ब्लॉग माझा : आयुष्याचा रिप्ले Print

विजय चितळे ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्यात आपल्या हातून काही ना काही सत्कृत्य होतच असतं. समाजासाठी, दुसऱ्यांसाठीही आपण उपयोगी पडत असतो. पण अनेकदा ते आपल्या लक्षातही रहात नाही.  आपल्या आयुष्याचा रिप्ले पाहिला तर कुणीच आत्महत्या करणार नाही. आपलं आयुष्य ही सर्वोत्तम भेट असते ती सांभाळायला हवी..
आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस जसे येतात तसे वाईट दिवसही येतच असतात. कधी आनंद असतो तर कधी दु:ख असतं, कधी यशाचं शिखर तर कधी अपयशाची दरी; परंतु काही लोकांना वाईट दिवस आणि अपयश सहनच करता येत नाही आणि मग आपलं जीवनच समाप्त करण्याचा, आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागतो. आपण तर नेहमी म्हणतो की, मनुष्य जीवन म्हणजे ईश्वराने आपल्याला दिलेली सर्वात उत्तम, सर्वात किमती भेट आहे हो ना? मग आपल्या अविचाराने आणि अतिरेकी कृत्यामुळे आपण आत्महत्या केली तर त्यामुळे आपले कुटुंब निराधार होत नाही का? अशा अनेकानेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोदाहरण उत्तरे देणारी एक लघुकथा खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९४६ मध्ये लिहिली गेली होती. लेखकाचे नाव होते- फिलिप वॅन डोरेन स्टर्न. आणि कथेचे नाव होते ‘द ग्रेटेस्ट गिफ्ट’ (सर्वात मोठी भेट).
गंमत म्हणजे किती तरी प्रकाशकांनी त्याची ही कथा प्रकाशित करण्यास नकार दिला. त्या लेखकाने जर निराश होऊन ती कथा फाडून फेकून दिली असती तर जगासमोर एका प्रसिद्ध चित्रपटाच्या रूपाने कधीच लोकांसमोर आली नसती. पण फिलिप स्टर्नने आपल्या कथेच्या मर्यादित २०० प्रती काढल्या आणि ख्रिसमसची भेट म्हणून मित्रमंडळींत वाटून दिल्या. योगायोगाने फ्रैंक काप्रा नावाच्या एका चित्रपट निर्देशकाला ही कथा एकदम पसंत पडली आणि मग या कथेवर आधारित एक चित्रपट तयार झाला. त्या चित्रपटाने नाव होते ‘इट इज ए वंडरफूल लाइफ.’ म्हणजे जीवन खरोखर खूप आश्चर्यकारक असते! थोडक्यात, चित्रपटाचे कथासूत्र असे होते..कथा मूलत: ‘गार्डियन एन्जल’ या संकल्पनेवर आधारित आहे. गार्डियन एन्जलची संकल्पना ग्रीक तत्त्वज्ञानात दिसून येते. याचा अर्थ असा की, ईश्वर प्रत्येक माणसांसाठी त्याचा एक पालक देवदूत निर्माण करतो आणि हा देवदूत संकटसमयी त्या व्यक्तीस मार्गदर्शन करतो, त्याचे रक्षण करतो. एक व्यक्ती, जॉर्ज प्रैट. अतिनैराश्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात असताना त्याचा तो पालक देवदूत त्याला असे करण्यापासून परावृत्त करतो. जॉर्ज त्याला आपली व्यथा सांगतो आणि त्याच्या तोंडून सहज उद्गार निघतो- ‘अशा दु:खी जीवनाचा काय फायदा? मी जन्मालाच नसतो आलो तर किती छान झाले असतं?’ तो देवदूत जॉर्जला म्हणतो, ‘ठीक आहे, तुझी ही इच्छा मी आताच पूर्ण करून देतो. कल्पना कर की, तुझा कधी जन्म झालाच नाही आणि आता जरा आपल्या भूतकाळात जाऊन बघ की, जर तुझे खरोखर अस्तित्वच नसते तर काय-काय झाले असते!’
आणि मग तो देवदूत जॉर्जला आतापर्यंत त्याच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याच महत्त्वाच्या घटनांचे पुनर्दर्शन करवितो. मग त्याचे डोळे उघडतात व तो आत्महत्येचा विचार सोडून देतो..
उदाहरण म्हणून आपण जॉर्जच्या आयुष्यातील दोन घटना पाहू. एका घटनेत जॉर्जला आपल्या घरी टेबलावर त्याच्या लहान भावाचा फोटो दिसतो. जॉर्जला सांगण्यात येते की, हा त्याच्या दिवंगत भावाचा फोटो आहे. जॉर्जला आश्चर्य वाटते की, आपला हा भाऊ मेला केव्हा? मग त्याला आठवतं की, जॉर्ज जेव्हा अगदी १२ वर्षांचा लहानगा होता तेव्हा त्याने एकदा आपल्या त्या भावाला बुडण्यापासून वाचविलेले असते, पण आता तो लहान भाऊ मृत झालेला दिसतो कारण देवदूताने सांगितल्याप्रमाणे जॉर्जला जे पुनर्दर्शन होत असते, त्यात जॉर्जचे अस्तित्व नसतंच. याचा अर्थ असा की, जॉर्ज होता म्हणून त्याचा तो लहान भाऊ वाचला. म्हणजेच जॉर्जच्या हातून एक सत्कर्म त्या वेळेला झाले होते.
एक आणखी दृश्य, जॉर्ज एका औषध विक्रेत्याकडे नोकरी करू लागला होता. दुकानाचा मालक एकदा खूप मोठी चूक करणार होता. एकदा तो गिऱ्हाईकाला योग्य औषध देण्याऐवजी दुसरेच विषारी औषध देणार होता; पण ऐन वेळेवर जॉर्ज प्रसंगावधान दाखवतो आणि त्यामुळे ही गंभीर चूक व्हायची टळते. पण जॉर्ज जेव्हा या घटनेचे पुनर्दर्शन करतो तेव्हा त्याला असे दिसते की, त्याचा तो दुकानदार बॉस जेलमध्ये आहे आणि कोर्टाने त्याला त्याच्या निष्काळजीपणाबद्दल गंभीर शिक्षा केलेली आहे. याही घटनेमुळे हेच दिसून येते की, प्रत्यक्ष घटनेच्या वेळी जॉर्ज हजर होता आणि त्याच्याच मुळे दुकानदाराच्या हातून ती गंभीर चूक झाली नाही.
अशा तऱ्हेने जॉर्जला त्याच्या जीवनाचा ‘जॉर्जरहित रिप्ले’ दाखवून तो देवदूत आत्महत्या करायला निघालेल्या जॉर्जला हे पटवून देतो की, आपलं जीवन ही एक अमूल्य भेट असते. प्रत्येक जण दुसऱ्याच्या आयुष्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका करीत असतो. आणि म्हणूनच देवाने दिलेली ही ‘गिफ्ट’ आज आपल्याला काही दु:ख आहे, आपण संकटात आहोत म्हणून इतक्या सहजतेने लाथाडून द्यायची नसते.
आपल्या आयुष्यात आपल्या हातून काही ना काही चांगल्या गोष्टी होतातच. दुसऱ्यांचे आपल्यामुळे काही ना काही कल्याण होतेच, ही कल्पनादेखील प्रत्येकाला आनंद देऊ शकते. आपणही जर आपल्या आयुष्याचा असा, ‘रिप्ले’ कल्पनेत पाहिला तर कुणी सांगावं, आपल्यालाही आश्चर्याचे सुखद धक्के बसू शकतील.