करिअरिस्ट मी : आनंद‘योग’ Print

alt

सुचित्रा साठे , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ आणि योगोपचारतज्ज्ञ अशा तीनही क्षेत्रांतल्या तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. उल्का नातू यांनी आता आपले आयुष्य योगप्रसाराला वाहून घेतले आहे. लोकांना रोगमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या डॉ. नातू यांच्या विधायक करिअरविषयी..
‘‘खरं सांगू मी आज पंधरा मिनिटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास वेळ काढू शकेन, नाहीतर मग पुढच्या आठवडय़ात कधी तरी.. चालेल का?’’ एकत्रित स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र व योगोपचारतज्ज्ञ अशा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या डॉक्टरांपैकी एक, अशा सुमधुरभाषिणी डॉ. उल्का अजित नातू यांच्या व्यस्त दिनक्रमाची चुणूक त्यांच्या बोलण्यातूनच जाणवली आणि हा ‘उत्तम योग’ लगेचच साधण्यासाठी माझी पावलं गोखले रोडवरील ‘नेस्ट’हॉस्पिटलकडे वळली.

‘‘मी माझ्या आयुष्यात एक लक्ष्मणरेषा आखून घेतली आहे.’’ मानसशास्त्राची प्रचंड आवड असल्यामुळे शिक्षिका व्हायचं स्वप्न उराशी बाळगलेल्या डॉ. उल्काताईंनी माझ्या मनातलं अचूक ओळखून त्यांच्या वेळेच्या गणिताबद्दल मला पडलेला प्रश्न मी काही विचारायच्या आतच सोडवून टाकला. ‘‘मला जुळ्या मुली झाल्यावर या कळ्या उमलताना बघण्यासाठी, त्यांच्या संगोपनासाठी, अपेक्षापूर्तीसाठी, संस्कारक्षम वयात सोबत करण्यासाठी आणि माझ्या घराचे घरपण जपण्यासाठी मी आमच्या हॉस्पिटलमधील संध्याकाळच्या कन्सल्टिंगला पूर्णविराम दिला. त्यामुळे तव्यावरची गरम पोळी खाण्याचा माझ्या चिमुरडय़ांचा ‘बाल हट्ट’ही मला पुरवता आला.’’ डॉ. उल्काताई सांगत होत्या.
खरं तर ही मर्यादा रेषा उमटली ती बालपणातल्या संस्कारांमुळे. ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ मानून भिवंडीजवळील कशेळी या चिमुकल्या खेडय़ात आपला ‘वैद्यकीय’ संसार थाटणाऱ्या डॉ. माधव व डॉ. वासंती केळकरांची ही कन्या. जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे ‘अर्थ’कारण न करता, उलट एक पैसाही न घेता अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचे असिधाराव्रतच त्या दाम्पत्याने स्वीकारले होते. पोद्दार आयुर्वेदिक कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावणारी स्कॉलर विद्यार्थिनी म्हणजे डॉ. वासंती. मुलांची आबाळ होऊ नये म्हणून जर्मनीला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी मिळालेली शिष्यवृत्ती डॉ. वासंती यांनी सहज नाकारली. पैसा हे सर्वस्व न मानण्याची वृत्ती, सामाजिक बांधीलकी याचं बाळकडू जन्मदात्यांकडून घेतच डॉ. उल्काताई मोठय़ा झाल्या. कशेळीहून रोज ठाण्याला डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेत व नंतर ठाणा कॉलेजला येण्याजाण्यातच बराचसा वेळ जाऊ लागला. बसचे अनियमित वेळापत्रक सांभाळत, कोणत्याही क्लासला न जाता पेट्रोमॅक्सच्या दिव्याखाली अभ्यास करून त्या दहावी व बारावीला ९८ टक्के गुण मिळवून विज्ञान व गणित या विषयात पहिल्या आल्या. बेडेकर विद्यामंदिरच्या या ‘आदर्श विद्यार्थिनीला’ मानसशास्त्र घेऊन शिक्षकी पेशात झोकून द्यायची तीव्र इच्छा होती; परंतु विधिलिखित वेगळंच होतं. त्यामुळे जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये रुळल्यावर बऱ्याच दिवसांनी यूडीसीटीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. प्रश्न आपोआप निकालात निघाला आणि अतिशय उत्तम रीतीने त्या एमबीबीएस झाल्या.
