स्त्री. पु. वगैरे वगैरे : संतप्त सहजीवन Print

महेंद्र कानिटकर ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संतप्त सहजीवन हा काहींच्या आयुष्याचा दुर्दैवी भाग आहे. यातला एक जोडीदार कायम दुसऱ्यावर संतापलेला असतो साहजिकच त्याचं सहजीवन धोक्यात आलेलं असतं. मात्र याला मार्ग काय़ ? यासाठी आधी आपण कुठल्या स्वभावाचे आहोत ते जाणून घेणं गरजेचं आहे..
।। एक।।
मधू आमच्या बरोबरची.  डॅशिंग म्हणून आम्ही तिला ओळखायचो. कॉलेजमध्ये येताना कधी कधी चक्क वडिलांची राजदूत मोटारसायकल घेऊन यायची.

(तेव्हा मुलींनी मोटारसायकल चालविणं ग्रेट मानलं जायचं.) ती बॅडमिंटन खेळायची आणि अगदी राष्ट्रीयस्तरावरही
खेळली. भारतभर हिंडली. कॉलेजमध्ये असताना प्रत्येक बॅडमिंटन प्लेअरबरोबर तिचं नाव आम्ही इतर लोक जोडायचो. तिचं ‘शटल’ असं नावही ठेवलं होतं इतरांनी, पण मधू आमच्या दोघांच्या अगदी जवळची असल्याने तिचं पार्टनर बदलणं फक्त मिक्स डबल्सपुरतं मर्यादित होतं हे आम्हाला माहिती होतं.
पण मधूला विजय देशमुखबद्दल आकर्षण होतं हे तिनं आम्हाला कुणालाही न सांगण्याच्या अटीवर सांगितलं होतं. विजय आमच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. अ‍ॅथलेट
होता. देखणा, खानदानी देशमुखी चेहरा, कमावलेली तब्येत. मोठं कूळ. घरचा तंबाखूचा व्यवसाय. बुलेटवरून कॉलेजमध्ये यायचा. त्याचा एक (आमच्या मते) खूशमस्कऱ्यांचा कंपू होता. त्याचं वागणं खूप दादागिरीचं असायचं. ‘कागदावर रेघोटय़ा मारण्याऐवजी मैदानात पळा’ असं काहीतरी तो मला बोले म्हणून मी त्याला टाळत असे.
त्याचं कॉलेज संपलं. मधू गावातून उपनगरात राहायला गेली आणि आमचा संपर्क संपला.
आणि इतक्या वर्षांनंतर मधूचा फोन आला. ‘‘भेटायला यायचं आहे. मी कोल्हापूरला असते. चार तास मी पुण्यात आहे, तेवढय़ात भेटायचं आहे.’’ सुदैवाने आमच्या दोघींच्याही कोणत्याही अपॉइंटमेन्ट नव्हत्या. जुनी वर्गमैत्रीण भेटेल याचा आनंदही होता. माझी कल्पना अशी होती की, ती मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाबद्दल भेटायला येत आहे.
ती दरवाजा उघडून आत आली आणि माझ्या समोर प्रश्न पडला हीच का ती मधू? कॉलेजमध्ये बिनधास्त टी शर्ट, बॉक्स फ्लॅप शॉर्ट स्कर्ट घालून फिरणारी तरतरीत मधू?
आमच्यासमोर जणू काही एक सापळा बसला होता. डोळे खोल गेलेले. गालफडं बसलेली आणि एकुणातच म्लान मुद्रा. ‘‘चित्रा (गौरीचं लग्नापूर्वीचं नाव), मुलीसाठी स्थळे बघशील म्हणून तुझ्याकडे आले.’’
‘‘जरूर’’ गौरी म्हणाली.
 ‘‘आधी का नाही आलीस?’’
 ‘‘नाही आले. दादाचं (म्हणजे विजयचं) म्हणणं होतं जावई आपल्या जातीतला खानदानी हवा, पण मी भटीण ना, त्यामुळे आमच्यात मुलं होला हो म्हणेनात. एका अर्थानं बरंच!’’ तिच्या स्वरात अचानक कटुता आली.
