ब्लॉग माझा : होऊ कशी उतराई? Print

alt

विभावरी केळकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
खरं तर ती माझ्याहून वयाने बरीच लहान, पण विचाराने, मनाने मोठीच. त्यामुळे तिचे शुभाशीर्वाद व शुभेच्छा घेऊन मी घरून बाहेर पडले. सर्व व्यवस्थित होऊन आम्ही घरी आलो. ऑपरेशनचे बिल देताना त्यात तिचे ५०० रुपये आवर्जून घातले. १५-२० दिवसांनी तिचा परिचित आवाज आला, ‘जुना सामान, डबा-बाटली’. कोणीतरी अगदी जवळची हवीशी वाटणारी व्यक्ती यावी अशी मी तिची वाटच पाहत होते..


‘‘अ वं ताई, जरा दमा की! लई दिस झाले, तुमी दिसतच नाय! तुमच्या बिल्डिंगीत आवाज देते, तुमच्या माळ्यावर बी येते, पन रोजच दार बंद असतं, अन् तुमी नाय तर माजी भवानी बी होत नाय, तुमचं समदं ब्येस हाय नव्हं?’’
इतकं आस्थेने, आपलेपणाने, खऱ्याखुऱ्या प्रेमाने विचारणा होण्याचे क्षण आता दुर्मिळच होत चालले आहेत. ही होती  जिच्याशी २०-२५ वर्षांपासूनची नुसत्या चेहऱ्याने ओळख असलेली डबा-बाटली व जुने-पुराणे सामान घेऊन कुटुंबाची गुजराण करणारी बाई!
मी म्हटलं, ‘‘अगं, साहेबांना बरे नाही, ते हॉस्पिटलमध्ये आहेत. परवा त्यांचे ऑपरेशन आहे. त्या गडबडीत, धावपळीत मी असते. कधी तरी येते अन् पटकन हॉस्पिटलमध्ये जाते.’’
ती म्हणाली, ‘‘तरीपण उद्या कवा घरी येनार?’’
मी म्हटलं, ‘‘नक्की सांगत नाही, पण बहुतेक याच वेळेला सकाळी ११ च्या सुमारास येईन.’’
ती मान हलवून ‘येते ताई,’ म्हणून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी १० च्या सुमारास मी घरी आले व भरभर काम आवरून परत हॉस्पिटलला जाण्याच्या तयारीत होते. इतक्यात घराची घंटा वाजली. दार उघडले तर दारात स्वच्छ जुनेरे नेसलेली, मोठं कुंकू लावलेली, हसतमुख चेहऱ्याने ही डबा-बाटलीवाली, अनामिका, डोक्यावर रिकामा हारा घेऊन दत्त म्हणून उभी!
मी म्हटलं, ‘‘आत्ता कशी आलीस तू? मला थोडासुद्धा वेळ नाही तुला काही द्यायला! हे पैसे घे, दे तुझ्या मुलांना खायला काहीतरी. १५-२० दिवसांनी ये पुन्हा घरी.’’
ती म्हणाली, ‘‘वाईज जरा इकडं या, कुकू आना, आनी हे ५०० रुपये घ्या. सायबांचं काय ओपरेसन का काय म्हणताय नव्हं, मला अडानीला का कळतंय त्यातलं? पन त्यानला माजी गरिबाची भेट!’’
हे सगळं ऐकताच माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. शरीर थरथरले, मन शहारलं व अधिकच हळवं झालं. पण क्षणात विचार चमकून गेला की, ही शुभशकुनाची चाहूलच असावी. माझ्याही नकळत प्रतिक्षिप्त क्रियेने मी तिच्या पाया पडले. भावना व्यक्त करण्याला कशाचेही बंधन वा अट नसते. तिच्या डोळ्यांतले दोन अश्रू माझ्या हातावर ओघळून तिच्या पायावर पडले व माझे अश्रूही तिच्या पायावर स्थिरावले.
ती म्हणाली, ‘‘काय बी बोलू नगा. जा आता तुमी लगालगा, समदं ब्येस होईल बगा.’’
खरं तर ती माझ्याहून वयाने बरीच लहान, पण विचाराने, मनाने मोठीच. त्यामुळे तिचे शुभाशीर्वाद व शुभेच्छा घेऊन मी घरून बाहेर पडले. सर्व व्यवस्थित होऊन आम्ही घरी आलो. ऑपरेशनचे बिल देताना त्यात तिचे ५०० रुपये आवर्जून घातले. १५-२० दिवसांनी तिचा परिचित आवाज आला, ‘जुना सामान, डबा-बाटली’. कोणीतरी अगदी जवळची हवीशी वाटणारी व्यक्ती यावी अशी मी तिची वाटच पाहत होते.
ती घरात आली. म्हणाली, ‘‘ताई, साहेबांचं ब्येस आहे ना?’’
मी म्हटलं, ‘‘बैस जरा, हे ताक पी आधी. घसा कोरडा पडला असेल आवाज देऊन होय ना? अगं एवढे पैसे कुठून आणलेस नि मला दिलेस?’’
ती म्हणाली, ‘‘ताई दर वेळी तुमी काहीबाही देता, पोरान्ला खायला देता, कपडे देता, पैशाची नड भागवता, दादल्यानं मारलं की मायेनं दवा देता, त्येला नसबंदी करून घेयाला तुमीच सांगितलं, लई उपकार झाले, सुटका झाली माझी. गरिबाची कोन काळजी करतं ताई, तुमी एकल्याच कोनी तरी. दर महाशिवरात्रीला तुमच्या आईची आठवन म्हनून नवीकोरी साडीचोळी देता, त्या नव्या कपडय़ाचा चार दिस वास घेते बगा. लई ब्येस वाटतं, नाहीतर आम्हा गरिबाला कोरा कपडा कुठून मिळणार? मग मी बी आई सारकं करायला नगं का? ताई पन हे कोनाला सांगू नगा.’’
क्षणार्धात विचारांची वीज चमकली. केवढे प्रगल्भ विचार, केवढं श्रीमंत मन! अमाप पैसा व अति उच्च पदव्या असूनही असे प्रगल्भ विचार आणि मनाची श्रीमंती मिळविता येतेच असे नाही. भरल्यापोटी दुसऱ्याला देणे व स्वत: अर्धपोटी राहून दुसऱ्याला देणे यातील श्रीमंत विचार व सुसंस्कारित मन कोणते, हे आपण सुशिक्षितांनीच ठरवायचं. खरं पाहता हे निरागस भाबडं मनच नेहमी कृतज्ञ असतं. त्याने दु:खाची झळ जास्त अनुभवलेली असते, सुखाची मस्ती गावीही नसते. त्यामुळे हे भाबडं निष्पाप मन अधिक तरल, मनमोकळं, दिलखुलास असतं. आत-बाहेर असं काहीच नसतं, लाजेचा अडसर नसतो, प्रदर्शनाचं नाटक नसतं, मानापमानाचा खेळ नसतो, प्रसिद्धीची अपेक्षा नसते. अशा या साध्या-भोळ्या, निर्मळ जिवाने केलेल्या उपकाराची परतफेड होणे अशक्य!