बारावीनंतर वसतिगृहात राहात असताना एमबीबीएस करणाऱ्या बुद्धिमान डॉ. अजित नातू यांच्यावर त्या अनुरक्त झाल्या. वास्तविक ते ‘अ-जित’ असूनही डॉ. उल्काताईंनी त्यांचे मन जिंकले. याचीच परिणती म्हणून दोघंही विवाहबंधनात अडकले. मानसोपचारतज्ज्ञ होण्याच्या विचाराने पुन्हा वर उसळी मारली. त्या वेळी अस्थिरोगतज्ज्ञ या शाखेकडे वळलेल्या डॉ. अजित नातू यांनी दूरदृष्टीने पत्नीला स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र या शाखेकडे जाण्यास सुचविले. स्त्री म्हणून स्त्रीच्या वेदना, संवेदना समजून घेताना मानसशास्त्रीय दृष्टिकोन नक्कीच उपयोगी पडेल या विचाराने डॉ. उल्काताई स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ झाल्या. यथावकाश ‘नेस्ट’मध्ये दोघांच्याही व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात झाली. घर आणि हॉस्पिटल यात त्या रमून गेल्या.
‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले’ या भावावस्थेमुळे घंटाळी मित्रमंडळाचा योगविषयक पदविका अभ्यासक्रम करताना ‘उल्काला हे आवडेल’ हा विचार डॉ. अजित नातूंच्या मनाला स्पर्शून गेला. अवघ्या वर्षांच्या असलेल्या दोन्ही मुलींना सांभाळण्याची जबाबदारी आनंदाने स्वत:कडे घेऊन त्यांनी डॉ. उल्काताईंना ‘योगा’कडे वळविले. पदविका अभ्यासक्रम करतानाच त्या ‘योगा’च्या प्रेमात पडल्या. गुरुवर्य योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या सांगण्यावरून मग पदवी परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. शारीरिक, मानसिक स्तरावर कुठे तरी काहीतरी चांगला बदल त्यांना जाणवू लागला होता. दुसऱ्यांना आरोग्यसंपदा लाभावी म्हणून पहाटे उठून नि:स्वार्थ भावनेने योगसाधना शिकविण्यासाठी घंटाळी मित्रमंडळात येणाऱ्या योग शिक्षकांविषयीचा आदर दुणावला. त्यांच्याही मनाने उचल खाल्ली आणि शिक्षक होण्याच्या सुप्त इच्छेला मूर्तस्वरूप लाभले.
‘योग’ विषयाची लागलेली आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. बंगलोर येथे ‘प्रशांती कुटिरम्’मध्ये जाऊन रोगाच्या अनुषंगाने योगोपचाराचे त्यांनी प्रशिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाचा ‘अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन योगा’ त्या उत्तीर्ण झाल्या. हरिद्वारच्या पतंजली योग विद्यापीठात जाऊन ‘अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च मेथडॉलॉजी इन योगा’च्याद्वारे प्रकल्प आखणीवर लक्ष केंद्रित केले. योगशास्त्र त्यांच्या मनाला पटले, रुचले, त्यांनी अनुभवले. फक्त वैयक्तिक पातळीवर शांती, समाधान, आनंद अनुभवत त्या थांबू शकल्या असत्या, पण ‘आपणासी जे जे ठावे, ते इतरांना सांगावे’ या उर्मीने योगावकाशात त्यांनी भरारी घेतली. डॉ. अजित नातू यांचे प्रोत्साहन, गुरुवर्य अण्णा व्यवहारे यांचे मार्गदर्शन आणि घंटाळी मित्रमंडळ ही संस्था याबद्दल कृतज्ञता बाळगूनच त्यांचा ‘योगा’चा प्रवास दमदार झाला.
