स्त्री. पु. वगैरे वगैरे : प्रौढ आणि एकाकी
|
|
महेंद्र कानिटकर , शनिवार , १ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एकेकटे राहणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या समाजात कमी नाही. अनेकदा हे एकटेपण लादलं गेलेलं असतं. अशा वेळी एकटेपण नाहीसं कसं व्हावं, कमी कसं व्हावं या प्रश्नावर/साठी नेमकं उत्तर सापडत नाही.. चित्रविचित्र अनुभव येत असतात. काय करावं अशांनी? ए कएकटे राहणाऱ्या स्त्री-पुरुषांबद्दल मला फार पूर्वीपासून कुतूहल वाटत आले आहे. त्यांच्या जीवनाचे लक्ष्य काय असेल? जोडीदाराच्या सहवासाविना ते आयुष्य कसे व्यतीत करीत असतील. शारीरिक गरजा आपण काही काळ बाजूला ठेवू पण मानसिक गरजांचे काय, असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत असतात.
मध्यंतरी एका इंग्रजी मासिकात अशा एकेकटे रहाणाऱ्यांबद्दल एक लेख वाचनात आला. त्यांच्या अविवाहित राहण्यामागे निश्चित काहीतरी कारणे होती. त्यांना त्यांचे करिअर अधिक महत्त्वाचे वाटत होते आणि एकटेच राहायचे हा त्यांचा खासगी निर्णय होता. मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचे नाही, पण परिस्थितीने ज्यांच्यावर एकटेपण लादले गेले आहे असे विधुर, विधवा, घटस्फोट झालेले, परित्यक्ता यांच्या एकूणच जगण्याबद्दल मला विशेष कुतूहल वाटते. या सगळ्यांनी विवाहित असण्याचा चांगला वाईट अनुभव थोडा काळ तरी घेतलेला आहे. त्यांना काय वाटते? त्यांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत, हे मी तपासत आलो आहे. ज्यांचे कमी वयात विनापत्य असताना घटस्फोट झाले आहेत अशा मुला-मुलींची लग्न होतात. थोडासा वेळ लागतो पण होतात. त्यांनी जर अपेक्षा लवचिक ठेवल्या, किचकट गोष्टींना फारसे महत्त्व दिले नाही तर अनेकांचे जीवन पूर्व पदावर येते. तुलनेने अशा विनापत्य मुला-मुलींची दुसरी लग्न हा तितका अवघड प्रांत नाही. पण सोनलसारख्या मुलींनी काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे सोनल डॉक्टर झाली आणि शिकत असतानाच हर्षलच्या प्रेमात पडली. हर्षल तेव्हा इंजिनीअरिंग करीत होता. त्यानंतर तो अमेरिकेत गेला एमएस करायला. मग तिकडेच नोकरी लागली. हिच्या पदवीचा तिकडे काही उपयोग नसल्याने तीही इथे शिकत राहिली. एमडी मेडिसिन झाली. हा मध्ये पंधरा दिवसांसाठी आला होता तेव्हा लग्न उरकून घेतले आणि लगेचच दिवस राहिले. तो अमेरिकेत आणि ती पुण्यात असा संसार सुरू झाला. म्हणता म्हणता पाच र्वष झाली. यांचा ई-मेल, फोनवर बोलून संसार चालू होता. दरम्यानच्या काळात हर्षलच्या जीवनात त्याच्यापेक्षा मोठी घटस्फोटिता आली. त्याच्या घरात राहू लागली. शेवटी ते एकदा सोनलला कळलेच. त्याने माफी वगरे मागितली. मी एकटा राहात असल्याने चुकलो वगरे सांगितले. सोनलचा बिनतोड सवाल होता. ‘‘मी सुद्धा इकडे एकटीच होते न?’’ तिला घटस्फोट घेणे हाच पर्याय वाटला. आणि तो तिला मिळालासुद्धा.. पोटगी आणि मुलीच्या खर्चापोटी घसघशीत रक्कम पण मिळाली. पुन्हा एकटेपण सुरू. पण या वेळी तिला त्याचा खूप त्रास होत होता. आपण फसवले गेलो आहोत ही भावना होती. लगेचच घरच्यांनी लग्नाचे प्रयत्न सुरू केले, पण मुलीसह स्वीकारणारा उच्चशिक्षित वर तिला मिळेना. जातीबाहेर जाण्याचीही तिची तयारी होती. तिने आपणहून काही ऑनलाइन विवाह संस्थांत नोंदणी केली, पण तिथे विचित्र अनुभव येऊ लागल्यावर तिने लग्नाची आशा पूर्णपणे सोडली आणि एकटीने राहण्याचा निर्णय घेतला. सी. ए. काणे म्हणून माझे मित्र आहेत. वयाच्या सदतिसाव्या वर्षी त्यांची पत्नी कर्करोगाने गेली. एकच मुलगी होती तीही तेव्हा पौगंडावस्थेतील. तिचे सगळे पाहणे हे त्यांनी व्रत मानले. तिच्या सगळ्या आकांक्षा पूर्ण केल्या. ती इंजिनीअर झाली. मग एमएस करायला अमेरिकेत गेली. तिथेच नोकरी करू लागली. तिथेच तिने लग्नसुद्धा केले. काणे एकदम एकटे पडले. वय फार नव्हते. सत्तेचाळीस-अठ्ठेचाळीस वर्षांचे असतील. मुलीचे सगळे नीट झाल्यावर त्यांना एकदम पोकळी जाणवू लागली. पसा भरपूर होता. अजून मिळवावा कशासाठी, हा प्रश्न होता. ऑफिसमध्ये जाणेही कमी झाले. त्यांच्या मनात येई, आता लग्न करावे. पण कसे? घरात कोणी मोठे नव्हते. एकुलती एक बहीणसुद्धा अमेरिकेत. त्यांच्याकरता जोडीदार शोधणार कोण? अशा अवस्थेत ते सौम्य नराश्याचे शिकार झाले आणि त्यांच्या डॉक्टरांनीच काणे यांना काही मदत करता येईल का असे मला सुचवले. मी दोन-चार विधवांना त्यांचा संदर्भ दिला. पण काही जमले नाही. ‘‘सगळ्याजणी माझ्या पशाकडे पाहतात,’’ असा सीनिकल शेरा मारला आणि पुन्हा त्यांनी जोडीदार शोधमोहीम थांबवली असल्याचे जाहीर केले. पण अलीकडेच त्यांच्या बाबतीत काहीसे विचित्र कानावर आले. निदान त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते. आमच्या परिचयातील एका महिलेने पुनर्वविाहासाठी प्रसिद्ध असलेल्या एका संस्थेत नाव नोंदवले होते. तिथे काणे यांचे स्थळ कळले. ती त्यांच्या घरी भेटायला गेली. गेल्याबरोबर काणे यांनी दरवाजा बंद केला. प्राथमिक चौकशी होताच, ‘‘तू मला पसंत आहेस पण आधी आपण सेक्स करू आणि मग मी पक्का निर्णय घेईन’’ वगरे म्हणाले. ती त्या क्षणी तिथून बाहेर पडली.. आम्ही काही वर्षांपूर्वी (बहुधा २००४) ४० ते ५० वर्षांचे विवाहेच्छुक व्यक्तींसाठी ‘सोबत’ म्हणून कार्यक्रम आयोजित केला होता. ४०एक महिला आणि ७० पुरुष त्यात सहभागी झाले होते. वाढत्या वयात एकेकटे राहण्यापेक्षा एकमेकांना सोबत करावी असा त्या कार्यक्रमाचा उद्देश होता. पण त्या कार्यक्रमात जे अनुभव आले ते आम्हा दोघांच्या एकुणातच मानसिकतेला झेपणारे नव्हते. त्यांच्या प्रश्नांना त्या वेळी आमच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. आज कदाचित या प्रश्नांना काही उत्तरे देण्याच्या परिस्थितीत आम्ही आहोत. सरिता नावाची स्त्री आली. गोरीगोमटी, सडपातळ. गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र. तिने आपली माहिती दिली आणि सगळ्यात शेवटी सांगितले, माझे पती हयात आहेत. त्यांनी दुसरा घरोबा केला आहे. गेल्या दहा वर्षांत घरी फिरकलेले नाहीत. एकच मुलगा आहे तो नोकरीनिमित्त मुंबईला असतो. माझे साहेब खानदानची इज्जत जाईल म्हणून सोडचिठ्ठी देत नाहीत. मी घरात एकटी असते. माझ्याबरोबर जर