स्त्री. पु. वगैरे वगैरे : भाषा : प्रेम व्यक्त करण्याची ! Print

alt

महेंद्र कानिटकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
प्रेम व्यक्त करण्याच्या पाच प्रमुख भाषा आहेत. या भाषांपैकी तुमची प्रेम व्यक्त करण्याची नेमकी भाषा कोणती ते ठरवा. जोडीदाराची भाषा कोणती ते लक्षात घ्या आणि शेवटचा टप्पा म्हणजे आपापल्या जोडीदाराची प्रेमभाषा शिकून घ्या. कोणत्या आहेत या प्रेमभाषा? जाणून घ्या आणि कृतीत आणा..
ज शी प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते तशी प्रत्येक माणसाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगवेगळी असते आणि ती त्याने आपल्या आईकडूनच शिकलेली असते. आई ज्या प्रकाराने प्रेम व्यक्त करीत असते ती भाषा सहजरीत्या माणूस शिकतो आणि त्याच्याही नकळत ती त्याची प्रेमभाषा बनते, पण ढोबळमानाने प्रेमाच्या म्हणजेच प्रेम व्यक्त करायच्या प्रमुख पाच भाषा आहेत.
लग्न झाल्यावर किंवा प्रेमात पडल्यावर जो नवीन गोंधळ सुरू होतो तो भाषेचा असतो, कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी भाषेचाच भरभक्कम आधार असतो. त्यातून जर दोघांची प्रेमभाषा वेगवेगळी असेल तर ती आधी शिकून घ्यावी लागते, तरच समोरची व्यक्ती प्रेम करीत आहे किंवा नाही ते समजते. आमच्याकडे आलेल्या अनेक जोडप्यांकडे पाहिलं, त्यांच्या समस्या ऐकल्या, की वाटते हा प्रश्न त्यांनी एकमेकांची भाषा शिकली तर सहज उलगडेल. त्यांच्या जीवनातील अनेक प्रश्न त्यांच्या या भाषेच्या शिकण्याने अगदी चुटकीसरशी सुटणाऱ्या आहेत!
प्रेमाच्या मुख्य पाच भाषा आहेत. त्यातील तुमची भाषा कोणती ते आधी निश्चित करायचे. मग दोघांनीही आपल्या आपल्या भाषा कोणत्या ते जोडीदाराला सांगायचे.
आणि शेवटचा टप्पा जोडीदाराची भाषा शिकून घेण्याचा. स्वत:ची भाषा जर पक्की असेल तर दुसरी भाषा शिकणे अगदी सहज शक्य होते, पण इथेही एक काळजी घ्यायला हवी. काही जणांना विशेषत: काही जणींना दोन दोन प्रेमभाषा आपल्या वाटतात. तेव्हा जोडीदाराला शिकायला आणि समजायला सोपी असेल तीच आपली मुख्य प्रेमभाषा आहे असे समजणे. तर प्रेमाच्या भाषा पाहूया.
एक:  शब्दातूनच कळते सारे.
अशा माणसांना शब्द हे अत्यंत महत्त्वाचे वाटतात. आपल्या जोडीदाराने वेगवेगळ्या मार्गानी आपले प्रेम व्यक्त करावे अशी त्यांची अपेक्षा असते आणि ते स्वत:सुद्धा तसे व्यक्त करीत राहतात. (इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे: प्रेम म्हणजे काय? आम्ही जी व्याख्या स्वीकारलेली आहे ती सांगतो, कोणतेही लेबल न लावता काळजी घेणं म्हणजे प्रेम. प्रेम हे क्रियापद असून आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याची प्रगती त्याच्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी निर्हेतुक मदत करीत राहणे म्हणजे प्रेम करीत राहणे.) यासाठी मोहिनीचं उदाहरण सांगतो. मोहिनीच्या घरी सगळे अगदी आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करणारे. तिचे बाबा घरी आले की विचारायचे, ‘‘माझी लाडकी बिल्ली कुठाय? बरी आहे का?’’ परीक्षेच्या वेळी तिला खूप ताण यायचा. अशा वेळी ते दिवसातून अनेक वेळा फोन करून विचारायचे, ‘‘माझी बिल्ली कशी आहे? अभ्यासाचा ताण घेऊ नकोस. हुशार आहेस बेटी, तुला चांगले मार्क नक्की मिळतील.’’
तिची आईपण असेच प्रोत्साहनपर बोलायची. जरा घरी यायला उशीर झाला की म्हणायची, ‘‘धस्स होतं गं. तू आपली वेळेवर येत जा. दिवस चांगले नाहीत. मला तुझी काळजी वाटते.’’
