करिअरिस्ट मी : नृत्याचे ‘देव’ घर Print

सुचित्रा साठे, शनिवार,८ सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
डॉ. मंजिरी देव.. कथ्थक नृत्यांगना. गुरू, अभ्यासक, लेखिका, आज्ञाधारक सून, कर्तव्यनिष्ठ आई, सासू, आजी.. अशा विविध भूमिकेत रमत नृत्याला जगण्याचा आधार मानणाऱ्या, देवपण देणाऱ्या. एका कलासक्त व्यक्तिमत्त्वाच्या करिअरचा हा चढता आलेख.
‘‘अहो, ‘देव जरी मज कधी भेटला, काय हवे ते माग म्हणाला’ असं घडण्यापूर्वीच कोल्हापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या श्रीराम देवांशी नाटकात काम करण्याच्या निमित्ताने माझी ओळख झाली. नाटकाचं नाव होतं ‘मला निवडून द्या’ पण त्यांनी मला प्रत्यक्ष जीवनसाथी म्हणून निवडलं. सासऱ्यांनी रितसर वधूपरीक्षा घेतली. ‘तुला इथे शिकायला मिळणार नाही, कारण तू कॉलेजमध्ये जाणार. मग तिथे नृत्य करणार..’ वकिली करणाऱ्या सासऱ्यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. त्या क्षणीच माझ्या नृत्यकलेच्या भवितव्याचा मला अंदाज आला. लग्न होऊन ठाण्याला येताना नटराजाच्या मूर्तीसमोर मी खूप रडून घेतलं. माझ्यातल्या नृत्याच्या आवडीला आणि रियाझालाही मी अर्धविराम दिला.. तब्बल आठ वर्षे मी नृत्यापासून दूर होते.’’ आपला नृत्यकलेचा प्रवास उलगडून दाखविताना नृत्य हा ज्यांचा श्वास आहे त्या कथ्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी श्रीराम देव भूतकाळात ४०-४२ वर्षे मागे गेल्या होत्या..
पूर्वाश्रमीच्या त्या मृणालिनी मराठे. वडिलांचा बस भाडय़ाने देण्याचा व्यवसाय. फक्त चौथीपर्यंत शिकलेल्या आईला संस्कृत विषयाबरोबरच वक्तृत्व, भजन, कीर्तन व समाजकार्याची मनस्वी आवड. तेथील स्नेहसंमेलनात छोटय़ा लीनाचा (कोल्हापुरात त्या लीना मराठे नावानेच प्रसिद्ध होत्या) नाच असेच. त्या वेळी आईला लीनामध्ये असलेली उपजत नृत्याची लय जाणवली. कलासक्त मनाच्या त्या माऊलीने कोल्हापुरातील नृत्यकलेतील अधिकारी व्यक्ती पं. बद्रिनाथ कुलकर्णी यांच्याकडे लीनाला आठव्या-नवव्या वर्षी नृत्य शिकायला पाठवले आणि आपल्या मुलाला जुन्या राजवाडय़ात गाणं शिकायला पाठवले. अभिनेता कमल हसनला ज्यांनी नृत्य शिकविलं त्या कुलकर्णीसरांसारखे चांगले गुरू भेटल्यामुळे पाच-सहा वर्षांत कथ्थक व भरतनाटय़म् या दोन्ही नृत्यशैलींचा लीनाने कसून अभ्यास केला,  अंगात लय इतकी छान भिनली की सरांबरोबर कागल, हुपरी, सांगली, मिरज अशा अनेक ठिकाणी तिचे नृत्याचे कार्यक्रम होऊ लागले. एक चांगली नर्तिका म्हणून ती नावारूपाला आली. सरांमुळेच ‘सुदर्शन’, ‘गोराकुंभार’, ‘सुरंगा म्हनत्यात मला’, ‘१२ वर्षे, ६ महिने, ३ दिवस’ या चित्रपटांतून छोटय़ा छोटय़ा भूमिकाही केल्या. खरंतर लीनाला कॉलेजमध्ये जायचे होते. नृत्यामुळे तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च करायची कॉलेजने तयारी दाखविली होती; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे भावाला मॅट्रिकच्या पुढे शिकविता येत नसल्यामुळे, मुलीलाही शिकविणार नाही, या विचारावर वडील ठाम राहिले. परिस्थितीबद्दल कोणतीच कुरकुर न करता लीना नृत्य, चित्रपट, नाटक यांत रमून गेली.
