ब्लॉग माझा : मौनात अर्थ सारे Print

विजय टोकरे , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गेल्या वीस वर्षांत टूर  व्यवसायाच्या निमित्ताने मी असंख्य सहली आयोजित केल्या परंतु मुक्या -बहिऱ्या मुलांबरोबरच ती सहल अविस्मरणीय होती. वेगळाच अनुभव गाठीशी बांधला गेला. सहल संपताना एक-एक जण फ्लाइंग किसची खूण करीत जायला लागले आणि ते ‘न बोललेलं थँक्यू’ कानात रुंजी घालायला लागलं..
मु लांची बसमध्ये लगबगीने चढण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सगळे बसमध्ये बरोबर बसले की नाही याची शिक्षक मंडळींनी खातरजमा केली व बस ड्रायव्हरने हॉर्न दिला. मी बसच्या पुढील भागात ड्रायव्हरशेजारी बसलो होतो. जशी बस सुरू झाली तशी नेहमीच्या शैलीत जोरात आरोळी ठोकली गणपती बाप्पा मोरया! थोडेसेच तेही अस्पष्ट आवाज ऐकू आले.मोरयाचा घोष ऐकू आला नाही. मी मनात म्हटलं, अरेच्चा ४०-५० मुलं आणि मोरयाचा जयघोष नाही. क्षणार्धात मागे बघितलं तेव्हा फक्त घोषणेच्या रूपात हात वर होते आणि पटकन लक्षात आलं आज टूर ‘मुक्या व बहिऱ्या मुलांची’ आहे. नेहमीची व्यावसायिक सहल नाही. नाही तर केव्हाच ४०-५० जणांच्या घोषणांच्या आवाजात बसच्या इंजिनाचा आवाज विरून गेला असता. मग लक्षात आले की आज बसच्या पुढे बसून माइकवर बोलण्यापेक्षा समोर उभे राहून हातवारे व हावभाव करीत बोलायचं आहे. मग एका शिक्षिकेच्या मदतीने त्या मुलांना दिवसाचा कार्यक्रम सांगितला तेव्हा ‘आवाज न काढता बोलता येतं?’ ते कळलं. आनंदाचे व प्रश्नांकित हावभाव सुरू झाले. एका मुलाने सहलीची आखणी केलेली लेखी प्रत काढली व बोट ठेवून इकडे नाही जाणार का? असे हाताच्या खुणेने े प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि एक वेगळाच ‘मी, शिक्षक व मुलं’ असा माझा तोंडाने बोलण्याचा, शिक्षकांचा हातवारे करण्याचा व मुलांनी ‘डोळ्यांनी’ ऐकण्याचा कार्यक्रम पार पडला.
आमच्या सहलीचे ठिकाण होतं औरंगाबाद-वेरुळ, अजिंठा, बस जितक्या वेगात पुढे जात होती त्याच वेगात मी मनाने मागे गेलो आणि सगळ्या  आयोजित केलेल्या सहली आठवायला लागलो. अर्थात त्या सगळ्या होत्या बोलणाऱ्यांच्या.  नुकतीच झगमगाटाची दुबई फेस्टिव्हल टूर करून आलो होतो. स्वत:चा गेली २० वर्षे टूरचा व्यवसाय आहे. १०-१२ देशांमध्ये व भारतात अनेक सहलींचं आयोजन केलं, पण या मुक्या मुलांच्या टूर्सचा अनुभव ‘बोलणाऱ्या माणसांना’ खूप काही शिकवून जाणारा होता.
बसने अजिंठाचा परिसर गाठला, प्रत्येकाने हात-वाऱ्यांच्या सूचनेचं पालन केलं आणि रांग लावली. अजिंठाची लेणी बघायला जशी सुरुवात झाली, पहिल्याच लेण्याजवळ मुलांना बघून पहारेकरी आधीच सूचना द्यायला लागले, आवाज करू नका, कॅमेऱ्याचा फ्लॅश बंद करा. मी म्हटलं, ‘दोन्ही सूचना तंतोतंत ही मुलंच फक्त  पाळू शकतात.’ तिथे जमलेल्या बोलक्या लोकांचे आवाज घुमत होते व पहारेकऱ्यांच्या सूचना ऐकूनही कॅमेऱ्यांचे फ्लॅश चालू होते. फ्लॅशमुळे तो इलेक्ट्रॉनिक उजेड पाडून आपण आपल्याच मौल्यवान व जुन्या सुंदर वास्तुकला व चित्रकला ठेवींचं नुकसान करतोय, हा त्यांना गंधही नव्हता!
