करिअरिस्ट मी : अवयवदान श्रेष्ठ दान Print

सुलभा आरोसकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अवयवदानाला श्रेष्ठ दान म्हटलं जातं. कारण यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकतं. मात्र आपल्या देशात आजही त्याबाबत जनजागृती नाही. सुजाता अष्टेकर गेली दहा-बारा र्वष अवयवदानाविषयी समुपदेशनाचं काम करताहेत.. अनेकांना नवं आयुष्य मिळवून देणाऱ्या या आगळ्या करिअरविषयी..
‘‘कोण्या एका क्षणी डॉक्टर म्हणतील-
माझा मेंदू मृत झाला
तेव्हा म्हणा मी मृत्युशय्येवर नाही
तर जीवनशय्येवर आहे
माझे शरीर कोणाचे तरी आयुष्य
फुलवण्यासाठी उपयोगी पडू दे
माझे डोळे सूर्योदयाचे विहंगम दृश्य
पाहण्यासाठी आसुरलेल्याला द्या
माझे हृदय, हृदयाच्या वेदनेने बेजार
झालेल्याला कामी येऊ दे
माझी किडनी ज्याचे जीवन
‘डायलिसीसमय’ झाले आहे त्याला द्या
तुम्हाला जाळायचे असेल तर जाळा
माझ्या कमतरता व चुका
माझे नश्वर शरीर वाटून टाका
आत्मा मात्र परमेश्वराला द्या’’
‘‘रॉबर्ट एन टेस्ट यांची  To remember me ही (अनुवादित) कविताच माझं प्रेरणास्थान आहे’’ असं सांगून सुजाता अष्टेकर यांनी ‘श्रेष्ठ दान अवयवदान’ या विषयावर  ठाण्याच्या आचार्य अत्रे कट्टय़ावर भाषण सुरू केलं आणि आम्हा कट्टेकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले ..
सुजाता अष्टेकर, पूर्वाश्रमीची सुजाता निमकर हिला अगदी लहानपणापासून, समाजासाठी काही तरी करायचंच हा ध्यास लागला होता. म्हणूनच ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’ (टीआयएसएस)मधून एमएसडब्ल्यू ही पदवी घेतली. १९९७ मध्ये तिला जसलोकमध्ये समन्वयक म्हणून नोकरी मिळाली. तीच मुळी ‘मानवी अवयव पुनरेपण’ कक्षात. तेथेच तिला इच्छापूर्तीची दिशा मिळाली. मानवी अवयवदानाच्या जागृतीने, अनेक रुग्णांचं जीवन आनंदी होऊ शकते हे लक्षात आल्यावर त्यांनी या कार्याला वाहून घ्यायचं ठरवलं. दरम्यान बाळंतपणासाठी दीड वर्षांत जसलोकची नोकरी सोडली. तरी घरातून समुपदेशनाचं काम सुरूच ठेवलं. १०/१२ दिवसांच्या मुलीचं सर्व करता करता दूरध्वनीवरून त्या कामाला गती देत राहिल्या..
१९९४ मध्ये भारत सरकारने ‘मानवी अवयव पुनरेपण कायद्याला मान्यता दिली. त्यामुळे मानवी अवयव खरेदी, विक्रीवर बंदी आली. ‘ब्रेन डेथ’ला मान्यता मिळाली. अवयव काढणं व पुनरेपण करणं यावर सरकारचं नियंत्रण आलं. या कायद्यांतर्गत काम सुरळीत चालावं, त्यात पारदर्शकता असावी, कोणावरही अन्याय होऊ नये, अवयवदान ते रोपण ही प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी म्हणून मुंबईत २००० मध्ये झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी (ZTCC) ची स्थापना झाली. शासनाने निर्मिलेली ही धर्मादाय संस्था. मुंबईतील सर्व काम या संस्थेमार्फत चालते. डॉ. वत्सला त्रिवेदी या पहिल्या संचालिका. तेव्हापासून सुजाताताई या संस्थेच्या सदस्य झाल्या. संस्थेच्या जडणघडणीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. २००३ ते नोव्हेंबर २०१० पर्यंत संस्थेच्या को-ऑर्डिनेटर, उपसमितीच्या त्या अध्यक्ष होत्या.