कर्मधर्मसंयोगाने इंजिनीअर म्हणून व्होल्टासमध्ये काम करणाऱ्या श्रीराम देवांशी भेट झाली. ‘प्रथम तुज पाहता, जीव वेडावला’ असं नाटय़ घडून गेलं आणि १८व्या वर्षी लग्न करून सौ. मंजिरी श्रीराम देव बनून ठाण्यात ब्राह्मण सभेशेजारील ‘देव’ घरात त्यांनी पाऊल टाकले. पुढची आठ वर्षे नृत्यातला ‘न’सुद्धा त्यांनी उच्चारला नाही. खूप वाईट वाटत होते. मग त्या मुकुंदराज व अभिजित या आपल्या चिरंजीवांच्या बाललीलांमध्येच रमून गेल्या.
..आणि एक दिवस असा आला. कुमार सोहोनी लोकनृत्याचा कार्यक्रम बसवत होते. मंजिरीताईंच्या पुतणीने सहज बोलता बोलता ‘आमची काकू पण नाच शिकलेली आहे. बघा तिची मदत होईल तुम्हाला’ असे कुमार सोहोनींच्या कानावर घातले. मंजिरीताईंची नृत्यातली अदाकारी बघून कुमार सोहोनी प्रभावित झाले. ‘तुम्ही नृत्याचा क्लास का काढत नाही?’, त्यांनी पटकन विचारले. ‘हरकत नाही काढायला’ ‘देव’वाणी झाली आणि मंजिरीताईंना अगदी आभाळ ठेंगणं झालं. लगेचच १९७६ साली ‘श्रीगणेश नृत्यकला मंदिर’ ह्य़ा कथ्थक नृत्यकलेचे शिक्षण देणाऱ्या संस्थेचा आपल्या घरीच त्यांनी शुभारंभ केला. पाच मुली दाखल झाल्या आणि नृत्यकलेचे शिक्षण देण्याचा ‘श्रीगणेशा’ झाला. त्यानंतर मंजिरीताईंनी कधी मागे वळून बघितलेच नाही.
नृत्यकला अवगत असली तरी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षेची मोहोर त्यावर उमटलेली नव्हती (गुरू बद्रिनाथ कुलकर्णीसरांना परीक्षेचा दृष्टिकोन ठेवून शिकणे मान्य नव्हते) त्यामुळे कोल्हापूरला जाऊन मध्यमा प्रथम त्या उत्तीर्ण झाल्या तरी ठाणे-कोल्हापूर वाऱ्या करणे, बदलत्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे तसे कठीणच होते. म्हणून मंजिरीताईंनी अंधेरीच्या प्रथितयश, करारी, निष्ठावंत, गोपीकृष्णांच्या शिष्या सौ. आशा जोगळेकर यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कथ्थक विशारद’, ‘अलंकार’ त्या उत्तीर्ण झाल्याच, शिवाय इकॉनॉमिक्स घेऊन बी.ए. व मराठी घेऊन एम.ए.ही झाल्या. त्यांच्या शिक्षणाचा आलेख एकदम उंचावला.
