ब्लॉग माझा : पहिला कमरा? Print

डॉ. सुवर्णा दिवेकर ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पहिला कमरा अर्थात शयनगृह, ही उत्तम पती-पत्नी संबंधांची पहिली पायरी. पूर्वीचे दाम्पत्यजीवन संमत असले तरी त्यातले नाते संयत होते. त्यामुळे ते जाहीर नव्हते; परंतु इंग्रजांच्या आगमनानंतर बेडरूम ही संकल्पना आली, रुजली आणि रुळलीही..
खरं तर हा एक नाजूक आणि समाजात उघडपणे चर्चा करण्यासारखा विषय नाही. निदान माझ्या पिढीपुरतं तरी हेच खरं आहे, पती-पत्नी संबंध ही अत्यंत खासगी गोष्ट.. त्याचं ज्ञान असणं, त्यासाठी चर्चासत्रं, काऊन्सिलिंग, वैद्यकीय ज्ञान, समस्या त्यावरची समाधानं, याबद्दल सबकुछ खुलेआम, हे वर्तमान आहे. पहिला कमरा ही संकल्पना मी शयनगृह म्हणजे बेडरूमसंदर्भात मी वापरते आहे, तेही हेतुत: कारण पूर्वपिढीत स्त्रीसाठीचा पहिला कमरा होता, स्वैपाकघर! तेव्हा आत्मशोधासाठी आवश्यक ‘चौथा कमरा’ ही सुशिक्षित स्त्रीची मानसिक गरज आहे, हे अमृता प्रीतमने सांगेपर्यंत सुशिक्षित स्त्रीलासुद्धा पुरेसं उमजलं नव्हतं. तिथे पहिला कमरा (शयनगृह) ही उत्तम पती-पत्नी संबंधांची पहिली पायरी (निदान पहिली काही र्वष तरी-) हे वास्तवही संकोचामुळे जाहीरपणे ओठावर येत नसे. मग हा पहिला कमरा आता आताच माझ्या मनगृहात का प्रवेशकर्ता झाला?
त्याचं कारण सांगते- या काही दिवसांत मी रमाबाई रानडय़ांचा उंच गेलेला झोका नियमितपणे पाहते, अनुभवते आणि त्याचं, म्हणजे त्यातल्या समाजजीवनाचं विश्लेषण करते. अर्थात माझ्यापरीनं. (मूळ आत्मचरित्र वाचलं आहे, पण यातलं समाजजीवन पाश्र्वभूमीवर असल्यानं ‘धावतं’ आहे.) त्यासाठी दोनदा सीरियलही पाहते, तेव्हा जाणवलं, त्यातलं दाम्पत्यजीवन (पहिला कमरा) नेमकं कसं असे? कारण गोविंदराव रानडे किंवा महादेव रानडे यांच्या स्वतंत्र खोल्या रानडेवाडय़ात दिसतात. (स्त्रियांना स्वतंत्र खोली दिसत नाही.) त्यात प्रशस्त मंचक (डबल बेड) आणि सूचक दोन उशा दिसतात. परंतु ‘माई’सारखी सव्वाष्ण स्त्री मुलांपाशी, माजघरातच झोपताना दिसते. याचा अर्थ दाम्पत्यजीवन होतेच (उघडच आहे.) परंतु ते मोकळं किंवा सहजचं नव्हतं. नजरा टाळून, चुकवून, प्रसंगोपात एकत्र येणं होतं. हे झालं मालिकेतलं. माझं बालपणही अशाच एका रानडेवाडासदृश श्रीमंत, पारंपरिक मोठय़ा वाडय़ातलं.
शिक्षण, संपत्ती असली तरी कर्मठच परंपरा. आजोबांची म्हणून मोठी खोली होती, त्यातही असाच प्रचंड मंचक होता. पण आजी हयात नव्हती. त्यामुळे आणि आम्हीही असं कुतूहल वागवायच्या वयाच्या नव्हतो. आमच्या वाडय़ातल्या बिऱ्हाडातूनही खालच्या मजल्यावर ‘काकू’ आणि त्यांची मुलं झोपत आणि ‘काकावर्ग’ माडीवरती असे. आमच्या मोठय़ा घरातून मात्र आई-वडिलांसाठी स्वतंत्र खोली होती. शयनव्यवस्था होती, पण आईच्या कितीतरी आधी आम्ही मुलं झोपत असू आणि आम्ही मुलं उठायच्या कितीतरी आधी आई-वडील उठलेले असत. त्यामुळे आमच्यासमोर एकत्रपणे खोलीत आहेत, असं चुकूनही पाहिलं नाही. तेव्हा एक नक्की, पती-पत्नीचं ‘असं’ नातं संमत असलं तरी संयत असणं, हेच अपेक्षित होतं. इच्छा, ओढ अशा भावनांपेक्षा सोय आणि सवड हेच महत्त्वाचं होतं. असावं. कारण आताच्या या (?) वयात प्रस्तुत विषयावर सहजगप्पा मारत असताना, माझ्या मैत्रिणींनी त्यांची ‘आई’ त्यांच्याजवळच झोपत असल्याचं सांगितलं आणि तरीही त्यांच्या ‘पाठीवर’ बेबी.. बंडू.. यापैकी एक-दोघे भावंड झाले. याचाच अर्थ संकोच, लज्जा, रूढी यांच्या त्रराशिकातून जे उरेल, ते दाम्पत्यजीवन..
पुढे एकदा मोठेपणी म्हणजे लग्न झाल्यावर (कारण तोवर तर अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे पाप.) एक जुन्या वळणाच्या काकू म्हणाल्या, ‘‘आम्ही नवऱ्याच्या खोलीत तरुणपणी जायचो, ते पायाला चिंध्या बांधून, कारण पायातल्या तोरडय़ांचा आवाज येऊ नये, कोणाला समजू नये म्हणून.’’ किती संकोचलं, अवघडलेलं आणि काचलेलं हे प्रणयजीवन! बरं, एकीकडे अगदी पुरातन लग्नपत्रिकेत चि. सौ. कां.xx आणि चि.x यांचा शरीरसंबंध असा नि:संकोच उल्लेख, धर्मात गुंफलेला, उघडपणे साजरा होणारा गर्भदानविधी, डोहाळतुलीचे लाड असा राजरोसपणाही.. आणि दुसरीकडे असा काहीतरी संकोचलेपणा, अशा दुटप्पी संस्कृतीला नाव काय द्यायचं?
या साऱ्या द्वंद्वात बायकांची किती घुसमट होत असेल? महाभारतात तर कुंती म्हणते, ‘‘अपत्यजन्मानंतर पुरुषास ‘होकार’ देणारी पत्नी ही ‘कुलटा’ समजावी!’ म्हणजे या संबंधाचं मोल फक्त वंशसातत्य एवढंच होतं? सप्तपदीत ‘कामेच’ ही हमी मिळायची, ती एवढय़ापुरतीच?
पुढे इंग्रजांच्या आगमनानंतर ज्या चांगल्या गोष्टी आल्या, त्यात स्वतंत्र शयनगृह- बेडरूम ही संकल्पना आली, रुजली, रुळली आणि तोरडय़ांना बांधल्या जाणाऱ्या चिंध्या संपल्या. फक्त ‘जनन’ हे एकमेव प्रयोजनही संपत चाललं आणि आजच्या घटकेला पहिला कमरा घरात आणि मनातही सहजपणे विसावला.
स्त्री-पुरुष समानतेचा साक्षीदार पहिला कमरा म्हणूनच मैत्रिणींसमोर ब्लॉग करावासा वाटला. इति अलम्।