ब्लॉग माझा : एक न लिहिलेलं पत्र... Print

altमंगला गोखले , शनिवार , ५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या पावसाने मला पुन्हा एकदा त्या ११ जुलैच्या पावसाची आठवण करून दिली. पावसाच्या धारांबरोबर सरसर आठवणी डोळ्यांपुढे आल्या. पण खरंच सांगते, ती आठवण अभूतपूर्व पावसाचीच केवळ नसते, तर तुझ्या-माझ्यातील मैत्रीच्या नात्याची पण असते. पाऊस केवळ निमित्तमात्र.
आज सकाळपासून खूप पाऊस कोसळतोय. गेले दोन दिवस त्याच्या अगदी अंगात आलंय. जिकडे-तिकडे पाणी साचलंय. सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. अधूनमधून वीजही गायब होते आहे. मधल्या वेळात संदीपचा फोन आला होता..           
संदीप कोण? अगं, माझ्या नणंदेचा मुलगा संदीपऽऽ.. तो इथून जवळच राहतो. तो आणि त्याची पत्नी सुमा दोघंही नोकरी करतात. चर्चगेटला जातात. त्याची दोन छोटी मुलं इथे पाळणाघरात असतात. या असल्या पावसामुळे ते दोघेही इथे वेळेवर पोहचू शकत नाहीत. त्यामुळे काळजीत आहेत. सुमा रडत रडत फोनवर म्हणाली, ‘‘आमचं काही खरं नाही. केव्हा पाणी कमी होईल!.. कधी गाडय़ा सुरू होतील!.. काही कळत नाहीए. प्लीज प्लीज त्या छोटय़ांना पाळणाघरातून घेऊन याल का?  तशा पाळणाघरातल्या मावशी प्रेमळ आहेत. पण आता रात्रीचे आठ वाजलेयत. अजून आम्ही प्लॅटफॉर्मवरच आहोत.. त्या तरी किती वेळ सांभाळतील नाही का!’’
‘‘सुमाऽऽ, अगं, काही काळजी करू नकोस. मी व्यवस्था करते बरं!’’ एवढं म्हणेस्तोवर वीज गेली. फोनही कट् झाला. सोसायटीच्या आवारात साचलेल्या गुडघाभर पाण्यातून तिच्या छकुल्यांना आणायला जायचं कसं?.. हा प्रश्नच होता. पण मन खंबीर होतं.
तुझ्याशी बोलतीय खरी पण मला मात्र खूप खूप मागे जाऊन मनात दाटलेल्या आठवणींचा महापूर दिसतोय.. पाऊस.. खूप खूप धुवँाधार पाऊस. बेभान सुटलेला वारा, वाऱ्याने आपटणारी दारं-खिडक्या.. ओसंडून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्या. पूरच पूर..  धरणांना भरलेली धडकी.. त्यानंतर काठावरच्या घरांची आहुती, बेघरांचे तांडे, कोसळलेले, ढासळलेले संसार.. असं सारं आठवायला लागलं. पानशेतच्या वेळी चार दिवस एकाच कपडय़ावर वावरणारी मी.. मलाच दिसायला लागलीय बघ.
११ जुलै १९६१.. पूर. महापूर. गढूळ पाण्याने वाहणारी नदी. कोसळणारा बेभान पाऊस. या सगळ्यातून मला जाणवतंय ते आमचं त्यावेळचं बेघर होणं. पाणी नाही, दूध नाही. दोन दिवसानंतर तर काहीच नाही. सारेच हवालदिल झालेले. पुण्यात येणारे माणसांचे लोंढे थोपवलेले, तरीही कसंही करून शिरवळच्या मनुआत्याने एस.टी.ने पाठवलेले जेवणाचे डबे, ते आणायला स्वारगेटवर सदा दादाची पायपीट. पाणी हळूहळू ओसरू लागल्यावर कोसळलेल्या भिंतीखाली गाडलेल्या वस्तूंची शोधाशोध. म्हणून तिथेच राहणं गरजेचं. चार दिवस तेच कपडे म्हणजे जणू काही पूरग्रस्तांचा युनिफॉर्मच.
