ब्लॉग माझा : अनलॉक्ड बॅग आणि श्ॉपेल कॉर्बी Print

alt

सुनीती काणे , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
धा कटय़ा बहिणीच्या लग्नासाठी भारतात आलेली अलका नुकतीच अमेरिकेत परत गेली होती. तिची आई माझ्याजवळ म्हणाली, ‘‘अलकी पोचली आणि हुश्श झालं.’’ मी विचारलं, ‘‘येवढी कसली चिंता? ती काय पहिल्यांदा चालली होती?’’
वहिनी म्हणाल्या, ‘‘तसं नाही गं! पण काय या काटर्य़ा?  धाकटीच्या लग्नात अल्कीच्या नवऱ्याला चांदीचं चांगलं जड ताट दिलं होतं मी! ते ‘कॅरी अ‍ॅबोर्ड बॅग’मध्ये जवळ ठेवायचं सोडून अलकीनं ते चक्क ‘चेक इन्’ बॅगेत दिलं टाकून आणि ९/११ नंतरची ही नवी डोकेदुखी! अतिरेक्यांच्या घातपाताला घाबरून होतेय कसून तपासणी. त्यासाठी चेक-इन् केलेल्या हार्ड- बॅग्ज लॉक करायच्या नाहीत म्हणे! आमच्या लेकीनं बिनकुलपाच्या बॅगेत खुशाल ते चांदीचं ताट टाकून दिलं. ते सहीसलामत पोचलेलं ऐकलं आणि हुश्श केलं बघ!’’
चांदी-सोन्याचे भाव कडाडले असताना ते ताट वाटेत गळपटणार तर नाही ना ही वहिनींना वाटणारी काळजी रास्तच होती, पण अनलॉक्ड बॅग म्हटलं माझ्या डोळ्यांपुढं येतो- चांदीच्या ताटाहून अनेक पट मोलाचं तारुण्य हरवून बसलेल्या श्ॉपेल कॉबीचा निरागस चेहरा आणि २००४ सालच्या आठ ऑक्टोबरच्या संध्याकाळी, टी.व्ही.वर, जगभरातल्या बातम्यांमध्ये झळकलेली तिच्याबद्दलची बातमी आठवून पोटात नव्यानं कालवाकालव होऊ लागते. कारण अनलॉक्ड बॅगेपायी तिला गमवावी लागली होती तारुण्याची, उभारीची मौल्यवान वीस वर्षे! तीसुद्धा इंडोनेशियातील भीषण तुरुंगात कंठावी लागत असलेली!
कोण होती ही श्ॉपेल? ही होती एक ऑस्ट्रेलियन तरुणी. ऑस्ट्रेलियामधल्या क्वान्सलंड येथे ती ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेता घेता आपल्या कॅन्सरग्रस्त पित्याची सेवा करत होती. कष्टाच्या दिनक्रमातून बदल म्हणून, काटकसरीनं प्रवासासाठी पैसे शिल्लक टाकून श्ॉपेल इंडोनिशियात राहणाऱ्या तिच्या बहिणीच्या तिसाव्या वाढदिवसासाठी निघाली होती. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनहून सिडनीला जाणाऱ्या विमानात चढताना तिनं तिच्या कुलपाच्या बॅगेबरोबरच सर्फरायडिंगचा बोर्ड ठेवलेली, बिनकुलपाची ‘बूगी बोर्ड’ बॅग चेक-इन केली. ब्रिस्बेनहून श्ॉपेल सिडनीला पोचली आणि तिथून तिनं बालीला जाणारी आंतर्देशीय फ्लाइट घेतली, तेव्हा तिच्या लॅक्ड आणि अनलॉक्ड अशा दोनी बॅगा परस्पर त्या विमानात चढवण्यात आल्या. बालीला पोचल्यावर आपलं सामान घेऊन कस्टम-तपासणीसाठी रांगेत उभ्या असलेल्या श्ॉपेलला, पुढे वाढून ठेवलेल्या संकटाची पुसटशीदेखील कल्पना नव्हती. कस्टम्स अधिकाऱ्यांनं, तपासणीसाठी श्ॉपेलची अनलॉक्ड बॅग उघडली आणि त्याला त्यात चार किलो वजनाचा गांजा सापडला. हा गांजा आपला नाही, तो आपल्या बॅगेत कसा आला ते आपल्याला ठाऊक नाही असं टाहो फोडून सांगणाऱ्या श्ॉपेलला गजाआड केलं गेलं. श्ॉपेलनं स्वत: हा गुन्हा केलाय की आंतरराष्ट्रीय तस्करांनी गांजाची ने-आण करण्यासाठी तिची बॅग निवडली असल्यामुळं ती अजाणता त्यात अडकलीय याबद्दल खूप तर्क-वितर्क घडले. लोक काही दिवस चर्चा करून गप्प बसले, पण तिचं सारं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. कारण तिला वीस र्वष कारावासाची शिक्षा झाली.