आईने योग्य वेळी दाखवलेलं कलाप्रेम मंजिरीताईंमध्येही रुजलेलं असल्यामुळे आपल्या मुलाला, मुकुंदराजला तबला शिकण्यासाठी नटराज गोपीकृष्ण यांच्या मामेभावाकडे पं. ब्रिजलाल मिश्रांकडे खारला त्या घेऊन जाऊ लागल्या. तिथेच नटराज गोपीकृष्णांचा रियाज चाललेला असायचा. अनिमिष नेत्रांनी मंजिरीताई बघत राहायच्या. त्या नृत्य शिकलेल्या आहेत हे कळताच गोपीकृष्ण त्यांना नृत्य करायला बोलवायचे; परंतु गुरुवर्य सौ. आशा जोगळेकरांची परवानगी घेणे भिडस्त स्वभावामुळे जमले नाही व परवानगी न घेता गोपीकृष्णांच्या शब्दाला मान देऊन तिथे शिकणेही जमले नाही. एक नाही, दोन नाही तर दहा वर्षे त्यांनी गोपीकृष्णांचे नृत्य डोळ्यांत साठवून ठेवले. योगायोगाने गोपीकृष्ण त्यांच्या घरी मुक्कामाला आले असताना सौ. आशाताईंचा फोन आला. कशावरून तरी विषय निघाला आणि गोपीकृष्ण घरी आलेले आहेत हे मंजिरीताई बोलून गेल्या. ‘‘अगं, तुला त्यांच्यासमोर नाचावंसं वाटत नाही का?’’ आशाताईंनी आश्चर्याने त्यांना विचारले. खरं काय घडलं होतं हे सांगून मंजिरीताई गप्प बसल्या. ‘‘आधी पायांत घुंगरू बांधून त्यांना नाचून दाखव आणि मगच माझ्याकडे ये,’’ हे शब्द ऐकताच ‘आनंद मनी माईना’ अशीच त्यांची अवस्था झाली आणि गोपीकृष्णांकडे त्यांची नृत्यसाधना चालू झाली. त्यानंतर गोपीकृष्णांसमवेत भारतभर त्यांनी नृत्याचे कार्यक्रम केले. सोलो कार्यक्रमाच्या निमित्ताने शिष्यवर्गासह त्यांनी देशाची वेस ओलांडून लंडन, अमेरिका, दुबई, मॉरिशस इथेही दौरे केले. शिवाय तिथे नृत्याच्या कार्यशाळाही घेतल्या. स्वत:च्या अभिनय, निवेदन, कीर्तन या छंदांना थोडी मुरड घालून देवासारखे ‘श्रीराम’ पाठीशी उभे राहिल्यामुळे मंजिरीताईंच्या पदन्यासाचा आणि गिरक्यांचा वेग वाढतच गेला हे त्या दिलखुलासपणे मान्य करतात. या सगळ्या सादरीकरणाला रियाज हवाच. मग हार्मोनियमवादक अनंत केमकर आले की रियाज चालू, अगदी रात्री बारा वाजतासुद्धा.
मंजिरीताईंना साहित्यातही रुची होती. स्फुटलेखनही त्या करत; परंतु एकलव्याप्रमाणे त्यांनी एकच ध्यास घेतला, नृत्य, नृत्य आणि नृत्यच. त्यामुळे आपल्या शिष्यांना लेखी परीक्षेसाठी मर्यादित साहित्य उपलब्ध आहे हे जाणून त्यांनी कथ्थक नृत्यावरील मराठीतले पहिले पुस्तक लिहिले, ‘नृत्यसौरभ’. या पुस्तकाचे प्रकाशन १९९४ साली सर्वश्री विद्याधर गोखले, पंडित सी. आर. व्यास आणि पद्मश्री नटराज गोपीकृष्ण अशा संगीतातील दिग्गज जाणकारांच्या हस्ते झाले याचा मंजिरीताईंना सार्थ अभिमान आहे. या पुस्तकाला १९९३-९४ चा महाराष्ट्र राज्य शासनाचा वाङ्मयाचा विशेष पुरस्कार लाभला आहे. कथ्थकच्या प्रगत अभ्यासक्रमावर आधारलेले ‘कथ्थककौमुदी’ हे त्यांचे दुसरे पुस्तक. कथ्थक शिकायला नुकतीच सुरुवात केली आहे अशा छोटय़ांसाठी लिहिलेले ‘ओळख कथ्थकची’ या पुस्तिकेची भरघोस प्रतिसादामुळे मागच्या वर्षी नववी आवृत्ती काढण्यात आली आहे. खरं तर ‘खाडिलकरांच्या नाटकातील नायिका’ हा विषय डॉक्टरेटसाठी मंजिरीताईंच्या डोक्यात घोळत होता. परंतु