करिअरिस्ट मी : संशोधक उद्योजिका Print

पूजा सामंत , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वुमन इन इंडिया’ ठरलेल्या पिरामल हेल्थ केअर लिमिटेडच्या संचालक पद्मश्री  डॉ. स्वाती पिरामल. वैद्यकीय शास्त्रातील संशोधनासारखं भरीव, विधायक कार्य करताना  उद्योजिका म्हणूनही त्यांनी स्वत:ला समर्थपणे प्रस्थापित केलं आहे. त्यांचं हे करिअर स्त्रीच्या अमर्याद क्षमतेला अधोरेखित करणारं.. म्हणूनच आदर्शवतही.. या पॉवरफुल  व्यक्तित्वाविषयी..
डॉ क्टर स्वाती पिरामल, आज त्यांची भारतातच नव्हे तर जगाला ओळख आहे ती, ‘वन ऑफ द मोस्ट पॉवरफूल वुमन इन इंडिया’ म्हणून. वैद्यकीय क्षेत्रात अनेक औषधांचा शोध लावणाऱ्या त्या प्रसिद्ध संशोधिका आहेतच, त्याशिवाय आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीतल्या एकमेव महिला सदस्य आहेत.       
देशाच्या योजना आयोग तज्ज्ञांपैकी एक असणाऱ्या  डॉ. स्वाती पिरामल यांनी ‘ड्रग्ज प्राइस कंट्रोल’, ‘बायोटेक्नॉलॉजी रेग्युलेशन ऑन बायोसीमिलर्स’ तसेच देशाच्या सार्वजनिक हितासंबंधी अनेक पुस्तके लिहिली आहेत, तरला दलाल यांच्यासमवेत ‘इट युवर वे टू गुड हेल्थ’ हे पुस्तक, मूत्रपिंड रुग्णांचा  आहार सांगणारं पुस्तक  तसेच ‘गीतेद्वारे प्रबंधनाचे पाठ’ हे पुस्तक देखील त्यांनी लिहिलं आहे. याशिवाय आर्थिक धोरणांसंबंधी त्यांनी आपली बाजू सातत्याने मांडली असून, त्यात डायरेक्ट टॅक्स कोड, जीएसटी, सरकारी आर्थिक धोरणकामासंदर्भात पारदर्शिता असावी यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत. ही योजना कार्यान्वीत झाली तेव्हा डॉक्टर स्वाती यांनी देशभर ४०० पेक्षा अधिक परिषदा घेतल्या.
राजीव गांधी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ‘आऊटस्टॅण्डिंग वुमन’ हा पुरस्कार स्वीकारणाऱ्या डॉक्टर स्वाती पिरामल म्हणजे एक हसतं-खेळतं, सतत कार्यशील, उद्यमी व्यक्तिमत्त्व. देशाच्या नामांकित वैज्ञानिक आणि क्लिनिकल मानद सल्लागार, एक प्रथितयश उद्योजिका, देशाचे प्रख्यात उद्योगपती अजय पिरामल यांच्या अर्धागिनी, दोन मुलांची माता आणि अलीकडेच मिळालेली एक कौटुंबिक बढती म्हणजे अडीच वर्षांच्या नातीची आजीदेखील..
अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर डॉक्टर स्वाती यांच्या भेटीची वेळ मिळाली ती त्यांच्या लोअर परळच्या पेनिनसुला संकुलातील पिरामल टॉवरमध्ये.. आणि गप्पांना सुरुवात झाली.
तुमचं अवघं व्यक्तिमत्त्व- कार्यशैली अष्टपैलू आहे, डॉक्टर व्हायचा निर्णय नेमका कधी-कसा घेतला ?