कर्मधर्मसंयोगाने घंटाळी मित्रमंडळाच्या ‘रोग मनाचा शोध मनाचा’ व ‘भक्तिगंगा’ या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली. दासबोध, ज्ञानेश्वरी, उपनिषद, गीतारहस्य या ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी ‘योग’ समाजाभिमुख ठेवला. विषयाला अनुलक्षून केलेले मुद्देसूद विवेचन सर्वानाच भावले. योगाविषयी गोड बोलणं ऐकून सगळेच माना डोलावतात, तत्क्षणी भारावून जातात. पण ‘नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ अशी गत होते. डॉ. उल्काताईंना फक्त हेच अभिप्रेत नव्हते. जीवनात कोणताही रोग होऊ नये, जीवन सुंदर व्हावे यासाठी ‘योग’ आचरणात आणणे आवश्यक आहे, हे जरी खरेच असले तरी प्रत्यक्षात ‘काही’ झाल्याशिवाय कोणीही इकडे वळत नाही हे मानसशास्त्र जाणून ‘रोग आणि योग’ अशा प्रकल्प उभारणीकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलं.
‘शुभस्य शीघ्रम’ या विचाराने अगदी कमी वेळात अविश्रांत मेहनत घेऊन घंटाळी मित्रमंडळातर्फे कैवल्यधाम लोणावळा व ‘प्रशांती कुटिरम्’ बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय योग परिषदेमध्ये ‘मासिक पाळीतील अनियमितता आणि योग’ हा शोधनिबंध त्यांनी सादर केला. मिळालेल्या प्रतिसादाने आनंदून तोच शोधनिबंध स्त्रीरोगतज्ज्ञांच्या परिषदेत (रऑड) मांडला तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी मन:पूर्वक दाद दिली. आजकालच्या ‘तू तिकडे अन् मी इकडे’ अशा मोबाइल संसारात ‘आधी लगीन करिअरशी’ असते. त्यामुळे मातृत्वाचा विचार अंमळ लांबणीवर टाकण्याची शक्यता निर्माण होते. ‘हम दो हमारा एक’ अशा त्रिकोणी कुटुंबात आर्थिक संपन्नता असली तरी स्पर्धात्मक युगात तग धरून उभे राहण्यासाठी चिमुकल्या पाहुण्याला शिक्षणाबरोबर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकासाची कास धरावी लागते. अशावेळी त्या बाळाला सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘योगांकुर’ प्रकल्पाचे त्यांनी आयोजन केले. ४५ मिनिटे ओंकार, यमन व केदारच्या सुरावटींचे वलय, प्रार्थना, शिथिलीकरण व काही आसने यांचा सराव, आधी व नंतर केलेल्या दृष्य परिणामांची नोंद बरंच काही चांगलं सांगून गेली. योगसाधनेच्या उपयुक्ततेला शास्त्रीय आधाराच्या बैठकीबरोबर उपनिषदातील गर्भोपनिषदाचा आधार होताच. बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या योगांकुर प्रकल्पाने तृतीय पारितोषिक पटकावले, तर कैवल्यधामच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सवरेत्कृष्ट संशोधन प्रकल्प म्हणून गौरवला गेला. संगणकजन्य नेत्रविकार व योग या प्रकल्पास बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय योग परिषदेमध्ये सवरेत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार लाभला. त्याचबरोबर ‘चिंतारोग आणि योग’, डिस्लिपिडेमिया व योग हे प्रकल्पही बक्षीसपात्र ठरले. कौलालंपूर मलेशिया येथे भरलेल्या फिगोमध्ये ‘प्रेग्नन्सी व योगसाधना’ या विषयावरील संशोधन त्यांनी सादर केले. बंगलोर येथे आ. यो. सं.त ‘शास्त्रीय शोध निबंध-पोस्टर प्रेझेंटेशन’साठी परीक्षक म्हणून त्या जाऊ लागल्या.
