ब्लॉग माझा : वृक्षसखी Print

दीपाली कात्रे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

पाऊस आज ‘खायला’ उठला होता, पण मला जायला हवं. माझ्या सखीसाठी. हो, मी तिला जवळपास आठ वर्षांनी भेटणार आहे, पण त्याआधी तिच्या ‘नातेवाईकांना’ भेटायला हवं, कारण ती नक्की विचारणार त्यांच्याबद्दल.. फोनवरून सांगणं शक्यच नव्हतं, तशी तिची अवस्थाही नव्हती..
छत्री घेतली, तरी अंगावर तुषार उडतच होते. उडू दिले त्यांना.. आज त्यांच्याशी मजा करावी असं वाटत नव्हतं. तिचे ‘नातेवाईक’ रक्तामांसाचे नसले म्हणून काय झालं, अचल असले म्हणून काय झालं? त्यांच्यावर नजर टाकावी आणि नंतरच तिला भेटावं असं मीच ठरवलं..
जवळपास १५ वर्षांपूर्वी तिनंच मला हे ‘नातेवाईक’ दाखवलं होतं. ती माझ्यापेक्षा लहान तरी आमची मुलं एकाच वर्षांतली. सकाळी उठून      
‘जागृत’ गल्लीच्या तोंडापाशी भेटायचं. नंतर हळूहळू ‘लोकनगरी’चा रस्ता धरायचा. मुलांशी गप्पा मारत आम्ही मोठय़ा मैदानापाशी यायचो. मुलांना मोकळं सोडायचं. तेव्हाच तिनं या सागाची ओळख करून दिली, ‘‘हा पाहिलास, आडदांड वाटतो ना! पण पानांचा कोंब चिरड की हात लाल होतो.’’
उन्हाळ्यात रस्त्यात मध्येच थांबून ओळीनं असलेल्या पाच निलगिरीच्या झाडापाशी उभी राहायला सांगे. दोन पानांचा आवाज करून दाखवे.
काही वर्षांपूर्वी तिचा फोन आला होता. ‘‘नोकरी सोडलीस ना, मग घरीच का थांबलीस?  इकडे ये. या झाडाच्या बुंध्याला टेकून उभी राहा. झाड बोलेल तुझ्याशी. बघ बिचारा, सालपटी निघाली आहेत बघ.’’ ती प्रेमानं हात फिरवत होती.
‘‘काय मिळतं गं?’’ या झाडांच्या सहवासातून? मी विचारलं होतं तिला.
‘‘याची मस्ती, हा स्पर्श, ही मिठी ना दिवसभर पुरते मला.’’ तिनं म्हटलं.
‘‘सालपटी निघणारच. उन्हाळा चालू आहे ना? ऋतू बदलणार, झाडांची ठेवण बदलणार, दु:ख कसलं त्यात?’’
‘‘दु:ख नाही गं, तो साग बघ, पानांची गळती झाली, पावसाळ्यात मात्र भरगच्च. गळती म्हणजे दु:ख नाही. तो शिकवतो मला, द्वेष, मत्सर, करंटेपणा, कपटीपणा गेल्यानं माणूस असा पारदर्शी होतो ना तसाच भासतो हा साग. हे दोष गेलेच पाहिजेत. नंतरच माणूस ‘माणूस’ म्हणून जगण्यास लायक होतो.’’
मी आता त्या सागाजवळ उभी आहे. तिचं बोलणं आठवत होतं.. पाऊस कमी झालाय.. त्याच्या शेजारी तो शिरीष, गुलाबी तंतू, डौलदार, दिमाखात तुरा दाखवतोय अजून..
‘‘तुला आठवतो का? हा अजून कोठे दिसतो?’’
‘‘हो, दत्ताच्या देवळासमोर हं. त्याच्या शेंगा रस्ताभर रुतत जातात.’’
कधीतरी तिला लहर आली की बकुळीला भेटायला जात असू. पार शिवमंदिराच्या रस्त्यावर. एका जुन्या घरासमोर उभा होता. त्या वेळी वाकून वाकून बकुळ वेचायचो. तिनं बकुळ कोठे कोठे आहे आपल्या गावात याचे पत्तेच मला दिले.
‘‘तुला कसं गं माहिती?’’