‘‘मधू तुझं फारसं बरं दिसत नाहीये!’’
‘‘फारसं नाही, अजिबातच बरं नाही.’’
‘‘लग्न झाल्याच्या दिवसापासून मी अनामिक आगीत होरपळते आहे ते आत्तापर्यंत.’’
दादाला मी आवडले होते म्हणून त्याच्या घरच्यांनी लग्न लावून दिलं इतकंच. पण त्याचे खानदानी रीतिरिवाज, नमस्कार चमत्कार हे समजेपर्यंत दोन वर्षे गेली, पण त्या दोन वर्षांत मी जेवढय़ा शिव्या खाल्ल्या तेवढय़ा त्यापूर्वी कधीही खाल्ल्या नव्हत्या. प्रत्येक वेळी माझं बॅडमिंटन, माझी ‘भट’ जात यांचा उद्धार होई.
आणि हे विजयला सांगायची चोरी. त्याचं एकच पालुपद. ‘‘खानदानी रक्त आहे चटके देणार.’’ इकडे आईनं दरवाजे बंद केलेले आणि इकडे चटके. आम्ही प्लॅनिंग करत नव्हतो तरीही दिवस राहायला उशीर होऊ लागला तसा दादा माझा राग राग करू लागला आणि ते प्रकार जीवघेणे होते. रात्री खूप प्यायचा आणि सिगरेटचे चटके देत मुलगा दे मुलगा दे असं ओरडायचा. बापरे अजूनही अंगावर काटा येतो आठवलं की.’’
‘‘अखेर एकदाचे दिवस राहिले. मग स्वारी खुशीत. खूप लाड केले माझे. पण मुलगी झाली असं कळलं तेव्हापासून हॉस्पिटलमध्ये कुणी फिरकलंच नाही. १५ दिवसांनी माझा मीच डिस्चार्ज घेऊन परत आले. तब्बल सहा महिने दादा माझ्याशी बोलला नाही. मग दुसरीही मुलगी झाल्यावर दादासाठी मी यंत्र झाले. ’’
‘‘सतत संताप. सतत खेकसणं. बाहेरच्यांशी बोलताना कोणाचा विश्वास बसणार नाही, पण माझ्याशी, मुलींशी बोलणं.. बापरे आम्ही तिघी सतत भीतीच्या छायेत वावरतो.’’
कुठल्या कारणावरून तो चिडेल हे सांगता येत नाही. आमच्या संसाराला संसार म्हणायचं का?
लेकीला चांगलं स्थळ बघून द्या. जिथे रक्त चांगलं असेल पण खदखदतं नसेल!

।। दोन।।
अशाच एका युवक मित्राची गोष्ट. मराठवाडय़ातला जैन समाजातला. त्या समाजात माणसं एकमेकांना घट्ट धरून राहतात. एकमेकांना खूप मदत करत राहतात. अशा संस्कृतीत वाढलेल्या भरतचं लग्न पुण्यातल्या मेधाशी झालं. मेधाचे वडील त्याच समाजातले, पण राष्ट्रीयीकृत बँकेत ऑफिसर. त्यामुळे सतत बदल्या यामुळे थोडेसे कॉस्मोपॉलिटिन समाजात वावरलेले. त्यामुळे मेधाची जडणघडण प्रायव्हेट टाइपची.
सुरुवाती सुरुवातीला इतकी माणसं कौतुक करीत आहेत, अगदी ‘हम आपके हैं कौन’ पद्धतीने लग्नसोहोळे चालले आहेत हे पाहून मेधा सुखावली; परंतु काही दिवसांत तिच्या लक्षात येऊ लागले भरत प्रत्येक बाबतीत कमालीचा शांत आहे. कुठेही विरोधी मत व्यक्त करणं नाही की काही नाही.
