ब्लॉग माझा : मुरलेले चवदार क्षण.. Print

सदानंद सिनगारे - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ताज्या कैरीचे लोणचे सासरी गेलेल्या आपल्या लेकीच्या हाती सोपविताना मनाची जी अवस्था होते ती अनुभवण्यासाठी आई-बापच व्हायला हवे किंवा सासरी गेलेली मुलगीच..  बरणी पाहताच मुलीने विचारले, ‘आई कशी आहे?’ लोणच्याला पाहताक्षणी तोंडाला सुटलेले पाणी तिच्या पापण्यांच्या कडेने जमा झाले होते .. मुरलेल्या  चवदार क्षणांची गोडी अशी अवीट असतेच..
जू न महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सर्वत्र लोणचे घालायचा उद्योग चाललेला असतो. माझ्या लहानपणी गावाकडे तर शेजारीपाजारी आयाबाया हा सामूहिक कार्यक्रम करायच्या. आज या घरचे तर उद्या त्या घरचे आंब्याच्या कैरीचे लोणचे घालायला एकमेकीला मदत करायच्या त्या. नव्याने सासरी आलेल्या मुलींना जर त्यांच्या घरात जुनेजाणते बाईमाणूस नसेल तर तिलाही मदत करावीच लागे. एवढे करूनही या घरचे वाटीभर लोणचे त्या घरी प्रेमाने द्यावे लागायचे. आता ते दिवस खूप मागे पडलेत. मात्र आपल्या सासरी गेलेल्या मुलीला एखादी लहानशी लोणच्याची बरणी अजूनही गावातून धाडली जातेच.
दोन वर्षांआधी लग्न होऊन माझी मुलगी सासरी गेली, तेव्हाची गोष्ट.. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात साधारणपणे पाऊस पडून हवेत थोडा गारवा आला आणि आमच्या घरात आंब्याच्या कैरीचे लोणचे घालण्याचा जंगी कार्यक्रम पार पडला. त्यावर दोन आठवडे उलटून गेले असतील. मुलीच्या गावी माझे कसलेसे सरकारी काम निघाले होते. मी त्या कामानिमित्त मुलीच्या गावी जाणार हे जाहीर झाले होते.
‘‘जाताना एवढी लोणच्याची बरणी सोबत न्याल का?’’ माझ्या सौभाग्यवतीने; प्रश्नार्थक चिन्हाचा शक्य तेवढा मोठा आकार करून मला विचारले. माझ्या सकारात्मक उत्तराची ती अपेक्षा करीत होती..
तिचा प्रश्न तसा फार काही बिकट नव्हता. उलटपक्षी तिचा स्वर अजिजीचा होता. याचे मला आश्चर्य वाटले होते. मी स्वत:च तिच्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ असे देऊन टाकले आणि तिच्या मुखावर मंद स्मित झळकले. कैरीच्या लोणच्याची बरणी; आमच्या सासरी गेलेल्या मुलीकडे पोहोचवायची होती. अर्थात आम्हा दोघांच्याही संयुक्त आनंदाचे ते काम होते आणि आम्हा दोघांपेक्षाही जास्त आनंद मुलीला होणार होता. आनंदाची ही काही रूपे केवळ पुस्तकात वाचून समजणार नाहीत. त्यासाठी सासरी गेलेल्या मुलीचे आई-वडील तरी व्हावे लागते किंवा सासरी गेलेली मुलगी तरी! आणि हो; केवळ आई-वडील होऊनही भागणार नसते. त्यासाठी कैरीच्या लोणच्याची बरणी मुलीकडे स्वत:हून पोहोचवावी लागते. तरच त्या आनंदाची अनुभूती होऊ शकेल व त्याची व्याप्ती कळू शकेल; अन्यथा नाही.
पती-पत्नीच्या आयुष्यात आलेल्या, निर्भेळ अशा आनंदाच्या क्षणापैकी, असे फार थोडे क्षण असतात. प्रवासात, लोणच्याची, काचेची बरणी घेऊन जाणे; अर्थातच ती व्यवस्थित सांभाळून नेणे व सुखरूप पोहोचती करणे, हे एक दिव्य असते. त्याला कसब लागते; परंतु मुलीच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भाव-भावनांची सरमिसळ आणि झालेला हृदय गदगदविणारा आनंद डोळे भरून पाहणे, या एकाच ध्येयापोटी ते केलेले असते.