‘‘माझा छंद आहे तो. माझे सोयरे, नातेवाईक आहेत ते. मी इथेच जन्मले, वाढले. सर्व गाव ठाऊक नाही, पण मोठी झाडं, वृक्ष कोठे आहेत, त्यांना आपलेपणानं कसं भेटायचं हे मला उपजतच माहिती आहे. मला त्यांची ओढ आहे.’’
..तिला उद्या काय सांगू? तुझा बकुळ रस्ता रुंदीकरणात मुळासकट उखडलाय..
एकदा तिने मला कदंब दाखवला. ‘‘सुगंध देणारा तो कदंब, त्याला तर दुपारी भेटायला हवं. तो आहे पश्चिमेकडे. ‘इस्टेट’मध्ये जावं लागेल.’’ मला घेऊन गेली तिथे. कृष्ण याच झाडाला झोके बांधायचा, गोपींशी खेळायचा, डोहापासचा कदंब खेळायला चेंडूप्रमाणे फुलं देई. हा कदंब आपल्या गावात आहे, हे मला माहितीच नव्हतं. त्या संध्याकाळी पाऊस थांबलेला होता. दोघी रिक्षा करून निघालो. पाण्याची बाटली, थोडे तांदूळ जवळ होतेच तिच्या! ‘इस्टेट’मध्ये आलो.
तो जवळजवळ ४० फूट उंच असलेला कदंब मी पाहतच राहिले. पाऊस पडला की फुललेला हा कदंब, त्याच्या फांद्यांना किती छान आकार होता! मुलांनी हात सोडून इकडेतिकडे धावायला सुरुवात केली..
‘‘बघ हे फूल, असंख्य टाचण्या टोचल्यात ना!’’
‘‘हो गं, किती सुवासिक आहे!’’
‘‘अगं म्हणून तर तो प्रेमाचा आहे बाई.’’
तिनं बुंध्याशी तांदूळ ओतले. पाऊस होता तरी मुळांना पाणी घातले. तेव्हा मी ज्या झाडापाशी उभी होते, ते झाड सप्तपर्णी होतं, हे तिनं मला सांगितलं.
‘‘पानं मोज त्या डेखाची.’’
‘‘सात आहेत गं.’’
‘‘औषधी झाड आहे ते!’’
मी चालतच होते, दुतर्फा वाढलेली ताम्रशिम्बीची झाडं, अजूनही पिवळी फुलं लेवून बसली होती. आता मात्र शेंगांनी लहडलेली. ‘लोकनगरी’च्या बाजूनं चालता चालता या झाडाच्या कमानी आता खूप लोभस दिसतात. झाली की पंधरा र्वष!
तिचा साग बघितला. निलगिरी पाहिली. बदाम, कडुनिम्ब, मोठा पिंपळ यांच्यात लपलेली शाळा पाहिली. पूर्वी फक्त पडक्या भिंती होत्या. आज सकाळीच चिल्लीपिल्ली आत जाताना पाहिली. तिला हे दृश्य सांगायलाच हवं. बरं वाटेल तिला..
हं विचारेल, ‘‘बदामाच्या झाडाला किती लाल पानं होती? ए कुसुंबी, रंग बघतेस ना.’’
‘‘हो, आंब्याच्या कोयीपासून येतात ती पानं पाहायची, तो हा रंग.’’
मला वेळ नसला की ती एकटीच फिरायला जाई. तिच्या या नातेवाईकांना भेटून येई. आता मात्र झाडांची कत्तल होत आहे, हे मी तिला सांगू शकत नाही..
गुलमोहर फुलला की ही मोहरून जाई. तिच्या दारात होता, मग काय, लाल फुलं देवाला वाहिलीच तिनं. तिचं झाडांपाशी बोलणं मजेशीर असायचं.
मी उद्या तिला भेटेन, तिचे नातेवाईक पाहिलं पण तिच्या छंदासारखं नाही. ते अंत:करण माझं नाही, पण मी फोटो काढलेत, ते दाखवीन. तिला खूप खूप आनंद होईल.
तिथं झाडं होती, पण ही लहानपणापासूनची.
तिला भेटण्यापूर्वीच तिच्या मुलानं स्पष्ट कल्पना दिली होती.. तिनं हे दुखणं स्वीकारलं आहे.. पण मी नाही स्वीकारलं.. एकच प्रार्थना, ती मला झुळझुळणाऱ्या पिंपळपानासारखी दिसली पाहिजे, तीच आठवण मला जपायची आहे..