नंतरचे कितीतरी दिवस कॉलेजला न येणं. कारण घर नाही. चार महिन्यानंतर कॉलेजचं तोंड बघितलं. इतक्या दिवसानंतर आले तर उगीचच पोरकं-पोरकं वाटतं होतं. तेवढय़ात तू दिसलीस. धावत येऊन माझ्याजवळ बसलीस.. काहीही न बोलता. नुसतं तुझ्या आश्वासक असण्यानंच किती बरं वाटलं ते आजही इतक्या वर्षांनंतर मला जाणवतंय. कॉलेज सुटल्यावर ग्रंथालयात तू माझ्यासाठी यायचीस. तुझ्या वह्या नोट्स द्यायचीस. खरं तर तू खूप लांब-कॅम्पात राहायचीस. तुझं घरही खूप मोठ्ठं तसा अभ्यासालाही निवांतपणा. पण माझ्यासाठी.. केवळ माझ्यासाठी तू थांबायचीस. मी अभ्यास करावा म्हणून गोंधळलेल्या माझ्या मनाला धीर देत नोट्स लिहायला प्रोत्साहन द्यायचीस. शब्दांची गरजच नव्हती. तुझं नुसतं असणं - माझ्यासाठी थांबणं हे त्या बेसहारा परिस्थितीत किती दिलासा देणारं होतं, हे तुला नाही समजणार!.. अगं, मला तरी कुठे समजत होतं ! पुराने वाताहत झाल्याने, बेघर होणं म्हणजे काय! हे दु:ख मलासुद्धा आताच समजतंय. तू होतीस म्हणून मी अभ्यास केला. लीला, तू होतीस म्हणून मी ग्रॅज्युएट झाले. हे मी तुला कधी बोलून दाखवलं की नाही! माहीत नाही. पण मनातील काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. मैत्रीच्या हळुवार नात्याला धक्का न लावता, समजावून घ्यायच्या असतात. त्यामुळे तुझ्या-माझ्यातील या नाजूक मैत्रीच्या धाग्यांना, रेशमी मुलायम नात्याला धक्का मला कधीच द्यावासा वाटला नाही ग.! पण इतक्या वर्षांनंतर आजच्या मुसळधार पावसाने मला पुन्हा एकदा ११ जुलैच्या पावसाची आठवण करून दिली. पावसाच्या धारांबरोबर सरसर आठवणी डोळ्यांपुढे आल्या. पण खरंच सांगते, ती आठवण अभूतपूर्व पावसाचीच केवळ नसते. तर तुझ्या-माझ्यातील मैत्रीच्या नात्याची पण असते. पाऊस केवळ निमित्तमात्र.
तसं मैत्रीण म्हटलं की, रुसवे-फुगवे, कमी-जास्त असायचंच आणि असतंही. पण ते तेवढय़ापुरतंच असतं. अगदी बालिश, त्या वयाला शोभतंही. पण आता!.. आता आपण दोघीही या सगळ्याच्या पल्याड आहोत. तुझ्या कविता, तुझं गाणं, माझं लेखन-वाचन, माझे कार्यक्रम. यासाठी एकमेकींना दाद देणं. त्या निमित्ताने एकमेकींशी फोनवर तासन्तास बोलत राहणं. कधी न बोलताही समजून घेणं. खूप वर्षांनी भेटूनही सतत भेटण्यातला जिव्हाळा जाणवत राहणं.. हे काय असतं ग! यालाच खरी मैत्री म्हणतात ना ग! असं खूप खूप लिहावंसं वाटतंय. पण नाही लिहिलं तरी, तू रागावणार नाहीस आणि नाही व्यक्त केलं तरी आपल्या मैत्रीत काही उणं होणार नाही.. नाही का?
तुझीच सखी
मंगला