ब्लॉग माझा : राहून गेलेल्या गोष्टी Print

प्रियंवदा करंडे ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२

माझी आई म्हणायची, नदीचा प्रवाह पुढे पुढेच वाहणार, पाठी नाही वळणार! तसाच संसार आहे, त्यामध्ये पुढे बघायचं, पाठी नाही वळायचं! तेच हितकारक असतं बरं सर्वासाठी!
आम्ही ‘ऊर्जा’ ग्रुपच्या सात-आठ मैत्रिणी सुजाताच्या घरी जमलो होतो. श्रावणातला पहिला दिवस आणि त्यात शुक्रवार! सुजाताने श्रावणाचं अगदी जंगी स्वागत केलं. दारावर मोगऱ्याचे गजरे सोडले होते.सेन्टरपीसवर एका परडीतही मोगऱ्याचे गजरे भरून ठेवले होते. त्या फुलांच्या घमघमाटानेच आम्ही प्रसन्नपणे आमच्या विषयाकडे वळलो. आम्ही सर्वजणी साधारण  समवयस्क! साठी उलटलेल्या! सुजाता नुकतीच तिच्या आयईएस शाळेतल्या शिक्षकी पेशातील नोकरीतून निवृत्त झालीय, पण तिचं समाजकार्य चालूच आहे. तिने या महिन्यासाठी विषय दिला होता - आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी! प्रत्येक मैत्रीण आपलं मन मोकळं करू लागली. सर्वजणी अगदी भावनाविवश होऊन बोलत होत्या. कुणाला वाटत होतं खरंच! नोकरीत उभा जन्म केल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. आता वेळ आहे, पण मुलं घरटय़ातून दूरदेशी उडून गेली आहेत. कुणी म्हणालं, माझं गाणं शिकायचं राहून गेलं. कुणाला चित्रकार व्हायचं होतं.. कुणाला वकील.. कुणाला डॉक्टर, नर्स! प्रत्यक्षात वेगळंच होतं. खरंच! माणूस किती स्वप्नं बघतो नाही? त्याला वाटतं, आयुष्य म्हणजे परीकथेप्रमाणे सुंदर, गोड गोड आणि सुखाच्या, आनंदाच्या डोक्यावर झुलणारं असतं; पण आपण जसजसे मोठे होऊ लागतो तसतसं वास्तव कळू लागतं.. मग वाटतं,
परीकथेत छान छान
स्वप्नांचे पंख असतात
तुमच्या आमच्या कथेत फक्त
वेदनांचे डंख असतात!..
हेच खरंय! आम्ही सर्वजणी आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलोत की, राहून गेलेल्या गोष्टी ‘का राहून गेल्या बरं?’ यावर फक्त चर्चा करू शकतो! आता ‘त्या’ करणं शक्य नाही, हे सत्य स्वीकारून पुढे जायचं एवढंच उरलंय.. पण मनाला एकदम चटका देणारं वाक्य नीला उद्गारली आणि वाटलं, आमचं जाऊ दे, पण नीलाला तरीही राहून गेलेली गोष्ट त्यावेळी करता यायला हवी होती..
नीला तो प्रसंग आठवत होती, ‘‘मी कॉलेजमध्ये असतानाच माझे वडील वारले, नंतर माझं लग्न झालं, लग्नानंतरही मी पोस्टग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं, कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी करायला लागले, माझा संसार, मुलं, नोकरी या चक्रात मी पूर्ण गुरफटून गेले. माझी आई या काळात आजारी पडली. माहेरी तिला बघायला भाऊ-वहिनी होते गं, पण आईला वाटायचं, मी तिला भेटायला जावं. ती म्हणायचीदेखील मला, ‘अगं नीला, ये ना गं माझ्याशी गप्पा मारायला.. निवांत बसायला! ’ मीही कॉलेज वगैरे सांभाळून तिच्याकडे जायची, पण तिथे गेल्यावर मी पुस्तकं वाचत बसायचे. मला  वाचनाची प्रचंड आवड आहे, हे आईला माहीत होतंच गं, पण तिला मी पूर्णपणे तिच्याशी संवाद साधावा, असं वाटायचं! म्हणजे मी मनाने पुस्तकात असायचे ना, त्यामुळे तिला माझ्याशी मनसोक्त बोलता यायचं नाही. कधी कधी मी आईकडे गेले की, आरामात पलंगावर झोपून जायचे. आता वाटतं, आईला माझ्याशी काही बोलायचंच असेल असंही नव्हतं, पण मी तिच्याजवळ बसावं, माझा हात तिला हातात घ्यावा वाटायचा, असंसुद्धा असू शकेल.. कधी कधी नुसतं एकत्र बसून एकमेकांना बघण्यातही किती मौज आणि आनंद असतो.. पण मला आपली सदा घाई असायची.. आता वाटतं, मी त्यावेळी आईच्या या नाजुक, हळव्या मनस्थितीचा विचार करायला हवा होता. तिला काय हवं होतं हे ती शब्दात सांगू शकत नव्हती तर मी त्या तिच्या मनातल्या गोष्टी ओळखायला हव्या होत्या.. माझ्याकडून तिच्या फार फार साध्या अपेक्षा होत्या गं.. आता अगदी हळहळायला होतं.. तुम्हाला सांगते, तिला मी केसांवरून आंघोळ घालायला मदत करण्यासाठी जायचं ठरवलं.. आदल्या दिवशी खरं तर मी तिला भेटायला जाणार होते.. पण मला संसाराच्या व्यापात नाही जमलं. म्हटलं, दुसऱ्या दिवशी वेळ काढून जाऊ, तिला मदत करू.. पण दुसऱ्या दिवशी सकाळीच भावाचा फोन आला, आई गेली म्हणून.’’ नीला बोलायची थांबली. सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.. तेव्हा सुज्ञपणे सुजाता उठली आणि स्वयंपाकघरात गेली. सर्वासाठी गरमगरम केशरी दुधाचे कप घेऊन आली.. म्हणाली, ‘‘आता आपण छान पावसाची गाणी म्हणायची.’’ क्षणार्धात सगळ्या बालकवींची श्रावणमासाची कविता म्हणू लागल्या. कवीचं शब्दसामथ्र्यच इतकं विलक्षण की, लगेच सगळ्या आनंदी आणि प्रसन्नपणे गाण्याची मजा लुटू लागल्या.
शेवटी निरोप घ्यायची वेळ आली. आपाल्या घरी जाण्यासाठी आम्ही दरवाजापाशी रेंगाळत होतो. नीला आता हसत होती. मला एकदम आठवलं. मी मैत्रिणींना म्हटलं, ‘‘माझी आई म्हणायची, लता, नदीचा प्रवाह पुढे पुढेच वाहणार, पाठी नाही वळणार! तसाच संसार आहे, त्यामध्ये पुढे बघायचं, पाठी नाही वळायचं! तेच हितकारक असतं बरं सर्वासाठी! तू वाईट नको वाटून घेऊन तुला माझं काही फार करता येत नाही म्हणून.. तुझा संसार सुखाचा झाला की, मला सगळं पोहोचतच..’’ माझं बोलणं संपतं न संपतं तोच नीला उद्गारली, ‘‘अगदी बरोबर आहे गं! आपल्यालाही आता वाटतंच ना की, आपल्या लेकीबाळींचे संसार आनंदाचे, समाधानाचे व्हावेत म्हणून! आपलं काय आता?’’