अशा संस्कारात वाढलेली मोहिनी याच भाषेत नवऱ्याशी बोलायची. निखिलला ‘नकु’ असं टोपणनाव ठेवलं होतं तिने. ती याच नावाने लडिवाळपणे त्याला हाक मारायची. ऑफिसमध्ये गेला तरी अधूनमधून उगाचच फोन करायची. तो टूरवर गेला की ‘‘आय मिस यू, आय लव्ह यू नकु’’ असे एसएमएस पाठवायची. कंपनीतल्या त्याच्या यशाचं तिला अपार कौतुक आणि ते त्याला अनेकदा बोलून दाखवायची, ‘‘तुझ्यासारखा नवरा मला मिळाला हे माझं भाग्य.’’ एकुणात काय मोहिनीची भाषा व्यक्त होण्याची होती. तिचं प्रेम बोलकं होतं.
दोन: फक्त तुझा अर्थपूर्ण सहवास!
काही जणांना एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवणे हा प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग असतो. अर्थपूर्ण सहवास म्हणजे दोघांनी एकत्रितपणे केलेल्या गोष्टी. कित्येकांना असे वाटते की, सहवास म्हणजे एकांत. प्रत्येक वेळी एकांताची जरुरी नसते. दिवसातला अर्धा तास जरी दोघांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळाला आणि बाकीच्या वेळी एकांत नसला तरी एक दुसऱ्याच्या कामात सहभाग घेतला तरी तो सहवास खूप अर्थपूर्ण होतो. कित्येकांना सिनेमा, नाटक, संगीत मैफल अशा गोष्टी जोडीदाराबरोबर कराव्याशा वाटतात त्याचे कारण हेच की, सहवास मिळावा.
अनिकेत या प्रकारात मोडतो. त्याच्या आणि आदितीच्या लग्नाला जवळ जवळ वीस वष्रे झाली. तो एका कंपनीत इंजिनीअर आहे. सुरुवातीला शिफ्टप्रमाणे कामावर जावे लागत असे. तेव्हासुद्धा तो जास्तीत जास्त वेळ घरात असे. सेकन्ड असेल तर आदितीला स्वयंपाकात मदत करणे ही तर त्याची आवडीची गोष्ट असे. भाज्या चिरून दे, नारळ खरवडून दे, घर झाडून घेणे, कपडे मशीनला लावणे अशी सगळी कामे तो बिनबोभाट करीत असे, पण हे सगळे करताना तो आदितीच्या भोवती भोवती घोटाळत असे. गेली पाच वष्रे तो जनरल शिफ्टला आहे. त्याला आता संध्याकाळ रिकामी असते. आदिती गाणे शिकते. संध्याकाळी ती रियाजाला बसते तेव्हा तो तंबोरा धरून बसतो. त्याला तिच्यासमवेत राहायचं असते. त्याच्या मित्रांची पार्टी असेल तर तो आवर्जून तिला बरोबर घेऊन जातो. तिच्या माहेरच्या समारंभांना त्याची उपस्थिती असतेच असते.
अनिकेत तिला जास्तीत जास्त सहवास देऊन आपले प्रेम व्यक्त करीत राहतो. हो, एक सांगायचं राहिलं. दरवर्षी तिच्या वाढदिवसाला फक्त दोघे महाबळेश्वरला जाऊन दोन दिवस राहून येतात. लग्नाला वीस र्वष झाली तरी खंड पडलेला नाही. आम्ही चेष्टेने विचारतो ,‘‘कितवा हनिमून?’’
तीन: भेटी स्वीकारणे.
भेटी देणारे अनेक असतात. आपल्याकडे एक प्रथाच आहे, कोणताही विशेष प्रसंग असला, की प्रेमाच्या माणसाला भेटी द्यायच्या. प्रत्येकाच्या आíथक कुवतीनुसार माणसे जोडीदाराला भेट देत असतात.
कित्येकदा ती भेट जोडीदाराला आवडणारी असतेच असे नाही, पण काही जणांना भेट स्वीकारणं म्हणजे त्या व्यक्तीचे प्रेम स्वीकारणे असते. जर त्या माणसाला भेट मिळाली नाही तर तो नाराज होतो, पण भेट मिळाली की ती कितीही छोटी असेना, तो इतक्या आनंदाने स्वीकारतो की विचारूच नका. भेट मिळणे म्हणजे समोरच्या माणसाने माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगणे असते. लग्नापूर्वी अनेकजण आपल्या भावना जेव्हा छोटय़ा छोटय़ा भेटी देऊन व्यक्त करीत असतात तेव्हा एकमेकांना खूप बरे वाटत असते.