‘‘गेल्या १०० वर्षांच्या आमच्या कौटुंबिक इतिहासात माहेरी कुणीही डॉक्टर नाही. तशी मी अभ्यासू होते, शाळकरी वयात पुढे काय व्हायचंय हे ठरवलं नव्हतं. पण मला आठवतंय, माझं वय तेव्हा दहा होतं. मी घरातच होते आणि माझ्या धाकटय़ा भावाला कसलीशी रिअ‍ॅक्शन झाली. काय झालं, काय होतंय हे कळेपर्यंत तो काळा-निळा पडला. त्याच्या निळ्या पडलेल्या शरीराला घेऊन माझी आई डॉक्टर शोधत होती. मीदेखील तिच्यासोबतच होते तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू, डॉक्टर मिळेपर्यंतची धास्ती, आपला मुलगा वाचेल ना? आदी तिच्या अश्रूंसोबत वाहणारे अनेक प्रश्न मी त्याही वयात समजू शकले. त्या क्षणी मी डॉक्टर व्हायचा निर्धार केला. मला फक्त एवढंच ठाऊक होतं की, डॉक्टर होण्यासाठी खूप शिकावं लागतं. तेव्हापासून मी मनोमनी डॉक्टर झाले होते. स्वत:ला अभ्यासाच्या खोलीत कोंडून घेऊन दिवसाचे दहा तास अभ्यास करणं माझं ध्येय झालं. मेडिकलच्या शेवटच्या वर्षांला असताना मी एक पूर्ण वर्ष माझ्या अभ्यासाच्या खोलीबाहेर पडले नव्हते. दहावीनंतर माझा डॉक्टर व्हायचा निर्णय अधिकाधिक पक्का होत गेला. डॉक्टरांना मिळणारा समाजात मान, ते व्हिजिटला आल्यावर त्यांची बॅग हातात घेणारे आपण, याचं त्या वयात मला कुतूहल होतं. तशी अंगाने मी कृश होते आणि मेडिकल्सची पुस्तकं किमान पाच किलो- दहा किलो असायचीच. ती पुस्तकं वाचताना दमछाक व्हायची. एका सेमिस्टरमध्ये अशा पुस्तकांचं पारायण करणं आणि किमान ९०-९५ टक्के गुण मिळवणं मोठं आव्हान होतं, पण सातत्याने अभ्यास करून मी एमबीबीएस आणि पुढे एमडी करत अनेक पदव्या मिळवत गेले. पण माझ्या वाचनाचा पाया तेव्हाच घडला, कारण कमी वेळात अधिकाधिक वाचन करण्याची सवय झाली. घरातच एका कोपऱ्यात बसून माझं अखंड वाचन चालायचं. अर्थात, अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनही खूप असायचं.’’ त्या सांगतात.
 आजही त्याचं वाचन दांडगं आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातली सगळी आवश्यक पुस्तकं वाचली आहेत, पण शेक्सपिअर ते चार्ल्स डिकन्स आणि पी. जी. वुडहाऊस ते सुफीजम असं एकूणच चौफेर वाचन त्या करतात. पुढे स्वातींचा विवाह प्रसिद्ध उद्योगपती गोपीकृष्ण यांचे कनिष्ठ चिरंजीव अजय पिरामल यांच्याशी झाला. त्यांच्या वैवाहिक जीवनात नंदिनी आणि आनंद या दोन अपत्यांनी पूर्णता आणली. अजयला त्याच्या वडिलांकडून मोठय़ा उद्योगाचा वारसा मिळाला असला तरी तो सांभाळणं तेवढं सोपं नव्हतं. पिरामल कुटुंबाला १०० वर्षांची टेक्सटाइल उद्योगाची परंपरा होती. सासऱ्यांकडून मिळालेला वारसा वैभवशाली असला तरी दत्ता सामंत युनियन संपामुळे उद्योगाला अवकळा आली. स्वाती आणि अजय या दाम्पत्याने ऊर्जितावस्था आणण्याचा निकराचा प्रयत्न करेपर्यंत कुटुंबात संकटं दत्त म्हणून उभी राहिली. सासऱ्यांचं निधन झालं, मोठय़ा दिरांना कॅन्सरचं निदान झालं. बिझनेस सांभाळेपर्यंत कुटुंबाचा आधारस्तंभ निखळला. वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी कंपनीची धुरा अजयच्या अननुभवी खांद्यावर आली. त्या दरम्यान बाजारात निकोलस लॅबोरेटरीज विक्रीस आली. डॉक्टर स्वाती सांगतात, ‘‘त्या क्षणी ही औषधी कंपनी विकत घ्यावी अशी प्रबळ इच्छा झाली, पण माझ्याकडे फक्त डॉक्टरकीची पदवी होती. त्या संदर्भातलं प्रॅक्टिकल नॉलेज शून्य होतं. औषधी कंपनी घ्यावी म्हटलं तरी फार्मास्युटिकल ज्ञान असणं अतिशय गरजेचं होतं, पण आमच्याकडे सारा अभाव होता. त्या लॅबोरेटरीच्या मालकाशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्याने आम्हाला आम्हा उभयतांचा ट्रॅक रेकॉर्ड विचारला. आमच्याकडे फक्त आणि फक्त वारेमाप उत्साह, ध्येय, प्रचंड इच्छाशक्ती आणि नवनव्या कल्पनांचा आवाका हेच काय ते भांडवल होतं. तो क्षण अतिशय नाजूक, गुंतागुंतीचा आणि तितकाच जोखमीचा होता. निकोलस लॅबोरेटरीज नुकसानीत होती. अशा कंपनीला देशाच्या पहिल्या पाच मोठय़ा कंपनीत आणण्याचा तो एक प्रकारे विडाच होता. तेही गाठीशी कसलाही अनुभव नसताना.’’
