ब्लॉग माझा : गुलमोहर Print

altमनोहर मंडवाले, शनिवार, २४  मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रकरण हाताबाहेर गेलं. ज्या गुलमोहराच्या झाडाखाली ते दोघं भेटायचे ते झाडही त्यांनी मुळासकट उखडून फेकून दिलं. तो असहाय्य होता त्यावेळी. पण..

हॅलो, हां बोल जयंता, बऱ्याच दिवसांनी माझी आठवण झाली?’
‘तशीच एक आनंदाची बातमी तुला द्यायची होती’
‘अरे व्वा, मग सांग की लवकर!’
‘सांगतो, सांगतो.. कसला इतका गोंधळ आहे बाजूला?’
‘काही नाही रे, गणपती मंदिरातला आवाज आहे. एक मिनीट’, असं म्हणून राघव रस्त्यापासून जरा बाजूला गेला.
संध्याकाळी ऑफिसमधून घरी यायला तो पायीच निघाला होता. वाटेत त्याला रामबागेतलं गणपतीचं देऊळ लागायचं. नेमका आज मंगळवार असल्यानं देवळात बरीच गर्दी होती. तिथं येणाऱ्या प्रत्येकाचा हात देवळातील घंटेवर जायचाच. त्याचा निनाद अख्ख्या रामबागेत भरून उरायचा.
‘हा जयंता, बोल आता’
‘गावाबाहेरील कॉलनीत एक प्लॉट घेतला. पाच हजार स्क्वेअर फुटांचा! काल सौदा झाला अन् सकाळीच खरेदी पण’
‘काय म्हणतो? छानच झालं. नाहीतरी गावातलं घर तुम्हाला लहानच पडायचं.’
‘पुढचं तर ऐक’
‘बोल ना’
‘आपल्या कॉलेजमागची ही तीच जागा आहे, ज्या जागेत २४ वर्षांपूर्वी तू तुझ्या हातानं गुलमोहराचं रोपटं लावलं होतं.’
‘काय? तीच जागा तू घेतलीस?’ राघवनं आश्चर्याने विचारलं. ‘हो. गेल्याच आठवडय़ात तिथं प्लॉट पडल्याचं मला माहिती झालं, तेव्हाच ठरवलं. तसा मलाही प्लॉट घ्यायचाच होता. तिथल्या जागेला आता सोन्याचे भाव आलेयेत. हं हे घे, तुझ्या वहिनींशी बोल’, असं म्हणून जयंतने त्याच्या बायकोजवळ फोन दिला.
‘बघितलंत भाऊजी, खरं तर रात्री आमचं ठरलं होतं की, ही बातमी तुम्हाला प्रत्यक्ष सांगून सरप्राइज द्यायचं, पण यांना कुठं राहवतंय’
‘चार दिवस कसं राहवेल रे जयंत’
‘म्हणजे’ राघव.
‘आम्ही येतोय तिकडे. शुक्रवारला ठाण्याला हिच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. शनिवार, रविवार कल्याणला तुझ्याकडे येतो.’’ जयंत
‘‘ये ये. मी वाट पाहीन.. ती जागा तू घेतली हे ऐकून खूप बरं वाटलं. गेल्या दोन वर्षांत गावी येणंच झालं नाहीये. गुलमोहर खूप मोठ्ठा झाला असेल ना?’’ राघव
‘मोठ्ठा?.. मस्त डवरलाय. घेरही बराच झालाय. त्याच्या सावलीतही बसून आलो. पोरालाही त्याच्याबद्दल सांगितलं. त्या कॉलनीत गेल्यावर सगळ्यात आधी त्याच्याकडेच लक्ष जातं! हिने तर रात्रीच ठरवून टाकलंय.. तुमच्या येत्या २५ व्या अ‍ॅनिव्हरसरीला जमिनीच्या त्या तुकडय़ासकट तो गुलमोहरच तुम्हाला गिफ्ट द्यायचा.
‘जयंता..’ त्यापुढचे शब्द राघवच्या ओठांतच अडकले.
‘राघव, त्यासाठी तू किती काय केलेयेस, हे माहितीये मला’
‘ती नशाच वेगळी होती.. ही बातमी कधी हिला सांगतो असं झालंय मला.’
