वर्ष संपल्यानंतरच्या मे महिन्यात त्या तलावाला पाणी आले. औरंगाबादमधील ७०० गावांपकी हे एकमेव गाव होते, जिथे पाणीटंचाईमध्येही पाण्याची मुबलकता होती. इतक्या परिश्रमाचे चांगले फळ मिळाल्यामुळे सर्वानाच खूप आनंद झाला. तलावाच्या जलपूजनाचा कार्यक्रम ठेवला गेला. कार्यक्रमासाठी तेथे गेले आणि काय- त्या तलावाचे नाव लोकांनी 'राधासागर' असे ठेवल्याचे समजले! मी क्षणभर स्तब्धच झाले. लोकांना माझ्याबद्दल वाटणारी आपुलकी मला त्यातून जाणवत होती. एवढय़ावरच न थांबता एका वसाहतीलादेखील त्यांनी 'राधानगरी' असे नाव दिले होते. या सर्व गोष्टींमध्ये जी कृतार्थता जाणवली त्यावरून असे वाटले. एक जिल्हाधिकारी आणि एक माणूस म्हणूनही आपल्यासाठी यापेक्षा आणखी काय समाधान असू शकेल? सरकारी नोकरीमध्ये खाजगी कंपन्यांपेक्षा तुलनेने कमी पगार असतो, पण या नोकरीच्या माध्यमातून आपण लोकांसाठी काहीतरी करू शकतो आणि त्यांचा विश्वास संपादन करू शकतो हे माझ्यासाठी सर्वात जास्त समाधानकारक आहे."
व्ही.राधा यांनी महिलांच्या कौशल्यांना वाव मिळावा या कल्पनेतून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी अद्यावत दालन पुण्यामध्ये 'सावित्री' च्या स्वरूपात खुले केले. ही कल्पना कशी सुचली याविषयी त्यांनी सांगितले की, पुण्यात जिल्हा परिषदेत असताना कार्यालयात जाता-येता बाजाराच्या मध्यभागी कॉर्पोरेशनच्या अखत्यारीतील एक गोदामसदृश जागा मला नेहमी दिसत असे. चौकशीनंतर असे कळले की, पशाअभावी ते दुकान गोदाम झालेले आहे. दुकानाची जागा मोक्याची होती आणि विनाकारण ती रिकामी पडल्याचे मला पाहवत नव्हते. काहीतरी योग्य नियोजन करण्याचे ठरवले आणि 'सावित्री'ची कल्पना डोळ्यासमोर आली.  प्रस्ताव मान्य झाला आणि एक नियोजनबद्ध आराखडाही तयार झाला. माझ्या माहितीत काही चित्रकलेच्या विद्यार्थ्यांकडून त्या दुकानाच्या िभती वारली पेंटिंग या चित्रप्रकाराने रंगवून घेतल्या. केवळ त्या पेंटिंग्जनेसुद्धा दालनाला इतकी शोभा आली की ते एक परिपूर्ण व्यावसायिक दालन वाटू लागले. दहा हजार रुपयांपेक्षा कमी खर्चात एका सरकारी गोदामाचे एका प्रेक्षणीय दालनात परिवर्तन झाले. प्रायोगिक तत्त्वावर केलेला हा एक छोटा प्रकल्प असला तरी त्याला खूप प्रतिसाद मिळाला आणि एक नवीन कल्पना प्रकाशझोतात आली. महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी जी.आर.सुद्धा काढला.
व्यावसायिक ठिकाणी पूर्ण कार्यक्षमतेने कामगिरी बजावण्यासाठी सर्वानीच- विशेषत स्त्रियांनी घरी/कुटुंबामध्ये आनंदी असणे गरजेचे आहे. राधा यांच्या कुटुंबातही मुले, पती, सासू-सासरे या सर्वाना या क्षेत्राची जाण आहे. त्या सर्वाना त्यांच्या कामाचा अभिमान आणि समाधान दोन्ही वाटते. त्या म्हणतात, "सुदैवाने माझे सासू-सासरे इतके सपोर्टव्हि आहेत की माझ्या पतीपेक्षा मी त्यांचेच जास्त कौतुक करू इच्छिते. जे काम मी किंवा माझ्यासारख्या इतर महिलांनी नागरी सेवांमध्ये येऊन स्वीकारले आहे, त्याचा आवाका बराच मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक हे नेहमीच व्यस्त राहते. या ठिकाणी वेळेचे नियोजन हे करावेच लागते. माझ्या सुट्टय़ा मी पूर्णपणे माझ्या कुटुंबासाठी राखून ठेवते. अनेकदा हे सर्व त्या त्या कामांच्या गरजांवर आधारित असते. मुंबई महानगरपालिकेत असताना लोकांसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची आवश्यकता असे, अगदी ऑफिसच्या वेळांव्यतिरिक्तदेखील! या उलट पुण्यात यशदामध्ये असताना तुलनेने कमी व्यापाचे काम असायचे तेव्हा मी माझ्या मुलांना बऱ्यापकी वेळ देऊ शकत होते. मुलांसाठी आजारपणाच्या रजा सहसा मी घेत नाही. परंतु त्यांच्या परीक्षांच्या दिवसात मात्र हमखास रजा घेऊन त्यांचा अभ्यास घेते. परीक्षेदरम्यान मी त्यांच्याजवळ असणे मला गरजेचे वाटते.
सुपर वुमन वगरे होण्याचा माझा बिल्कुल अट्टहास नसतो. कारण रोजच्या ऑफिसच्या धावपळीत घराकडेही तेवढेच लक्ष पुरविणे मला शक्य नसते. असा अट्टहास केलाच तरी हातात फारसे काही येत नाही, पण केवळ ओढाताण! त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या गरजा लक्षात घेऊन घरासाठी वेळेचे नियोजन करण्याचा माझा प्रयत्न असतो. वर्षांतून एकाद-दोन वेळा कुटुंबासोबत चार-पाच दिवस सहलीला जाण्याचा माझा आग्रह असतो. माझी आई अतिशय शांत व संयमी स्वभावाची आहे. जेव्हा-केव्हा माझ्यासमोर कठीण प्रसंग उभे राहतात, तेव्हा मी माझ्या आईकडे पाहते. ती नेहमीच माझ्यासाठी या बाबतीत रोल मॉडेल आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी बराच मोठा कालावधी जावा लागला हेही तितकेच खरे. आय.ए.एस. ही सेवा माझे सकारात्मक व संयमी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरली. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी ठामपणे सांगू शकते की, चांगल्या कामांचा रिझल्ट हा नेहमी चांगलाच असतो. अगदी सुरवातीला हा विश्वास कदाचित वाटणार नाही, कारण पहिल्या दोनेक नियुक्त्यांमध्ये तर आपण विद्यार्थीदशेतच असतो. पण त्यावेळीसुद्धा जे करू ते स्वच्छ व चांगल्या मनाने करू, हा निर्धार असला तर सुरुवात नक्कीच चांगली होते.
(स्वप्ना जरग यांनी लिहिलेल्या आणि लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या ‘अधिकारिणी’ या पुस्तकातील ही संपादित मुलाखत.)