कुणी राहायला तयार असेल तर माझ्या फोनवर संपर्क साधावा. त्या ७० पुरुषांपकी ६५ वर्षांच्या एका गृहस्थाने फक्त संपर्क साधला, असे तिने नंतर सांगितले. आम्हाला तिचे धाडस वाटले. आज जर ती भेटली तर काही वेबसाइटवर तिला कदाचित जोडीदार मिळू शकेल असे वाटते. कार्यक्रमातील बहुतेक पुरुष प्रथम वर होते. अनेकांची शिक्षणे बेतास बात होती. आíथक परिस्थिती फारशी बरी नसल्याने तिथे आलेल्या मुलींपेक्षा कमी उत्पन्न असल्याने ते काहीसे खिन्न होते. उपस्थित प्रथम विवाहेच्छुक मुली फार मोठय़ा उत्साहाने आल्या नव्हत्या. एकतर त्यांच्या पालकांनी जबरदस्ती केली म्हणून आल्या होत्या किंवा येऊन तर बघू अशा आविर्भावात आल्या होत्या. त्यांच्यापकी काही जणींशी आम्ही बोललो. बहुतेक सगळ्यांना आता या वयात लग्न करून आपले सुरळीत(?) चाललेले जीवन का बिघडवावे असे वाटत होते. आत्तापर्यंत वर शोधमोहिमांना त्या मनस्वी कंटाळल्या होत्या. त्यातल्या जवळजवळ कुणीच रूपवान नव्हत्या आणि त्याची त्यांना जाणीव होती. उत्तम शिकलेल्या होत्या. चांगली नोकरी करीत होत्या त्यामुळे राहणीमान नीटनेटके होते. तरीही रूप नसल्याची आणि अनेकांनी त्यांच्याबाबत बुद्धिमत्तेपेक्षा इतर गोष्टींना भर दिल्याची खंत होती. सर्व प्रौढ अविवाहित मुली त्यांच्या आई-वडील आणि भाऊ यांच्याबरोबर राहत होत्या. भावाच्या संसारावर आपली छाया पडू नये म्हणून जागरूक होत्या. एकटे राहणे त्यांच्यावर लादले गेले होते आणि दुसरा काही पर्याय नसल्याने त्या कशाकशात स्वत:ला गुंतवून घेत होत्या. पण त्या या जीवनाला आनंदाने स्वीकारत होत्या हे नक्की. प्रौढ अविवाहित मुली आणि घटस्फोटिता यांच्या बोलण्यात एक समान धागा होता. त्या मत्रीसाठी आणि पुढच्या सर्व गोष्टींसाठी सहज उपलब्ध असतील अशी आसपासच्या अनेक पुरुषांची धारणा त्यांनी अनुभवली होती. कामाचे ठिकाणी हा अनुभव येत असेच, पण काही पुरुष नातेवाईकांना सलगी करण्यापासून कसे टाळावे हा मोठा प्रश्न होता. मागे एकदा घटस्फोटित स्त्री-पुरुषाच्या आधार गटाला व्याख्यान देण्यासाठी मी गेलो होतो. हा आधार गट एकमेकांची दु:खे जाणून त्यावर मत कशी करता येईल, या उत्तम उद्देशाने स्थापन करण्यात आला होता. पण अनेक स्त्री-पुरुषांना ते वधू-वर मेळावे वाटू लागले. पण त्या पुढे जाऊन अनेक तरुण स्त्रियांच्या मागे घटस्फोटित पुरुष लागू लागले. एका मुलीने तर सांगितले : एक गृहस्थ तिच्याजवळ आले आणि म्हणाले, ‘तू माझा पती म्हणून स्वीकार करीत नाहीस ठीक आहे. पण आपण दोघेही आता मोकळे आहोत तर थोडी मजा करायला काय हरकत आहे?’ मध्यंतरी नागपूर येथे प्रौढ स्त्री-पुरुषांचे लग्न या विषयक एक उपक्रम झाल्याचे वाचनात आले असे उपक्रम चांगले आहेत. पण ते राबवताना आíथक जबाबदाऱ्या हा महत्त्वाचा घटक आहे असे मला वाटते. प्रौढ स्त्री-पुरुषांना एकमेकांचा आधार हवा असेल आणि काही प्रमाणात शारीरिक नाते हवे असेल तर विधिवत लग्न इत्यादी भानगडीत न पडता दोघांनी स्पष्ट करार करून एकत्र नांदावे, असे माझे स्पष्ट मत आहे. एकेकटं राहणाऱ्या प्रौढ स्त्री-पुरुषांसाठी अन्य चांगला पर्याय मला तरी दिसत नाही... |