जयंतानं फोन कट केला. राघवने फोन खिशात ठेवला अन् क्षणभर जुन्या आठवणीत हरवून गेला. घंटेच्या आवाजानं त्याला भानावर आणलं. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, देवळाच्या बाजूला बसलेल्या हारवाल्याकडून एक छानसा हार त्याने घेतला. तसा तो नास्तिक नव्हता. कधीतरी बायकोसोबत देवळात यायचा. आज इच्छेने त्याला यावं वाटलं. फाटकाशी सँडल काढून लगबगीनं तो देवळात शिरला. गणाधीशासमोर दोन्ही हात जोडून उभा राहिला. हळूहळू त्याच्या मनातली ढवळाढवळ आनंदाश्रूंच्या रूपात त्याच्या गालांवर सांडू लागली. मिटलेल्या डोळ्यांसमोर त्याला गुलमोहरच दिसू लागला. त्याचं मन ३८ वर्ष मागं गेलं ..
तो १३ वर्षांचा असताना लपाछपी खेळता खेळता दुर्गामावशीच्या दाराआड लपलेल्या, मन भांबावून सोडणाऱ्या कुंदाच्या स्पर्शानं त्याला तिचा नाद जडला होता. त्याच्या घरापासून हाकेच्या अंतरावर तिचं घर होतं. कुमारवयातलं त्याचं प्रेम कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांपर्यंत फुलतंच गेलं. कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली ती दोघं नेहमी भेटायची. रोजची त्यांची भेट सहसा चुकायची नाही.
असंच एकदा ती भेटायला येणार होती. त्यानं लांबूनच बघितलं तर ती त्याच्या आधीच पोहोचलेली. तिची बेचैन नजर त्याच्या येण्याच्या वाटेवर लागलेली होती. मोठी गंमत वाटली त्याला! आणखी काही क्षण तिला छळावं असं वाटून झाडाआडून तो तिचे नखरे पाहू लागला. बाजूलाच फुललेल्या चाफ्याचा गंध वातावरणात भरून होता. आपल्या मंद सुवासानं शुभ्रचाफ्याने तिच्यावरही मोहिनी घातलीच! तिची नजर चाफ्याकडे वळली. जवळ जात हळूच तिने त्यातली दोन फुलं खुडली. त्यांचा सुवास तनामनात भरून घेतला.
चाफ्याचा गंध तिला खूप आवडायचा.
असह्य़ झालं होतं तिला वाट पाहणं. तिचं लक्ष नाहीये हे बघून हलकेच तो झाडाआडून बाहेर आला.
‘हे काय, कित्ती उशीर?’ फणकारतच तिने विचारलं.
‘अगं, झाला उशीऽर’,
‘कळलं, तुला माझी किती काळजीये ते!’ लाडीक तक्रार तिने केली. तिचा हात हातात घेऊन हलकेच त्यानं हाताचं चुंबन घेतलं. तिचा राग फूर्ररर झाला. गुलमोहराच्या झाडाखाली असलेल्या तुटक्या बाकावर दोघंही बसली. वारा सुटला. नखशिखान्त फुललेल्या गुलमोहराची लालनारिंगी फुलं वाऱ्यानं तिच्या अंगावर पडू लागली.
‘बघ ना, आज गुलमोहरही तुझ्यावर फिदा झालेला दिसतोय’ त्यानं तिला छेडलं.
‘काहीतरीच’ ती.
‘आपल्या पाकळ्या-पाकळ्यांचा तो तुझ्यावरच वर्षांव करतोय’
‘असं नाहीये काही! या दिवसांत त्याचं रस्त्यावर सडा टाकणं सुरूच असतं.’
‘आज तो रस्त्यावर सडा टाकण्यासाठी नाही तर तुझ्यावर वर्षांव करण्यासाठी फुलं उधळतोय. चुकून त्यातलीच काही रस्त्यावर सांडतायेत’
‘आ हा हां हा, म्हणे चुकून त्यातलीच काही रस्त्यावर सांडतायेत’
‘अगं खरंच! आता हेच बघ ना, मी तुझ्या बाजूलाच बसलोय, पण माझ्या अंगावर एकही फूल पडत नाहीये अन् तुझ्यावर मात्र शेकडो फुलं’, असं म्हणून तिच्या केसात अडकलेल्या पाकळ्या तो काढू लागला. पाकळ्या काढताना त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती रोमांचित झाली.
‘वाटतं अशीच फुलं पडत राहावी अन्..’
त्याचं ते मुग्ध बोलणं ती तन्मयतेनं ऐकू लागली. आपल्या सहवासात आल्यावर रोमँटिक होऊन असंच काहीसं तो बोलत असतो हे तिलाही माहिती होतं. तिच्या नुसत्या सहवासानंच त्याच्या चित्तवृत्ती फुलून यायच्या.
आता तीच गुलमोहर झाली होती. ती बावरली. लाजली.