आजकाल गूगल-सर्चसाठी एखादं नाव टाइप केलं की सारी माहिती मिळते. या श्ॉपेलचं पुढं काय झालं असेल अशी हुरहूर लागली, की मी सहज माहिती काढू शकते. पण दर वेळेस निराशाच पदरी पडते, कारण तिच्या शिक्षेत घट व्हावी म्हणून निकराचे प्रयत्न चालले असले, तरी  काहीच घडत नाहीए. त्यांनी तिला ‘मारुआना बगेन’ हा किताब बहाल केला आहे.
ती निष्पापी आहे असं मानलं, तर एका अनलॉक्ड बॅगनं तिच्या आयुष्याची किती उलथापालथ घडवलीय बरं!
आंतरराष्ट्रीय प्रवास ही आजची गरज बनली आहे. शिक्षण, पर्यटन, परदेशस्थित मुलांना भेटणं यासाठी लक्षावधी लोक विमानप्रवास करत असतात. त्यांचे प्रवास बिनबोभाट, सुखरूपपणे पारसुद्धा पडतात. परंतु श्ॉपेल कॉर्बीसारखी एखादी बातमी अतिशय अस्वस्थ करून जाते. नियमांनुरूप कुलूप न लावता हार्ड बॅग्ज चेकइन करणाऱ्या कुणा निष्पाप व्यक्तीच्या वाटय़ाला अशी एखादी भीषण घटना तर येणार नाही ना, ही भीती सतावू लागते.
ब्रिस्बेनहून सिडनीपर्यंत गांजा पोचवण्यासाठी श्ॉपेलच्या अनलॉक्ड बॅगचा कुणीतरी वापर केला आणि सिडनीला ती बॅग आंतरराष्ट्रीय विमानात चढवली जाण्यापूर्वी तो गांजा काढून घेण्यात काहीतरी समस्या निर्माण झाल्यामुळे तो गांजा इंडोनेशियापर्यंत पोचला आणि निष्पाप श्ॉपेल विनाकारण अडकली, अशी एक शक्यता वर्तवली जाते. तिथले अधिकारी आणि पोलीस हातमिळवणी करून गोरी, प्रवासी सावजं हेरतात, त्यांच्या बिनकुलपांच्या बॅगेत अमली पदार्थ ठेवतात, विमानतळावर कस्टम्समध्ये खूप गाजावाजा करून त्यांना पकडतात, पोलीस कोठडीत एक-दोन दिवस डांबून त्यांना घाबरवून टाकतात आणि खंडणी वसूल झाल्यावर त्यांना तंबी देऊन परतीच्या विमानात बसवून देतात असं या भीषण अनुभवातून गेलेल्या काहींनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं असल्याचंही ऐकिवात आहे. अर्थात आजही निकाल लागलेला नाही त्यामुळे खरं, खोटं काय हे कोण ठरवणाऱ? श्ॉपेल निर्दोष आहे का माहीत नाही पण, आजही गजाआड आहे, हे सत्य आहे.
श्ॉपेलबाबतच्या या उलटसुलट शक्यता ऐकल्या आणि मला गेल्या वर्षीच्या अमेरिका प्रवासाची आठवण आली. तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दर पंधरा मिनिटांनी ध्वनिप्रक्षेपण केलं जातं होतं. ‘आपल्या अनलॉक्ड बॅग्ज नजरेआड ठेवू नका, कुणी नेण्यासाठी एखादं पुडकं तुमच्यापाशी दिलं तर त्यात काय आहे, याची खातरजमा केल्यावाचून ते स्वीकारू नका.’ अशा सावधगिरीची सूचना प्रवाशांना देण्यामागे, तसंच सबळ, सयुक्तिक कारण असलंच पाहिजे!
‘या आईला काळजीखेरीज काही उद्योग नाही,’ असं माझी मुलं म्हणत असतात. त्यात तथ्यसुद्धा आहे. पण अनलॉक्ड बॅग म्हटलं की मला आठवतो श्ॉपेलचा निरागस चेहरा आणि ‘श्ॉपेलसारखा अनुभव इतर कुणाच्याही वाटय़ाला न येवो’ अशी मी मनोमन प्रार्थना करू लागते.