स्त्री. पु. वगैरे वगैरे : कौतुकाचे फळ ... Print

alt

महेंद्र कानिटकर , शनिवार , २९  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कौतुक ऐकायला प्रत्येकालाच आवडत असतं  मात्र अनेकांना त्याचीच सवय होते. आणि मग  हेच कौतुक पती-पत्नींच्या नात्याला बिघडवू शकतं, चिडचिड वाढवणारं, निराशा देणारा ठरु शकतं. म्हणूनच कौतुक ऐकण्याच्या सवयीपासून लांब कसे राहायचे हे शिकायला हवे..
सु खी वैवाहिक जीवनासाठी इंग्रजीमध्ये असंख्य पुस्तके आहेत. त्या पुस्तकांमध्ये दिलेल्या काही सूचना मला खूप अवघड वाटतात, म्हणजे आपल्याकडे माणसे अशी वागतील का? असा प्रश्न पडतो. हा प्रश्न डोक्यात येण्याचे कारण माझी मैत्रीण सुविधा!
सुविधाचे माहेर पुण्याचे. आईवडील आणि एक धाकटा भाऊ असे छोटे कुटुंब. तिचे वडील मोठय़ा कंपनीत विपणन विभागात वरिष्ठ अधिकारी होते. त्यामुळे असेल किंवा त्यांच्या स्वभावाचा भाग असेल ते स्वत:चे आणि सामान्यपणे सर्वाचेच एक प्रकारे मार्केटिंग करीत असत. त्याला सुविधा, तिचा भाऊ आणि तिची आई अपर्णा अजिबात अपवाद नव्हते. रोजची आईने केलेली भाजीसुद्धा ते ‘‘वाह! क्या बात है’’ म्हणून खात. आईने जरा कानातले जरी नवे घातले तरी ‘‘तू खूपच सुंदर दिसत आहेस’’ असा त्यांचा शेरा असे. त्यांच्या मित्रमंडळीत तर ‘‘आमच्या अपर्णासारखी चिकन करी भूतलावर मिळणार नाही’’ असे तोंडभरून कौतुक करायचे. साहजिकच मुलांचेपण ते भरपूर कौतुक करीत असत. प्रत्येक गोष्टीला दाद मिळण्याची सुविधाला सवयच लागून राहिली होती. यथावकाश तिचे लग्न मिलिंदशी झाले. मििलदचे स्थळ चांगलेच होते. तो केमिकल इंजिनीअर होता. चांगल्या ठिकाणी नोकरी करीत भरपूर पगार होता. वडिलांचा शहराच्या मध्यवर्ती भागात फ्लॅट होता. मििलदची आई काही वर्षांपूर्वीच गेली होती. घरात ती मििलद आणि सासरे तिघेच. सासरे रिटायर झाले असले तरी अनेक ठिकाणी सल्लागार म्हणून जात. वर वर पाहता सगळे उत्तमच होते.
पण सुविधांची अडचण वेगळीच होती. मििलद आणि त्याचे बाबा कमालीचे अबोल होते आणि सुविधाला तर प्रचंड बोलायची हौस. रोज रात्री सुविधा उत्तमोत्तम पदार्थ करीत असे, पण मििलद हा पदार्थ चांगला झाला आहे असे चुकूनसुद्धा म्हणत नसे. तिला वाटायचे मी इतके कष्ट करते, पण त्याचे काही चीजच नाही. तिचे सासरे तर मिलिंदच्या वरताण. तिला हे घर अगदी चमत्कारिक वाटू लागले. चांगल्या गोष्टींना दाद देणे सोडाच, पण त्यांची दखलही घेतली जात नाही याचा तिला त्रास होऊ लागला. एकदा तिने मििलदला ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली. तो म्हणाला, ‘‘खरंच हे माझ्या लक्षातच आले नाही. आई गेल्यापासून आम्ही बाईंच्या हातचे खातोय त्यामुळे कधी प्रसंगच आला नाही. सॉरी, यापुढे मी ताबडतोब सांगेन.’’
त्यानंतर मििलद पदार्थ कसा झाला आहे ते सांगू लागला. त्याचे सांगणेसुद्धा ठराविक असे. ‘‘आज भाजी चांगली झाली आहे. कोिशबीर वेगळी आहे.’’ सुविधाला वाटू लागले, त्याच्या बोलण्यात तेच तेच शब्द आहेत. शब्द पोटातून आल्यासारखे मुळी वाटतच नाहीत. आपण सांगितले म्हणून मििलद बोलतो इतकेच. जे पदार्थाबाबत होते ते इतर बाबतीतही लागू होते. ती कशी दिसते? तिचा ड्रेस कसा दिसतो? तिच्या कानातले कसे आहेत या गोष्टी तर त्याच्या खिजगणतीतही नसत. ‘तू मला आवडतेस’ हा शब्दप्रयोग तर तिने हनिमूनलासुद्धा ऐकला नव्हता!