त्याच्या डोळ्यात बघता बघता वर गुलमोहरावर तिने नजर टाकली. जणू गुलमोहराला ती सांगत होती- माझा राघवही आज तुझ्यासारखाच डवरून आलाय रे! त्याच्याकडे बघत ती हलकेच हसली.
‘काय झालं?’
‘काही नाही. तुझ्या बाहुत विसावले म्हणून तो रुसलाय माझ्यावर! ..बघ ना; गेल्या दहा मिनिटांत एकही फूल उधळलं नाहीये पठ्ठय़ानं’ तिने गुलमोहराची तक्रार केली.
‘बिच्चारा! त्यालाही माझा हेवा वाटला असेल! पण काय करणार? एक सांगू, त्याची सोबत मिळाली म्हणूनच हा अमृत-कलश आज..’
पुढे तो काही बोलणार एवढय़ात एका काळ्या मांजरीनं धप्पदिशी दोघांच्या मध्येच उडी मारली.
तो घाबरला. गोंधळून वर पाहू लागला.
‘ससा आहे तू ससा! ..भित्रा’ जोरजोरात हसून ती त्याला चिडवू लागली. एवढय़ात कसली तरी चाहूल लागली अन् काही कळायच्या आत झाडाआडून आलेल्या तिच्या दोघा आडदांड भावांनी, ऊरफुटेस्तोवर त्याला बेदम झोडपलं. त्यांच्या तावडीतून त्याला सोडविण्याच्या नादात तिलाही बरंच लागलं.
प्रकरण हाताबाहेर गेलं. त्याला झोडपूनही त्या दोघांचं समाधान झालं नव्हतं. ज्या गुलमोहराच्या झाडाखाली ते दोघं भेटायचे ते झाडही त्यांनी मुळासकट उखडून फेकून दिलं. त्यांची ही अमानुषताच त्याच्या मनाला खूप बोचली होती. पोलीस केस झाली. त्यांनी दम भरला. अब्रू घालवली म्हणून त्याच्या अण्णांनी मनस्ताप केला. त्यातच अण्णांना आलेल्या अर्धागवायूच्या झटक्यानं तर त्याचं आयुष्यच बदललं. अकालीच घराची जबाबदारी पडल्यानं कॉलेज सोडून, फॅक्टरीत साडेचारशे रुपयांची नोकरी मिळतेय म्हणून तो मुंबईला निघून आला..
काही महिन्यांनी त्याला कळलं की, तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने तिचं लग्न केलं. त्यानंतर तिच्या नवऱ्याचा हायवेवर अपघाती मृत्यू झाला. त्या बातमीनं तर तो हादरूनच गेला होता. तोपर्यंत तिच्या सुखातच तो आपलं सुख मानून होता. त्या नवऱ्यासोबत जेमतेम दीड वर्ष संसार झाला तिचा. ही घटना घडली तेव्हा ती दोन महिन्यांची प्रेग्नंट होती. त्या वेळी तो स्वत:च गेला होता तिला भेटायला. त्यानंतर ती तिच्या आईकडे असताना दोन महिन्यांनी तो पुन्हा गेला- तिला लग्नाची मागणी घालण्याकरिता!
‘मी लग्न नाही केलंय अजून. माझं लग्न कधी झालंच तर हिच्याशीच होईल, नाहीतर कधीच नाही!’ त्याचं बोलणं ऐकून तिचे दोघे भाऊ चमत्कारिक नजरेनं त्याच्याकडे पाहू लागले. निर्णय त्यांच्यावर सोडून तो निघून आला होता.
स्वत:च्या हिमतीचं त्यालाच अप्रूप वाटलं होतं.
दोन दिवसांनी तिचे भाऊ, लग्नाची तारीख पक्की करायला तिच्या सासऱ्यांसह आले होते. त्याने फक्त एकच अट घातली. गुलमोहर जिथं होता त्याच ठिकाणी आमचं लग्न लावायचं. सगळ्यांनी ती अट आनंदाने मंजूर केली. तेव्हा बाबांचा भरून आलेला ऊर फक्त त्यालाच दिसला होता.
लग्न झाल्या झाल्या कुंदाच्या सोबतीनं गुलमोहोराचं रोपटं आपण त्या जागी लावलं होतं.. या आठवणीसरशी त्याच्या पापण्यांतून अश्रू ओघळू लागले. डबडबलेल्या डोळ्यांना देवळात सगळीकडे गणाधीश दिसू लागले. घंटेचा निनाद आज त्याला सुखावत होता अन् देवळात येणाऱ्या प्रत्येक नजरेत श्रद्धेच्या फुलमाळाच त्याला दिसत होत्या.