ब्लॉग माझा : ए, आई गं! Print

वंदना धर्माधिकारी , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई-बहिणींवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या या फारच अपमानास्पद असतात. अनेकदा तर ती देणाऱ्याला त्याचा अर्थ तरी माहीत असतो का हा प्रश्न पडतो. म्हणूनच १३ मेच्या मातृदिनाच्या निमित्ताने मनातला त्रास देणारा अनुत्तरीत प्रश्न तुमच्यासाठी... ‘एआई.. सांग ना.. सगळेजण भांडायला लागल्यावर आईला वाईट वाईट शिव्या का गं देतात? मी तिसरी-चौथीत असताना आईला विचारलेला प्रश्न. माझी आई, सर्वसामान्य आयांसारखीच. तिने उत्तर दिलेच नाही. मी वडिलांना विचारलं तर ते ओरडलेच मला. ‘काहीतरीच काय विचारतेस? चल बस अभ्यासाला.’ म्हणजे प्रश्न विचारणारी मी चुकीची होते? की हा प्रश्न लहान वयात विचारायला लावणारा आजूबाजूचा समाज चुकीचा होता.
पुन:पुन्हा प्रश्न विचारल्यावर आई म्हणाली, ‘असंच असतं गं? जाऊ दे!’ आवाज कापरा होता तिचा. हे आईचं उत्तर त्या वेळी त्या वयात मला पुरलं. पण तो प्रश्न अनुत्तरित तो तसाच राहिला.
कुणी देईल याचं उत्तर? भांडण झाल्यावर हमरीतुमरीवर येऊन आयाबहिणीवरूनच शिव्या का दिल्या जातात? त्याच्या विरोधात ना कधी कुणी आवाज उठवल्याचं ऐकिवात आहे ना कधी संप केल्याचं ना मोर्चा, ना निदर्शने, ना उपोषण, ना काळी फीत. साधा निषेधही नसावा? या शिव्या ऐकून वाटतं, सर्वाच्या आया काय बेवारस पडल्या आहेत रस्त्यावर! कुणीही यावं आणि वाट्टेल ते बोलावं. उचलली जीभ लावली टाळ्याला. हासडल्या एकापाठोपाठ एक शिव्या आणि झटकले हात. एकीकडे सटीसामासी का होईना मातृत्वाचे गोडवे गायचे आणि कुठे मनाविरुद्ध झालं, खुट्ट झालं, थोडंसं कोणाशी बिनसलं की लगेच आयाबहिणींची अब्रू चव्हाटय़ावर टांगायची.
त्या आई-बहिणींचा त्या भांडणाशी सुतराम संबंध नसतो, तरीसुद्धा शिव्यांचा पट्टा त्यांच्यावर. तंबाखूची पिकं मारून बाह्य़ा सरसावायच्या. एवढी कुठली मस्ती चढते की शिव्यांचा पाऊस पाडावा तो तमाम मातृवर्गावरच? आई- ती कोणाचीही असो आईच असते. ज्या अर्थी हातापायी धडधाकटपणे तुम्ही दुनियेत मिरवता, त्या अर्थी नक्कीच तुमच्या आईने अतोनात कष्ट, त्रास सोसून तुम्हाला वाढवलं असणार. त्याच आई या नात्याला अर्वाच्य शिव्या, तेही मिसरुडही फुटत नाही तोच.