लोणच्याच्या कैरीच्या लहान लहान फोडी आणि मीठ मसाला म्हणजे लोणचे? असे नसते काही! त्यातल्या त्यात आईच्या हातचे लोणचे म्हणजे काही बोलायलाच नको. मायेचा विविधगुणी मसाला भरलेल्या त्या फोडी असतात. खूप दिवस आस्वाद घेता यावा आणि तो पुरून उरावा आणि टप्प्याटप्प्याने घेता यावा, अशा ममतेच्या उत्साहवर्धक चूर्णाच्या पुडय़ाच त्या! रोजचे जेवण हे केळीच्या पानावर असो की, स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत ताटात; पळसाच्या पत्रावळीवर असो की, चिनी मातीच्या थाळीत; लोणच्याची फोड असल्याशिवाय जेवण अपूर्णच राहणार, असा माझा अनुभव आहे आणि ते आईच्या हातचे लोणचे असेल तर गोडी अवीटच म्हणावी. त्याच्या परिणामकारक आस्वादाला तोड नाही. तो आस्वाद घेऊन मिळालेल्या समाधानाला जगात तोड नाही.
आईने घातलेल्या लोणच्याच्या बरणीत केवळ आंबा-लिंबाच्या फोडी असतात, असे मानणे हे अरसिकतेचेच लक्षण!
आमच्या मते तिच्यात असतात साठवलेले आणि एकावर एक रचलेले, माहेरच्या अनेक सुखकारक हृदयस्पर्शी प्रसंगांचे मधुर क्षण, व्याकुळ काळजातल्या ओलाव्याचे मसाल्याचे थर. लहान भावंडासोबतचे लुटुपुटीच्या रुसव्या-फुगव्यांचे गोड-आंबट चवीच्या रसाचे मिश्रण. आई-बाबांच्या मायाळू हाताच्या स्पर्शाची आठवण करून देणारी अवीट गोडी. भातुकलीच्या खेळाची परकरी लय आणि भोंडल्याच्या गाण्याचा नाद.
माहेराचे सुखा-दु:खाचे; मीलन-विरहाचे; तळमळ व कळकळीचे; गदगदलेले; गहिवराचे; मांडवाखालचे; मुंडावळ्यांचे, या हृदय उचंबळविणाऱ्या क्षणांच्या संपृक्त द्रावणाच्या एकत्र मिश्रणाचे मुरलेले चवदार क्षण..
मुलीच्या सासरी पाठवलेले कैरीचे लोणचे हे आईच्या ममतेचे प्रतीक. ही आईची माया रोज रोज थोडी थोडी पुरवून खाल्ली की, तिची गोडी आणखीच वाढत जाते. ज्यांच्या नशिबी हा योग नसेल ते करंटेच म्हणावे लागतील. लोणच्याच्या फोडीला पाहून ज्यांच्या तोंडाला पाणी सुटणार नाही ती माणसे आमच्या मते अरसिक किंवा स्थितप्रज्ञ तरी असावीत.
मी सहसा प्रवासात थोडेसेच सामान घेऊन जाणे पसंत करतो; परंतु या वेळी, लोणच्याची बरणी; पाच-दहा लिंबे; एक डझन केळी; नातीसाठी पिटुकली छत्री व तिच्या खेळण्यातली लहान बादली आणि एक डोळे मिचकाविणारी बाहुली, असे ‘ओझे’ घेऊन निघालो होतो. तिची आज्ञा जराही आढेवेढे न करता पाळल्यामुळे माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटलेले माझ्याविषयीचे कौतुकाचे भाव तेवढय़ात मी टिपून घेतले. माझ्या स्वभावात झालेला हा बदल तिला जाणवला असावा. यदाकदाचित पुरुषांच्या कृतीतून मायेचा पाऊस पडलाच तर तो अवकाळी पाऊस व स्त्रिया जो सतत ममतेचा पाऊस डोळ्यावाटे पाडत असतात तो श्रावणातला रिमझिम पाऊस असा सर्वसामान्य समज तिचाही होताच. त्याला काय इलाज?