नांदेडला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंडळातर्फे साऊथ सेंट्रल झोनच्या महोत्सवास जज्ज म्हणून त्या गेल्या असताना डॉ. पुरू दधीच या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची, नृत्यातील चालता-बोलता सखोल संदर्भग्रंथाशी, त्यांची ओळख झाली. त्यांच्याच प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली ‘कथ्थक नृत्यमें प्रयुक्त कवित्त छंदो का विश्लेषणात्मक अध्ययन’ या वेगळ्या विषयावर संशोधनात्मक प्रबंध लिहिला. कथ्थक नृत्यशैली उत्तर भारतात जास्त अभ्यासली जाते म्हणून तो प्रबंध हिंदीतून लिहिला. जास्तीतजास्त कथ्थकप्रेमींपर्यंत तो पोहोचावा म्हणून पुस्तकरूपाने तो प्रकाशित केला, यामागे मंजिरीताईंची तळमळ दिसून येते. सर्व ललित कलांचा अभ्यास ज्या ठिकाणी होतो त्या छत्तीसगडमधील खैरागड विश्वविद्यालयातर्फे त्यांनी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली. आता डॉक्टरेट करणाऱ्या कलाकारांच्या ((VIVA) परीक्षा घेण्यासाठी तिथे जाताना त्यांना आनंद होतो. सुप्रसिद्ध नृत्यांगना सितारादेवी यांच्या वडिलांच्या नृत्यविषयक शंभर वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथाची प्रेसकॉपी करण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी झटपट हातावेगळे केले. दरम्यान १९९४ साली गुरू गोपीकृष्ण यांच्या निधनामुळे चालत्या गाडीला खीळ बसली. त्या वेळी पं. सी. आर. व्यासांनी सुचविल्याप्रमाणे नुकत्याच स्थापन केलेल्या गणेश कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे गोपीकृष्ण संगीत महोत्सवाची कल्पना आकाराला आली. त्यानिमित्ताने सितारादेवी, पं. जसराज, डॉ. पुरू दधीच, अहमद अली खान, सी. आर. व्यास, डॉ. प्रभा अत्रे अशी अनेक संगीतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वे मंजिरीताईंच्या ‘गुरुछाया’ या निवासस्थानी राहून अगदी घरचीच झाली आहेत. त्यांच्या आशीर्वादाने ‘गुरुछाया’ हे नाव सार्थ झाले आहे. दृक्श्राव्य माध्यमातून कलेचं हे सादरीकरण आजही चालू आहे. आदरणीय व्यक्तींच्या स्पर्शानेपवित्र झालेल्या घरातील ‘त्या’ खुर्चीवर बसून शिष्यांना शिकवताना डॉ. मंजिरीताईंना अगदी भरून येते.
गेली पंचवीस वर्षे अ.भा.गां.म. मंडळाच्या परीक्षांच्या त्या पेपरसेटर व परीक्षक आहेत. तसेच खैरागड, नागपूर, अमरावती, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पुणे विद्यापीठ, एस.एन.डी.टी. येथे पेपरसेटर व व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून त्या कार्यरत आहेत. अनेक नृत्य व नाटय़ स्पर्धेच्या परीक्षक आहेत. ‘झी’ टी.व्ही.वरील ‘एकापेक्षा एक’ या नृत्याच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ज्युरी म्हणून त्या दीड वर्ष काम पाहात होत्या. सामाजिक भान जपत निरपेक्ष भावनेने जव्हेरी ठाणावाला शाळा, १९ नंबर शाळा, दगडी शाळा येथे जाऊन त्यांनी नृत्याचे धडे दिले आहेत. तसेच ठा.म.पा.च्या शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले आहे.
