ब्लॉग माझा : मुलगा झाला तर? Print

अमिता दरेकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आमच्याकडे पुन्हा ‘गोड’ बातमी आहे हे कळलं आणि आता मुलगाच होऊ दे हे वाक्य नाना प्रकारे, नाना ठिकाणाहून ऐकू येऊ लागलं. एका मुलीनंतर मुलगा हवाच हा एकच पर्याय आहे का ?


‘पहिली मुलगी आहे आणि दुसरा चान्स घेतलाय म्हणजे नक्कीच तुम्हाला मुलगा हवा असणार.’ आमच्याकडे पुन्हा ‘गोड’ बातमी आहे, हे कळल्यानंतर मला भेटलेल्या जवळपास ९९ टक्केस्त्रियांनी हीच भावना व्यक्त केली आणि तीही इतक्या ठामपणे की जणू आम्हा दोघांनाही असंच वाटतंय.
खरंच असं असतं का? आपल्याला एक तरी मुलगा हवाच, असं प्रत्येकाला वाटतंच का? काहींना मुलगीच हवी असेल. काहींना मुलगा-मुलगी काहीही झालं तरी फरक पडणार नसतो. पण, मुलगा हवाच असं वाटणाऱ्यांचीच संख्या आसपास अधिक दिसते, असा माझा अनुभव आहे. अनेकांना तर पहिली मुलगी असल्यानंतर दुसरा मुलगा झाला की ‘परिपूर्ण कुटुंब’ वाटतं. खरं तर, मुलगा असो वा मुलगी, एकमेकांना सोबत व्हावी, त्यांनी भावंडं म्हणून कायम आपली सुखदु:खं शेअर करावीत, इतका साधा विचार यामागे असायला हरकत नाही. पण, तसं होत नाही. अगदी सुशिक्षित माणसंही ’आता मुलगा झाला की झालं’ असं माझ्याकडे बोलतात तेव्हा मन खंतावतं.
आसपासची माणसं जे बोलतात, त्याच्या थोडंसं विरुद्ध दिशेला जाण्याची बंडखोरी वृत्ती काही माणसांमध्ये असते. ती चूक की वाईट, हा मुद्दा इथे नाही. पण, ही वृत्ती काही प्रमाणात माझ्यात आहे, हे मलाही मान्य आहे. त्यामुळेच कदाचित, समोरच्या बाईचं ‘या वेळी मुलगाच होणार बघ’ हे वाक्य आलं की चवताळल्यासारखं होतं. अलीकडे तर ‘मला मुलगीच हवी’ हे सांगताना थोडासा रागाचा पाराही चढतो की काय, असं वाटू लागलंय. हे वाक्य आता इतक्या वेळा ऐकून झालंय की चीड यायला लागलीय. अरे, आम्हाला नकोय मुलगा. आम्हाला मोठय़ा मुलीला कंपनी म्हणून दुसरीही मुलगीच हवीय. आम्हाला मुलीच आवडतात, असं ओरडून सांगावंसं वाटतं कधी कधी. पण मग वाटतं, अरे, या सगळय़ात आपल्याला कदाचित मुलगा होऊच नये, असं वाटतंय का? मुलगा झाला तर आपल्याला वाईट वाटेल का? हो. खरंच आता अशी भीती वाटायला लागलेय खरी..
मुलगा झाला, याचं वाईट नाही वाटणार कदाचित. पण, या सगळय़ा ‘मुलगा होऊ दे’वाल्यांना आनंद झाला, याचा राग नक्कीच येईल. शिवाय, आम्ही याचसाठी पुन्हा चान्स घेतला, हेच पक्कं झाल्यासारखं होईल, ते वेगळंच. आमच्यापेक्षा इतरांनाच त्या गोष्टीचा आनंद होईल की काय, असं वाटायला लागलंय.. चुकीच्या कारणं आमच्यावर लादली जाऊ नयेत इतकंच.
ही वाक्यं कानावर पडणं सुरू झालं तेव्हा योगायोगाने डॉ. मुंडेच्या रुग्णालयावर छापा टाकणं, त्या दोघांचं पळून जाणं मग त्यांचं पोलिसांना शरण येणं वगरे प्रकार सुरू होते. गर्भात रुजणारा एक जीव आणि नजरेसमोर अशा कित्येक कोवळय़ा जिवांना खुडून टाकल्याच्या बातम्या यामुळे मनाला काही प्रश्न पडले. मुलगी नको, असं नेमकं कोणाला वाटत होतं? त्या कोवळय़ा जिवाच्या नातेवाईकांना? यातल्या किती आयांनी फक्त नवऱ्याच्या, नातेवाईकांच्या दबावाला बळी पडून हे कृत्य केलं? किती बायकांना स्वत:लाही मुलगाच हवा होता?