अवयव पुनरेपणाची सोय असलेली रुग्णालयं या संस्थेचे सदस्य असतात. हे सदस्यत्व सक्तीचं आहे. आज त्यांची २८ रुग्णालयं आहेत. त्यांच्यातर्फे गरजू रुग्णांची यादी केली जाते. कोणत्या रुग्णाला जास्त गरज आहे त्यानुसार त्यांचा अग्रक्रम लावला जातो. त्यात वय, आजाराचा काळ, प्रतीक्षा कालावधी, रक्तगट या सर्व गोष्टींचा नीट विचार होतो. त्याप्रमाणे त्यांना गुण दिले जातात व ही यादी अगदी पारदर्शक केली जाते. ही सर्व यादी सदस्य रुग्णालयांना लगेचच पाठवली जाते.
अवयवदाता मिळवताना वैद्यकीय शास्त्रानुसार त्याचे काही निकष आहेत. मेंदूच्या आघाताने (ब्रेन डेथ) मृत्यू आला तरच यकृत, मूत्राशय, स्वादुपिंड, फुफ्फुस हे अवयव घेता येतात. मेंदूला मार लागला, मेंदूत रक्तस्राव झाला, तर रुग्णाचा ‘मस्तिष्क स्तंभ’ (ब्रेन स्टेम) कायमस्वरूपी निकामी होऊ शकतो. त्याची चेतना, श्वासोच्छ्श्वास बंद पडू शकतो. कारण या दोन्हीचे केंद्र ‘मस्तिष्क स्तंभ’मध्ये असते व मेंदू कोणत्याही उपकरणाच्या साहाय्याने कार्यान्वित करता येत नाही. अर्थात या निर्णयापर्यंत यायला चार डॉक्टरांची टीम असते. हे डॉक्टर अवयवरोपण प्रक्रियेत कोठेही कार्यरत नसतात. अनेक चाचण्या केल्यावरच रुग्णाचा ‘ब्रेन डेथ’ आहे हे घोषित केले जाते. तेव्हाच त्याच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी विचारले जाते. रुग्णालयातील आयसीयूमध्ये समन्वयक जातीने हजर असतात.
येथे समुपदेशनाची खरी कसोटी लागते. मृत माणसाच्या नातेवाईकांची मन:स्थिती तर शोकाकुल असते. त्यातून त्यांचं मन वळवणं, त्यांच्या अनेक शंकांचं निरसन करणं, त्यांना अवयवदानाचं महत्त्व समजावून सांगणं, त्यांच्या भावना न दुखावता हे सगळं करणं फार कठीण असतं. समुपदेशकावरही ताण असतोच, त्यामुळे मनाचा अतिशय समतोल असावा लागतो. समन्वयकाचं त्यातलं ज्ञानही सखोल हवं. सुजाताताई हे मोठं धीराने आणि सामंजस्याने करतात.
समुपदेशन करतानाचे बरे-वाईट अनुभव आले असतील ना, असं विचारताच त्या म्हणाल्या, ‘‘या अवयव दानाचा पायाच मुळी आपल्या माणसावर असलेल्या नितांत प्रेमाचं प्रतीक असल्याने वाईट अनुभव नसतातच, असते ती फक्त चांगली-वाईट अनुभूती. तरीही आम्हाला १० हत्तींचं बळ देणारे अनेक अनुभव आहेत. जसलोक रुग्णालयात लागून मला आठ-दहा महिनेच झाले होते. ६५-६६ वर्षांच्या महिला आयसीयूमध्ये होत्या. त्यांचा ‘ब्रेन डेथ’ झाला. आता आम्ही त्यांच्या नातेवाईकांकडे वळलो. आम्ही खूपच हळुवारपणे त्यांचं सांत्वन तर करत होतोच व मध्येच खुबीने अवयव दानाचं महत्त्वही सांगत होतो. त्यावेळेस त्याची माहितीही लोकांना फारशी नव्हती. तरीही आमच्या प्रयत्नांना यश मिळालं. त्यांचे नातेवाईक तयार झाले व त्यांच्या दोन्ही किडनी दुसऱ्या दोघांना जीवनदायी ठरल्या. नंतर बरेच वर्षे माझे त्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते.’’
तसंच २-३ वर्षांपूर्वी ब्रेन डेथमुळे  ४४ वर्षांच्या एका महिलेचा  मृत्यू झाला. त्यांच्या पतीने अवयव दानाचा मानस स्वत:हून व्यक्त केला व त्यांच्या दोन किडनी, लिव्हर याचं पुनरेपण झालं. इतकंच नव्हे तर आम्ही केव्हाही बोलावलं तर अवयव दानाचा हा अनुभव सांगायला ते कुठेही येतात.