खरं तर यांचा नवीन संसार आणि पुण्यात याचा वन बीएचके फ्लॅट, पण भरतचे नातेवाईक कुठल्याही क्षणी येऊन टपकत आणि त्याचा मोठा भाऊ आणि भाभी इतकी भारी की ते दोघे आले की भरतच्या बेडरूमचा ताबा घेत आणि त्यांची मुलं आणि मेधा हॉलमध्ये!
हे मोठ्ठं कुटुंब प्रकरण मेधाला पचनी पडत नव्हतं. तिला वाटे अख्ख्या मराठवाडय़ातील सर्व नातेवाईकांची ती वेटिंग रूम आहे. दर वेळी कोणाचा ना कोण, कोणत्याही वेळी येऊन टपके आणि पाहुणचाराची जबाबदारी मेधावर. हे सगळं भरतला सांगितलं तर तो म्हणायचा, ‘‘उसमें कौनसी बडी बात? हमें तो दुआएं मिलती होंगी.’’
त्याच्या या वाक्याचा तिला विलक्षण राग येई. तिला वाटे भरतला प्रायव्हसीची गरज नाही आणि त्याला आत्मसन्मान नाही आणि तो इतरांची कामे करतो त्यामुळे इतर सगळ्यांची मेधाकडून काम करण्याची अपेक्षा असते आणि तिला त्यामुळे सारखंच, नेहमीच इतरांचं तिला न आवडणारं वागणं सहन करावं लागतं. यावर तिनं नामी उपाय शोधून काढला. असहकार. तिच्या मनाविरुद्ध काहीही घडलं की ती बोलणं बंद करायची. अगदी घरात पाहुणे आले तरी त्यांच्याशीही एक शब्द बोलणं नाही. हळूहळू त्याच्या घरी माणसं येणं बंद झालं. तिच्या माहेरीसुद्धा आई सोडून कोणी येत नसतं.
थोडे दिवस बरे जात, पण अचानक ती मौनात जाई. तेव्हा दोन दोन दिवस मुलीकडेसुद्धा लक्ष देत नसे. भरत हे सगळं आम्हाला सांगत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील वैताग स्पष्ट जाणवत होता. त्याच्या मते मेधा म्हणजे एक धगधगता ज्वालामुखी आहे. त्याचा उद्रेक होऊ नये म्हणून तो झटतो.
             भरत आणि मधू ही आपल्या कुटुंबव्यवस्थेत अनेक ठिकाणी पाहायला मिळणारी उदाहरणं आहेत. त्या वृत्ती म्हणून पाहिलं तर आपण त्या प्रकारात तर नाही ना याची खातरजमा करून घेता येईल आणि भरत, मेधा, विजय, मधू यांच्यापैकी कोणती वृत्ती आपली आहे ते ठरविण्यासाठी काही मुद्दे.
मी भरत वृत्तीचा/ ची असेन तर
१) मी नेमस्त राहीन.
२) मी संघर्ष टाळीन.
३) मी जोडीदाराच्या इच्छेनुसार वागेन.
मी मेधा वृत्तीची/ वृत्तीचा असेन तर
१) मी आक्रमक आहे, पण संघर्ष करीत नाही.
२) माझ्याकडे सहनशक्ती कमी आहे.
३) माझ्या भावनांमुळे इतरांना त्रास होतो याची मला पर्वा नाही.
मी विजय वृत्तीचा/ वृत्तीची असेन तर
१) आक्रमकता हा धर्म आहे.
२) माझे रक्तच तापट आहे.
३) माझ्या पलीकडे कोणत्या दृष्टीने वा दर्जाने पाहावे हा माझा अधिकार आहे.
मी मधू वृत्तीचा/ वृत्तीची असेन तर
१) सहन करणे आणि करीत राहणे याला पर्याय नाही.
२) प्रत्येक पर्यायाची एक किंमत असते आणि आवडीचा जोडीदार मिळाल्यावर जे होईल ते स्वीकारलं पाहिजे.
 यातूनही मार्ग निघू शकेल. याबद्दल काही पुढच्या (२३ जून) भागात.