ब्लॉग माझा : शेळके नावाचा जवान Print

 

alt

कमला जयंत करगुटकर , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सकाळची वेळ होती. शाळेत जायला निघाले होते. स्टेशनवरून शाळेत जाताना चार-पाच तरी सहकारी भेटायचे. मग गप्पा मारत आम्ही जायचो. श्रावण महिना होता तो. श्रावण म्हणजे सगळ्याच गोष्टीची रेलचेल.  प्रसन्न व आनंदी वातावरण. तेवढय़ात एकीने  मला हटकले, ‘‘अहो मॅडम, तो बघा तुमचा विद्यार्थी शेळके. टपरीवर चहा पितोय.’’ पाहते तो तोच होता. म्हटलं, ‘‘शाळेत गेल्यावर विचारते त्याला.’’
तेव्हा मी सहावीची वर्गशिक्षिका होते. सहावीतला मुलगा टपरीवर चहा पितो? मन थोडं बेचैन झालं. तसा शेळके शांत नम्र. अभ्यासात बरा. शारीरिक शिक्षण, मैदानी खेळ यात तो हुशार होता. मितभाषी, हसतमुख. बेल झाली वर्गात गेले. वर्गात मी त्याला काहीही विचारले नाही. इतर मुलांसमोर नको तो विषय. पहिली तासिका संपल्यावर मी त्याला बाहेर बोलावले आणि विचारले. ‘‘काय रे आज तू टपरीवर चहा पीत होतास?’’ ‘‘बाई मी तर रोजच टपरीवर चहा पितो.’’

‘‘काय रे, घरी काय आई तुला चहा देत नाही काय?’’ ‘‘नाही तसं नाही. माझे आई-वडील गावाला असतात.’’ ‘‘मग तू इथे कोणाकडे राहतोस? काका, मामा कोणाकडे?’’ ‘‘नाही बाई मुंबईत माझं कोणीही नाही. मॅडम, मी केळ्याच्या वखारीत राहतो. गाववाल्यांसोबत.’’त्याचं हे उत्तर ऐकून काय बोलावं सुचेना. ‘‘केळ्याच्या वखारीत? वखार कोणाची आहे? तुमची?’’ मी विचारले. ‘‘नाही बाई गाववाल्यांची आहे.’’ घरच्या गरीब परिस्थितीमुळे शाळा शिकण्यासाठी आईविना मुंबईत येऊन राहिलेले हे सहावीतलं पोरगं आणि त्याने जी काही चित्तर कथा ऐकवली ती औरच! तो सकाळी उठून थंड पाण्याने आंघोळ करून शाळेत यायला निघतो. टपरीवर चहा घेतो. शाळा सुटल्यावर वखारीत जातो. खानावळीतून डबा आलेला असतो तो जेवतो आणि केळ्याची गाडी घेऊन केळी विकायला बाहेर पडतो. ती केळी संपली की वखारीत येतो. कधी केळी लवकर संपतात. कधी रात्र होते. ‘‘अरे मग अभ्यास तरी केव्हा करतोस?’’ ‘‘बाई, दुपारी जास्त गिऱ्हाईक नसतं तेव्हा गाडी सावलीला लावतो आणि अभ्यास करून टाकतो आणि आता श्रावण महिना असल्याने माल लवकर खपतो. परीक्षेच्या वेळी मात्र मालक थोडं कन्सेशन देतो. तेव्हा उशिरा जाऊन लवकर परत येतो व अभ्यास करतो.’’
हे सारं कशासाठी तर शिक्षणासाठी! माझ्यातली आई व माझ्यातली शिक्षिका जाग्या झाल्या. होता होईतो आपण याला सर्व प्रकारची मदत करायची असे ठरविले. माझ्या वर्गाला जे जे शिक्षक शिकवायला होते त्या सर्वाना सांगून त्याला मदत करण्याचे आश्वासन मी सर्वाकडून घेतले. त्या दिवसापासून माझं आणि शेळकेचं वेगळं नातं निर्माण झालं. घरी काहीही गोडधोड केलं की एक वाटा त्याचा असायचाच. सारं व्यवस्थित चाललं होतं, सहावीतून सातवीत, सातवीतून तो आठवीत गेला. आठवीला त्याला दुपार मिळाली. शाळा सुरू होऊन महिना-दीड महिना झाला असेल. अधूनमधून तो मला भेटतही होता.
एक दिवस त्याच्या वर्गशिक्षिका माझ्याकडे तणतणत आल्या व मला म्हणाल्या, ‘‘तुझा तो शेळके, रोज उशिरा येतो शाळेत. आता मात्र खूप झालं हे. आता नाही मी खपवून घेणार.’’ माझा तर विश्वासच बसेना. मी प्रश्नांकित मुद्रेने त्यांच्याकडे पाहातच राहिले; ‘‘विश्वास नसेल तर आज थांब आणि पाहा.’’ ‘‘अहो पण तुम्ही त्याला विचारलत का? का उशीर होतो?’’ ‘‘अहो १२.३० च्या शाळेला येणाऱ्यांना काय विचारायचं?’’