अर्थात कधी कधी पोलीस केसमध्ये पोस्ट मार्टममध्ये मृत व्यक्तींची बॉडी एवढी अडकते की नातेवाईक तयार असूनही अवयव काढून घेता येत नाहीत. त्यांचे प्रयत्न जीवनदायी ठरत नाहीत. ‘तेव्हा मात्र मनात येते अशा वेळी तरी सरकारी कामकाजाला हेलिकॉप्टरची गती हवी.’ तर काही वेळा नातेवाईक ‘अजून दुसऱ्या डॉक्टरांना विचारू या’ असं मत मांडतात. त्यातही खूपच वेळ वाया जातो. एकदा एका मृत माणसाचे इतर नातेवाईक तयार होते पण त्यांच्या एका मुलाने नाही म्हटले तेव्हाही आमचं काहीही चाललं नाही. कारण जवळच्या नातेवाईकांमध्ये एकमत हे हवंच.
अर्थात अवयव दान ही संपूर्ण वैयक्तिक गोष्ट आहे. भावनिक, मानसिक सर्व अंगांनी ती जवळच्या नातेवाईकांच्या निर्णयावर अवलंबून असल्याने अशा गोष्टी घडणारच. त्याने खचून न जाता मी व माझे इतर सहकारी जास्तच जोमाने प्रचार करायला लागतो.’’
नागोठणे गावचा अनुभव त्या आवर्जून सांगतात,‘‘ तेथे एका कुटुंबाने त्यांच्या मृत नातेवाईकाचं देहदान केलं. शिवाय त्यांच्या तेराव्याला या दानाची सर्व माहिती गावातील लोकांना देण्यासाठी आम्हाला बोलावून घेतलं. त्यांची समाजाबद्दलची आत्मीयता आम्हाला भावली. अशी जागरुकता प्रत्येकात आली तर किती तरी आयुष्य वाचतील.’’
सुजाताताईंच्या बोलण्यातील जोष, गंभीरता, उत्साह बघितल्यावरच लक्षात येतं ते त्यांचं या कार्यासाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून देणं. त्याविषयीची आत्मीयता आणि तळमळ याला मोजमापच नाही. सध्या त्या चर्चमध्ये, गणेशोत्सवात अशा अनेक धार्मिक ठिकाणीही जनजागृतीसाठी जातात. त्या म्हणतात, ‘‘चर्चमध्ये मी लागोपाठ २-३ रविवार १०-१५ मिनिटंच यावर बोलले होते, तेव्हा तर तेथे असलेल्या बऱ्याच जणांनी ‘डोनेट कार्डे’ (अवयवदानासाठीची मान्यता देणारं कार्ड) भरली.’
‘अर्थात हे काम सहज होणारं नसतं.’ त्या सांगतात. ‘ही जनजागृती, ZTCC चं हे काम म्हणजे ‘टीम वर्क’ असतं. समन्वयक, डॉक्टर्स, पॅथॉलॉजिस्ट, अनेक टेक्निशियन्स इतकंच नव्हे तर पोलीसही, हे सर्व जणच तहान-भूक विसरून काम करीत असतात. एक दाता मिळाल्यावर कधी कधी २-३ दिवस ५०-६० फोन करावे लागतात. तेव्हा अवयव स्वीकारणारा रुग्ण मिळतो. यादीतील रुग्ण व त्याचे नातेवाईक हे मन, तन व धन या सर्वागांनी तयार असावे लागतात. पुनरेपणाचं काम हे ७०/७२ तासांतच करावं लागतं. म्हणजे किती युद्धपातळीवर काम चालतं हे ऐकून आपण थक्कच होतो. आपला सर्वसामान्य समज असतो की, दाता मिळाला की रुग्ण हजर. पण छे, कधी कधी २५-३० रुग्णांना फोन करावा लागतो. तसंच त्यांनी नाही म्हटलेली कारणमीमांसाही नोंद करावी लागते. शिवाय अवयव पुनरेपण केल्यावर सुरळीत सुरू होण्यासाठी अनेक चाचण्या असतातच. त्यामुळे  शस्त्रक्रियेच्या तयारीसाठी लक्ष घालावं लागतं. त्यासाठी आयसीयूमध्ये मृत्यू आल्यासच हे करता येतं. पण हे सर्व केल्यावर रुग्णाचं नवीन जीवन व्यवस्थित सुरू झालं म्हणजे जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.’’