नृत्य करणे, शिकवणे, त्याविषयी लेखन करणे, परीक्षा, कार्यशाळा पेण, ज्येष्ठ कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी सर्वाना प्राप्त करून देणे अशा नृत्याच्या विविध पैलूंना स्पर्श करत नृत्य कलेच्या विकासासाठी त्यांनी अक्षरश: वाहून घेतले आहे. ‘नृत्य आत्मसात करण्यासाठी मन लावून साधना करावी लागते. आपल्याला हस्तमुद्रांकडे कौतुकाने बघावे लागते,’ असे म्हणत डॉ. मंजिरीताईंनी बसल्याबसल्या क्षणार्धात एक लोभस भावमुद्रा साकारली. ‘‘आठ वर्षांचा काळ म्हणजे माझ्या संयमाची जणू परीक्षाच होती.’’ याचा आवर्जून उल्लेख करत भावी नर्तिकांसाठी त्या गुरुमंत्र देतात. ‘‘विवाहानंतर आपल्या जोडीदाराचा आधी विश्वास संपादन करा, जरा सबुरीने घ्या, तुम्हाला कलेमध्ये यश नक्की मिळेल.’’
 नृत्य शिकताना ‘पी हळद हो गोरी’ असा कल आजच्या तरुणाईत दिसून येतो, याची मात्र त्यांना थोडी खंत वाटते. नृत्यकलेची आराधना केल्यामुळे मनोरंजन होतेच, शिवाय व्यायाम होतो, इंद्रियांची क्षमता वाढते, आरोग्याचे व्यवस्थापन सुधारते. अभिनयाची जाण येण्यामुळे नाटय़चित्रपटक्षेत्राची दारे किलकिली होतात. व्यक्तिमत्त्वात डौल येतो. गणेश नृत्यकला मंदिरातर्फे सहा-सात हजार जणींना त्यांनी नृत्याचे शिक्षण दिले आहे व अजूनही देत आहेत. सोनिया परचुरे, रूपाली देसाई, मनाली देव, वैशाली दुधे, वृषाली दाबके, स्वाती कोल्हे, वर्षां कोल्हटकर, लंडनला केतकी देशपांडे, अमेरिकेत मनीषा डोंगरे, शिल्पा मांजरेकर, दुबईला वैशाली म्हैसाळकर अशा कितीतरी जणींनी देश-परदेशात नृत्याच्या करियरमध्ये उंच झोके घेतले आहेत.
नृत्यकलेतील योगदानाबद्दल डॉ. मंजिरीताईंना ठा.म.पा. तर्फे ठाणे गौरव, ठाणे नगररत्न, रोटरी क्लबतर्फे व्होकेशनल एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड, लोकमततर्फे पंडिता पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
गुरूंच्या आशीर्वादाने कथ्थक नृत्यशैलीत स्वत:चे अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. मंजिरीताईंचा मोठा मुलगा मुकुंदराज जागतिक कीर्तीचा तबलावादक आहे. त्याची पत्नी नृत्यांगना सौ. मनाली म्हणजे मंजिरीताईंची शिष्या. ‘अहो बाई’ ते ‘अहो आई’ असा तिचा प्रवास ‘मला सासू हवी’ या भावनेतून साकार झाला आहे. शिवाय नृत्यासाठी लागणारा कपडेपट व इतर साहित्य भाडय़ाने देण्याचा तिचा व्यवसाय आहे. घरात मुकुंद‘राज’ असल्यामुळे त्याच्या ‘ताला’वर ‘सासू-सून’ नृत्याविष्कार सादर करत असतात. दुसरा मुलगा साउंड इंजिनीअर असून अंधेरीला त्याचा स्वत:चा स्टुडिओ आहे. त्याची पत्नी सौंदर्यतज्ज्ञ आहे. मोठा नातू दहावीत असून तबल्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली आहे. दोघी नाती नृत्य शिकत आहेत. एकदंरीतच हे देवघर नृत्य-कला गुणांनी निपुण आहे. या गणेश नृत्यकला मंदिरात घुंगरांचा नाद भविष्यातही अव्याहत घुमणार आहे.
लहानपणी नखचित्र काढणाऱ्या मंजिरीताई चित्रातील डौलदार रेषांना कथ्थक नृत्यशैलीतील भाव आणि ताल अंगाने गतिमान करत चालत्या-बोलत्या शिल्पाकृती साकारताना ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ उमटवत आहेत, हेच खरे!