‘‘करते चौकशी मी.’’ असे मी त्यांना आश्वासन दिले. मलाही नवल वाटलं. नेहमी वेळेवर येणारा मुलगा का बरं त्याला उशीर होत असावा. कारण तो आळशी नक्कीच नव्हता. काहीतरी कारण नक्कीच असलं पाहिजे. मी थांबले. दुपारच्या शाळेची प्रार्थना झाली. त्याचा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. तो वर्गात आला नव्हता. मी जिन्याजवळ उभी होते. दहा-बारा मिनिटांनी धावत पळत खाली मान घालून तो जिना चढत होता. खाली मान घालूनच तो वर्गाकडे पळत होता. मी त्याला हटकले. ‘‘का रे उशीर का झाला? आणि तुझ्या वर्गशिक्षिका म्हणत होत्या. तू नेहमीच उशिरा येतोस म्हणून.’’ ‘‘होय बाई, त्याचं काय आहे.’’ खाली मान घालूनच तो सांगू लागला. ‘‘माझ्या धाकटय़ा भावाला मी शिक्षणासाठी मुंबईत घेऊन आलोय. त्यामुळे तो शाळेतून येऊन-जेवून आला की, मी त्याच्या ताब्यात गाडी देतो आणि मग शाळेला येतो. त्यामुळे होतो उशीर.’’ हे ऐकून मी थक्कच झाले. त्याला काय बोलावे? काय सांगावे? मला शब्दच सुचत नव्हते. आदराने आणि अभिमानाने माझा ऊर भरून आला होता. त्याला म्हटले वर्गात दप्तर ठेव आणि चल माझ्याबरोबर. मी त्याला घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले. त्याची सर्व परिस्थिती कथन केली. थोडे दिवस उशिरा येण्याची मुभा त्याला मुख्याध्यापकांनी दिली आणि त्याला वर्गात जायला सांगितले. त्याच्या वर्गशिक्षकांना बोलावून त्यांना या सर्व गोष्टींची कल्पना दिली. त्या   मला म्हणाल्या, ‘‘या सर्व गोष्टींचा छडा लावा.’’ ‘‘ठीक आहे.’’ असे म्हणून मी निघाले. एक दिवस त्या वखारीच्या मालकाला जावून भेटले. सर्व गोष्टी त्याला पटवून दिल्या आणि मग त्यानंतर मात्र त्याला कधीच उशीर झाला नाही.
नंतर तो १० वी पास झाला. साताऱ्याला सैनिकी शिक्षण घेण्यासाठी तो गेला आहे हे त्याच्या भावाकडून मला समजले. अधूनमधून त्याच्या भावाकडून त्याची खुशाली मला कळायची. आता त्याचा भाऊही दहावी पास होऊन शाळा सोडून गेला.
एक दिवस टीचर रूममध्ये मी काम करत होते. तेवढय़ात शिपाई सांगत आला. ‘‘बाई, तुम्हाला एक जवान भेटायला आलेत.’’ ‘‘अहो, मामा, असतील कोणीतरी पालक.’’ ‘‘नाही हो जवानच.’’ शिपाई मामा अभिमानाने सांगत होते. ‘‘जाऊन भेटा तर खरं मग समजेल.’’ टीचर रूमच्या बाहेर येते न येते तोच एक जवान माझ्या पाया पडू लागला. ‘‘अहो, हे काय करताय? हे काय करताय? आणि नमस्कार तुम्ही नाही तर आम्ही तुम्हाला करायचा.’’ असे म्हणत त्याच्या दोन्ही दंडांना धरत मी त्यांना उभं केलं आणि चेहऱ्याकडे पाहते तो काय? माझाच माझ्यावर विश्वास बसेना. उंचापुरा, दणकट शरीरयष्टीचा, सुदृढ बांध्याचा, सावळ्या रंगाचा, नाकीडोळी नीटस, स्वाभिमान, दरारा त्याच्या चेहऱ्यावर होता. देशाच्या जवानाचा वेश धारण केलेला. गोंधळलेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहात स्मितहास्य करत असलेला माझा शेळकेच माझ्यासमोर उभा होता! ‘‘अरे तू? तू इथे कसा?’’ त्याच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारत त्याच्या दंडाला पकडत मी म्हटले, ‘‘चल चल आपण प्रतीक्षा खोलीत जाऊन बसूया. मला आता दोन तास ऑफ आहेत. वेळ आहे ना तुला.’’ आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. तो कारगीलला असतो. आज शस्त्रास्त्र नेण्यासाठी तो मुंबईस आला होता. त्याला मुंबई पाहण्यासाठी दोन तास ऑफ दिला होता. म्हणाला, ‘‘बाई, मुंबई काय मी पाहिली आहे. मला तुम्हाला पाहायचं होतं. तुमच्याशी बोलायचं होतं आणि मुंबईत माझं तुमच्या शिवाय कोणीच नाही. त्याचे हे शब्द ऐकून मला भरून आलं. चहापाणी, कारगीलच्या गप्पा यात एक तास कसा गेला कळलंच नाही. कारगीलबद्दल बरीच माहिती त्याला मी विचारली त्यानेही मनमोकळेपणाने मला सांगितली. तो आला मला भेटला. तो आणि त्याचं कारगील हा विषय मला बरेच दिवस पुरला.