त्या काळात ‘ग्लॅक्सो’ आणि ‘फायझर’ कंपन्या टॉपवर होत्या. अजय आणि स्वातीने ‘निकोलस’ला विकत घेतलं. त्यावर अहोरात्र काम करून ही कंपनी अवघ्या दहा वर्षांमध्ये शिखरावर नेली. पती-पत्नीने एकाच कंपनीत सर्वोच्च पदावर काम करण्याची उदाहरणं कमी आहेत. या मुद्दय़ावर बोलताना त्या म्हणतात, ‘‘ लहान वयात आम्ही विवाहबद्ध झालो. एकत्र वाढलो. काही किरकोळ बाबींखेरीज आमचे टोकाचे मतभेद कधी उत्पन्न झाले नाहीत. अहंकाराचा संघर्ष कधी नव्हता. प्रचंड मेहनत, पुढे जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची मानसिक तयारी दोघांमध्येही आहे. त्यामुळे आमचं नातं खूपच छान आहे. माझं अधिकतर क्षेत्र विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आहे, तर अजयची कार्यपद्धती वेगळी आहे. त्याचा कामाचा झपाटा, निर्णयक्षमता, उत्कृष्ट व्यवस्थापन वादातीत आहे. आम्हा दोघांचे गुण बिझनेसमध्ये एकवटतात, त्याचा फायदा कंपनीला होतो.’’ त्या सांगतात.
डॉक्टर स्वाती पिरामलना अलीकडेच ‘पद्मश्री’ मिळाली. तो क्षण आनंदाचा तर होताच, पण त्याहीपेक्षा अधिक जबाबदारी वाढवणारा होता, असं त्या सांगतात.
‘फोब्र्ज’ने प्रसिद्ध केलेल्या पॉवरफूल महिलांच्या यादीत तुमचंही नाव अग्रक्रमावर आहे. काय वाटतं पॉवरफूल वुमन म्हटल्यावर?
‘डॉक्टर स्वाती पिरामल’- पॉवरफूल वुमन, हॉल ऑफ फेम असे किताब, अनेक पदव्या- माझ्या कार्यावर तसा थेट फरक पडत नाहीत. मला असं वाटतं, असे किताब माझ्यापेक्षा इतर महिलांचा हुरूप, उत्साह वाढवतात. त्यांच्यात ही भावना नक्कीच निर्माण होते. अमुक महिलेला जर पॉवरफूल वुमन म्हणतात, तर तशी कार्यक्षमता माझ्यात का नाही? मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.’’
डॉक्टरी क्षेत्रात सतत नवीन शोध लागताहेत, तरी आपण मागे पडतोय, याची खंत वाटते का?