अलीकडे दिवसेंदिवस त्यात भरच पडते आहे. सिनेमा, टीव्ही मालिका घराघरात आल्या. त्याबरोबर असे हे असंस्कृत, असभ्य शब्दही चांगल्या चांगल्याच्या उंबऱ्याच्या आत आले. हास्यविनोदाच्या एका कार्यक्रमात ‘तेरे माँ का साकीनाका’ आहे. या वाक्याला काही अर्थ तरी आहे का? की केवळ ‘तेरे माँ का’ हा शब्द महत्वाचा. पण यावरही टाळ्या आणि हशा पडतात. ‘तेरी माँ की आँख (?)’ हे ही आता अनेक चित्रपटात कॉमन झालंय. तर ‘जब वी मेट’मध्ये करीनाच्या संतापाने दिलेल्या शिव्यांचा शेवट ‘तेरे माँ की..’ इथे संपतो. ‘आईचा घो’, ‘आईच्या गावा ..’ हे तर सर्रासच ऐकायला मिळते. हे दोन-चार दाखले आहेत मी टिपलेले. प्रत्यक्षात अनेक, त्यातील तिरस्काराची भावना एकच. शत्रुपक्षातील कोणाच्या आईला शिवी दिली की दुसऱ्याचा यथोचित अवमान केल्याची खात्री आणि अभिमानाने मान वर करून सभ्यतेचा बुरखा पांघरून मिरवायला हे महाशय तयार.
तमाम आयांना हा घाणेरडा आरडाओरड ऐकताना मान खाली घालावीच लागते. कारण ओरडणारा तो पुरुष त्या क्षणी राक्षस बनतो. या क्रूर राक्षसी मनोवृत्तीपुढे ती प्रेमळ हळवी मूर्ती उभी राहूच शकत नाही. भांडणारे ते, भर चौकात, गर्दी गोळा करीत एकमेकांच्या आयांच्या नावाने शिव्या मोजतात अगणित. तोंडसुख घेतात. व्यभिचाराचं ओंगळ किळसवाणं रूप म्हणजे जन्मदात्रीला शिव्या देणं.
आई, जशी स्वत:ची तशीच दुसऱ्याचीही असते. हे लक्षात येत नसेल का? कुठला असुरी आनंद मिळत असेल असं बरळताना? असे हे कडू जहाल सत्य सर्व मातांनी स्वीकारलं आहे? स्त्री संघटनाही याच्या विरोधात उठल्याचं आठवत नाही. निदान माझ्या वाचनात तसं आलं नाही. लहानपणी मनात उमटलेला प्रश्न  माझा आजही माझ्या मनात तसाच राहिला आहे. मातृदिनाचं निमित्त साधून मांडला तुमच्यासमोर इतकंच.
एखादा म्हणेल, दुनियेत इतका भ्रष्टाचार, व्यभिचार, अनर्थ, अव्यवहार, असंस्कृतता, अनागोंदी.. असं सगळं सगळं बोकाळलं आहे. त्यात आईवरून दिलेल्या शिव्या म्हणजे अगदी किरकोळ बाब. त्यात काय एवढं? चालायचंच माणूस चिडला की बोलणारच असं..
..हे असं बोलण्यात काही गैर आहे, वाईट आहे, असं जर वाटेनासं झालं तर सुसंस्कृत असंस्कृत यात फरक तो काय राहिला? बरं.. या शिव्यांचा अर्थ कुणी मुलांना सांगतही नाही. त्याचा इतका गलिच्छ अर्थ आहे हे मला वाटतं अशी शिवी देणाऱ्याला सांगितला तर बहुसंख्य ती शिवी देणं बंद करतील. पण अनेकदा साधा आक्षेपही घेतला जात नाही. ‘सो वॉट’ ही मानसिकता याला कारणीभूत आहे. ‘ए आई गं!.. तू उत्तर न देता निघून गेलीस. पण त्या अनुत्तरीत प्रश्नाने आजही मला छळलं आहे..
अनुत्तरित प्रश्न असेच छळतात. वाचणारे वाचतील, विसरतील, डोकं शांत असेल तोवर ठीक. थोडेसे हलतीलही आतून. चुकलं असंही वाटेल एखाद्याला. पण पुन्हा एकदा फिरलं की पुन्हा गाडी त्याच रुळावर धावणार. अशीच अर्वाच्य शब्द बरसत. पण कायम अनुत्तरितच!