ब्लॉग माझा : माझ्या आजेसासूबाईंच्या लग्नाची गोष्ट Print

अंजली भागवत ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

वैदिक विधीप्रमाणे लग्न करण्याची प्रथा माझ्या आजेसासूबाई सीताबाई रामचंद्र भागवत यांच्या लग्नापासून महाराष्ट्रात सुरू झाली. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात स्थान मिळवणाऱ्या माझ्या आजेसासूबाईंच्या लग्नाची ही गोष्ट ..
टी व्ही. सध्या चालू असलेल्या ‘उंच माझा झोका’ ही मालिका पाहत असताना मला आमच्या घरातील त्या काळातील जुन्या कागदपत्रांतील काही नोंदी वाचल्याचे आठवले. या नोंदी आहेत १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात थोर समाजसुधारक राजारामशास्त्री भागवत यांच्या स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह यांबद्दल त्यांनी मांडलेल्या विचारांच्या. त्यातच आमच्या घरातच झालेल्या एका मुंजीची व लग्नाची गोष्टही एका रोजनिशीत लिहिलेली आहे. माझ्या आजेसासूबाई आणि आजेसासरे (राजारामशास्त्री भागवत यांचे चुलत भाऊ) यांच्यात त्यावेळी वैदिक विधीप्रमाणे लग्न लागलं. वैदिक विधीप्रमाणे लग्न करण्याची प्रथा सुरू झालेल्या या लग्नाने महाराष्ट्रात त्यावेळी खळबळ माजली होती. पण त्याही आधी म्हणजे या लग्नापूर्वी माझ्या आजेसासूबाईनी शिकलं पाहिजे. त्याशिवाय मी लग्नाला उभं रहाणार नाही, असा आग्रह राजारामशास्त्री (दुर्गाबाई भागवत यांचे मामा) यांनी धरला होता. त्यासाठी वर्षभर वाटही पाहिली आणि नंतरच त्यांचं लग्न वैदिक पद्धतीने झालं. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात मानाचे स्थान मिळवणाऱ्या माझ्या आजेसासूबाई सीताबाई रामचंद्र भागवत यांच्या लग्नाची ही गोष्ट.
तत्पूर्वी राजारामशास्त्री भागवतांबद्दल थोडेसे. राजारामशास्त्री भागवत हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्य़ातील. मुंबईत त्यांनी शिक्षण घेतले व प्रथम शिक्षक व पुढे प्राध्यापक म्हणून काम केले. संस्कृत हा त्यांचा विषय. त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. ते नवमतवादी व न्यायमूर्ती रानडय़ांचे समकालीन होते. ते रानडय़ांना गुरू मानीत. पण अनेक वेळा गुरूला या शिष्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असे वाटे. वेदोक्त शास्त्रांचे संदर्भ देऊन आजचे ब्राह्मण हे रूढी-प्रथा व परंपरा यांनाच धर्म म्हणतात हे चुकीचे आहे, असे ते आपल्या लेखातून, भाषणातून सिद्ध करीत. म्हणून पुण्यात त्यांना विक्षिप्तराव शास्त्री म्हणत. त्यांच्या चुलत भावाच्या (म्हणजे माझे आजेसासरे रामचंद्र भागवत यांच्या) लग्नाबद्दल त्यांच्या मेहुण्यांच्या डायरीत ‘सहज आठवले म्हणून’ या शीर्षकाखाली एक नोंद सापडली ती आहे माझ्या आजेसासूबाई सीताबाई रामचंद्र भागवत (माहेरच्या रेवती लक्ष्मण गुणे) यांच्या लग्नाची. गुणे मंडळी कापडगावची. त्यांच्या कुटुंबात वडील तात्या, थोरला भाऊ यशवंत व थोरली बहीण बळी व धाकटी रेवती, अशी चार माणसे. आई नव्हती. तात्यांना जबर मधुमेह. मोठी मुलगी बळी हिला त्यांनी थोडे शिकविले होते, पण या शिक्षणामुळे तिचे लग्नाचे वय उलटून चालले तरी तिचे लग्न जमेना. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मुलीला रेवतीला फक्त बाळबोध लिहायला-वाचायला शिकविले. याच रेवतीच्या शिक्षणाची व लग्नाची गोष्ट तिचा भाऊ यशवंत यांनी नोंदली आहे. ती त्याच्याच शब्दात देत आहे -
‘इ. स. १८९७ चा फेब्रुवारी महिना असावा. मुंबईच्या मराठा हायस्कूलमध्ये राजारामशास्त्री भागवतांनी मला विचारले- ‘तुला बहीण आहे का? वय किती?’ मी म्हटले, ‘होय आहे. ११ वर्षांची.’ ‘उद्या तिला मी पाहायला येईन, असे तुझ्या वडिलांना सांग.’ दुसऱ्या दिवशी सकाळीच ते आमच्या घरी येऊन रेवतीस पाहून गेले. त्यानंतर एक-दोन दिवसांनी शास्त्रीबुवांची पत्नी, रामभाऊंची बहीण आणि एक बाई अशा तिघीजणी आमच्या घरी येऊन रेवतीस पाहून गेल्या. तात्या मला म्हणाले, ‘उद्या-परवा शास्त्रीबुवांना भेटून रेवती पसंत पडली का ते विचारून ये, पण गंमत अशी की, दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळीच शास्त्रीबुवाच आमच्या घरी आले व म्हणाले, ‘तात्या तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. आमच्या रामभाऊंना करून घेऊ.  पण लग्नापूर्वी तिला मराठी, थोडे बहुत इंग्रजी व लग्नातील विधी समजण्याइतके संस्कृत शिकवा. ते झाल्यानंतरच लग्न होईल. बनीच्या लग्न जमण्याची परवड झाली म्हणून रेवतीला शिकविले नव्हते. पण शेवटी ते अंगाशी असे आले.
