स्त्री. पु. वगैरे वगैरे : मनातले पोलीस Print

महेंद्र कानिटकर ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

माणसाच्या मनात चार प्रकारचे पोलीस असतात. या पोलिसांना ट्रेनिंग द्यायचं असतं. ती एक प्रकारची कवायतच असते. नातेसंबंधात जास्तीत जास्त वेळा कोणत्या पोलिसाला आपण तैनात करतो यावर नात्याचं यशापयश अवलंबून असतं.
‘संतप्त सहजीवन’ (प्रसिद्धी, ९ जून) लेखाची पानं मी आमच्या कार्यालयातल्या स्त्री कर्मचाऱ्यांना वाचून दाखवली. त्यांच्या मते ‘मधूची गोष्ट असू दे किंवा भरतची, सगळं शेवटी बायकांनाच सहन करावं लागते. मधूचा नवरा आक्रमक आणि क्रूर आहे. वेगळ्या रीतीरिवाजातील मधू त्याच्या घरी आल्यानंतर त्याने तिच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला हवं होतं. बिचारी मधू सतत भीतीच्या छायेत. खरं तर तिनं कुठल्या तरी महिला आधार केंद्राची मदत घ्यायला हवी होती.’
मी सहमतीदर्शक मान हलवली. ‘विजय जे वागला ते क्रूर होते याबद्दल कोणताही संशय नाही. प्रश्न हा आहे की, मधू अगदी सुरुवातीपासून हे सारं सहन का करीत राहिली?
भाग्यश्री म्हणाली, ‘तिच्यापुढे पर्याय होता का? कुठे जाऊ शकली असती ती? जातीबाहेर लग्न केल्याने माहेर तर तुटलं होतं.. शेवटी बायकांनाच सहन करावं लागतं.’
‘तुम्हाला एक विरोधाभास माहित्येय, ज्याला संताप येतो तो आणि ज्याच्यावर संताप आलेला असतो अशा दोन्ही व्यक्ती एकाच क्रियेबद्दल बोलत असतात. ती म्हणजे ‘मला सहन होत नाही’ आता आपण विजयचा विचार करू. मधुचं एखादं वागणं मग ते क्षुल्लक असेल किंवा मोठं असेल.. तो ते बघतो आणि स्वत:ला म्हणतो, ‘मला हे सहन होत नाही. अशक्यच. हे भयंकर आहे. माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे. जितकी अशा प्रकारची वाक्य तो स्वत:शी बोलतो तितका त्याचा राग उफाळतो, तीव्र होतो आणि त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे तो हिंसक होतो, क्रूर होतो. कोणतीही गोष्ट जर आपल्याला सहन झाली नाही तर राग येण्याची शक्यता खूप असते. प्रत्येक व्यक्तीचे आपल्या जोडीदाराने कसे असावे, कसे वागावे, कसे बोलावे याबाबत स्वत:च ठरवलेले (मग ते किती का चुकीचे असेनात ते त्यावर ठामही असतात.) नियम असतात आणि जर का ते नियम जोडीदाराने तोडले, तर त्याला शिक्षा करायलाच हवी, असं म्हणणारा पोलीस पण त्याच्या मनात घट्ट असतो.
सहजीवनातला संतापाचा सारा चित्रपट एकमेकांच्या मनातील नियम किती कडक आहेत आणि त्यांच्या मनातील पोलीस किती रावडी किंवा नेमस्त आहे त्यावर अवलंबून असतो.
विजयच्या वागण्याला आपण रावडी किंवा दांडगाई करणारा पोलीस जबाबदार आहे तर मधूच्या वागण्याला भित्रा पोलीस, पळपुटा पोलीस जबाबदार आहे.
भरतच्या मनातला पोलीस सहृदय आहे आणि तटस्थ आहे. मेधाच्या मनातला पोलीसही विजयइतकाच दांडगा आणि क्रूर आहे.
प्रश्न हा आहे की, कोणतंही सहजीवन कायमच नेहमीच शंभर टक्के वेळा शांत किंवा संतप्त असं असतं का?
सवाल हा आहे की मनातल्या पोलिसाचं काय करायचं?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच द्यावं लागेल. मेधाचं तसंच झालं. मेधाला विचारलं, ‘तुझ्या मते वर्षांतून जास्तीत जास्त किती वेळा भरतचे नातेवाईक घरी येतात? आणि तू संतापतेस? ती म्हणाली, ‘महिनाभर येत असतील.’ मी म्हणालो, ‘हं, म्हणजे ३६५ दिवसांपैकी त्रास न होण्याचे दिवस ३३१ नाही का ? मग ३३ वा ३४ दिवसांचा त्रास दोघेही जण उरलेल्या ३३१ दिवसांवर लादून तुम्हाला काय मिळतं? मी असं अजिबात म्हणत नाही की, तू त्याचं वागणं सहन कर. मी इतकंच सांगतो, तुला होणारा त्रास किती वेळा (म्हणजे ३३ दिवस) सलग किती काळ आणि किती तीव्र होतो? याचा विचार कर. जितक्या वेळा सहन होत नाहीचा जप करशील तेवढा तो तीव्र होईल. तुझ्या मनाविरुद्ध लोक वागत आहेत ते कदाचित तुझ्या कंट्रोलबाहेर असेल पण थोडीशी सहनशीलता वाढवून तुझा त्रास कमी करणं तुझ्याच हातात असेल. ते जर तुझे नियम-अदा पाहण्यांनी कधी यावं, काय करावं, थोडे लवचिक केलेस तर त्यामुळे तुझाच त्रास कमी होणार आहे.
आणखी एक गोष्ट, ‘तुझा नियम का आहे ते एकदा भरतला समजावून सांग. उदाहरणार्थ लग्नानंतर तुमची दोघांची इन्टीमसी जपण्यासाठी बेडरूम तुम्हा दोघांची असली पाहिजे हे ठामपणे सांग. कित्येकदा आपल्या मनातला नियमाबद्दलचा विचार नेमकेपणाने मांडण्यात आपण कमी पडतो. तिथे ठाम भूमिका हवी.
‘मेधा म्हणाली, मी असा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही तर घटस्फोट नाहीतर सेपरेशनचा विचार करीत होतो.’
‘मी म्हणतो, त्या दिशेने प्रयत्न तर करून बघा. घटस्फोटाचं नंतर बघूया.’