सहल म्हटली की, फोटो काढून ठेवायला हवेच ना.. दोन मुलं बाहेरच्या बाजूला फोटोसेशन करीत होती. फोटो काढणाऱ्या मुलाला हातवारे करीत थांबविल्यावर मी खुणेने विचारलं, काय झालं ? त्याने हातवारे केले व म्हणाला, तुमचा गॉगल द्या. मी म्हटलं का? तसे पुन्हा हातवारे केले आणि म्हटलं मी वर्गातला हीरो आहे ना.. आणि मग मॉडेलप्रमाणं दोघांनी मनसोक्त छायाचित्रं घेतली.’ फिरता फिरता बाजारात आलो, तिथल्या बाजारात बरीच गर्दी जमलेली दिसली. मी मनात म्हटलं, मुलांना इथून लवकर नेऊ या, उगाच गर्दीत कोणी हरवायला नको.. ‘बघतो तर तिथे आलेल्या लोकांचीच गर्दी या मुलांभोवती.’ मग दुकानदार व मुलं यांच्यात कॅलक्युलेटरवर भाव करण्याची कसरत सुरू झाली आणि त्या गर्दीतल्या बायकांना कळलं ‘न आवाज करताही खरेदी करता येतं’ एका शिक्षिकेशी बोलताना कळलं मुलांची कानातली यंत्रं काढली आहेत, कारण ती महाग यंत्रं मुलं हरवतात. मग मुलांना शोधण्याचा खेळ सुरू झाला. प्रत्येक मुलासमोर जाऊन हातवारे करीत आता परत चला, सांगण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या वेळेपर्यंत दुपारचे ४ केव्हा वाजले कळलंच नाही. दुपारचं जेवण चहाच्या वेळी सुरू झालं बुफे पद्धतीचं. त्यावेळी एक अनुभव आठवला. एका परदेशातल्या आयोजित टूरवर असताना एका चांगल्या हॉटेलात एक कुटुंब स्वत:च्या ताटाबरोबर दोन ताटं पण वाढून बसलेली होती. म्हटलं कोणासाठी ताटं वाढून ठेवली आहेत? अजून कोणी येणार आहे का? कुटुंबाने उत्तर दिलं, नाही. उगाच सारखं उठायला नको म्हणून एक्स्ट्रा ताटं वाढून घेतली. ती माणसं उठून गेल्यावर बघितलं तर अध्र्या ताटातील अन्न तसंच वाया गेलेलं. एव्हाना मुलांची जेवणं संपत आली. सगळीकडे नजर फिरवली तेव्हा बघितलं, ‘तिखट जास्त आहे की मीठ नाही आहे’ हे पटकन न सांगता येणाऱ्या तोंडांनी स्वत:चीच ताटं स्वच्छ करूनही ठेवली होती व जेवण छान आहे, हे हातवाऱ्यांनी येऊन सांगण्यास विसरली नव्हती.
शिक्षकांच्या गप्पागोष्टींतून कळलं की, या मुलांना व्यवहारज्ञानाचं शिक्षण खास पद्धतीने दिलं जातं व बाहेरच्या जगात जाताना त्यांना ऑफिसमध्ये वायफळ बडबड करून उगाच ज्ञानाचे धडे देणाऱ्यांपेक्षा एक न बोलणारा पण परिपक्व माणूस बनवून पाठविण्यात येतं आणि हे अवघड व जिकिरीचं काम ही शिक्षक मंडळी करतात. सहल म्हणजे आपण बोलकी मंडळी मौज-मज्जेसाठी भरपूर खर्च करताना दिसतो. पण शिक्षकांकडून कळलं की, काही मुलं तर इतर मुलांकडची चित्रं व वर्णनं यावरच समाधान मानणारी होती. सहलीला जाणं त्या मुलांना परवडणारं नव्हतं. मग सहज माझ्या काही ‘बोलघेवडय़ा’ मंडळींना मी आवाहन केलं की मी अशी अशी मुक्या-बहिऱ्या मुलांची सहल करीत आहे आणि काय सांगावं.. या ‘बोलघेवडय़ा’ मंडळींनी ‘मग मौनालाही शब्द फुटावेत असं काही करून टाकलं त्यांच्यामुळे त्यातील त्या काही मुक्या मुलांना सहलीचा ‘बोलका अनुभव’ आला व सहल संचालक या नात्यानं बोलघेवडय़ांनी मला मुकं केलं.
पहाटेच्या थंडीत गार वाऱ्यात टूर्सची मुलं कल्याण स्टेशनला उतरली. एव्हाना मुलांनी कानातली मशीन लावायला सुरुवात केली. एक-एक जण ‘त्यांच्या भाषेतलं थँक्यू’ म्हणत म्हणजे ‘फ्लाइंग किसची’ खूण करीत जायला लागले आणि ते ‘न बोललेलं थँक्यू’ कानात रुंजी घालायला लागलं.