असेच पाच-सहा महिने गेले, रात्रीचे साधारण दहा वाजले असतील. जेवण आटोपून टी.व्ही. पाहात होते. तेवढय़ात फोनची लांबलचक रिंग आली. मुंबईबाहेरून फोन आल्याची ती खूण होती. माझं तर बाहेरगावी कोणीच नव्हतं. कोणाचा बरं असेल? मी फोन उचलला. ‘हॅलो मॅडम आहेत का?’’ हो मीच बोलतेय. ‘‘मॅडम मी तुमचा शेळके बोलतोय.’’ ‘‘अरे बोल, कुठून बोलतोयस?’’ ‘‘मॅडम कारगीलवरून’’ मग सुरू झाल्या गप्पाटप्पा. तेथील त्याचं जीवन, त्याचं राहणं, खाणंपिणं, लढाईची वर्णन. मी विचारत होते. तो सांगत होता. मी ऐकत होते. ‘‘मॅडम पुन्हा एकदा नमस्कार हा आशीर्वादाचा नमस्कार. मला खूप आयुष्य लाभू दे. देशासाठी लढू दे आणि लढता लढता मरण येऊ दे. बरं ठेवतो फोन.’’ मी फोन ठेवला आणि अभिमानाने सर्वाकडे पाहिले. सर्वाचे कान व डोळे माझ्याचकडे लागले होते आणि मग फोनवर त्याचं ते अंगावर शहारा आणणारं वर्णन ऐकले होते ते ते सारं कथन केलं. मुलंही कान देऊन ऐकत होती. आज मला एक वेगळंच समाधान मिळालं होतं. अशीच दोन-तीन वर्षे गेली. अधूनमधून त्याचे फोन येत होते. मी कथा ऐकत होते. शाळेत सगळ्यांना सांगत होते.
जून महिना होता. शाळेचे नवीन वर्ष सुरू झालं. आज शाळेचा पहिला दिवस होता. म्हणून थोडी लवकरच शाळेत गेले. काही वेळाने शिपाई माझ्याकडे आला व म्हणाला, ‘‘बाई पर्यवेक्षकांनी तुम्हाला बोलावले आहे. मी सरांकडे गेले. असेल काही काम. म्हणून सरांसमोर जाऊन उभे राहिले. ‘‘मॅडम बसा.’’ मी म्हटले, ‘‘नाही. सर, नो फॉरमॅलिटीज. काय काम असेल ते सांगा. करते मी.’’ मी म्हटले, ‘‘नाही हो बसा मॅडम आधी. बसा तर खरं.’’ सरांचा चेहरा गंभीर होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. एक लांब व दीर्घ श्वास घेत ते गंभीर आवाजात म्हणाले, ‘‘मॅडम, तुमचा शेळके लढता लढता शहीद झाला.. गावकऱ्यांनी त्याचं स्मारक बांधलंय गावाकडे. मी हजर होतो तेव्हा. मला तुमची खूप आठवण आली तेव्हा. त्याची आईही तुमची आठवण काढत होती.’’ मी हादरलेच. मन सुन्न झालं. मनात विचारांचा कोलाहल माजला. कुठेतरी काळजाच्या कोपऱ्यात असलेला तो. ६ वीतला तो. १० वीतला तो आणि जवान झालेला तो. त्याच्या तीनही मूर्त्यां माझ्यासमोर उभ्या राहिल्या. एक आदर्श, आदरणीय, शांत सुस्वभावी, हसतमुख, असा माझा शेळके देशासाठी लढता लढता शहीद झाला होता. अमर झाला होता. ‘‘सर मला का नाही कळवलं? मी आले असते त्याच्या गावी.’’ रडत रडत मी म्हटले, ‘‘अहो मी गावी गेलो होतो. तेव्हा घडले सारे आणि मी संपर्क तरी कसा साधणार होतो तुमच्याशी? मे महिन्याच्या सुट्टीतच घडलं सारं. त्यामुळे माझाही नाईलाज होता.’’
तेव्हाच मी मनात विचार केला. त्याच्या कुटुंबीयांना भेटायचं. एका आईने दुसऱ्या आईला भेटायचं. माझ्या दोन्ही डोळ्यातले अश्रू मला आवरेनात. सर माझं सांत्वन करत होते. दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहत होते. एका डोळ्यात दु:खाचा अश्रू होता, तर दुसऱ्या डोळ्यात अभिमानाचा!