ब्लॉग माझा : निर्णय Print

दीप्ती बजाज - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माझं लग्न ठरलं, किती आनंदात होते मी. खूप स्वप्न रंगवायला सुरुवात केली, पण एके दिवशी त्यांना सुरुंग लागलाच. आता निर्णय मला घ्यायचा होता..
किती मोकळं वाटत आहे आज! खरंच. आणि का तर- मी माझं लग्न मोडलंय आणि तेही विचारपूर्वक!
आमचं छोटंसं कुटुंब- मी, आई आणि मोठी बहीण माधवी. वडील लहानपणीच हार्टअ‍ॅटॅकने गेलेले. माझ्याजवळ त्यांच्या फारशा आठवणीदेखील नाहीत. आठवतं ते इतकंच की, एकदा घरी दुपारी अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि तिच्यातून बाबांना काढून पुढच्या खोलीत झोपवलं होतं आणि आई त्यांच्यावर पडून रडत होती. ती रडत होती म्हणून आम्हीपण रडत होतो. कोणीतरी आम्हाला त्यांना नमस्कार करायला सांगितला आणि आम्हाला शेजारच्या घरी नेलं. आम्हाला रडू नका, म्हणून सांगितलं. आता आम्हाला मोठय़ांप्रमाणं वागायला सांगितलं. पण रडू येतच राहिलं. कारण कळत नव्हतं नीटसं आणि थोडय़ाच वेळात आमच्या घरातून येणारे आवाज थांबले आणि काहीतरी आपल्यापासून खूप दूर गेल्यासारखं वाटलं. जे माझं खूप जवळचं होतं असं काहीतरी आणि हळूहळू समजलं की आमचे बाबा गेलेत आता- कायमचे! आणि सगळंच बदललं त्यानंतर..
दिवस जात राहिले. आम्ही मोठय़ा होत राहिलो. आई आता घर सांभाळून नोकरी करीत होती. आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवीत होती. आम्हाला बाबांची कमी जाणवू नये म्हणून धडपडत होती, पण एकदा मीच तिला दुखावलं होतं.
माझ्या शाळेची सहल जात होती हैदराबादला. माझ्या मैत्रिणी जात होत्या, पण ताईने मला आईला विचारू नकोस म्हणून बजावलं. पण मला मन आवरेना. ताई नसताना मी आईकडे गेले. मनात शब्दांची जुळवणी करीत एका दमात तिला सांगितलं, ‘‘आई, आमच्या शाळेची सहल जातेय हैदराबादला. माझ्या सगळ्या मैत्रिणी जाताहेत. मलापण जायचं आहे. हो म्हण ना!’’ आई म्हणाली, ‘‘नाही बाळा, मोठी झाल्यावर हवं तिथे जा. आत्ता नको.’’ मी रागावले. वाईटही वाटलं. मोठी झाल्यावर का म्हणून? आठवीला आहे मी आता.’’ आई जवळ आली. माझ्या केसांतून हात फिरवीत म्हणाली, ‘‘होय राजा, मोठी झालीएस तू.  तुला माहितेय ना पैसे नाहियेत आपल्याकडे.’’ ती इतकेच म्हणाली की मी तिचा हात झटकला. रागाने म्हणाले, ‘‘काय पैसे नाहियेत? मला माहीत आहे तू साठवत असतेस ते. पण ते तुला मला द्यायचे नाहीत. वाईटेस तू. तुला मी आवडतच नाही. आज माझे बाबा असते तर ते मला कधीच नाही म्हणाले नसते.’’
खरे तर मला माझे बाबा आठवत नव्हते, पण मैत्रिणींचे बाबा बघून मी ते बोलून गेले आणि खोलीचं दार लावून झोपले. मला जेवायला ताई बोलवायला आली, पण मी गेले नाही. आई आली तरी नाही गेले. तसाच किती वेळ गेला काय माहीत, पण भूक खूप लागली म्हणून मी स्वयंपाकघरात गेले, तर आई तेथे रडत होती. माझ्या आत काहीतरी गलबललं. मी तिच्या कुशीत शिरले. काय वाटतंय ते कळत नव्हतं, पण आतल्या आत काहीतरी तुटत होतं. तसंच जेवून झोपले. दुसऱ्या दिवशी  घरात एक अस्वस्थ शांतता होती. तेवढय़ात आई आली. जेवणाच्या डब्यासोबत एक पाकीट तिने दिलं. ‘हे तुला,’ इतकंच म्हणाली. त्यात एक हजार रुपये होते. सहलीचे. मला खूप आनंद झाला. सगळी मरगळ त्यात हरवली. त्या नादातच मी शाळेत गेले. मॉनिटर एकेका मुलीचे नाव लिहून पैसे घेत होती. मी पाकीट चाचपून पाहिलं. आता थोडय़ाच वेळात ती माझ्याजवळ आली असती, पण मला खूप भरून आलं. डोळ्यांतून आसवे ओघळायला लागली. मनात आलं, या पैशांसाठी मी आईला रडवलं. लहानपणी तिचे डोळे भरून आले की मी रडत असे. किती बदललेय मी. पण मला असं नाही व्हायचं. तिला रडवून मला मजा करायला नाही जायचं. मी मन घट्ट केलं आणि पैसे दप्तरात ठेवून दिले. मला आता त्याची गरज नव्हती. मला काय हवंय ते मला  समजलं होतं. त्यानंतर मी पूर्ण बदललेच, पण आणखी एक गोष्ट बदलली. आमची नाती. आम्ही तिघी आता मैत्रिणी बनलो.