ही भाषा समजण्याकरिता थोडेसे कष्ट पडतात. भेटी देणं एक वेळ समजू शकतं, पण भेटी स्वीकारण्याची भाषा समजायला कठीण असते. मुळात आपल्या परंपरेत दिवाळीचा पाडवा, एकमेकांचे वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस असे काही अपवादात्मक प्रसंग सोडले तर मध्यमवर्गीय घरात भेट देणे-घेणे फारसे घडत नाही, पण आपल्या जोडीदाराची ती भाषा असेल तर ती शिकण्यावाचून पर्याय नसतो. साखरपुडय़ाला मिळालेली अंगठी लग्न झाले तरी वापरत राहणारी माणसे असतातच की. माझ्या पाहण्यात एक जोडपे आहे. ते अनोख्या भेटी द्यायचे एकमेकांना! लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला स्वत:च्या स्वभावातला एक दोष दूर करण्याची भेट ही त्यांच्या दृष्टीने खूप अमूल्य गोष्ट असे. एका वर्षी पतीने सांगितले, येत्या वर्षांत मी सिगरेट पिणे बंद करीन, तर पत्नीने सांगितले, मी सात किलो वजन कमी करीन. दोघांनी एकमेकांच्या भेटी स्वीकारल्या आणि ती त्याची सिगारेट आणि तो तिचे वजन कमी करण्यासाठी एकमेकांना मदत करू लागले. विचार करा, दोघांना ह्या भेटी स्वीकारताना किती आनंद झाला असेल!
चार : सेवाभाव
जगात सगळीकडे पतिसेवा हे कर्तव्य मानले गेले होते. त्यामुळे पतीचे कपडे धुणे, इस्त्री करणे, बूट पॉलिश करणे, अंथरूण घालणे, आंघोळीसाठी पाणी तापवणे आणि बादली बाथरुमध्ये ठेवणे अशी सगळी सेवा पत्नीने करावी, असे गृहीत होते. गृहिणी म्हणजे पती, सासू-सासरे, नंदा-दीर-भावजया आणि मुले यांच्या अखंड सेवेत असणे अशी व्याख्या होती. पतीचे मन जिंकायचे असेल तर त्याला चांगला स्वयंपाक करून खाऊ घाला असाही समज होता. आज काळ बदलला तरी काही गृहिणींच्या मनात सेवा म्हणजे प्रेम हे समीकरण आहेच! जोपर्यंत ही सेवा केल्याने पती तिचा अनादर करीत नाही, अपमान करीत नाही किंवा तिच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचेल असे काही करीत नाही तोपर्यंत सेवाभाव ही भाषा असू शकते.
पण सेवाभाव हे दुधारी शस्त्र असते ही लक्षात घ्यावी अशी बाब आहे. हल्ली काही ठिकाणी पुरुषांकडेही अशाच प्रकारच्या सेवेची भाषा दिसते. अभिषेक एका मोठय़ा कंपनीत संचालक आहे, पण जो काही थोडा वेळ घरी असतो तेव्हा तो चक्क इतकी मदत करतो की, ती अगदी खूष होते. सकाळी तिला बेड-टी आवडतो, तर ती उठताच चहा समोर हजर असतो. दर शनिवारी तिच्या डोक्याला मेंदी लावणे, फेस पॅक लावणे, इतकंच काय पाठीला तिळाच्या तेलाने मसाज करणे ही सारी तिची सेवा तो इतक्या आनंदाने करीत राहतो की बस्स. काही मित्र त्याला चिडवतात, पण तो म्हणतो, मी हे सारे करतो ते माझ्या आनंदासाठी. सेवेची भाषा अशी असते.
पाच : स्पर्शभान.
आपली संपूर्ण त्वचा कमीअधिक प्रमाणात संवेदनशील तंतूंनी भरलेली असते आणि स्त्री-पुरुष नात्यात स्पर्शाला विशेष महत्त्व असते, पण अनेकदा प्रेम, स्पर्श हा विषय निघाला, की मनात थेट समागमाचा विचार येतो; पण ज्यांना स्पर्शभान असते त्यांची केवळ ‘हीच’ मागणी नसते. दिवसभरात जेव्हा संधी मिळेल तेव्हा जवळ घेणं, खांद्यावर हात ठेवणे, हातात हात घेणे, टीव्ही बघताना चिकटून शेजारी बसणे आणि सहेतुक स्पर्श अशा सगळ्या गोष्टींचा त्यात सहभाग असतो.
दुर्दैवाने आपल्याकडे पती-पत्नी घरी एकटे असले तरी एकमेकांना स्पर्श करीत नाहीत. चुंबन-आिलगन तर दूरचीच गोष्ट. मग होते काय, एकदा का ज्येष्ठ नागरिक झाले आणि प्रवासाला गेले की हातात हात घालून फोटो काढत बसतात.
स्पर्शाचे भान येणे म्हणजे आपली संवेदनशीलता वाढवणे.
या पाच भाषांतली आपली भाषा कोणती ते निश्चित करणे शक्य झाले असेल.
काही जण म्हणतील, सगळ्या भाषा माझ्याच! गडबड होईल. तुमची भाषा तुमच्या जोडीदाराला सांगा आणि एका वेळी एकच भाषा शिका आणि शिकू द्या.
नवे शिकताना व्याकरण चुकेल, काळाची सांगड चुकेल, शब्दांची रूपे चुकतील, पण माणूस आपली भाषा शिकत आहे हे काय कमी आहे?