दरम्यान, घंटाळी मंडळातर्फे निरंजन योग स्वास्थ्य केंद्राची स्थापना झाली. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख डॉ. उल्काताईंनी तयार केलेले प्रकल्प प्रत्यक्ष राबविले जाऊ लागले. सुलभ प्रात्यक्षिकांसह डॉ. उल्काताईंचे मार्गदर्शन व प्रभावी समुपदेशन यांच्या एकत्रित परिणामाने केंद्रात येणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच चालली आहे. हे झाले ठाणेकरांसाठी, पण ‘योगाचा’ परीघ रुंदावण्यासाठी वैद्यकीय परिषदांमधून डॉ. उल्काताईंनी हे प्रकल्प मांडण्याचा श्रीगणेशा केला. ‘‘हे ज्ञान डॉक्टरांमध्ये झिरपून त्यांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’मधून व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे वजन येते व उंचीही लाभते’’ या त्यांच्या प्रबळ इच्छेला नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्त्रीरोगतज्ज्ञ परिषदेत (एफओजीएसआय) मनासारखा प्रतिसाद मिळाला आहे. गर्भारपणातील धोके, वारंवार होणारा गर्भपात, बाळाचं कमी वजन, वाढलेला रक्तदाब, वंध्यत्व, पॉलीसिस्टिक रोग, हार्मोनल डिसऑर्डर यात योगसाधनेचा प्रभावी उपयोग ऐकून कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी ती शिकण्याची व आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचविण्याची तयारी दाखविली आहे. अर्थात डॉ. उल्काताई ‘याचसाठी केला होता अट्टहास’ म्हणत मदत करायला एका पायावर तयार आहेत.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रकल्प तयार करण्यासाठी घं.मि.मं.तर्फे प्रज्ञान योग अनुसंधान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
डॉ. उल्काताईंच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टर्स, अनुभवी योगशिक्षक यांच्या सहयोगाने तबलावादकांसाठी, टेबल टेनिस खेळणाऱ्यांसाठी, मेंटल हॉस्पिटलमधील मनोरुग्णांसाठी ज्युपिटरमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी असे अनेक संशोधन प्रकल्प उभारले जात आहेत. डॉक्टर झाल्यावर योगाशी ओळख होण्यापेक्षा डॉक्टर होतानाच योग शिकवावा या भूमिकेतून कळव्याच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये योगवर्ग चालू केलेले आहेत. डॉ. भारती आमटे यांच्या निमंत्रणावरून डॉ. उल्काताई तीनदा आनंदवनात जाऊन आल्या. तेथील पासष्ट गर्भवती महिलांना ‘योगांकुराच्या’ माध्यमातून योग समजविण्यात आला. अजूनही तेथील योगशिक्षक दीपक शीव फोनवरून सतत संपर्कात राहून योगवर्ग चालू ठेवत आहेत. कै. साधनाताईंची भेट आणि आशीर्वादाचा भाग्ययोग जुळून आल्याबद्दल डॉ. उल्काताई स्वत:ला धन्य समजतात. शिकागो येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या संमेलनात गुरुवर्य अण्णांसमवेत जावून ‘महिलांसाठी आनंदयोग’ त्यांनी सादर केला. सलग आठ महिने रोज ‘योग आहे योगाचा’ हा कार्यक्रम ‘स्टार माझा’च्या वाहिनीवरून प्रक्षेपित केला गेला. झी टीव्ही, साम मराठी, दूरदर्शन, आकाशवाणी अशा सर्व माध्यमांतून त्या ‘योग’वर मार्गदर्शन करत आहेत. कै. गुरुवर्य का. बा. सहस्रबुद्धे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काढलेल्या योगदिंडीमध्ये गुरुवर्य अण्णांबरोबर त्या प्रमुख वारकरी होत्या. ‘रोग आणि योग’ हे नातं उलगडून दाखवीत त्यांनी नाशिक, नगर, चिंचवड, सातारा, गडहिंग्लज अशा तेरा गावांत दौरा काढला. यानिमित्ताने कार ड्रायव्हिंगचा छंदही जोपासला.