मधूचं दुखणं फक्त जरा जुनाट होतं. तरीही माझ्या मते मार्ग निघणं शक्य होतं.
मधूला मी विचारलं, ‘विजय तुझ्याशी वाईट वागत होता. हे तुला सहन होत नव्हतं. त्याचा तुला, तुझ्या मुलींना कमालीचा त्रास होत होता. या गोष्टीवर ते काय अॅक्शन घेतलीस?
‘आधी थोडा प्रयत्न करून बघितला. सासूबाईंना मधे घेतलं. तेव्हा तो जास्तच पिसाळला. मग नाद सोडून दिला. मी माझं स्वयंपाकघर आणि दोन मुली. सगळं आयुष्य बंदिस्त करून टाकलं. ना मैत्रिणी, ना माहेर, ना बॅडमिंटन.’
‘भारतातल्या असंख्य स्त्रिया करतात तेच तू केलंस याचं आश्चर्य वाटतं. तू शिकलेली मॅच्युअर्ड खेळाडू आणि तुझ्या कोर्टमध्ये शटल क्षणभर न टिकू देणारी. संसारात मात्र (एनडी) गेम हरत गेलीस.
याचा एक नियम सांगू शकशील?
तिनं मान हलवली-
‘एकदा प्रेम केलं की, सगळं सहन करायचं असतं!’ लक्षात घे, विजयवर तू मनापासून जिवापाड प्रेम केलंस आणि त्यात तू आत्मसन्मान विसरलीस. प्रेम म्हणजे शरणागती नाही. ती तू पत्करलीस आणि तुझ्यातली धाडसी, आक्रमक मधू दडपून टाकलीस. आपल्या स्वत:च्या नैसर्गिक वृत्तीपासून माणसाला फार काळ मनाविरुद्ध लांब राहता येत नाही.
जा विजयकडे आणि सांग थेट निर्भयपणे, ‘मुली लग्नाच्या झाल्या, आता तरी माणूस म्हणून वागवणार आहेस का? आणि कधीपासून? ठाम राहा. या प्रश्नानं तो चकित होईल. कदाचित अशा स्मार्ट मधूचीच तो वाट पाहत असेल.
लक्षात घे, माणसाच्या मनात चार प्रकारचे पोलीस असतात.
आक्रमक : रावडी, दबंग वगैरे.
तटस्थ : फक्त नियमाला धरून चालणारे.
नेमस्त : बोटचेपे मवाळ.
ठाम : नियमाची योग्य अंमलबजावणी करणारे.
या पोलिसांना आपल्याला ट्रेनिंग द्यायचं असतं.
केव्हा, कुठे, कधी, किती वेळ कोणत्या पोलिसाचा ड्रेस चढवायचा ते आणि एक लक्षात घे पोलिसांचं ट्रेनिंग मनातल्या पोलिसांचं ट्रेनिंग अधिक शिस्तबद्ध आणि नेमकं असावं लागतं. ती एक प्रकारची कवायतच असते.
लक्षात ठेव, आपलं उद्दिष्ट आपल्या पोलिसाला ठामपणे परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे हे आहे.
त्याकरता मी नातेसंबंधात जास्तीत जास्त वेळा कोणत्या पोलिसाला तैनात करतो याचा प्रामाणिक शोध घेणं आणि ते मान्य करणं आहे.
मनातला आक्रमक पोलीस म्हणत असतो, माझंच बरोबर. तटस्थ म्हणतो, माझं काही मतच नाही आणि नेमस्त पोलीस म्हणतो, मला कुणी विचारतच नाही. ही सगळी म्हणणी आपल्याला त्रासदायक पडतील, तेव्हा सध्याच्या पोलिसाला हे प्रश्न विचारायचे-
१) तुझे नियम योग्य शब्दात योग्य वेळी, योग्य टोनमध्ये सांगितलेत का?
२) नियम मोडल्याचा तुम्हाला काय त्रास होतो हे सांगितले आहे का?
३) तुमचे नियम तुमच्या जीवनमूल्याशी निगडित आहेत का?
४) तुमचं सत्य वगैरे संपूर्ण सत्य असतं असा तुमचा भ्रम तर नाही ना!
तुम्ही दोघे आक्रमक आहात. आता तू नेमस्त झालीयस. ठाम हो.
ती म्हणाली, ‘काय रे तू लग्नाच्या नात्यात पोलिसांची उदाहरणं काय देतोस-’
‘काय करणार, जमाना दबंग, सिंघम, रावडी राठोडचा आहे.
आणि त्यापेक्षा महत्त्वाचं नात्याला टिकवण्यासाठी गस्त हवीच!