माहेरी असे आणि सासरी तसे!
सुविधा कौतुकाची इतकी भुकेली झाली की सासरी तिचे मन रमेना. एक दिवस ती माहेरी आली आणि तिची होणारी घुसमट सांगितली आणि मग तिच्या आईने तिला आमच्याकडे पाठवले होते. सुविधाने सारी हकीकत सांगितली. मी शांतपणे ऐकून घेतली आणि सुविधाला एक प्रश्न विचारला, ‘‘तू जे काही करतेस ते कोणासाठी?’’
‘‘अर्थात, मिलिंदसाठी!’’ एका झटक्यात तिचे उत्तर आले. ‘‘म्हणूनच तुझा आनंद त्याच्या दाद देण्यावर अवलंबून असतो?’’ माझा प्रश्न. त्यावर तिचे अगदी ताबडतोब उत्तर आले, ‘‘शेवटी असं आहे ना, की पतीला खूश ठेवण्यातच मजा आहे! आणि तो जेव्हा मी खूश आहे असे सांगतो, तेव्हा इतकं बरं वाटतं आणि नेमकं हेच मििलदला कळत नाही. मी उत्तम ड्रेस घालायचे, वेगवेगळी कानातली घालायची, इतकेच काय आम्ही सिनेमाला गेलो तर त्याच्या कपडय़ांशी मिळताजुळता ड्रेस घालायचा या कशाकशाचे त्याला काडीमात्र कौतुक नाही. अलीकडेच मी एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकात वाचले आहे, की नाते सुधारण्यासाठी पत्नीच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींना दाद देणे गरजेचे असते. ते पुस्तकपण मी त्याला वाचायला लावले, पण काही फरक नाही.’’
‘‘मला वाटते मी घरातली कामवाली बाई आहे.’’तिच्या शेवटच्या वाक्याने मी थोडा थबकलो. नवऱ्याने दाद न देणे तिच्या किती जिव्हारी लागले आहे, याचा मला अंदाज आला.
मला सुविधासारखीच असलेली कुणालची गोष्ट आठवली. कुणालच्या बाबतीत मी फारशी मदत करू शकलो नव्हतो. सुविधाचे तसे काही होऊ नये म्हणून मी तिला मििलदसमवेत पुढच्या सप्ताहात भेटायला बोलावले.
कुणालच्या बाबतीत नेमके काय घडले हे मी आठवू लागलो..
कुणाल एका पदार्थविज्ञान प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम करीत होता आणि त्याची पत्नी रीमा एका बँकेत काम करायची. ते दोघे लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि कुणालच्या भाषेत त्यांचे पाळण्यात लग्न झाले. रिमा टिपिकल मध्यमवर्गीय विचारांची होती. नोकरीतसुद्धा प्रमोशन नको, घराजवळची शाखा असावी, मुलांकडे लक्ष द्यावे अशा तिच्या साध्या अपेक्षा होत्या. याउलट कुणाल होता. त्याला स्वत:च्या नावावर अनेक शोधनिबंध प्रकाशित व्हावेत, जमले तर एखादे पेटंट आपल्या नावावर असावे, अशा त्याच्या महत्त्वाकांक्षा होत्या आणि त्याची पावले त्या दिशेने पडत होती. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्याचे वीस शोधनिबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय सेमिनार्समध्ये वाचले गेले आणि काही नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले.
पण त्याच्या यशाचे रीमाला सोयरसुतक नव्हते. तो काही सांगायला गेला तर ‘‘घराकडे दुर्लक्ष केल्यावर एवढे मिळायलाच हवे,’’ असे ताशेरे ऐकावे लागत. कुणालचे यश तिच्या लेखी फारसे महत्त्वाचे नव्हतेच. तिच्या मत्रिणींचे नवरे आयटी क्षेत्रात पसे छापत होते आणि त्यांच्यापेक्षा जास्त शिकून कुणाल कमीच पसे मिळवीत होता.
पुढे पुढे आपल्या कामाबद्दल घरी सांगणे त्याने बंद केले. रात्री घरी उशिरा येणे सुरू झाले. दिवसभर कुणाल झोकून देऊन काम करीत असे, पण घरी येताना थोडी थोडी दारू पिणे सुरू झाले. त्यामुळे रीमाला वाद घालायला अजून एक निमित्त मिळाले. अशा काळात माझी दोघांशी भेट झाली त्या वेळी कुणाल म्हणाला, ‘‘मी जे काही करतो त्याचे कौतुक घरच्यांना नसेल तर काय फायदा?’’ पुढे रीमा सुरुवातीपासून त्याच्या संशोधनाविरुद्ध आहे इत्यादी मुद्दे काढू लागला तसे मी त्याला थांबवले.
