ब्लॉग माझा : ‘इथे तेवते अखंड शौर्य ज्योती..’ Print

मीना गरीबे (जैन) ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
२६ जुलै कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. कारगिलमध्ये शहीद झालेल्या वीरांची स्मृती जपलेल्या ‘कारगिल वॉर मेमोरियल’ची ही हृद्य भेट.
आम्ही उभे होतो ‘कारगिल वॉर मेमोरियल’च्या पवित्र भूमीवर! सोनमर्ग ते कारगिलदरम्यानच्या रस्त्यावर द्रास सेक्टरमध्ये भारतीय सेनेने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयानिमित्त हे स्मारक उभारण्यात आले आहे. कारगिल युद्ध झाले १९९९ मध्ये, पण या स्मारकाची निर्मिती झाली २००४ मध्ये. भारतीय विजयाची गाथा कथन करीत हे स्मारक उभे आहे.
सोनमर्ग सोडले आणि प्रवास सुरू झाला तो अतिशय वळणावळणाच्या रस्त्यावरून. प्रचंड उंच हिमालयीन पर्वतराजीच्या कुशीतून खोदून काढलेल्या आव्हानात्मक, एकेरी रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू होता. एकेक वळण घेत घेत गाडी पहाडावर उंचच उंच चढत होती. उजव्या बाजूला सुमारे १४००० फूट खोल दरी. ‘पोटात गोळा येणे’, ‘देव आठवणे’, ‘सात जाणे आणि पाच राहणे’ या सगळ्या मराठी म्हणी एखाद्या भाषाशास्त्रज्ञाला या रस्त्यावरून प्रवास करतानाच सुचल्या असतील असे वाटावे अशी भीषण परिस्थिती. एकाच वेळी आजूबाजूच्या सगळ्या रम्य आणि रौद्र भीषण, बर्फाच्छादित निसर्गाचे रूप बघावेसेही वाटावे आणि त्याच वेळी काहीच बघू नये, फक्त डोळे बंद करून हा रस्ता संपण्याची वाट बघावी असे वाटायला लावणारा होता तो प्रवास! दोन्हीकडून बर्फाचेच कडे, दऱ्या, पर्वत असलेला जोझिला पास आम्ही ओलांडला होता. कडाक्याची थंडी ही किती कडाक्याची असू शकते हेही नुकतेच कळले होते.
सोनमर्गपासूनच सगळा परिसर हा लष्कराच्या निगराणीखाली असावा, कारण त्या उंचच उंच पर्वतावर प्रचंड थंडीत, थोडय़ा थोडय़ा अंतरावर एकेकटाच भारतीय जवान डोळ्यात तेल घालून बसलेला दिसत होता. या खडतर प्रदेशात या जवानांना बघूनच त्यांच्या विषयी आदराने डोळे पाणावत होते. त्या प्रदेशातील विपरीत भौगोलिक परिस्थितीचा अंदाज बांधता येत होता. हिमालय खूप उंच पर्वत आहे आणि तेथे खूप थंडी असते, असे फक्त वाचूनच माहिती होते, पण तेथे प्रत्यक्ष अनुभवता आले. या हिमाच्छादित आणि उंच पर्वतराजींवर भारतीय जवान खडा पहारा देत असतात. आता आम्ही पोहोचलो होतो ऑपरेशन विजय म्हणजेच कारगिल युद्ध स्मारकात! कारगिल युद्धाच्या दरम्यान भारतीय सैन्याने परत घेतलेली सगळी महत्त्वाची शिखरे इथून दृष्टिपथात येत होती म्हणून स्मारक या स्थळी उभारण्यात आले आहे.
डोक्यापासून पायापर्यंत स्वत:ला गरम कपडय़ांनी झाकून घेतले होते, तरीही थंडगार वारे चेहऱ्याला झोंबत होते. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे चालताना दम लागत होता, पण कारगिल स्मारक बघताना सैनिक किती विपरीत परिस्थितीत लढतात या कल्पनेने सैनिकांविषयी अभिमान वाटला.
‘‘वो जो चोटी आप देख रहे है, जो की नुकीली है और बरफ से ढँकी हुई है और सबसे उँची है, नाम है टायगर हिल’’
टायगर हिल हे शब्द कानावर पडल्याबरोबर कान एकदम टवकारले गेले आणि कारगिल स्मारकातील जवान, सुखविंदर सिंगने हाताच्या बोटाने दाखविलेल्या, दूरवर दिसणाऱ्या त्या उंचच उंच शिखराकडे सगळ्या ग्रुपच्या नजरा वळल्या.
लख्ख सूर्यप्रकाशात चमकणारे ते बर्फाच्छादित शिखर जणू काही आभाळातच घुसल्यासारखे वाटत होते. ढगांचे पुंजके त्या शिखराच्या आजूबाजूला रेंगाळत होतेच. ‘टायगर हिल’ म्हणजे खूप उंच पर्वत असेल या माझ्या कल्पनेला प्रचंड छेद देत आणि त्या कल्पनेच्याही कितीतरी पट जास्त उंच असलेला तो पर्वत नुसता बघतानाच शहारा आला. तो खरोखरच आपल्या नावाला जागणारा ‘टायगर हिल’च वाटत होता.