ही सर्व प्रक्रिया वेळेच्या बांधीलकीची असल्याने तसेच दाता व गरजू रुग्ण यांचं प्रमाण फारच व्यस्त असल्याने जनजागृती फारच महत्त्वाची. सध्या सुजाताताई संधी मिळेल तेव्हा पोटतिडकीने आपलं मनोगत मांडत असतात. मुद्देसूद सर्व माहिती देऊन श्रोत्यांच्या प्रश्नांना शांतपणे, त्यांचं समाधान होईपर्यंत उत्तरं देत असतात. कसा प्रतिसाद मिळतो? असं विचारताच त्या म्हणाल्या, ‘‘सर्वच ठिकाणी मला खूप चांगला पाठिंबा मिळतो.’’ ‘डोनेट कार्ड’ घेऊन याचा नक्की विचार करू. घरातल्यांना सांगून ठेवू, हे आवर्जून सांगतात. लोकांना पटायला लागलंय हाच आमचा विजय आहे. अर्थात  तुमचा ब्रेथ डेथ नसेल पण तुमचे डोळे आणि त्वचा दान करायची असेल तर जरी हे डोनेट कार्ड भरलेलं नसलं तरी तुमच्या नातेवाईकांना तुमची इच्छा सांगून ठेवलेली असली आणि त्यांनी सहा तासांच्या आत वरील २८ रुग्णालयांपैकी कुणाशीही संपर्क साधला तरी तेथील लोक पुढची कार्यवाही करतात.’’
पाश्चात्त्य देशांत जे अवयव प्रतिरोपणासाठी घेतले जातात त्यांपैकी ९० टक्के ‘ब्रेन डेथ’कडून असतात. ‘‘अशी मानसिकता आपल्याकडे जेव्हा होईल तेव्हाच आमचं कार्य खऱ्या अर्थाने मार्गी लागेल, तोपर्यंत आम्ही झटतच राहणार,’’ हे त्या निर्धाराने सांगतात. आपल्याकडे थोडा उशीर लागेल हे सांगताना त्या धर्माचा पगडा हे एक कारण सांगतात. ‘‘कधी बायकांचं गर्भाशय काढलं जातं तरी पुढला जन्म सर्व अवयवांसहित येतोच ना? आपला देह जाळला, पुरला जातो तरी परत मनुष्य जन्म मिळतोच ना? उरलेला देह विधिवत क्रिया करण्यासाठी नातेवाईकांना परत दिला जातो. तसंच लिंग भेद, जातिभेद, गरीब, श्रीमंत या सर्वापासून हे क्षेत्र मुक्त आहे.’’ अवयवदानाचं प्रमाण वाढलं तर अवैध विक्रीलाही आळा बसेल, म्हणून त्या विविध रुग्णालयांतील समन्वयक मेडिकल सोशल वर्कर्सना सुजाताताई प्रशिक्षणही देतात.
सध्या TCC च्या सचिव आहेत डॉ. सुजाता पटवर्धन व अध्यक्ष डॉ. जी. बी. डावर. या सर्व टीमसाठी स्वेच्छेने, सर्वतोपरी काम करणाऱ्या सुजाताताईंना पतीची पूर्ण साथ आहे. मुलंही  समजूतदार आहेत. त्यांना माहीत असतं आईचे फोन आले की टीव्ही बंद. कधी कधी घरातील बोलणंही बंद. सासूबाईंची शाबासकीची थाप तर खूपच बळ देते. अवयवदानाचं भव्य मंदिर उभारण्याचं काम आम्ही करीत आहोत हे सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुलला होता..
पण काही अनुभव चटका लावणारेही असतात. बोलता बोलता  सुशीला राय या मुलीच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले. २१ वर्षांची अत्यंत उत्साही, घरातील सर्वाची लाडकी मुलगी. कार अपघातात तिचा मृत्यू झाला. संपूर्ण घरावर शोककळा पसरली होती. कोणी कोणाला सावरायचं हा प्रश्न असतानादेखील तिच्या आईवडिलांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली आणि सर्वजण कामाला लागले. तिला केईएममध्ये नेलं. तिच्यामुळे पाच जणांना नवीन आयुष्य लाभलं. खरोखरच ती त्या सर्वाची जीवनदायी ठरली..
हे ऐकल्यावर पुन्हा रॉबर्ट एन टेस्ट यांच्या विचारांनी मनाचा ताबा घेतला आणि आपणही ‘डोनेट कार्ड’ भरून घरात ठेवायचं हे मी मनाशी पक्कं केलं..
(सुजाता अष्टेकर यांचा संपर्क क्रमांक - ९८१९२२६३३२ )