हे मान्य करायलाच हवे की, वर्षांकाळात आभाळात अचानक ढगांची दाटी व्हावी आणि सर्वत्र पावसाचे लहान-मोठे थेंब पडत राहावे ही स्थिती बायकांच्या बाबतीत वारंवार येते. याचा अर्थ पुरुषांच्या मनात गहिवरलेले ढग कधीच वस्तीला येत नाहीत असे थोडेच आहे! अशा ढगांची दाटी पुरुषांच्या मनातसुद्धा होते; परंतु ते गळ्यातच अडकून पडतात आणि जेव्हा ते डोळ्यावाटे बाहेर पडण्याची घाई करतात तेव्हा, पुरुष त्यांना संयमाचे बांध घालून अडवतात. कारण ते एकदा फुटले तर कोण अडवणार?
आमचा हा साठीचा काळ, म्हणजे परतीचा ऋतू. आज आहोत, उद्याचा काय भरवसा? दुसऱ्याला आनंद देण्यात आणि तो त्याच्या मुखावर दृगोचर झालेला पाहण्यात खरा आनंद आहे; तो अनुभवणे हेच आपले आता कार्य उरले आहे; असे वाटायला लागले आहे. इकडून पाठविलेली मायेची सावली त्या टोकाला नेऊन ठेवावी आणि त्या सावलीत शांत झालेल्या जिवाला स्वस्थ वाटावे, त्याला झालेले सुख आपण डोळ्यांत साठवावे; तेच भरलेले डोळे घेऊन परत फिरावे यापरते सुख ते कोणते? आणि हाच एकमेव उद्देश माझ्या लोणच्याच्या बरणीशी निगडित होता आणि म्हणून मी ती न कुरकुरता नेली व सुरक्षित पोहोचविलीसुद्धा. त्याचा अपेक्षित परिणाम झालाच. मुलीला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर उमटला, तो मी वाचला; परंतु त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. ती फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे. तरीही ती जी काय मनातल्या मनात पुटपुटली असावी त्याचा मथितार्थ असा असावा, असे माझ्या कविमनाला आपले वाटून गेले.
‘लोणच्याच्या बरणीला जाता-येता पाहू
मुरलेली माया आई तुझी रोज तोंडी लावू
लोणच्याची चव अशी तोंडाला सुटे पाणी;
माऊलीला आठवता उभ्या डोळ्यांत रोहिणी’
बरणी पाहताच मुलीने विचारले, ‘आई कशी आहे?’ लोणच्याला पाहताक्षणी तोंडाला सुटलेले पाणी तिच्या पापण्यांच्या कडेने जमा झालेच. ते लपविण्यासाठी तिने माझ्याकडे न बघताच सगळ्यांची विचारपूस केली. डोळ्यांतल्या पाण्याला आतल्या आत ढकलून, माझ्याकडून खुशालीचे वर्तमान वदवून घेतल्यानंतरच तिच्या मुखावर उमटलेल्या आनंदाची आभा घरभर पसरली. अर्थ आणि कांचनाची अपेक्षा नसलेल्या तिच्या भावभावनांच्या लहरी मी वाचण्याचा प्रयत्न केला. त्यातून अस्फुट असा ध्वनी ऐकू येत होता.
‘जेथवर तुझी काया; तेथवर तुझी माया
माहेरच्या वाऱ्यासंगे, अनुभवू तुझी छाया
लोणच्याच्या बरणीत; गच्च भरला आठव
माये तुझी फक्त आता; खुशाली पाठव’
या टोकावरची खुशाली बरणीत भरून त्या टोकावर पोहोचवायची आणि त्या टोकावरचा अखंड सौभाग्याचा हिरवागार निर्भेळ आनंद पसरलेल्या घरातले तेजोमय सौख्य मनात साठवून, त्याचा उजेड आपल्या घरभर पसरवायचा, यातच तर आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मी ते सत्कार्य आटोपून घरी परतलो. घरी आल्या-आल्याच माझ्यावर तिकडच्या खुशालीबाबतच्या प्रश्नांची सरबत्ती झाली. मी मुलीचे क्षेमकुशल सांगितले. नातीच्या बाळलीला वर्णन केल्या. ती भान विसरून ऐकत होती. प्रश्न आणि उपप्रश्न विचारीत होती.
तिच्या चेहऱ्यावर वैतागाच्या रेषा नव्हत्या. प्रश्न साधे आणि सरळ होते. मी पैकीच्या पैकी प्रश्न सोडवून प्रथमच तिने घेतलेल्या परीक्षेत चांगले मार्क मिळविले होते.
तिने विचारलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक महत्त्वाचा प्रश्न हा होता. लोणच्याची बरणी व्यवस्थित नेली ना? हा प्रश्नही मी क्षणात सोडवला होता आणि तोही १०० टक्के बरोबर.