वर्ष जात राहिली आणि ताईचं लग्न झालं. तिला गावातच दिलं होतं. तिची ती अटच होती, पण दोन वर्षांनी भाऊजींचं प्रमोशन होऊन रायपूरला बदली झाली. भाऊजींनी प्रमोशन नाकारलं, पण आईनं त्यांना समजावून पाठवलं. ताई जाताना खूप रडली व मला आईची काळजी घेण्याचं बजावून गेली.
दिवस जात राहिले. मी बीए. बीएड. करून शाळेत शिक्षिका झाले होते आणि आई माझ्यासाठी स्थळं पाहत होती. माझीही ताईसारखीच अट होती. मुलगा गावातलाच हवा. एक स्थळ मला व आईला दोघींना पसंत पडलं. मुलगा- पराग डॉक्टर होता. म्हणजे बदलीचाही प्रश्न नव्हता आणि झटक्यात साखरपुडा झाला. लग्न दिवाळीनंतर ठरलं आणि आमचं भेटणं, फिरणं सुरू झालं. आयुष्य मोरपंखी बनून गेलं, पण यात मी माझं कर्तव्य विसरले नाही. मी त्याला सांगितलं की, लग्नानंतर माझ्यावर माझ्या आईची जबाबदारी राहील. तो काहीच म्हणाला नाही. माझ्या नोकरीलाही त्यांचा विरोध नव्हता. सगळं मनासारखं होत होतं. मी हरखून गेले.
एके दिवशी त्याच्या आईंनी मला घरी बोलावलं. मी त्याच्या आवडत्या रंगाची- अबोली- साडी नेसून गेले. गेल्यावर आई-बाबांना नमस्कार केला व आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो. आई म्हणाल्या, ‘‘हे बघ मानसी, तुम्ही दोघं भेटता त्याला माझी हरकत नाही; पण तू त्याला शब्दात अडकवून घेऊ नकोस. तू त्याला सांगतेस की, तुझ्या आईची जबाबदारी तू घेणारेस म्हणून. पण हे आम्हाला मान्य नाही,’’ आई म्हणाल्या. ‘‘यात मान्य नसण्यासारखं काय आहे? आम्हाला भाऊ नाही, ताई दूर आहे आणि मी जर गावातच असेल तर ते साहजिकच नाही का? म्हणून तर मला गावातलं स्थळ हवं होतं,’’ मी ठामपणे म्हणाले. इतकं सुशिक्षित घर असा विचार करील, हे मला अनपेक्षित होतं. माझ्या आईची जबाबदारी मी घेतली तर त्यांना त्रास तरी काय होता? मी कमवत होते. हा, पुढे-मागे तिला इकडे आणावी लागली असती, पण तिच्यासोबतच मी परागच्या आई-बाबांचीही काळजी घेणार होतेच ना!
आई म्हणाल्या, ‘‘तेच आम्हाला नकोय. उद्या जर विहीणबाई इथं येऊन राहणार असतील तर ते चालणार नाही. असंही तू लहान आहेस, त्यांची जबाबदारी खरे तर तुझ्या ताईची आहे.’’ यावर काय म्हणणार? आईचं आयुष्य इथे गेलेलं, बाबांच्या आठवणी इथे होत्या. त्या सोडून ती लांब जाऊ शकली असती का? पण हे सांगून उपयोग नव्हता. मी निघून आले. माझा स्वप्नांचा मनोरा कोसळला होता. पण आता माघार घेऊ शकते का? साखरपुडा होऊन किती दिवस झालेत. लोक काय म्हणतील? लोकांचं जाऊ दे, पण मीही त्याच्यात गुंतले होतेच की. पण या अटीवर मी त्याला स्वीकारू शकत होते का? माझ्या सुखासाठी ती वृद्धाश्रमात जाईल, पण मला ते मान्य नाही. आधीच तिने खूप भोगलंय. तिला असं सोडू शकत नाही. अखेर आता निर्णय मलाच घ्यायला हवा होता. तेवढय़ात आई समोर आली आणि मला अपराधी वाटू लागलं. किती स्वार्थी झालेय मी. यात इतका विचार करण्यासारखं काय आहे? आणि मी ठरवलं. मी परागला भेटून साखरपुडय़ाची अंगठी,  साडी परत दिली. त्याच्या बोलण्याचा, रागावण्याचा माझ्यावर परिणाम झाला नाही. आता पुन्हा मी पूर्वीची तीच मानसी झालेय. माझं मन अगदी शांत आहे आणि मला खात्री आहे, माझ्या अटीवर मला स्वीकारणारा मला भेटेलच!!!