एखादी बाई गरोदर आहे, हे कळल्याबरोबर तिच्या आसपासच्या लोकांचं सूचक बोलणं सुरू होतं. मुलगी होणं काही वाईट नाही. पण, एक तरी मुलगा हवाच, असं त्या बाईला कधी थेट तर कधी आडून सांगितलं जातं. काही बायकांना तर भीती वाटावी, इतका त्रास होत असणार. पहिली मुलगी एक वेळ चालून जाते. पण, त्यानंतर मुलगाच हवा असतो. काही शहरी, भिडस्त कुटुंबांमध्ये दुसऱ्या मुलीनंतर पूर्णविराम लागत असेल. पण, हेसुद्धा पक्कं सांगता येणार नाही. दुसऱ्या वेळेला गर्भिलगनिदान करून ‘योग्य कारवाई’ केली जातही असेल.
ही लागण सर्व देशभर आहे, हेसुद्धा याच काळात कळलं. दोन मुलीच असलेल्या एका मारवाडी आँटीने तर मला थेट विचारलं, टेस्ट करून चेक केलंस का मुलगा आहे की नाही? तिच्या या प्रश्नावर इतकं बावरायला झालं, कारण तोपर्यंत माझी अशी समजूत होती की असं काही इतक्या उघडपणे होत नसेल. तिला कसंबसंच मी सांगितलं की मुलगा असो वा मुलगी, मला काहीच फरक पडत नाही. घरी स्वयंपाकाचं काम करणारी गुजराती मावशी. जख्खड म्हातारी. एकुलता एक मुलगा तिला भयंकर त्रास देतो पशांसाठी. म्हणूनच या वयातही तिला कामं करावी लागतात. पण, तिची प्रतिक्रिया होती- अभी एक लडका हो जाएगा तो अच्छा है. बाद में ऑपरेशन करवा लेना. पत्रकारितेतील एक मत्रीणही हाच विचार करतेय, हे ऐकून तर धक्काच बसला. आम्हाला मुलगा नसला तरी चालेल, असं सांगितल्यावर तर ती म्हणाली, ‘तुम्हाला नको असेल पण घरच्यांना काही वाटतच असेल ना? त्यांच्या मनाचा नको विचार करायला.’ एकदा जरा धापा टाकत ट्रेनमध्ये चढले. अशा अवस्थेत असल्यामुळे एका काकूंनी सरकून जागा दिली. माझा श्वासही नीट झाला नव्हता तोवर त्यांनी चौकशी सुरू केली, पहिलीच वेळ का? आधीची मुलगी का, बरं. आता तुला मुलगाच होणार. दादर लोकल लक्षात ठेव हं. मुलगा झाला की पेढे दे आणून मला. काकूंना बोलायचा अगदी चेव चढला होता. मी शक्य तितक्या रूक्षपणे म्हटलं, ‘मला मुलगीही चालेल.’ त्यावरही त्या गप्प बसायला तयार नाहीत. ‘अगं, तू काळजीच नको करूस. मी सांगत्येय ना मुलगा होणार बघच तू.’ यावर मात्र त्यांच्याकडे माझा ठेवणीतला ‘लूक देऊन’ बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. माझ्या नजरेतून त्यांना कळलंच असणार. कारण, त्यानंतर अवाक्षरही आलं नाही.
काही दिवसांपूर्वीच एका आजीने माझ्यासमोरच देवाला साकडं घातल्यावर रागाचा पारा एकदम वर चढला. त्यानंतर मात्र आजी वरमल्या. ‘तुम्ही पण दोन बहिणीच ना. छान चाललंय की तुमचं. काही असो, देवाची करणी म्हणावं आणि गप्प बसावं.’ हे बोलतानाही दुसरी मुलगी म्हणजे देवाने कसली तरी शिक्षाच केलीय, असं समजावं आणि गप्प बसावं, असा सूर होता.
 गेले काही दिवस मी फक्त आणि फक्त अशाच प्रकारची वाक्यं ऐकतेय. खरं सांगायचं तर मी नाही करीत काळजी. मला नाही आलेलं टेन्शन मुलगी होईल की मुलगा याचं. आम्हाला काहीही चालेल. पण, गेले पाच महिने हे असं सगळं ऐकून जाम कंटाळा आलाय. प्रामाणिकपणे साांगायचं तर आता टेन्शन आलंय. खरंच मुलगा झाला तर..