स्त्री. पु. वगैरे वगैरे : नियम Print

महेंद्र कानिटकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लग्नातील नाते कायमस्वरूपी आनंदी वा समाधानी ठेवायचे असेल तर काही नियम हे पाळावेच लागतात. आणि ते सातत्याने ताजेही करावे लागतात. काय आहेत ते नियम..
गेल्या लेखात (२८ मार्च) आपण तीन मुद्दे बघितले होते,  त्याची उजळणी करून पुढे जाऊया.
१. सहजीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट हवे.
२. जोडीदार गरज की जरुरी
३. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते.
हे तीनही मुद्दे सकस सहजीवनासाठी मूलभूत मुद्दे आहेत. हे साध्य झाले तरच काही आशा आहे. इथेच जर घोटाळा असेल तर कठोर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असे वाटते . या गोष्टी जमल्या नाहीत तर केवळ घटस्फोट घ्यायचा नाही म्हणून आपण एकत्र राहत आहोत असे समजून चालायला हरकत नसावी.
अर्थात अशी अवस्था असेल आणि दोघांना यातून मार्ग काढावा असे वाटत असेल तर चांगल्या समुपदेशकाची मदत जरूर घ्यावी. त्यात कमीपणा वाटायचे काही कारण नाही. आपल्या सहजीवनाचे आरोग्य आपणच सांभाळायला हवे. थोडेसे कष्ट पडतील, दोघांनाही स्वत:वर काम करावे लागेल. पण त्यातून जे निष्पन्न होईल ते चांगले असेल.
स्लाइड  ४
स्वत:च्या चुकांकडे आधी बघायला शिकूया
नोट्स:
 प्रत्येक भांडणाचे, वादविवादाच्या प्रसंगात माणूस आधी स्वत:चा बचाव करतो. त्याकरता समोरच्या माणसावर आरोप करणे, घडलेला प्रसंग उगाचच मोठा भयंकर, अक्षम्य आहे असे भासवणे असे नानाविध उद्योग करीत असतो. इतकेच काय यात माझी काहीच चूक नाही असे भासवीत असतो. यामुळे तणाव वाढतात. सगळ्यात पहिल्यांदा या प्रसंगातील आपली चूक त्वरित मान्य करून मग दुसऱ्या व्यक्तीच्या चुकांवर बोट ठेवले तर भांडण लांबत नाही.
स्पष्टीकरण :
 विराज आणि विनया यांचे प्रत्येक गोष्टीवर खटकते. त्यांच्यात वादाचा मोठा मुद्दा म्हणजे विराजला त्याचे काम महत्त्वाचे वाटते. ऑफिसमध्ये तो इतका रमलेला असतो की घरच्या कोणत्याच जबाबदाऱ्या तो घेत नाही अशी विनयाची गेली पाच वर्षे तक्रार आहे.आणि या तक्रारीत बदल नाही. तिने उशीर होण्यावरून बडबड सुरू केली की तो बचावाच्या पवित्र्यात जातो. काहीना काही कारणे सांगतो. ऑफिसमध्ये काम होते आणि ते टाळता येणे शक्य नव्हते ही त्याची बचावाची नेहमीची ढाल. हा विषय इतका चावून चोथा झालेला तरी यांची भांडणे सुरूच.
मी विराजला विचारले एकदा तरी कारणे न देता म्हण ना की माझे चुकते म्हणून. माझ्या उशिरा येण्यामुळे तुला खूप त्रास होत असेल. तुला घराच्या सर्व जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. सॉरी. त्याने मग एकदा तसे म्हणून पाहिले आणि त्यानंतर विनयच्या प्रतिक्रियांत बराच फरक पडला.. आजपर्यंत विराजने चूक कबूलच केली नव्हती. स्वत:ची चूक लगेचच कबूल केली तर निम्मी भांडणे टाळता येतात. पण स्वत:ची चूक कबूल करणे हे अनेकांच्या इगोच्या आड येते.
स्लाइड ५
जोडीदाराचे पालक बनू नका
नोट्स
लग्न हे दोन प्रौढ माणसांचेच होत असते. त्यांच्या प्रगल्भतेची पातळी कदाचित वेगवेगळी असेल पण दोघांनाही प्रौढ म्हणून वागवले जाण्याची मानसिक गरज वाटत असते. याचाच अर्थ असा की दोघांना स्वतंत्रपणे विचार करण्याची बुद्धी असते आणि ती वापरण्याचा अधिकार असावा असे वाटते.