‘‘प्रचंड खंत वाटतेय. आपल्या देशाने प्रगती खूप केलीय, पण देशाच्या ७० टक्क्य़ांपेक्षा अधिक महिला अ‍ॅनिमियाग्रस्त आहेत, ऑस्टियोपोरोसिस शहरी-ग्रामीण दोन्ही स्त्रियांमध्ये दिसतो. बाळंतरोगामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या स्त्रिया भारतातच अधिक आहे. पोलिओचे उच्चाटन करण्यात आपण यशस्वी ठरलोय, पण एक खंतवणारा प्रसंग जसाच्या तसा आठवतो. याच रोडवरून एक पोलिओग्रस्त मुलगी जात होती. ती छान मुलगी पोलिओग्रस्त पाहून मी त्या क्षणी ठरवलं की, येत्या दोन वर्षांमध्ये किमान या रोडवर तरी कुणालाही पोलिओग्रस्त असता कामा नये. अनेक पोलिओग्रस्तांचे आम्ही पुनर्वसन केलं, पुढे पोलिओ लसीने पोलिओस प्रतिबंध केला. नॅशनल पोलिओ प्रोग्राम पुढे दोन वर्षांनी सुरू झाला. सार्वजनिक आरोग्याची, महिलांच्या आरोग्याची अशी दुर्दशा आहे.          
त्यांना आलेल्या अडचणींबद्दल त्या म्हणाल्या, दुर्दैवाने आपल्याकडे संशोधनाबद्दल एकूणच औदासिन्य आहे.
कॅन्सरवरच्या मूळ भारतीय औषधाचं पेटंट आपल्याला जर्मनीकडून घ्यावं लागलं. भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन कितीही व्यापक, अभ्यासू आहेत पण या संदर्भातील भारतीय सरकारची नीती खूप चीड आणणारी आहे. ड्रग्सचा शोध ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. वेळखाऊही आहे. या संशोधनासाठी अनेक वर्षे खर्ची पडतात. अनेकदा प्रचंड संशोधनानंतरही अपयश येतं, प्रयोग फसतात. हिमालयावर चढावं आणि शिखरावर पोहोचल्यानंतर तळाला घरंगळत यावं, असाही अनुभव येतो. सगळं ठाऊक असूनही सरकारी धोरणं खूप वेळकाढू आहेत. नियम, धोरणं खूपच तऱ्हेवाईक आहे, संशोधन झालेल्या औषधांना मान्यता मिळायला कित्येक वर्षे लागू शकतात, लागलीत. त्या-त्या औषधाचा कार्यकाल जर १५ वर्षांचा असल्यास त्यातली १२ वर्षे जर ते मान्य व्हायला लागलीत तर हातात कितीसा वेळ राहणारेय? बरं औषधं अ‍ॅप्रूव्ह झाल्यानंतरही ती विकण्याची परवानगी लवकर मिळत नाही. एकूणच सावळागोंधळ आहे.
भारतीय महिलांना गेल्या काही वर्षांमध्ये करिअर-घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. डॉक्टर पिरामल सधन असल्याने दैनंदिन पातळीवरचा रोजचा संघर्ष त्यांना करावा लागला का? यावर त्या हसून म्हणतात, मी पूर्वीही घरात स्वयंपाक करत असे, आजही करते. अगदी रोज केला नाही, तरी किचनमध्ये जाऊन काही डिश बनवणं विशेषत: आइस्क्रीम्स, डेझर्टस् मला फार प्रिय आहेत. माझ्या मुलांना सांभाळणं, त्यांचा होमवर्क, सासूबाईंना सांभाळणं, घर बघणं या घरगुती कामाखेरीज अनेक औषधांसाठी संशोधन करणं, शासनाकडे त्याच्या परवानगीसाठी अनेक सोपस्कार. खूपच सव्यापसव्य होतातच.
आपल्या या अतिव्यस्त दैनंदिन व्यवहारात स्वत:ला फिट ठेवणं गरजेचं असल्याने त्या प्राणायाम, योगाभ्यास किंवा दररोज काही वेळ चालण्याचा व्यायाम करतात.
वैद्यकीय शास्त्रातील संशोधनासारखं भरीव, विधायक काम करणाऱ्या स्वाती पिरामल उद्योजिका म्हणूनही समर्थपणे स्वत:ला स्थापित करतात आणि तीही कौटुंबिक जबाबदारी सांभाळून. त्यांचं हे करिअर स्त्रीच्या अमर्याद क्षमतेला अधोरेखित करणारं. म्हणूनच आदर्शवतही.