सुखविंदर सिंग सांगत होते की, या सगळ्या प्रदेशावर हिवाळ्यात बर्फाची चादर पसरते. ६० फुटांपेक्षा जास्त उंचीचे बर्फाचे थर सगळं गिळंकृत करतात. -६० अंश सेंटिग्रेडपर्यंत तापमान खाली घसरते.
असाच १९९९ मधील हिवाळा. टायगर हिल, तोलोलोंग हिल आदी पर्वत शिखरांवरील लष्करी ठाणे खाली करून नियमाप्रमाणे भारतीय फौजा बेस कॅम्पला परत आलेल्या, कारण भारत- पाकिस्तान या दोन देशांतला सिमला करारच तसा होता, पण पाकिस्तानने डाव साधला. या सगळ्या प्रदेशावर आपले सैनिक घुसवले आणि आजूबाजूच्या छोटय़ा गावांमधील भारतीय नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केली. या गावांमधील लोकांमुळे ही बातमी भारतीय सैन्याला समजली आणि मग प्रतिचढाईच्या हालचाली सुरू झाल्या.
पाकिस्तानी लष्कर उंच पहाडावर तर भारतीय सैन्य जमिनीवर! श्रीनगर-कारगिल-लेह हा हायवे पाकिस्तानी लष्कराच्या माराच्या टप्प्यात आलेला. आणि हा जर त्यांनी काबीज केला तर भारतीय सैन्याच्या हालचालींवर मर्यादा येणार. अशी सगळी विपरीत परिस्थिती. वरची शिखरे काबीज करण्यासाठी चढाई करायची ती रात्रीच्या कीर्र अंधारात आणि प्रचंड थंडीत!
सुखविंदर सिंग सांगत होते आणि त्या युद्धजन्य परिस्थितीचे जणू चलत्चित्र डोळ्यांपुढे सरकत होते. सगळा इतिहास डोळ्यांसमोर सजीव होत होता.
कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांची नावे इथे कोरलेली आहेत. त्यांच्या नामपट्टय़ासमोर एक अखंड ज्योत इथे सतत तेवत असते.
‘‘शहिदों की चिताओं पर हर बरस लगेंगे मेले, वतन पर मिटने वालों का यही बस निशाँ होगा’’
त्या दिवशी त्या अखंड ज्योतीसमोर आमच्या ४० लोकांच्या ग्रुपने सलामी दिली आणि भारतमातेचा जयघोष निनादला.
कॅप्टन विक्रम बत्रा आणि संजयकुमार यांना अतुलनीय पराक्रमासाठी ‘परमवीर चक्र’ प्रदान केले गेले. त्यांच्या शौर्यगाथेचे निनाद अजूनही त्या भूमीत घुमत आहेत असे वाटत राहते. आज १२ वर्षांनंतरही वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसवे त्या साहसकथेचे स्वर घुमत राहतात.
बाजूलाच ‘ऑपरेशन विजय’शी संबंधित कॅप्टन मनोज पांडे गॅलरी बनविलेली आहे. कारगिल युद्धाचे असंख्य फोटो तेथे लावलेले आहेत. एकेक फोटो बघताना अंगावर काटा उभा राहतो. आम्हां सर्वसामान्य नागरिकांच्या, या भारतभूच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेले हे जवान कोणत्या परिस्थितीत लढतात, कसे राहतात, काय खातात हे सगळे या फोटोतून डोळ्यासमोर येत होते.
चढाईसाठी सज्ज असणाऱ्या जवानांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा जोश त्या निर्जीव फोटोतूनही आपल्यापर्यंत पोचतो. पाकिस्तानी लष्कराकडून हस्तगत केलेला प्रचंड शस्त्रसाठय़ाचा फोटो धडकी भरवितो. तिरंग्यात लपेटून परत आलेल्या निष्प्राण देहाचा फोटो बघताना डोळ्याची कडा ओलाविते आणि मग विजयाचा जल्लोष! त्या जल्लोषात चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद, प्रचंड देशाभिमान, मातृभूमीविषयीचे प्रेम हे सर्व त्या फोटोची चौकट तोडून आपल्या अंगावर सुरक्षिततेची रिमझिम वर्षां करीत आहे असे वाटते.
२६ जुलै हा विजय दिन! कारगिल युद्ध या दिवशी भारतानं जिंकलं! पाकिस्तानी लष्कराने गिळंकृत केलेली सर्व ठाणी, सर्व शिखरे भारतीय सैन्याने परत ताब्यात घेतली. त्या सैनिकांच्या विजयाचे, पराक्रमाचे हे स्मारक. त्या विजयात हातातला हात निसटून शहीद झालेल्या वीरांच्या स्मृतीचे हे स्मारक! सैनिकांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे हे प्रतीक!
आज तिथे भारतीय तिरंगा डौलाने फडकत आहे. अमर जवान ज्योतीच्या बाजूला उभा असलेला जवान, हा महाराष्ट्रीय होता. तो चंद्रपूरजवळील घुग्गूस गावाचा. त्याच्याशी मराठीतून बोलताना छान वाटले.
काश्मीर आणि लेह-लडाख या आमच्या संपूर्ण प्रवासात जिवाला चटका लावून जाणारे हे स्थान! पराक्रमाची गाथा ऐकताना नतमस्तक व्हावंसं वाटावं असं हे ठिकाण! देशाचे रक्षण करताना सांडलेल्या रक्तानं सिंचित झालेली ही भूमी एक तीर्थक्षेत्रच!