स्पष्टीकरण :
आम्ही दोघे एका सहलीला गेलो घेतो. त्यात अरिवद आणि प्रज्ञा हे जोडपे होते. दोघे चाळिशीच्या आसपासचे. तो चार्टर्ड अकाउंटंट आणि ती गृहिणी आहे. अरिवदच्या व्यवसायामुळे त्याला प्रवास भरपूर घडलेला. ती मुलांच्यात गुंतलेली, त्यामुळे ती पहिल्यांदाच विमान प्रवास करीत होती. तेव्हा एखाद्या लहान मुलाला समजावून सांगावे आणि कुतूहल शमवावे तसा अरिवदचा आविर्भाव होता आणि ते तिला आवडत नाही हे स्पष्ट दिसत होतं. हॉटेलमध्ये सकाळी नाश्त्याच्या वेळीसुद्धा तो अगदी लहान मुलासारखी तिची काळजी घेत होता. तिला तर इतके अवघडल्यासारखे झाले की बस ! या विषयावरून ती इतकी चिडली की तिने नाश्ता घ्यायला नकार दिला. माझ्या पत्नीने गौरीने तिला आमच्या शेजारी बोलावून घेतले आणि दोघीजणी शांतपणे नाश्ता एन्जॉय करू लागल्या. सबंध सहलभर प्रज्ञा आमच्यातच जास्त होती. अरिवद इतरत्र गप्पा मारत जोक करत फिरे.
प्रज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे तो नेहमीच इतक्या सूचना देतो की तिला त्या सूचनांचा उबग येतो. आणि त्याच्या सूचनांप्रमाणे न वागल्यास त्याचा संताप वाटय़ाला येतो हे तिने वारंवार अनुभवलं होतं. ती तर हेसुद्धा म्हणाली की आता कॉलेजमध्ये जाणारी त्यांची मुलगीसुद्धा त्याचे ऐकून प्रज्ञाला सूचना देत असते.
हल्ली मुलांनासुद्धा त्यांच्या कलाने वाढू द्यावे असा सूूर असताना पत्नीचे पतीने किवा पतीचे पत्नीने पालकत्व घेणे म्हणजे त्या माणसाच्या प्रौढपणाचा अपमान करणे आहे. दोघांनीही एकमेकांचे आई-बाबा होण्याचे टाळलेच पाहिजे.
स्लाइड ६
मुलांपेक्षा जोडीदार महत्त्वाचा!
नोट्स
लग्नाचा फक्त एक हेतू वंशवृद्धी हा आहे. पण धर्म, अर्थ आणि कामजीवन हेही लग्नाचे महत्त्वाचे हेतू असतात हे विसरता कामा नये. आणि ही गडबड अनेकदा महिलावर्गाकडून होताना दिसते. त्यांच्या दृष्टीने मुले हे त्यांच्या जीवनाचे सर्वस्व असते. रात्रंदिवस त्यांचाच विचार. दिवसरात्र त्यांच्यासाठी जगणे. यामुळे जोडीदारांत आणि त्यांच्यात अंतर वाढत जाते.
स्पष्टीकरण :  अगदी परिचयातल्या कुटुंबात घडलेली गोष्ट. दोघांचे लग्न झाले. मधुचंद्राला गेले आणि एकमेकांच्या काम प्रेरणा अगदी एकमेकांना पूरक असल्याची जाणीव झाली. दोन वर्षांचे नियोजन केले. मुलगी झाली. पण जन्मत: तिच्या यकृतात काही दोष होता. डॉक्टरांच्या म्हण्याप्रमाणे थोडीफार काळजी घेणे आणि नियमित म्हणजे आयुष्यभर रोज एक गोळी घेणे एवढे पुरेसे होते. पण तिला वाटले आपले सबंध जीवन मुलीच्या काळजीसाठी द्यायला हवे. नवरा बरोबरीने काळजी घेत होता. रात्री लेक उठली तर डायपर्सही बदलत असे. या दरम्यान त्यांच्यात एकदाही संबंध आले नाहीत. त्यालाही संयम राखता आला. मुलगी सात वर्षांची झाली तरी दोघांच्याच बेडरूममध्ये दोघांच्या मध्ये तिच्या अंगावर हात टाकून झोपत असे. आणि त्याचे तिला काहीच वाटत नसे. त्याच्या संबंधांच्या विनंतीला तिचा कायमचा नकार असायचा. सोनू उठेल हेच तिचं पालुपद. पुढे त्याच्या संयमाचा बांध फुटला असावा, तो त्याच्या कनिष्ठ सहकारीशी संबंध ठेवू लागला. दोन-तीन वष्रे प्रकरण चालले आणि अशी प्रकरणे संपतात तसे संपले. त्याला पश्चाताप झाला. त्याने मी मोहात पडलो, मला क्षमा कर वगरे सांगितले. तिने पुष्कळ बडबड केली. मुलगी अशी असताना तुला ही थेरं सुचतात कशी वगरे. ते आता एकत्र राहतात पण तो हॉलमध्ये झोपतो.