शास्त्रीबुवांच्या सांगण्याप्रमाणे इंग्रजी व संस्कृत शिकविणे सुरू होईल, एक वर्ष होऊन गेले. शास्त्रीबुवामधून मधून घरी येऊन रेवतीची चाचणी परीक्षा घेत. तात्यांचा मधुमेह फारच जोर करू लागला.
रेवतीचे लग्न केव्हा व कसे होते या काळजीनेही आजाराबरोबर त्यांना घेरले. एके दिवशी धीर करून तात्यांनी शास्त्रीबुवांना विचारले, ‘रेवतीच्या शिक्षणाची लग्नानंतरही जबाबदारी आम्ही घेतो, पण विवाह आमच्या समोर झाला असता तर बरे; पण शास्त्रीबुवा पक्के हट्टी. ते म्हणाले, मी सांगितले तेवढे शिक्षण झाल्याशिवाय लग्न करावयाचेच नाही. तुम्ही काही काळजी करू नका. तुमचे काही बरे-वाईट झालेच तरी हे लग्न होईलच हे निश्चितच. शास्त्रीबुवांनी रेवतीच्या लग्नाच्या निमित्ताने वैदिक विवाह व मौजीबंधनांच्या विवाह विधीचा कसून अभ्यास केला. आश्वलायन सूत्राच्या आधारे त्यांनी लग्नातले व मुंजीतले खरे मंत्र व विधी तेवढेच शोधून काढून त्याचे एक पुस्तक तयार केले व रेवतीला दिले. रेवती जेव्हा विवाहमंत्रांचा उच्चार स्पष्ट करू लागली तेव्हा शास्त्रीबुवा गुण्यांच्या घरी आले. आपण लग्नाची तारीख २३ मे ठरवली आहे. तुम्ही मुलीला घेऊन साताऱ्यास यावे, असे सांगितले. त्या वेळी तात्या निजूनच होते. मी, रेवती, पानवलकर व एक स्वयंपाकी असे साताऱ्यास लग्नासाठी पोहोचलो. या लग्नाची अशी गंमत की ज्याच्याशी लग्न त्या रामभाऊंनाही त्यांच्या लग्नाबद्दल शास्त्रीबुवांनी पूर्वकल्पना दिली नव्हती. रामभाऊ त्या वेळी लोणावळ्यास गेले होते. तेथे त्यांना शास्त्रीबुवांचे कार्ड मिळाले. ‘आपले लग्न २३ मेला, आहे. साताऱ्यास यावे. त्याप्रमाणे लग्न झाले. २०० रुपये हुंडा दिला. लग्नापूर्वी नानूंची मुंज झाली. (प्रसिद्ध लेखिका कै. दुर्गा भागवत यांचा भाऊ) मुंजीचे ही विधी कोणते करावे हे त्यांनीच पुरोहिताशेजारी उभे राहून सांगितले. शास्त्रीबुवांनी डोक्यावर ‘तुर्की’ टोपी घातली होती. त्या काळातील तुर्कस्थानचा प्रसिद्ध कर्ता सुधारक केमालपाशाच्या सामाजिक कामाचा आदर म्हणून ही टोपी घातली होती. ही मुंज सातारला करंदीकरांच्या वाडय़ात झाली. दुसऱ्या दिवशी लग्नही तिथेच व्हावयाचे होते. आयत्या वेळी करंदीकर म्हणाले, ‘‘मुंजीसारखाच लग्नात काही प्रकार व्हायचा असला तर आमच्या वाडय़ात हे लग्न नको. तेव्हा लग्न साताऱ्यातच पण दुसऱ्या ठिकाणी एका वकिलाच्या घरी झाले. पुष्कळांनी व त्या वेळच्या वर्तमानपत्रांनी दोन्ही कार्यावर भडक टीका केली. वाईच्या एका वृत्तपत्राने लिहिले, ‘हे लग्न कायदेशीर होऊच शकत नाही,’ पण एकदोन दिवसांतच शास्त्रीबुवांनी साताऱ्यात सभा घेऊन ‘आपण वापरलेल्या विधींवर भाषण करून त्याचा पाठपुरावा केला.’
शास्त्रीबुवांच्या घरच्या या विधीमुळे सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. शास्त्रीबुवांनी हे विधी खानापूरच्या ‘धुरीण’ या पत्रात छापून प्रसिद्ध केले होते. वैदिक विधीप्रमाणे लग्न करण्याची प्रथा माझ्या आजेसासूबाई सीताबाई रामचंद्र भागवत यांच्या लग्नापासून महाराष्ट्रात सुरू झाली व आज याच पद्धतीने लग्नं होतात. आजींचे लग्न हे असे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात मानाचे स्थान मिळवील, असे आजींना वाटले तरी असेल का?