आधुनिक वैद्यकशास्त्राने शारीरिक रोग बरा होतो, पण सुदृढ मनासाठी योगशास्त्राशिवाय पर्याय नाही, हा विचार ‘योगा फॉर हेल्थ, हिलिंग अँड हार्मनी- ऌ3 योगा’ या पुस्तकात गुरुवर्यासोबत अक्षरबद्ध केला. ‘गर्भवती महिलांसाठी योग-योगांकुर’ या त्यांच्या पुस्तकाचाही जन्म झाला. इतर वर्तमानपत्रे व दिवाळी अंकांतील ललित लेखांबरोबरच पद्मभूषण योगाचार्य सदाशिवराव निंबाळकर यांच्या ‘महिलांसाठी आनंदयोग’ या पुस्तकास प्रस्तावना लिहिताना त्या कमालीच्या हरखून गेल्या. ‘ओंकार’, ‘मुलगी वयात येताना’, भारतातील लेदर इंडस्ट्रीत काम करणाऱ्या लोकांसाठी ‘सुलभ योगसाधना’ या त्यांच्या सीडी योगप्रसारास हातभार लावीत आहेत.
कैवल्यधाम, लोणावळा योग इन्स्टिटय़ूट, सोमय्या कॉलेज, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान येथील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यात्या म्हणून त्यांचा नेहमीच सहभाग असतो. याशिवाय सोमय्या कॉलेजमध्ये बी.ए. व एम.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅनॉटमी अँड फिजिऑलॉजी इन योगिक प्रॅक्टिसेस या विषयाच्या त्या व्याख्याता आहेत. योगिक समुपदेशन हे त्यांचे अत्यंत आवडते काम. नाना पालकर स्मृती समिती, ठाणे शाखेच्या त्या अध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या रुग्णसेवा दिनाचे औचित्य साधून परळ येथील शाखेच्या कार्यालयात व्याख्यान देण्यासाठी त्या गेल्या असताना नुकतेच दिवंगत झालेले डॉ. अजित फडके, डॉ. उल्काताईंचे भाषण ऐकण्यासाठी प्रकृतिअस्वास्थ्य असूनही हजर राहिले. ‘बाळ, किती ओघवते आणि सुरेख बोललीस’ ही त्यांनी दिलेली शाबासकी म्हणजे डॉ. उल्काताईंच्या ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. परदेशात ध्यानाचे महत्त्व पटले आहे, पण आपल्या दाराशी गंगा वाहत असूनही आपण कोरडेच राहतो, याची त्यांना रुखरुख लागते.
नि:स्वार्थ भावनेने एक तपाहून अधिक काळ योगप्रसाराला वाहून घेतल्याबद्दल रोटरी क्लबतर्फे व्होकेशनल एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड; इनरव्हील, डोंबिवलीतर्फे वुमन ऑफ एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड, चित्पावन संघ, ठाणेतर्फे वैद्यकीय- सामाजिक सेवा पुरस्कार, मी मराठीतर्फे ‘तेजस्विनी’साठी निवड, नवदुर्गा पुरस्कार अशा पुरस्कारांनी डॉ. उल्का यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आठ-दहा वर्षे शास्त्रीय संगीत शिकलेल्या, आपण हार्मोनियम उत्तम वाजवू शकतो हा आत्मविश्वास बाळगणाऱ्या, पहाटे चारला उठून विविध आघाडय़ांवर लीलया लढणाऱ्या डॉ. उल्काताई म्हणजे योगाचे खतपाणी घातल्यामुळे जीवनपुष्पाची प्रत्येक पाकळी कशी बहरून येते, याचे मूर्तिमंत उदाहरण. परमेश्वर त्यांच्या योगप्रसाराच्या कार्यात त्यांना यश देवो, हीच सदिच्छा.