त्याचा प्रश्न हाच आहे जोडीदार महत्त्वाचा, मुले महत्वाची की दोघंही?
इतकी टोकाची गोष्ट सोडली तरी घरात मुलांचीच बाजू नेहमी घेणे, वडिलांच्या किवा आईच्या दोषांबद्दल मुलांशी बोलणे हे प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतात.‘‘माझे काही म्हणणे नाही पण बाबांच्या परवानगीचे तू बघ.’’ अशा प्रकारची वाक्ये जोडीदारापेक्षा मुले महत्त्वाची असा संदेश देत असतात. या प्रश्नाचे ज्याने त्याने उत्तर लगेच शोधणे अपरिहार्य आहे.
स्लाइड ७
दोघांना हवे आपापले अवकाश
नोट्स
लग्न झालं म्हणजे यापुढचे सगळे आयुष्य एक दुजे के लिये असावे यात काहीतरी छान वाटणारे आहे. किती सुंदर कल्पना. आता यापुढे आपल्या दोघांचे विश्व एक. आपल्या दोघांच्या आवडीनिवडी एक. नातेवाईक एक. असे बरंच काही हवेहवेसे वाटत असते. पण जर दोन प्रौढ माणसांनी, जे वेगवेगळ्या घरांत, वेगवेगळ्या संस्कारांतून वाढले आहेत ती व्यक्तिमत्त्वे संपूर्णपणे एकमेकांच्यात विरघळून जातील का? शक्य नाही. १०० टक्के अशक्य आहे.
त्यामुळे प्रत्येकाला काही भाग आपल्या दोघांचा कॉमन आणि काही भाग एकमेकांचा स्वतंत्र अशी मांडणी करावी लागते. आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याची कदर करीत सहजीवन संपन्न करावे लागते.
स्पष्टीकरण :
मी माझाच अनुभव सांगतो. आम्ही दोघे मिळून अनुरूप विवाह संस्था चालवतो आणि पती-पत्नीही आहोत. पती-पत्नी म्हणून राहताना आमच्या बऱ्याच आवडीनिवडी सारख्या आहेत. खाणे, भटकणे, शॉिपग या सगळ्या गोष्टी आम्ही मनापासून एकत्रितपणे करतो आणि मजा घेतो. आता ते करतानासुद्धा आम्ही एकमेकांचे स्वातंत्र्य जपत असतो.
कोणतीही वस्तू किंवा कपडा ती माझ्या आग्रहाखातर घेत नाही की मला आवडलेला शर्ट मी घेतो. या एकत्रित करायच्या गोष्टीव्यातिरिक्त आमचे दोघांचे (माझे कमी तिचे जास्त) छंद आहेत. चित्रकला असू दे, की मातीकाम, की मुरल्स ती स्वत:ला कशात तरी गुंतवते. याउलट माझे काम हाच माझा छंद आहे.( ते चुकीचे आहे हे माहिती असून ). मला लिहायला आवडते. मी भरपूर विकत घेऊन वाचतो. पण आम्ही दोघेही एकमेकांना अवकाश देतो.
कोणत्याही समाधानी सहजीवनात याला पर्याय नाही.
हा सात कलमी कार्यक्रम कदाचित तुमच्या सहजीवनाची दिशा बदलून टाकेल अशी आशा.