रीमाही कधी भेटायला आली नाही. कुणालचे काय झाले ते सगळे समजले नाही. उडत उडत कानावर आले की, तो व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे. कुणाल असो व सुविधा, दोघांच्यात एक समान धागा आहे.
 ‘‘निदान आपल्या जवळच्या माणसांनी आपले कौतुक केलेच पाहिजे’’ किंवा माणूस स्वत:शी असे बोलू लागतो, ‘‘दुनियेतल्या कुठल्याही माणसाने मला दाद दिली नाही ना तरी काही बिघडत नाही, पण निदान आपल्या माणसाने, आपल्या जवळच्या माणसाने आपल्याला दिलीच पाहिजे.’’
आणि गंमत बघा हं!  हा विचार प्रौढ माणसाचा आहे. परिपक्व  माणसाचा आहे. आणि हा विचार अनेक पती-पत्नींना एकमेकांपासून दूर नेणारा आहे, चिडचिड वाढवणारा, निराशा देणारा हा विचार आहे, म्हणून त्या विचारापासून लांब कसे राहायचे हे शिकावे लागणार आहे.
याकरिता सुविधा आणि माझे झालेले संवाद इथे देत आहे.
सुविधा आणि मििलद पुढच्या सप्ताहात मला भेटायला आले. मी मििलदला विचारलं, ‘‘सुविधाच्या कोणत्या गरजा आहेत हे सांगू शकशील?’’ तो हसला. ‘‘ह्य़ात काय सांगायचं? आम्ही अत्यंत सुस्थितीत आहोत. आमचे कामजीवन उत्तम आहे. ती पाहिजे तेव्हा पाहिजे ते खरेदी करू शकते. माझ्या मते तिला आता काही गरजा नसाव्यात आणि असल्या तरी तिने मला सांगितलेल्या नाहीत.’’
‘‘सुविधाने सांगितले, पण ज्या अपेक्षेने तिने तुला सांगितले त्याप्रमाणे तुला ते समजले नाही.’’ मी त्याला सांगू लागलो. ‘‘सुविधाचे संगोपन जसे झाले त्यात प्रत्येक बाबतीत कौतुक ऐकण्याची, करून घेण्याची सवय लागून गेली होती. ही सवय कालांतराने इतकी तीव्र झाली की, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या माणसाने विशेषत: आपल्या माणसाने कौतुक केले नाही तर एक प्रकारची पोकळी येणं, त्या पोकळीतून येणारी अस्वस्थता, चिडचिड या गोष्टींचा अनुभव सुविधा घेत आहे.’’
मी सुविधाकडे वळत म्हणालो, ‘‘सुविधा, इंग्रजी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे नवऱ्याने कौतुक जरूर करावे, पण त्या कौतुकावर तुझा आनंद अवलंबून ठेवू नकोस.’’
‘‘आता समजा, तू सुरळीच्या वडय़ा केल्यास तर तुला वाटते की, मििलदने म्हणावे ‘हे चांगले झाले आहे.’ अगदी साहजिक आहे, पण तुझं होतं असं की, जोपर्यंत मििलद तुझ्या वडय़ांना मनापासून दाद देत नाही तोपर्यंत तू बेचन असतेस आणि समजा तो काहीच बोलला नाही तर तुला वाटते आपले काही चुकले की काय? म्हणजे तू घेतलेल्या कष्टाची पोचपावती मिळेपर्यंत तू अस्वस्थ!
आता गंमत बघ! वडय़ा करण्याचे ठरवलेस तूच! त्याकरिता नाजूक हाताने वडय़ा थापल्यास तूच! त्यांत खोवलेला नारळ पसरवून गुंडाळून ओळीने मांडल्यास तूच! हे सगळे तू केलेस ते तुला बरे वाटावे म्हणून! स्वयंपाकाची बाई काम करते ते तिची नोकरी टिकावी म्हणून. इथे तुझ्याकडून जी प्रेमाची पखरण होते त्याची पावती कशाला?
अनेक प्रौढ माणसे कौतुक मिळालेच पाहिजे या आग्रहाचे बळी ठरून आपले जीवन त्यांचे करून घेतात. सुविधा, मििलदने कौतुक करणे हे छान! अगदी बोनस! पण लक्षात घे तुला आनंद मिळतो तो तू केलेल्या कामातून.’’
सांगायला आनंद वाटतो, सुविधा आणि मिलिंद यांचे आता बरे चालले आहे...